'चांगला मुसलमान कसा असावा हे हिंदूंनी ठरवावं का?'

    • Author, शेष नारायण सिंह
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी बुरखा आणि त्रिशूळाची तुलना केली. या लेखात त्यांनी हर्ष मंदर यांच्या एका वाक्याचा संदर्भ दिला. त्यानंतर मुस्लिमांना सार्वजनिक जीवनात कसं राहावं ही चर्चा जोर धरत आहे. आदर्श मुस्लिमांची वागणूक किंवा पेहराव कसा असावा हे ठरवण्याचा अधिकार बहुसंख्य समाजाला कुणी दिला, असा प्रश्न विचारत आहेत ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह.

देशात उदारमतवादी राजकारण आणि चर्चेच्या परीघाचं आकुंचन झालं असलं तरी तो पूर्णत: संपुष्टात आलेला नाही. पण हे खरं आहे की, उदारमतवादाचा पुरस्कार करणाऱ्यांना त्यांची मतं मांडताना काळजी घ्यावी लागत आहे. सार्वजनिक जीवनातल्या ढासळत्या समतोलाबाबत चर्चा करणं अवघड होऊन बसलं आहे.

जवळपास 17 कोटी संख्या असलेल्या मुस्लिमांवर आणि त्यांच्या प्रश्नांवर राजकीय चर्चा करण्याचं काम एकट्या असदुद्दीन ओवेसींवर सोडण्यात आलं आहे.

काँग्रेस असो की समाजवादी पक्ष सर्वच जण मुस्लिमांचं नाव घेण्याबाबत कचरत आहेत. पण पाकिस्तान, कट्टरतावादी संघटना इस्लामिक स्टेट आणि दहशतवादाचं नाव घेऊन मुस्लिमांवर निशाणा साधण्यात कुणीच मागे नाही.

देशातल्या मुस्लिमांनी कसं असायला हवं याबाबत देशातले काही विचारवंत गेल्या काही दिवसांपासून चर्चा करत आहेत. मुस्लिमांनी कसा पेहराव करायला हवा, काय खायला हवं, कसं दिसायला हवं या बाबींचा चर्चेत समावेश आहे. गोमांस बंदीनंतर आता चर्चा मुस्लिमांची दाढी आणि बुरख्यावर होऊ लागली आहे.

तिरस्काराला राजकीय हत्यार बनवण्याचा प्रयत्न बऱ्याच वर्षांपासून सुरू होता. पण सध्या त्याला यश येताना दिसतं आहे.

मुस्लीम म्हणजे अशी व्यक्ती ज्याची देशाप्रति असलेली निष्ठा संदिग्ध आहे, असं वातावरण तयार करण्यात आलं आहे. 1857 ते 1947पर्यंत देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हजारो मुस्लिमांबद्दल असं वातावरण अशा लोकांनी बनवलं आहे ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी होण्यास नकार दिला होता.

1947मध्ये पाकिस्तानात जाण्याचा पर्याय असतानासुद्धा भारतातल्या लोकांबद्दल असलेलं प्रेम आणि हिंदूंवर असलेला विश्वास यामुळे लाखो मुस्लीम लोक भारतातच थांबले हे विसरून चालणार नाही.

देशभक्तीचं प्रमाणपत्र

हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या संघटनांनी देशभक्तीचं प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी घेतली आहे. यात दाढी ठेवणारा, नमाज पढणारा आणि टोपी घालणारा मुसलमान देशभक्त म्हणून अयोग्य ठरवला जातो. त्यांना देशभक्तीसाठी अब्दुल कलाम यांच्या पठडीसारखा मुसलमान आवडतो. जो गीता वाचतो, वीणा वाजवतो पण स्वत:च्या धर्माची लक्षणं मात्र जाहीर होऊ देत नाही.

दुसरीकडे भजन, कीर्तन, तीर्थयात्रा, धार्मिक घोषणा, टिळा लावणं आदी गोष्टी देशभक्तीची लक्षणं समजली जात आहेत. जी व्यक्ती हे असं करणार नाही तो देशभक्त नाही, असा शिक्का मारला जाईल साहजिकच यामुळे मुस्लीम लोक आपोआपच बाहेर फेकले जातील.

सरकारचं अपयश जेव्हा समोर यायला लागतं तेव्हा कुणीतरी शत्रू शोधला जातो आणि सरकार पुरस्कृत राष्ट्रवादाच्या माध्यमातून त्या द्वेषाला खतपाणी घातलं जातं. एखाद्या शत्रूच्या विरोधात लोकांना फूस लावणं सोपं असतं.

सरकारला आव्हान देणाऱ्या प्रत्येक संस्था, व्यक्ती किंवा ट्रेड युनियनला शत्रू ठरवलं जातं आणि त्यांना लक्ष्य केलं जातं.

हेच निकष लावून सरकारी राष्ट्रवादी लोकांनी मुस्लिमांची गणना याच प्रकारात करण्यास सुरुवात केली आहे. टीव्हीवर होणाऱ्या वादविवादांकडे पाहिले तर हे दृश्य नेहमीचं झालं आहे असं लक्षात येईल. एक शत्रू ठरवून त्याला लक्ष्य करण्याच्या प्रकारामुळे मुस्लीम असणं आणि शांततापूर्ण आयुष्य जगणं कठीण होऊन बसलं आहे.

याबाबत हर्ष मंदर यांच्या एका लेखाचा उल्लेख करणं आवश्यक आहे. त्यांच्या मते, "एका दलित राजकारण्यानं मुस्लिमांना सांगितलं की तुम्ही माझ्या सभांमध्ये जरूर या पण येताना विशिष्ट प्रकारची टोपी अथवा बुरखा घालून येऊ नका."

रामचंद्र गुहा यांच्या मते मुस्लिमांना बाजूला सारण्याचे प्रयत्न करणं अयोग्य आहे. ते म्हणतात, "मुस्लिमांसमोरील पर्याय रीतसरपणे हिसकावून घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत."

मुकुल केशवन यांच्या मते, "बुरख्याचा त्याग करा असा सल्ला देणारे नेते मुस्लीम महिलांना विकासाच्या अजेंड्यात सामील होण्याचं आमंत्रण देत आहेत."

मुस्लिमांवर दबाव ?

हा असा काळ आहे ज्यात सरकारचं संपूर्ण लक्ष मुस्लिमांच्या सामाजिक सुधारणेवर आहे. यात ट्रिपल तलाक, हजचं अनुदान, हलाला यांवर ज्या पद्धतीनं चर्चा होत आहे, त्यामुळे आपण देशात कसं राहायचं हे हिंदू ठरवणार असा दबाव मुस्लिमांवर येत आहे.

ही तीनही विद्वान माणसं आहेत. त्यांच्या मतांवर प्रश्न उपस्थित करण्यास हरकत नसली तरी त्यांची मतं पूर्णत: खरी नाहीत. खरी परिस्थिती ही आहे की, सार्वजनिक स्तरावर मुस्लिमांना भेटून अथवा ते राहत असलेल्या वस्त्यांमध्ये काही वेळ घालवून त्यांच्या मनात काय सुरू आहे हे समजणं अवघड काम आहे.

इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रात ब्राऊन विश्वविद्यालयाचे प्राध्यापक आशुतोष वार्ष्णेय यांनी एक मत मांडलं. राष्ट्रवादाला समजून घेण्यासाठी भौगोलिक, धार्मिक आणि जातीय मर्यादा समजून घ्यायला हव्यात असं त्यांचं मत आहे. चर्चाही यावरच व्हायला हवी असं त्यांना वाटतं. हा विषय खूप क्लिष्ट आहे आणि या विषयांतर्गतच मुस्लिमांच्या अस्तित्वाच्या प्रश्नाला गंभीरपणे घेणं जरुरी आहे.

राष्ट्रवाद आणि मानवतेशी संबंधित एखाद्या मुद्द्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं असल्यास एक व्यक्ती अशी आहे जिची मतं खरी असू शकतात.

राष्ट्रवाद, देशप्रेम आणि मानवतेविषयी गांधींचे विचार काय होते, हे समजून घेणं गरजेचं आहे.

'मेरे सपनों के भारत'मध्ये गांधींनी लिहिलं आहे की, "माझ्यासाठी देशावर प्रेम करणं आणि माणसावर प्रेम करणं वेगळं नसून एकच गोष्ट आहे. मी देशप्रेमी आहे कारण मी माणसावर प्रेम करतो. एखाद्या कुळाचा अथवा समूहाचा प्रमुख यांची जी जीवनमूल्य असतात ती देशप्रेमाच्या जीवन मूल्यांहून वेगळी नसतात. देशावर प्रेम करणारी एखादी व्यक्ती तितक्याच तीव्रतेनं माणसावर प्रेम करत नसेल तिच्या देशप्रेमात कमतरता आहे, असं म्हणायला हवं."

गांधी लिहितात, "देशप्रेमाचा धर्म आपल्याला शिकवतो की, व्यक्तीला कुटुंबासाठी, कुटुंबाला गावासाठी, गावाला जिल्ह्यासाठी आणि जिल्ह्याला राज्यासाठी काम करायला हवं. त्याचप्रमाणे समाजाच्या कल्याणासाठी वेळ पडल्यास बलिदान देण्यासाठी देशानं स्वतंत्र व्हायला हवं. देशानं यासाठी स्वतंत्र व्हायला हवं की वेळ पडल्यास त्यानं मानवजातीच्या कल्याणासाठी मृत्यूला सामोरं जायची तयारी ठेवायला हवी. माझ्यासाठी हाच राष्ट्रवाद आहे. माझ्या राष्ट्रवादात जातीय द्वेषाला काहीही जागा नाही. आपलं राष्ट्रप्रेम असंच असायला हवं, ही माझी इच्छा आहे."

राष्ट्रवादाची खरी प्रतिमा

महात्मा गांधींनी एकदम स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "ज्याप्रमाणे इतरांना आपण आपलं शोषण करू देणार नाही, त्याचप्रमाणे आपणही इतर कुणाचं शोषण करणार नाही, या गोष्टीमुळे आपला राष्ट्रवाद दुसऱ्या देशांसाठी चिंतेचं कारण होऊ शकत नाही. स्वराज्य मिळवून आपण सर्व मानवजातीची सेवा करुयात."

महात्मा गांधींची ही मतं राष्ट्रवादाला संदिग्धतेतून बाहेर काढण्यास मदत करतात. त्यांची मतंच खऱ्या अर्थानं राष्ट्रवादाची खरी प्रतिमा आहे.

देशभक्तीचा आधार धर्म होऊ शकत नाही हे गांधी चांगल्याप्रकारे समजत होते. तसंच कोणत्याही धर्मात बदल करायचा असल्यास तसा आवाज त्या धर्मातून उठायला हवा. बाहेरून आलेल्या आवाजावर सकारात्मक प्रतिक्रिया येण्याची शक्यता नसते. उदाहरणार्थ, किती हिंदू आपल्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर मुस्लिमांची अथवा ख्रिश्चनांची टीका सहन करू शकतील?

(लेखातील विचार लेखकाचेवैयक्तिक आहेत.)

हेवाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)