सुशांत सिंह राजपूत आणि नरेंद्र दाभोलकर खून तपासाच्या निमित्ताने शरद पवार यांचा CBIवर निशाणा

सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र सीबीआयवर निशाणा साधला आहे.

तसंच महाराष्ट्र सरकार या चौकशीत सहकार्य करेल, अशी खात्री असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात ट्विट करताना पवार लिहितात, "सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा निर्णय दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल. मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी #CBI मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही."

सुशांतला आत्महत्या करण्यासाठी कथितरित्या प्रवृत्त केल्याबद्दल अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर दाखल केली होती. बिहार सरकारने हा तपास सीबीआयकडून करण्यात यावा, यासाठी केंद्र सरकारकडे विनंती केली होती. केंद्राने ती मान्य केली. त्याविरोधात रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तपास मुंबई पोलिसांना सोपवण्यात यावा, अशी रियाची मागणी होती.

या याचिकेवर निकाल देताना मुक्त, सक्षम आणि निष्पक्ष तपास ही काळाची गरज असल्याचं म्हणत हा तपास सीबीआयलाकडे वर्ग करण्यासाठी बिहार सरकार पात्र असल्याचं सर्वोच्च न्यायायलाने म्हटलं होतं आणि हा तपास सीबीआयला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. न्या. हृषीकेश रॉय यांनी हा निकाल दिला.

या आदेशानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख निकालाचं स्वागत करत असल्याचं म्हणत राज्य सरकार सीबीआयला सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, "पोलिसांच्या तपासात कोणताही दोष आढळला नाही आणि योग्य पद्धतीने तपास झाला, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. ही मुंबई पोलिसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. विरोधी नेते यावर राजकारण करत आहेत."

खरंतर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

या प्रकरणात पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचं नाव कुणी घेतलेलं नसलं तरी सर्वांचा रोख त्यांच्यावर आहे. स्वतः आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण दिलं होतं. मुंबई पोलीस योग्य तपास करत असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं होतं.

तिकडे हा निकाल आल्यानंतर शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी ट्वीटरवरून 'सत्यमेव जयते' अशी प्रतिक्रिया दिली.

अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी आजोबा शरद पवार यांनाच एकप्रकारे प्रत्युत्तर दिल्याचं बोललं गेलं. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी पार्थ पवार यांनी स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून केली होती. त्यावर पार्थ पवार अपरिपक्व आहेत, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती.

दरम्यान सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासाची परिणीती डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासारखी होऊ नये, असं म्हणत पवार यांनी दाभोलकर हत्याप्रकरणातल्या तपासावरही नाराजी व्यक्त केलीय.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात शरद पवार यांनी एक पत्रकही जारी केलेलं आहे. या पत्रकात ते लिहितात, "डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज 7 वर्षं पूर्ण झाली. पण 7 वर्षांनंतरही सीबीआयसारख्या प्रतिष्ठीत तपास यंत्रणेकडून अजूनही तपास पूर्ण न होणं ही वेदनादायी बाब आहे."

तर डॉ. दाभोलकर खून प्रकरणाचा तपास वेगाने झाला असता तर कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यासारख्या विचारवंताचे खून टळले असते, अशी प्रतिक्रिया डॉ. दाभोलकर यांचे पुत्र हमीद दाभोलकर यांनी बीबीसीशी बोलताना दिली आहे.

ते म्हणतात, "सीबीआय तपासातून नरेंद्र दाभोलकर खुनाच्या तपासात गेल्या सात वर्षांच्या मध्ये संशयित मारेकरी आणि त्यांना मदत करणारे लोक यांना अटक झाली आहे त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे उशिराने का होइना सीबीआयने योग्य दिशेने तपास केला. हा तपास अधिक वेगाने झाला असता तर पानसरे कलबुर्गी आणि गैरी लंकेश ह्यांचे खून टळले असते. डॉ. दाभोलकर प्रकरणातील संशयित बंदुकीची तपासणी लवकर करून सीबीआयने आता खटला तातडीने चालू करणे आवश्यक आहे."

20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंग वॉकला गेलेले असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला होता.

सुरुवातीला हा तपास पुणे पोलीस आणि एसआयटीने मिळून केला. मात्र, वर्षभरातच तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने संशियत म्हणून 2016 मध्ये डॉ. विरेंद्र तावडे त्यानंतर 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे तर 2019 मध्ये वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक केली होती. मात्र, खुनाचे सूत्रधार कोण, हे अजूनही कळू शकलेलं नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)