You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रिया चक्रवर्तीचा 'पितृसत्ताक व्यवस्था मोडून काढा' लिहिलेला टीशर्ट सोशल मीडियावर चर्चेत
'गुलाब असतात लाल,
व्हायोलेट असतात निळे,
पितृसत्ता फोडून काढू
तु आणि मी सगळे.'
अशी वाक्य लिहिलेला रिया चक्रवर्तीने घातलेला टीशर्ट सध्या सोशल मीडियावर गाजतोय. रिया चक्रवर्तीची सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात चौकशी चालू होती. त्याच संदर्भात तिला मंगळवारी नार्कोटिक्स ब्युरोने अटक केली.
NCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांच्या माहितीनुसार, "दीपेश सावंत यांना ड्रग्स खरेदी आणि देवाण-घेवाणप्रकरणी अटक करण्यात आलीय. डिजिटल पुरावे आणि जबाबांच्या आधारे दीपेश सावंत यांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची चौकशी सुरू आहे."
रिया चक्रवर्तीची रवानगी सध्या भायखळा तुरुंगात करण्यात आली आहे.
मंगळवारी जेव्हा रिया नार्कोटिक्स ब्युरोच्या ऑफिसमध्ये पोहचली तेव्हा तिने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला होता, ज्यावर ही वाक्य लिहिलेली होती. रिया चक्रवर्ती पितृसत्ताक विचारांची बळी ठरली आहे, असं मत अनेकांनी व्यक्त केलेलं आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटीही रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ पुढे आलेले आहेत. अनेकांनी तिच्या टीशर्टवरचा हा कोट शेअर केला किंवा रिट्वीट केला. करिना कपूर खान, विद्या बालन, अनुराग कश्यप, शबाना आझमी, फरहान अख्तर, आणि अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा अशा सेलिब्रिटीजने रियाच्या टीशर्टवरची वाक्य आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करत रियाला पाठिंबा दर्शवला.
"प्रत्येकाला चेटकीण चेटकीण म्हणत कोणाच्या तरी मागे लागायला आवडतं, अट इतकीच की जिला चेटकीण ठरवलं जातंय ती दुसऱ्याच्या घरातली असावी." अशा आशयाची पोस्ट सोनम कपूरने आपल्या इंस्टाग्राम वर लिहिली. यासोबत तिने रियाने घातलेल्या टीशर्टवर लिहिलेल्या संदेशाचा फोटोही पोस्ट केला.
करिना कपूर यांनी हा संदेश आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर केला तर विद्या बालन यांनी तोच संदेश शेअर करत जस्टीस फॉर रिया हा हॅशटॅग वापरला.
"अच्छा म्हणजे ती पैशाची हपापलेली नाही, आणि खूनीही नाही. तिने ड्रग्स घेतले/दिले. मग ही केस ज्यांची कोणाची होती त्यांचं अभिनंदन. कारण सुशांतला नाही पण लोकांना नक्कीच न्याय मिळाला असेल," अशा आशयाचं ट्वीट अभिनेत्री तापसी पन्नू हिने केलंय.
'सेक्रेड गेम' या वेबसिरीजमधली अभिनेत्री कुब्रा सेठने म्हटलं की रिया चक्रवर्तीला अटक झाली असेल पण ती 'खूनी' नाहीये. "देव रिया चक्रवर्तीच्या आईवडिलांना हे सगळं सहन करण्याची ताकद देवो," असं तिने लिहिलं. अटक झाल्यानंतर रिया चक्रवर्तीने तिच्यावर रोखलेल्या कॅमेऱ्यांकडे पाहून हात हलवत अभिवादन केलं होतं. 'आपण दबून जाणार नाही, तर जे घडतंय त्या विरोधात लढा देऊ,' असं तिच्या कृतीतून ध्वनित होत असल्याचं अनेकांचं म्हणणं पडलं.
दरम्यान सुशांत सिंहची बहीण श्वेता किर्ती सिंहने या प्रकरणावर ट्वीट करत लिहिलं, "गुलाब असतात लाल, व्हायलेट असतात निळे, जे सत्य आहे त्यासाठी लढा देऊ आपण सगळे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)