You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रिया चक्रवर्तीच्या 'मीडिया ट्रायल'वर विद्या बालन, तापसी पन्नूनं काय म्हटलं?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत गेल्या 14 जूनला आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्यानंतर त्यानं नेमकी आत्महत्या का केली असावी, याबद्दल बोललं जाऊ लागलं. त्याच्या आत्महत्येचा कायदेशीर तपासही सुरू झाला.
आधी मुंबई पोलीस आणि आता सीबीआय हा तपास करत असताना फिल्म इंटस्ट्री आणि टेलिव्हिजनच्या स्टुडिओजमध्येही चर्चेला तोंड फुटलं आहे. सुरूवातीला नेपोटिझम, बॉलिवूडमधील कंपूशाहीवर सुरू असलेली चर्चा गेले काही दिवस एकाच नावाभोवती स्थिरावली आहे- रिया चक्रवर्ती.
सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीकडे संशयाने पाहिलं जाऊ लागलं. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे गेल्यानंतर रिया चक्रवर्तीची तासन् तास कसून चौकशी केली जात आहेच, पण दुसरीकडे रियाला मीडिया ट्रायलला सामोरं जावं लागत असल्याचंही चित्र आहे. तसंच सोशल मीडियावरही रियाबद्दल अतिशय असभ्य भाषेत टीका केली जात आहे.
रियावर पैशाच्या लालसेचे आरोप करण्यासोबतच तिला बलात्कार आणि हत्येच्या धमक्या दिल्या जाऊ लागल्या. रियाच नाही तर बंगाली महिलांना सोशल मीडियावर लक्ष्य केलं गेलं. इंग्रजी बोलणाऱ्या, विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी तयार असणाऱ्या, आपल्या मनातलं मोकळेपणाने बोलणाऱ्या बंगाली महिला उत्तर भारतातील पुरुषांना बिघडवतात, अशी टिप्पणी सुरू झाली.
बॉलिवूडमधूनही सुरूवातीला रियाला समर्थन मिळालं नाही किंबहुना काही कलाकारांनीही रियावर आरोप केले.
अभिनेत्री कंगना रानौतने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत रियाला अख्तर कुटुंबीय (लेखक-गीतकार जावेद अख्तर यांचे कुटुंब) तसंच अगदी महिला आयोगापर्यंत सगळ्यांचंच समर्थन आहे, असं कंगनानं म्हटलं होतं. सतीश मानेशिंदेंसारखा प्रसिद्ध क्रिमिनल वकील रियासाठी कसा उभा राहतो, असा प्रश्नही कंगनानं उपस्थित केला होता.
अभिनेते शेखर सुमन यांनीही रियानं एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीवर टीका करताना म्हटलं की, जवळपास दोन महिने बाळगलेलं मौन सोडावं असं रियाला अचानक का वाटलं? या मुलाखतीतून तिला 'बिचारी', 'तिला सगळ्यांनी चेटकीणच बनवलं' अशी सहानुभूती मिळाली. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. पण मग ती मांडण्यासाठी तिला एवढे दिवस का लागले?
ज्या मुलाखतीबद्दल शेखर सुमन बोलत होते, त्याच मुलाखतीत रियाला प्रश्न विचारण्यात आला होता, की बॉलिवूडमधले कलाकार तुझ्या समर्थनार्थ समोर का येत नाहीयेत.
त्यावर उत्तर देताना रियानं म्हटलं होतं, की मला माहीत नाही. पण त्यांनी यावं, असं मला वाटतं.
रियाला पाठिंबा देण्यासाठी आता काही अभिनेत्री पुढे आल्या आहेत. अभिनेत्री विद्या बालन हिने रियाला ज्यापद्धतीने मीडिया ट्रायलला सामोरं जावं लागत आहे, त्याबद्दल आक्षेप घेतला आहे.
आपल्या पोस्टमध्ये विद्या बालननं म्हटलं आहे की, सुशांतसारख्या तरूण अभिनेत्याचा अकाली मृत्यू आता 'मीडिया सर्कस' बनला आहे. पण त्याचबरोबर एक स्त्री म्हणून रिया चक्रवर्तीच्या बदनामीमुळेही मला वाईट वाटत आहे. 'जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत निरपराध' असं तत्त्व असतं ना की 'आता जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत दोषी' असं झालंय? नागरिकांच्या घटनात्मक हक्कांचा तरी आदर ठेवा.
विद्या बालननं दाक्षिणात्य अभिनेत्री लक्ष्मी मांचु हिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना ही पोस्ट लिहिली होती.
रविवारी (30 ऑगस्ट) लक्ष्मी मांचुनं रियाला पाठिंबा व्यक्त करताना लिहिलं होतं की, वस्तुस्थितीची पूर्ण जाणीव नसताना रिया आणि तिच्या कुटुंबासोबत क्रूर वागणं सोडा. "इंडस्ट्रीमधल्या माझ्या मित्रांनो...हे लिंचिग थांबवा," असं म्हणत लक्ष्मीनं एक मोठी पोस्ट लिहिली आहे.
गायिका सोना मोहपात्रानंही माध्यमांमध्ये रियाची जी प्रतिमा रंगवली जात आहे, त्यावर टीका केली. सुशांतचं जाणं दुःखद आहेच आणि त्याला न्याय मिळायलाच हवा. पण रियाचे बिकिनीमधले फोटो दाखवणं, तिला 'विषकन्या' म्हणणं हा न्याय मिळवण्याचा मार्ग आहे का?
'कसाबलाही अशा वागणुकीला सामोरं जावं लागलं नसेल'
अभिनेत्री तापसी पन्नू आणि स्वरा भास्करनं रियाला ज्यापद्धतीच्या द्वेषाला सामोरं जावं लागत आहे, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
स्वरा भास्करनं ट्वीट करून म्हटलं आहे, "कसाबलाही अशाप्रकारे माध्यमांच्या द्वेषाला सामोरं जावं लागलं नसेल. रिया चक्रवर्तीची मीडिया ट्रायल ही भारतीय माध्यमांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. अशाप्रकारचा हिस्टेरिया पाहणाऱ्या आपल्यालाही लाज वाटायला हवी."
तापसी पन्नूनंही ट्वीट करून म्हटलं आहे, की मी सुशांत सिंहला वैयक्तिकरीत्या ओळखत नव्हते आणि रियाला ओळखतही नाही. पण माणूस म्हणून मला एक गोष्ट नक्कीच कळते, ती म्हणजे एखादी व्यक्ती दोषी सिद्ध झालेली नसताना कायदेशीर प्रक्रियेला बगल देत तिचा न्यायनिवाडा करणं चुकीचं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)