You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टीव्हीवर फक्त कंगना राणावत आणि रिया चक्रवर्तीच का दिसतात? जेव्हा देशात कोरोनाने उच्चांक गाठला आहे
- Author, अमृता कदम आणि अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी
दोन दिवसांपूर्वीच भारतानं कोरोनारुग्णांच्या संख्येत ब्राझीलला मागे टाकलं. कोरोनाच्या रुग्णसंख्येत भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनलाय.
त्याआधीच्या आठवड्यात जीडीपीचे आकडे जाहीर झाले. जीडीपीचे आकडे नकारात्मक असतील, याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. पण ते व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षाही अधिक घसरले. -23.7 हा गेल्या तिमाहीतला आपला जीडीपीचा दर आहे.
पण या गोष्टींपेक्षाही एका अतिशय महत्त्वाचा प्रश्न इलेक्ट्रॉनिक मीडियामधून मांडला जात होता. सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणात रिया चक्रवर्तीचं काय होणार?
कोरोना, अर्थव्यवस्थेची घसरण, बेरोजगारी, सीमेवर भारत-चीनदरम्यानचा तणाव यापेक्षाही रिया चक्रवर्ती हा देशासमोरचा महत्त्वाचा मुद्दा बनल्याचं चित्र कोणतंही टीव्ही चॅनेल पाहताना निर्माण होत होतं.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या ऑफिसबाहेर माध्यमांनी ज्याप्रकारे रियाला गराडा घातला होता, त्या दृश्यावर सेलिब्रिटींसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
त्याघडीला माध्यमांच्या प्रतिनिधींना जणू कोरोना, सोशल डिस्टन्सिंग या सगळ्याचा विसर पडला होता. ही कोणत्या प्रकारची स्पर्धा आहे? सर्वांत आधी, एक्सक्लुझिव्हच्या शर्यतीच्या मागे नेमकी काय कारण आहेत? टीआरपीचं गणित, लोकांचा सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यातील रस की गंभीर विषयांपासून लोकांचं लक्ष हटविण्याचा प्रयत्न? हे पाहूया
नेपोटिझम ते ड्रग्ज रॅकेट- मीडिया ट्रायलचा प्रवास
14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केली होती.
सुरुवातीला सुशांतनं बॉलिवूडमधील नेपोटिझममुळे आत्महत्या केली का, या प्रश्नाभोवती सर्व तपास फिरत होता. अभिनेत्री कंगना राणावतने या निमित्तानं बॉलिवुडमधील नेपोटिझमवर निशाणा साधला आणि त्यानंतर माध्यमांमध्येही नेपोटिझमवर चर्चा सुरू झाली.
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, यशराज स्टुडिओ, दिग्दर्शक महेश भट्ट आणि संजय लीला भन्साली अशा अनेकांची नावं चर्चेत आली. काहींची चौकशीही झाली.
त्यासोबतच मानसिक आरोग्याचाही मुद्दा चर्चेत आला.
त्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पाटणा इथं तक्रार दाखल केली. सुशांतच्या कुटुंबीयांनी याचवेळी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आणि माध्यमांचा सगळा फोकस रिया चक्रवर्तीकडे वळला.
त्यानंतर रियाविरोधात एकप्रकारे मीडिया ट्रायलच सुरू झाली. रिया विषकन्या, रिया काळी जादू करायची का, रियानं सुशांतला त्याच्या कुटुंबीयांपासून कसं दूर केलं असे डिबेट्स सुरू झाले.
रिया विरुद्ध सुशांतचे कुटुंबीय असं चित्र निर्माण झालं. सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्येही 'जस्टिस फॉर सुशांत' म्हणजे रियाला शिक्षा असा काहीसा मतप्रवाह निर्माण झाला.
रियाचे आर्थिक व्यवहार, तिचे नातेसंबंध आणि अगदी तिचे व्हॉट्स अॅप चॅटही सार्वजनिक केले गेले. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रियाने हा मुद्दाही उपस्थित केला. पुरावा म्हणून मी सादर केलेले चॅट्स असे लीक कसे होतात, हा तिचा प्रश्न होता.
माध्यमांचा रियाच्या आयुष्यातील हस्तक्षेप इतका पराकोटीचा वाढला की, अगदी तिच्या इमारतीच्या वॉचमनलाही चॅनेल्सनी सोडलं नाही.
टीआरपीची गणितं?
एकीकडे अशाप्रकारे केल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं, तर दुसरीकडे टीआरपीचे आकडे मात्र काही वेगळंच सांगत होते. 24 जुलै ते 29 जुलैदरम्यान रिपब्लिक टीव्ही या चॅनेलनं 50 डिबेट शो घेतले. यापैकी 45 कार्यक्रम हे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित होते, तर एक कार्यक्रम हा NEET/JEE परीक्षेसंदर्भातला होता आणि एक होता कोरोनाबद्दलचा. यामुळे रिपब्लिक टीव्हीला 50 टक्के मार्केट शेअर मिळवण्यात यश आलं.
18 जुलैला रिपब्लिकन टीव्हीनं सुशांत प्रकरणी कंगना राणावतची मुलाखत घेतली. त्यावेळी BARC नं जाहीर केलेल्या टीआरपीच्या आकड्यांमध्ये रिपब्लिकन टीव्हीनं आघाडी घेतली. पण त्यानंतर काही दिवस त्यांचा टीआरपी घसरला.
मग त्यांनी सुशांत प्रकरणी एक विशिष्ट भूमिका घेऊन कव्हरेज करायला सुरुवात केल्यानंतर टीआरपीचे आकडे बदलले.
दर आठवड्याला येणारे टीआरपीचे आकडे पाहिले तर रिपब्लिक भारतनं तीन आठवडे आज तक आणि इतर चॅनेल्सना मागे टाकलं.
आज तकनं रिया चक्रवर्तीची मुलाखत घेतली, पण त्याचाही त्यांना फार फायदा झाला नाही. याचं कारण कदाचित रिया हीच खरी गुन्हेगार आहे, अशी लोकांनीही धारणा करून घेतली असावी. त्यामुळेच सोशल मीडियावरही अरेस्ट रियासारखे हॅशटॅग ट्रेंड होत होते.
माध्यमांनाही मग याच मार्गानं जाणं भाग पडल्यासारखं कव्हरेज सुरू झालं.
हे सर्व प्रकरण म्हणजे भारतीय माध्यमांमधला एक लज्जास्पद अध्याय आहे, असं ट्वीट पत्रकार रोहिणी सिंह यांनी केलं. टीआरपीसाठी भुकेले अँकर्स आणि त्यांचा कंपू 28 वर्षीच्या मुलीच्या मागे हात धुवून लागले आहेत, जेणेकरून त्यांच्या चॅनेल्सचा आर्थिक फायदा होईल. मीडिया हा आता 'झुंड' बनला आहे.
ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्तांनीही रिया चक्रवर्ती प्रकरणी माध्यमांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता.
या प्रकरणाचं वार्तांकन, मीडियाची भूमिका याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर म्हणाले, "ज्याच्यात लव्ह, सेक्स, धोका, ड्रग्स, थोडा हंगामा, मसाला अशा सगळ्या गोष्टी असतात अशी टिपीकल साऊथ इंडियन वा बॉलिवुड फिल्म बनण्यासाठी जो मसाला आवश्यक असतो, तो मसाला हल्ली पत्रकार शोधतात. आणि खासकरून टीव्ही चॅनल्समध्ये जे आऊट पुट डिपार्टमेंट असतं, त्यातले लोक ते शोधत असतात. हे सगळं एका सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सापडलं.
" त्यानंतर जे काही झालं, त्याला मी टिपीकल सुपारी पत्रकारिता असं म्हणेन. कारण यामध्ये नॉर्मल पत्रकारिता दिसत नाही. नॉर्मल पत्रकारिता असती तर यामध्ये इन्व्हेस्टिगेशन झालं असतं. आरडाओरडा कमी असता. हा एवढा आरडाओरडा का आहे, तर हा सगळा टीआरपीचा गेम आहे आणि मला आश्चर्य वाटतं या देशातलं कोर्ट, पत्रकारांच्या संघटना, प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया, प्रेस क्लबसारख्या संस्था यासगळ्यांनी एक भूमिका घ्यायला हवी होती.
"फिल्डवर काम करणाऱ्या सगळ्या पत्रकारांकडे माझी ही मागणी आहे. मी अनेक लोकांना म्हटलं तुम्ही विरोध करायला हवा. संजय दत्त प्रकरण जेव्हा सुरू होतं, त्याचा पाठलाग होत होता. त्या पाठलागाचा आम्ही हिस्सा होतो. मी पाठलाग केलाय संजय दत्तचा. पण त्यानंतर आम्ही आमच्या बॉसेसशी भांडून त्यांना हे करू शकणार नाही, हे सांगितलं. बऱ्याच पत्रकारांनी आणि टीव्हीमधल्या लोकांनी अशी भूमिका घेतली आणि त्यानंतर पाठलाग करण्याचे प्रकार कमी झाले.
"मला वाटतं, कदाचित कोरोनामुळे मंदीचं सावट, रोजगाराची भीती हे सगळं पत्रकारांनाही सतावत असतं. ज्यामुळे पत्रकार आपल्या संपादकांच्या, मालकांच्या विरोधात भूमिका घेत नाहीत. हे जे आत्ता चालू आहे, ते प्रचंड धक्कादायक आहे. माध्यमांच्या विश्वासार्हतेला धक्का लावणारं आहे. अशा पद्धतीची पत्रकारिता होत राहिली तर कदाचित यापुढच्या काळात या क्षेत्रात चांगले पत्रकार येणार नाहीत."
सर्वोच्च न्यायालयाची मीडिया ट्रायलवर भूमिका
रिया चक्रवर्तीने या मीडिया ट्रायलविरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. 10 ऑगस्टला तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताना म्हटलं होतं की, माध्यमांचं वार्तांकन पक्षपाती आहे. आपल्या खाजगीपणाचा सन्मान व्हायला हवा.
रिया प्रकरणी नसलं तरी सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीही मीडिया ट्रायलसंबंधी भूमिका स्पष्ट केली होती. आरुषी तलवार प्रकरणात ऑगस्ट 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं कोणत्याही प्रकारे बळी गेलेल्या, पीडित व्यक्तीच्या सन्मानाला धक्का लागेल असं वार्तांकन केलं जाऊ नये, असं म्हटलं होतं.
"मृत व्यक्तिच्या चारित्र्याची चिरफाड करण्याचा अधिकार म्हणजे माध्यम स्वातंत्र्य का? आपल्या राज्यघटनेनं मृत व्यक्तिलाही खाजगीपणाचा अधिकार दिला नाहीये का?" असा प्रश्न 2008 साली आरूषी प्रकरणाची चौकशी सुरू असताना अॅडव्होकेट सुरत सिंह यांनी उपस्थित केला होता.
ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनीही शेखर गुप्ता यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, की छोटा पडदा हा आता न्यायाधीश आणि ज्युरी बनला आहे.
लोकांची मानसिकता कारणीभूत?
माध्यमांनी रियाच्या रंगवलेल्या विषकन्या, सुशांतला कह्यात ठेवणारी गर्लफ्रेंड, त्याला व्यसनाच्या जाळ्यात ढकलणारी अशा प्रतिमेला टीआरपीचे आकडे आणि सोशल मीडियावरच्या हॅशटॅगवरून समर्थन मिळत असेल, तर समाज म्हणून आपल्याला हेच पाहायचंय का असाही प्रश्न निर्माण झाला. शिवाय आपली गतानुगतिक मानसिकताही या निमित्तानं समोर आली का?
कारण सुशांतच्या यशाचं श्रेय त्याच्या मेहनतीला देताना त्याच्या मानसिक अवस्थेला मात्र रियाला जबाबदार धरलं गेलं. एका चांगल्या मुलाला तिनं 'नादी' लावलं असा काहीसा सूर उमटत होता
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा मीडियाला मुलाखत देताना रियाने म्हटलं की गेल्या काही महिन्यात तिच्यावर जे 'निराधार' आणि 'खोटे' आरोप करण्यात आले त्यामुळे ती स्वतः आणि तिचं कुटुंब इतक्या मानसिक तणावात आहेत की त्यांना आत्महत्या करावी वाटते.
या तिच्या म्हणण्यालाही नाटकीपणा म्हणत 'तुला कोण थांबवतं आहे', 'आम्ही तर वाट बघतोय', 'सुसाईड लेटर लिहायला विसरू नको' असं टाळ्या वाजवत, मोठमोठ्याने हसून लिहिणाऱ्यांविषयी काय सांगतं?
मुलाखतीत रियाच्या हावभावावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्याचंच उदाहरण बघा. 'ती कॅज्युअल आणि कॉन्फिडंट वाटते.' 'पॅनिक अटॅक आणि अँक्झायटीविषयी बोलते, पण तसं दिसत मात्र नाही.' 'तिला अजिबात दुःख नाही.' 'ती आपलं हसू लपवण्याचा प्रयत्न करत होती'.
मंगळवारी (8 सप्टेंबर) रियाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं अटक केली. त्यावेळी रियानं एक टी-शर्ट घातला होता. त्यावर 'पितृसत्ताक व्यवस्था फोडून काढा' असं लिहिलं होतं.
हाच संदेश देणारे ट्वीटस अनेक सेलिब्रिटींनीही करायला सुरूवात केली, रियाला पाठिंबा द्यायला सुरूवात केली.
त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असल्या तरी रियामध्ये माध्यमं आणि लोकांना असलेला रस पाहता त्यामागचं नेमकं कारण इतर कशापेक्षाही समाजाच्या या मानसिकतेत आहे का, असा प्रश्न निश्चित उपस्थित होत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)