सनातन संस्था-हिंदू जनजागृती समिती काय आहेत? या संस्थांचं काम नेमकं कसं चालतं?

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गोविंद पानसरे यांच्या हत्येला 20 फेब्रुवारी 2023 रोजी 8 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

या दोन्ही संस्था एक आहेत की वेगळ्या, तसंच या संस्थांचं नेमकं कार्य काय? त्या शिकवतात काय? त्या चालवणारी माणसं कोण? त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आली आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.

"वैभव राऊतच्या घरात बाँब आणि बाँब बनवण्याचे साहित्य सापडले. यावरून सनातन संस्था दहशतवादी कारवाई करत आहे, हे सिद्ध होतं" असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला तर काँग्रेसने सनातनवर बंदीची मागणी केली होती.

यावर सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस म्हणतात की, "हिंदुत्ववादी वैभव राऊत हे सनातनचे साधक नाहीत. मात्र ते हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनात सहभागी असत. हिंदुत्वासाठी कार्य करणारा, धर्मासाठी कार्य करणारा, कोणताही हिंदू कार्यकर्ता हा सनातनचाच आहे असं आम्ही मानतो."

सनातनवर बंदी आणावी ही मागणी खोडसाळपणाची आहे असं ते म्हणतात. पण बाँबस्फोट प्रकरणात नाव येण्याची किंवा बंदीची मागणी होण्याचीही ही पहिली वेळ नाही.

सनातन आणि बाँबस्फोट प्रकरणं

याआधी गडकरी रंगायतन बाँबस्फोट, मडगाव बाँबस्फोट, नरेंद्र दाभोलकरांची हत्या, गोविंद पानसरेंची हत्या आणि गौरी लंकेश यांची हत्या या प्रकरणांत सनातनशी संबंधित कार्यकर्त्यांवर संशयाची सुई आली आहे.

1. गडकरी रंगायतन बाँबस्फोट

ठाण्यातील गडकरी रंगयातन नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये 4 जून 2008 रोजी बाँबस्फोट झाला होता. या स्फोटात सात जण जखमी झाले होते. या प्रकरणात सनातनचे साधक विक्रम भावे आणि रमेश गडकरी यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. या नाट्यगृहात 'आम्ही पाचपुते' या नाटकाचा प्रयोग होणार होता.

हे नाटक हिंदू धर्माच्या विरोधात आहे, असा आरोप सनातने केला होता. या विरोधातूनच हा बाँबस्फोट घडवण्यात आला असावा असं सरकारी पक्षाचं म्हणणं होतं. सनातनच्या साधकांना या कटात गोवण्यात आलं होतं असं संस्थेचे प्रवक्ते सांगतात.

2. मडगाव बाँबस्फोट

16 ऑक्टोबर 2009ला गोव्यातल्या मडगाव येथे बाँबची जुळवाजुळव करताना सनातनचे साधक मलगोंडा पाटील यांचा मृत्यू झाला होता, असं गोव्याच्या गृह मंत्रालयाने म्हटलं होतं.

जेव्हा गडकरी रंगायतनमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर सांगलीमध्ये दंगल झाली, त्यावेळी पाटील यांचं नाव ATSच्या रडारवर होतं. सनातन संस्थेने देखील हे मान्य केलं की मलगोंडा पाटील हे त्यांचे साधक होते.

सनातनचे प्रवक्ते राजहंस सांगतात, "या प्रकरणात सनातनला गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. उलट आमचे साधक मलगोंडा पाटील यांचं निधन झालं. ज्या इतर कार्यकर्त्यांवर या प्रकरणात आरोप ठेवण्यात आले त्यांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली. आता ते लोक तुरुंगाबाहेर आहेत पण त्यांची महत्त्वाची वर्षं वाया गेली."

3. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि विवेकवादी लेखक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात हत्या झाली.

सनातनशी संलग्न असलेल्या हिंदू जनजागृती समितीचे सदस्य वीरेंद्र तावडे यांच्यावर दाभोलकरांच्या हत्येचा संशय आला. त्यांना या प्रकरणात 2016 मध्ये अटक करण्यात आली.

सनातन संस्थेचे सदस्य सारंग अकोलकर हेही या हत्या प्रकरणात सहभागी आहेत, असा CBIला संशय आहे. अकोलकर सध्या फरारी आहेत. सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या हिंदू गोवंश रक्षा समितीच्या वैभव राऊत यांना अलीकडेच अटक करण्यात आली आहे.

4. गोविंद पानसरे हत्या प्रकरण

कोल्हापूर येथील कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांची 20 फेब्रुवारी 2015 रोजी गोळ्या झाडून हत्या झाली. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी या प्रकरणाचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आला.

कर्नाटकातील विचारवंत डॉ. M. M. कलबुर्गी आणि बंगळुरूतल्या पत्रकार गौरी लंकेश या दोघांच्या मारेकऱ्यांचे तावडेंशी संबंध आहेत, असा तपास संस्थांचा दावा आहे.

पानसरे खून प्रकरणात तपास करणाऱ्या SITनं सप्टेंबर-2015मध्ये सांगलीतून समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली. समीर हे सनातनचे साधक आहेत. गायकवाड यांना अखेर चौथ्या प्रयत्नात जून-2017मध्ये जामीन मिळाला.

हिंदुराष्ट्र स्थापन करण्याचा प्रयत्न

'वर्ष 2018 ते 2023 या काळात होणार्‍या तिसर्‍या जागतिक महायुद्धात प्रचंड मनुष्यहानी होईल. भारतालाही या युद्धाची मोठी झळ बसेल. सर्वत्रच घरे, रस्ते, पूल, कारखाने इत्यादींची अपरिमित हानी होईल. युद्धाच्या शेवटी भारतात हिंदुराष्ट्राची स्थापना झालेली असेल.'

हे लिहिलं होतं सनातन संस्था या वादग्रस्त संस्थेचे संस्थापक जयंत बाळाजी आठवले यांनी. पुढे ते लिहितात, 'भारतात हिंदुराष्ट्र स्थापन झाल्यामुळे जगभर हिंदू धर्माचा प्रसार करणे सुलभ होईल.'

सनातन आणि हिंदू जनजागृती या वेगळ्या संस्था?

हिंदू जनजागृती समिती आणि सनातन या दोन्ही संस्था वेगळ्या आहेत असं या दोन्ही संस्थांच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे. "सनातनची स्थापना ईश्वरप्राप्तीसाठी साधकांना मार्गदर्शन करणे आणि अध्यात्म प्रसार करणे यासाठी झाली आहे. हिंदू जनजागृती समिती देशातल्या अनेक हिंदू संघटनांच्या संपर्कात असते. अशा अनेक संस्थांपैकी एक सनातन संस्था आहे," असं सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस सांगतात.

पण या दोन संस्था म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं जाणकार सांगतात. "जरी या संस्थांची नावे वेगवेगळी दिसत असली तरी त्या एकच आहेत. दोन्ही संस्था अनेक उपक्रम एकत्रित घेतात. एकाच कार्यालयातून त्यांचं व्यवस्थापन होतं," असं 'सिंपल टाइम्स' या सकाळ समूहाच्या येऊ घातलेल्या वृत्तपत्राच्या संपादक अलका धुपकर सांगतात. त्यांनी सनातन संस्थेशी संबंधित अनेक विशेष बातम्या लिहिल्या आहेत.

"जेव्हा सनातन कुणाला माहीत नव्हती त्या वेळी सनातननं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन तरुणांना ब्रेनवॉश करून संस्थेत आणलं. त्यांच्या पालकांनी पोलिसांकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही," असं अलका धुपकर पुढे सांगतात.

ब्रेनवॉशिंगचे आरोप सनातनशी संलग्न असलेल्या हिंदू विधिज्ञ परिषदेचे प्रमुख संजीव पुनाळेकर फेटाळून लावतात. "सनातनतर्फे युवकांचे जे कार्यक्रम आयोजित केले जातात ते सर्वांसाठी खुले असतात. कोणताही कार्यक्रम छु्प्या स्वरूपाचा नसतो. त्या कार्यक्रमात सर्व स्तरांतील युवक सहभागी होताना दिसतात. ज्या पालकांचा विरोध असतो ते अशा प्रकारचे आरोप करत असतात."

'2023मध्ये हिंदुराष्ट्राची स्थापना'

सनातन संस्थेच्या वेबसाईटवर संस्थेचं हे उद्दिष्ट दिलं आहे - 'समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांद्वारे सर्वच दृष्ट्या आदर्श असलेले धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे.'

'परात्पर गुरू डॉ. आठवले यांचे विचारधन खंड -2, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा' या पुस्तकात लिहिलं आहे की '...डॉ. आठवले यांनी सर्वप्रथम 1998 या वर्षी भारतात वर्ष 2023 मध्ये 'ईश्वरी राज्य' म्हणजे 'हिंदुराष्ट्र' स्थापित होईल असा विचार द्रष्टेपणाने मांडला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर, आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार, पू. गोळवलकर गुरूजी आदी थोर पुरुषांनीही हिंदुराष्ट्राचा विचार प्रखरपणे मांडला. दुर्दैवाने स्वयंभू हिंदुराष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले आणि हिंदुराष्ट्र ही तेजस्वी संकल्पना झाकोळली गेली.'

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते संजय सावरकर सांगतात की "सुरुवातीच्या काळात सनातन संस्थेचं स्वरूप हे आध्यात्मिक प्रचार प्रसार करणारी संस्था असंच होतं. 1999 पर्यंत त्यांनी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मावर टीका केली नाही. सुरुवातीला विरोध होऊ नये म्हणून त्यांचं हे धोरण असावं. नंतरच्या काळात मात्र ही संस्था आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करताना आपल्याला दिसते."

सनातनचा लोकशाहीवर विश्वास नाही, असं त्यांच्या अनेक लेखांतून दिसतं. 'हिंदुराष्ट्राची स्थापना करण्यास राजकारणी आणि लोकप्रतिनिधी नव्हे, तर संतच सक्षम असणे!' या नावाचा त्यांनी लेख प्रकाशित केला आहे. तसंच, 'हिंदुराष्ट्रात निवडणुका नसतील' असं या लेखात लिहिलं आहे. हे करत असतानाच 'दुष्प्रवृत्तींच्या विरोधात कृती' करणंही आवश्यक आहे, असं ते त्यांच्या पाठीराख्यांना सांगतात.

पण हे हिंदुराष्ट्र नेमकं कसं होणार, त्यात हिंसेला स्थान आहे का, याविषयी सनातन संस्था स्पष्टपणे बोलत नाही. "सनातन संस्था अतिउजव्या विचारसरणीची आहे. ते हिंसेचं समर्थन करतात. हिंदुराष्ट्राची निर्मितीचं ध्येय बाळगून ही संस्था काम करते. हिंदू राष्ट्र निर्मितीमध्ये जे-जे अडथळे ठरतील ते नष्ट करणं हा त्यांच्या कार्याचा एक टप्पा आहे," असं सिंपल टाइम्सच्या संपादक अलका धुपकर सांगतात. 2015 साली अलका धुपकर यांनी गोव्यातील रामनाथी आश्रमाला भेट दिली होती आणि त्यांनी सनातनवर सातत्यानं वार्तांकन केलं आहे.

हिंसेच्या वापराबद्दल सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस म्हणतात, "समाज आणि धर्मजागृती करणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. सनदशीर आणि शांततेच्या मार्गानेच आम्ही हा प्रचार करत आहोत. गौरी लंकेश, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडले नाहीत. सनातनला सॉफ्ट टार्गेट बनवलं जात आहे. पुरोगामी विचारवंत सातत्याने हिंदूविरोधी लिखाण करत आले आहेत. सनातनने त्यांचा विरोध कायदेशीर मार्गानेच केला आहे."

डॉ. जयंत बाळाजी आठवले कोण आहेत?

डॉ. जयंत बाळाजी आठवले हे सनातन संस्थेचे संस्थापक आहेत. सनातनच्या वेबसाइटवर लिहिलं आहे की ते मानसोपचारतज्ज्ञ आहेत आणि त्यांनी ब्रिटनमध्ये सात वर्षं आणि नंतर भारतात प्रॅक्टिस केली. इंदूरचे भक्तराज महाराज हे त्यांचे गुरू होते.

1 ऑगस्ट 1991 रोजी डॉ. आठवले यांनी 'सनातन भारतीय संस्कृती'ची स्थापना केली आणि 23 मार्च 1999 या दिवशी सनातन संस्थेची स्थापना केली, अशी माहिती वेबसाइटवर दिली आहे.

2017 साली डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव (75वा वाढदिवस) गोव्यातल्या रामनाथी या ठिकाणच्या आश्रमात साजरा करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी श्रीकृष्णाचा वेश परिधान केला होता आणि ते सिंहासनावर बसले होते. पण त्यानंतर त्यांचा लोकांमधला वावर कमी होत गेला.

"सध्या डॉ. आठवले हे वृद्धापकाळाने थकले आहेत. त्यामुळे ते सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत. 2009 पासून ते आश्रमाबाहेर गेले नाहीत. गेल्या आठ-दहा वर्षांत ते गोव्यातील रामनाथी आश्रमातच राहतात," असं राजहंस सांगतात.

सनातनच्या साधकांचे अनेक चमत्कारिक दावे सनातनच्या वेबसाइटवर देण्यात आले आहेत. डॉ. आठवले यांच्या शरीराभोवती 'प्रकाशाचा गोळा' दिसणे, त्यांच्या सान्निध्यात सुगंध येणे, त्यांचा चेहरा कृष्णस्वरूप दिसणे असे दावे साधकांनी केल्याचं वेबसाइटवर म्हटलं आहे.

आठवलेंनी संमोहनाचा वापर करून तरुणांना गोळा केलं, असा दावा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी अनेक वेळा केला आहे. "डॉ. आठवले हे हुशार डॉक्टर आहेत. ते एरिक्सनियन हिप्नॉटिझम पद्धतीचा वापर करून साधकांच्या मनावर ताबा मिळवतात," असं ते म्हणतात.

'नग्न न होता अंघोळ करा'

सनातन संस्था त्यांच्या साधकांना अनेक गोष्टी शिकवते. सकाळी उठल्यावर दात कसे घासावे इथपासून रात्री कसे झोपावे इथपर्यंत सगळ्या गोष्टींचे सल्ले ही संस्था देते. सनातनच्या अधिकृत वेबसाइटवरचे काही सल्ले:

  • नग्न न होता अंघोळ करा. नसता वाईट शक्तींचा त्रास होऊ शकते.
  • उभ्याने लघवी करू नये.
  • शौचास जाऊन आल्यानंतर हात मातीने घासून स्वच्छ करावेत. टॉयलेट पेपर वापरू नये.

अनेक ठिकाणी हे सल्ले देताना सनातन संस्थेने त्यामागची कारणं देण्याचा प्रयत्न केला आहे. उदा.

  • रात्रीच्या वेळी आरशात पहाणे निषिद्ध आहे कारण आरशातील प्रतिबिंबावर वातावरणातील प्राबल्यदर्शक वाईट शक्ती लगेचच आक्रमण करू शकतात.
  • निर्जीव ब्रशने दात घासण्यापेक्षा सजीव बोटाने दात स्वच्छ केल्यास शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर लाभ होतो.
  • श्राद्धाच्या दिवशी दात घासू नयेत कारण तेव्हा पूर्वजांचे लिंगदेह पृथ्वीच्या कक्षेत येऊन संबंधित वास्तूत भ्रमण करत असतात. त्यावेळी तेज तत्त्वात्मक लहरींची तीव्रता घटू नये म्हणून जेवल्यानंतरही चूळ भरू नये.

पण सनातनच्या या सल्ल्यांना तज्ज्ञांनी विरोध केला आहे. दातांबद्दलच बोलायचं झालं तर श्राद्धाच्या दिवशी दात घासू नये, ही अंधश्रद्धा आहे, असं डेंटिस्ट सांगतात. बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. रविंद्र जोशी म्हणाले, "बोटाने हिरड्यांना थोडाफार मसाज होतो, पण दात साफ होत नाहीत. दोन दातांमधले कण साफ करण्यासाठी ब्रश आवश्यक आहे. अंघोळ करणं जितकं आवश्यक तितकंच रोज दात घासणं. गेलेल्या व्यक्तीपेक्षा जिवंत व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे."

सनातन संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध करतानाही असे तर्क देण्याचा प्रयत्न केला आहे:

  • हेअर ड्रायरने केस वाळवू नयेत कारण ड्रायरच्या ध्वनीकडे वायुमंडलातील वाईट शक्तींच्या लहरी आकृष्ट होऊन केसांच्या मुळांत संक्रमित झाल्याने देह अल्प काळात रज-तमाने युक्त बनतो.
  • वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुऊ नयेत कारण त्या कपड्यांतून त्रासदायक स्पंदने वायुमंडलात प्रक्षेपित होऊ लागतात.

सनातनच्या वेबसाईटप्रमाणेच 'सनातन प्रभात' या मुखपत्रातूनही असे विचार मांडले जातात. हे अवैज्ञानिक आहेत, असा आरोप त्यांच्यावर सातत्याने होत असतो. यातले अनेक दावे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुराव्यानिशी खोडून काढले आहेत.

सनातनच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुषांसाठी नियम वेगळे आहेत. जी गोष्ट पुरुषांसाठी वाईट ती स्त्रियांसाठी चांगली आहे, हे सांगताना त्यांनी जो तर्क दिला आहे, तो अनेकांसाठी समजणं कठीण आहे.

  • पुरुषांनी केस वाढवू नयेत कारण ते रजोगुणाचे प्रतीक आहेत.
  • स्त्रियांनी केस वाढवावेत कारण त्यांच्या देहातून रजोगुणाच्या साहाय्याने लांब केसांच्या हालचालींतून उत्पन्न झालेल्या तेजतत्त्वात्मक ऊर्जेचा उपयोग करून शक्तिलहरींचे वायुमंडलात वेगवान प्रक्षेपण करणे शक्य होते. त्या शक्तीलहरींमुळे वायुमंडलातील रज-तमाचे उच्चाटन होते. या शक्तितत्त्वात्मक कार्याचे प्रतीक, तसेच देहातील रजोगुणाच्या कार्याला पोषक आणि पूरक म्हणून स्त्रीने केस वाढवावेत.

मुस्लीम आणि ख्रिश्चनांविरोधात प्रचार

लव्ह जिहाद आणि धर्मांतर या दोन गोष्टींविरोधात हिंदूंनी एकत्र यावं असं आवाहन सनातन संस्थेने वारंवार केलं आहे. आठवलेंनी लिहिलेल्या 'धर्मांतर अन् धर्मांतरितांचे शुद्धीकरण' या पुस्तकात लिहिलं आहे की 'मुसलमान लव्ह जिहादद्वारे राष्ट्र पोखरत आहेत तर ख्रिस्ती धर्मांतराद्वारे हिंदू धर्म पोखरत आहे आणि धर्मशिक्षण नसल्याने धर्माभिमानशून्य बनलेला हिंदू समाज त्याला मोठ्या संख्येने बळी पडत आहे.'

हिंदू जनजागृती समितीच्या वेबसाइटवर सातत्याने अल्पसंख्याकांवर टीका होताना दिसते. पत्रकार धीरेंद्र झा यांनी 'शॅडो आर्मीज' या पुस्तकात एक प्रकरण सनातन संस्थेवर लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की 'सनातन संस्थेच्या 'स्वसंरक्षण प्रशिक्षण' पुस्तिकेत बंदूक कशी चालवावी याबाबत सदस्यांना मार्गदर्शन केले गेले आहे. ते असेही म्हणतात की गोळी चालवण्यासाठीचे लक्ष्य हे दुर्जन असावे. संस्थेचे प्रकाशित साहित्य पाहिल्यास स्पष्ट होते की 'दुर्जन' याचा अर्थ विवेकवादी (Rationalists), मुस्लीम, ख्रिश्चन आणि जो कोणी हिंदूविरोधी मानला जातो तो.'

पुढे धीरेंद्र झा लिहितात, 'आठवले यांच्या 'क्षात्रधर्म साधना' या पुस्तिकेनुसार, 'पाच टक्के साधकांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. योग्य वेळी ईश्वर कोणत्या तरी माध्यमातून शस्त्र उपलब्ध करून देईल.' पुस्तिकेत पुढे असेही म्हटले आहे, 'एखाद्याला गोळी झाडण्याचा अनुभव नसला तरी चालेल. तो जेव्हा देवाचे नामस्मरण करत गोळी झाडेल तेव्हा दैवी नामस्मरणातील अद्भुत शक्तीनं गोळी नक्कीच लक्ष्याचा अचूक भेद घेईल."

हे वाचलं का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)