इर्शाळवाडी : 14 वर्षांचा वामन आणि 13 वर्षांच्या रंजना-वनिता मातीच्या ढिगाऱ्याखाली आई-बाबांना शोधतायत

- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, इर्शाळवाडीहून
इर्शाळवाडीच्या बाजूला एक शाळा आहे. या गावात राहणारा 14 वर्षांचा वामन भुतमरे त्या दिवशी नेहमीप्रमाणे गावाच्या बाजूला असलेल्या त्या शाळेत गेला होता.
या वाडीतली पोरं शाळेत रोज रात्री झोपायला एकत्र जमायची. अंधार पडला की आपापले मोबाईल घेऊन ही पोरं इथे येऊन पब्जी खेळायची. 19 तारखेला देखील अगदी तसंच झालं. शाळेत ही मुलं जमा झाली आणि पब्जी खेळण्यात दंगही झाली.
रात्रीचे दहा साडेदहा वाजले असतील आणि तिथे अचानक एक आवाज झाला. या आवाजाने भेदरलेली ही सगळी मुलं शाळेतून बाहेर पडली आणि जीवाच्या आकांताने खाली पळाली. जीव मुठीत घेऊन पळणाऱ्या या मुलांमध्ये वामनही होता.
काही अंतरावर येऊन ते सगळे थांबले आणि त्यांनी मागे वळून पाहिलं, तर त्यांच्या घरांवर अक्षरशः चिखलाच्या ढिगाऱ्याचा थर जमा झाला होता. वाडीतल्या वामनच्या घराला एव्हाना डोंगरसमाधी मिळाली होती.
त्या घरात असलेले वामनचे वडील भाऊ भुतमरे, त्याची आई लता आणि 2 बहिणी असे 4 जण त्या ढिगाऱ्याखाली दबले होते. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणारी इर्शाळवाडी एव्हाना मातीच्या थराखाली लुप्त झाली होती.
रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. त्यात 21 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 119 लोकांची ओळख पटली आहे. अजून 109 लोकांचा शोध सुरू आहे.
मृत पावलेल्या 16 लोकांपैकी 12 जणांची ओळख पटली असून अद्याप 4 जणांची ओळख पटलेली नाही. या वाडीवर कोसळलेल्या या संकटामुळे भुतमरे कुटुंबासारखीच अनेक कुटुंबं उध्वस्त झाली आहेत.
सकाळी पोहोचलो तेव्हा वाडी गायब झाली होती

इर्शाळवाडीत राहणाऱ्या लता आणि भाऊ भुतमरे यांना एकूण पाच मुलं होती. यापैकी 13 वर्षांच्या दोन जुळ्या मुलींना त्यांनी पनवेलला आश्रमशाळेत शिकायला पाठवलं होतं. घरी चौदा वर्षांचा मुलगा वामन आणि त्याच्या 2 बहिणी राहत असत.
इर्शाळवाडीतच कधी नाचणीची शेती करून तर कधी मजुरी करून भुतमरे कुटुंब त्यांचा उदरनिर्वाह करत असल्याचं वामन भुतमरेच्या मावशी काशी बुरबुडे सांगतात.
काशीबाईंनी सांगितलं की त्यांच्या बहिणीला इर्शाळवाडीत दिलं होतं. तर त्यांना मात्र तिथून काही अंतरावर असणाऱ्या गावात दिलंय.
घटनेबद्दल बोलताना काशीबाई म्हणतात की, "आम्हाला त्याच रात्री इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याचं कळलं होतं. पण रात्री अंधार असल्यानं आम्ही वर चढून जाऊ शकलो नाही. त्या गावात लाईट वगैरे काहीच नव्हती. सकाळी तिथे गेलो तेंव्हा गावावर दरड कोसळली होती. तिथे असणारी वाडी गायब झालीय.

"त्या वाडीतल्या घरात त्या रात्री माझी बहीण, तिचा नवरा आणि त्यांच्या 2 मुली असे चौघे झोपले होते. माझ्या बहिणीचा मुलगा वामन तिथल्या शाळेत इतर मुलांसोबत झोपायला गेला होता. आवाज झाला तेंव्हा ही सगळी मुलं घाबरून पळाली आणि खाली येऊन त्यांनी बघितलं तर त्यांच्या गावावर दरड कोसळली होती."
अजूनही ढिगाऱ्याखाली असलेल्या लता आणि भाऊ भुतमरेंच्या इतर दोन मुलींना त्यांच्या मावशी काशीबाई बुरबुडे पनवेलच्या आश्रमशाळेतून त्यांच्या घरी घेऊन आल्या आहेत.
मावशीच्या घरी ही सगळी मुलं आई वडिलांच्या आठवणीत मोठमोठ्याने रडत आहेत. चौदा वर्षांचा वामन एवढा रडतोय की तो डोकं वर काढायला तयार नाहीये.
वामन आणि आठवीत शिकणाऱ्या रंजना आणि वनिता या दोन जुळ्या बहिणींच्या कुटुंबाचा शोध मागच्या दोन दिवसांपासून घेतला जातोय.
20 तारखेला रात्री पाऊस आणि काळोखामुळे शोधकार्य थांबलं होतं आता ते पुन्हा सुरु करण्यात आलंय. वामन, रंजना, वनिता चिखलाच्या ढिगाऱ्याखाली त्यांच्या कुटुंबाचा शोध घेतायत.
नेमकं काय घडलं होतं इर्शाळवाडीत?

रायगडमधील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे. इर्शाळवाडी वस्तीवर दरड कोसळून दुर्घटना घडली असून तिथं मागच्या दोन दिवसांपासून मदतकार्य युध्दपातळीवर सुरु आहे.
इर्शाळगडाचा इतिहासात फार कुठे उल्लेख येत नाही. पण आसपासचे गडकिल्ले आणि या परिसरातून बोरघाटाकडे म्हणजे आजच्या खंडाळा घाटाकडे जाणारी वाट पाहता, टेहळणीसाठी आणि मुख्यतः संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी या गडाचा वापर होत असावा, असं या परिसरातले इतिहास अभ्यासक सांगतात.
शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा मुलुख घेतला तेव्हा हा गड देखील त्यांच्या ताब्यात आला असावा, असं स्थानिक संशोधक सांगतात.
या गडाचं नाव फारसं कुठे इतिहासात घेतलं जात नसलं, तरी जवळच्या चौक गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाजी महाराजांचे सरनौबत आणि निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म याच चौक गावात झाला होता.

सुखद राणे सांगतात, “सतराव्या-अठराव्या शतकात चौक ही या परिसरातली मध्यवर्ती बाजारपेठ होती. बाजारपेठेचे संरक्षण आणि टेहळणीसाठी इर्शाळगड महत्त्वाचा होता. चोर, लुटारू, परकीय सत्ता, दरोडेखोर यांचे नेहमीच या बाजारपेठेवर लक्ष असायचे.
“अशाच एका व्यंकोजी वाघ नावाच्या लुटारूला नेताजी पालकर यांनी चौक पासून पाच किलोमीटरवर असलेल्या वडगाव इथे गाठले होते आणि चकमकीत ठार केले होते.”
चौकमध्ये आज नेताजी पालकरांचं स्मृतीस्थान म्हणून चौथरा उभारला आहे आणि दरवर्षी दोन फेब्रुवारीला उंबरखिंडीतल्या लढाईची आठवण म्हणजून चौक ते उंबरखिंड अशी मशाल यात्रा जाते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








