You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : 'मारेकरी सापडले, सूत्रधार कधी'
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 5 वर्षं पूर्ण झाली. या निमित्तानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं राज्यभर 'जबाब दो' आंदोलन करण्यात आलं. तर कोल्हापुरात सनातन संस्थेच्या वतीनं या आंदोलनाला प्रत्यूत्तर म्हणून घंटा नाद आंदोलन करण्यात आलं.
पुण्यात ओंकारेश्वर पुलापासून ते साने गुरूजी स्मारकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी "मारेकरी सापडले, सूत्रधार कधी?" असा सवाल मोर्चात सहभागींनी उपस्थित केला.
20 ऑगस्ट 2013ला पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर डॉ. दाभोळकर यांची हत्या झाली होती.
या हत्येप्रकरणात सीबीआयनं नुकतच औरंगाबादमधून संशयित सचिन अंदुरे याला अटक केली. त्याला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे.
या मोर्चांत बाबा आढाव, हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, शैला दाभोळकर, प्रा. मेघा पानसरे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, मुक्ता मनोहर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहभागी झाले होते.
तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर, कलाकार, नागरिक आणि चळवळीतले कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
निषेध मोर्चानंतर साने गुरूजी स्मारक इथं 'व्यर्थ ना हो बलिदान' हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, तुषार गांधी, मुक्ता दाभोलकर आणि प्रा. मेघा पानसरे यांनी भूमिका मांडली.
अंधश्रद्धा झुगारून आपल्या बुद्धीचा वापर करण्यासाठी आपण वचनबद्ध होऊया. हीच डॉक्टरांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी प्रतिक्रिया सोनाली कुलकर्णी यांनी दिली.
दरम्यान अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं आयोजित केलेल्या आंदोलनाला प्रत्यूत्तर म्हणून कोल्हापुरात सनातन संस्थेच्या वतीनं 'अंनिसवालो जबाब दो' हे आंदोलन करण्यात आलं. संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातल्या मिरजकर तिकटी इथं घंटानाद आंदोलन करण्यात आलं.
"डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 5 वर्षं पूर्ण होत आहेत. या कालवधीत कोणताही पुरावा नसताना सनातन संस्था हाच तपासाचा एकमेव केंद्र मानत, अनेक साधकांची नावं घेऊन त्यांची बदनामी करण्यात आली. याचा जबाब पुरोगामी संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं द्यावा," अशी प्रतिक्रिया सनातनचे पदाधिकारी मानसिंग शिंदे यांनी दिली.
दरम्यान अंधश्रद्ध निर्मूलन समिती आणि इतर पुरोगामी संघटनांच्यावतीनं डॉ. दाभोळकर यांच्या खुनाल 5 वर्षं तर अॅड. पानसरे यांच्या खुनाला 3 वर्षं होऊनही ठोस तपास झाला नसल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील आणि इतर आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे राजधानी नवी दिल्लीतही निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्लीतल्या सप्रू हाउसपासून जंतरमंतरपर्यंत ही रॅली काढण्यात आली होती.
खुनाचा तपास कुठंपर्यंत?
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) 10 ऑगस्टला नालासोपारा इथं धाड टाकून बाँब तयार करण्याचं साहित्य आणि इतर काही शस्त्र जप्त केली.
या प्रकरणी वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या संशयितांना अटक झाली आहे. या तिघांच्या चौकशीमध्ये एक संशयितानं डॉ. दाभोलकरांच्या खुनात सहभाग असल्याचं मान्य केलं आणि या खुनाच्या कटात आणखी एकाचा सहभाग असल्याचं सांगितलं, असा दावा एटीएसनं केला आहे.
यानंतर मुळचा औरंगाबादाचा असलेला सचिन अंदुरे याला सीबीआयनं अटक केली आहे. अंदुरे याला सध्या 26 ऑगस्टपर्यंत सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान नालसोपारा इथं सापडलेल्या स्फोटक प्रकरणात पोलिसांनी जालना शहरातले शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीकांत पांगरकर (वय ४०) यांना अटक केली आहे. दैनिक पुढारीनं ही बातमी दिली आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)