भूस्खलन आणि दरड कोसळणे म्हणजे काय? ते का होतं? ते रोखण्याचे उपाय काय?

वायनाडमध्ये भूस्खलनानंतर मदत कार्य जोरात सुरू आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वायनाडमध्ये भूस्खलनानंतर मदत कार्य जोरात सुरू आहे.

केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मुंडक्कई, चुरलमाला आणि मलप्पुरम जिल्ह्यातल्या नीलांबूर वनक्षेत्रात दरड कोसळून 178 जणांचा मृत्यू झाला असून 98 पेक्षा अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.

30 जुलै रोजी दुपारी दोन ते चार वाजेच्या सुमारास दोन भूस्खलनं झाली आणि या घटनेची तीव्रता एवढी होती की सुमारे 90 किलोमीटरपर्यंत याचा प्रभाव जाणवला.

माधव गाडगीळ अहवालात हे सर्व भाग इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) म्हणून घोषित करण्यात आले आहेत. हा अहवाल पश्चिम घाटातील पर्यावरणाशी संबंधित आहे.

या अहवालात अधिक संवेदनशील, थोडेसे कमी संवेदनशील किंवा कमी संवेदनशील क्षेत्रांची माहिती दिली आहे. या अहवालाला केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सर्व राजकीय पक्षांनी आणि राज्य सरकारांनी सातत्याने विरोध केला आहे.

दुर्घटनाग्रस्त भागातील एका चहाच्या मळ्यात सुमारे 150 कुटुंबे राहत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

महाराष्ट्रात इर्शाळवाडी येथे जुलै 2023 मध्ये दरड कोसळली होती. त्याच्या दोन वर्षांपूर्वी जुलै 2021 ला अशीच दुर्घटना महाडमधल्या तळीये गावात घडली होती. दरड कोसळल्यानंतर जी हानी झाली होती, त्यात चार दिवस मातीच्या ढिगाऱ्यातून मृतदेह काढण्याचं काम सुरू होतं.

30 जुलै 2014ला पुण्यातील आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावात दरड नाही तर अख्खा डोंगर कोसळला. हे रात्रीत हे गाव होत्याचं नव्हतं झालं.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
फोटो कॅप्शन, बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

या घटनांची चर्चा होते, मदत जाहीर केली जाते, पुनर्वसनाच्या गोष्टी होतात. पण गेल्या काही वर्षांत दरड कोसळणे, भूस्खलनासारख्या घटना का वाढत आहेत याचा विचार होतोय का?

मुळात भूस्खलन म्हणजे नेमकं काय? ते का होतं? भूस्खलन रोखण्याचे उपाय का? हे आधी समजून घेणं आवश्यक आहे.

भूस्खलन म्हणजे काय?

डोंगर कड्यावरून दरड किंवा खडक कोसळणं, जमीन खचणे अशा घटनांना आपण भूस्खलन म्हणतो. याचा वेग इतका असतो की त्याच्या प्रवाहात येणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा जीवाला आपल्यासोबत घेऊन जातं.

भूस्खलनाचा अंदाज लावणं हे सहज शक्य नसतं. त्यामुळेच त्यावर तात्काळ उपाययोजना शक्य होत नाही.

भूस्खलनाचे वहन (Flowage), स्खलन (Sliding), डोंगरकड्यावरून खडक कोसळणं (Rock toppling) असे अनेक प्रकार असतात.

सावकाश होणाऱ्या स्खलनाचा अंदाज काढणं शक्य नसतं. याचा वेग फारच कमी असतो. जमीन खचणे हा प्रकार हळूवार किंवा सावकाश होणारं भूस्खलन होय.

इर्शाळवाडी दुर्घटना

राज्याचा 15 टक्के भाग हा दरडप्रवण क्षेत्र आहे. यात नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना दरड कोसळण्याचा धोका आहे.

या जिल्ह्याच्या घाट परिसरात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. या प्रकरणी 2006 साली तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या अहवालात सांगितलंय की भूस्खलन ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी मानव निर्मित कारणांमुळं भूस्खलन होतं.

कठीण पाषाणांमध्ये निर्माण झालेल्या भेगा आणि फटी विस्तारित होऊन खडकांचे तुकडे वेगळे घेऊ लागतात. अशा प्रकारे खडक उतारी भागात घसरत जाऊन खालील बाजूस स्थिरावतात. यालाच दरड कोसळणे किंवा भूस्खलन म्हणतात.

याशिवाय मानव निर्मित कारणही जबाबदार असल्याच या समितीनं म्हटलं होतं.

उतारी भागाच शेतीसाठी सपाटीकरण करणे तसंच रस्ते बांधणे आणि त्यांचं रुंदीकरण याचा समावेश आहे आणि अतिपर्जन्याच्या काळात उताराचं सपाटीकरण केलेल्या भागात पाणी मुरण्याच्या प्रक्रियेतही अशा दुर्घटना घडतात.

भूस्खलनाची कारणं काय असतात ?

भूस्खलन
  • भूस्खलनात पाण्याचं कार्य फार महत्वाचं आहे. पाणी हे नैसर्गिक वंगणासारखा आहे. जेव्हा जमिनीत पाणी जातं तेव्हा ते मातींच्या कणांमधील घर्षण कमी करते. तसेच या पाण्यामुळं जमिनीत छिद्रीय बल (Pore pressure) निर्माण होतं.
  • यामुळे जमिनीची दाब झेलण्याची क्षमता (Load bearing capacity) कमी होते. त्यावर बांधकाम केल्यास भूस्खलन होऊ शकतं.
  • भूगर्भातील काही रचनाही भूस्खलनास कारणीभूत ठरतात. भूगर्भात विविध प्रकारचे खडक आहेत. काही खडक कठीण,तर काही खडक ठिसूळ असतात. तसचं भूगर्भांत सतत हालचाली होतं असतात या सगळ्यांचा परिणाम म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ताण पडतो. यामुळं भूस्खलन होऊ शकतं.
  • ज्वालामुखींच्या उद्रेकामुळं मोठया प्रमाणात जमिनीच्या हालचाली होतात. यातून बाहेर पडलेला मॅग्मा आणि खडक उतारावर पडत असतात आणि तेथे भूस्खलन होतं.
  • मानवी कारणांमुळे भूस्खलन होतं. अती खोदकाम केलं तर जमिनीत हादरे निर्माण होतात त्यामुळं तिथे भेगा तयार होतात. बोगदा खणताना कधी कधी स्फोटकांचाही वापर केला जातो. त्यामुळं जमीन कमकुवत होऊ शकते. बऱ्याचदा बांधकाम करताना वृक्षतोड केली जाते. अमर्याद वृक्षतोडीमुळं भूस्खलन होऊ शकतं.

भूस्खलनाचा धोका कसा कमी करता येईल?

इर्शाळवाडी दुर्घटना
  • पाणी हे भूस्खलनामागील सर्वांत महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळं जमिनीतील अतिरिक्त पाणी काढून टाकणं हा भूस्खलन थांबवण्याचा एक उपाय आहे. यासाठी उतारावर पाण्याचे पाईप टाकून सर्व अतिरिक्त भूजल त्या पाइपमधून वाहून जाईल अशी व्यवस्था केली पाहिजे.
  • भूस्खलन थांबवण्याचा अजून एक मार्ग म्हणजे उतारांवर संरक्षक भिंती (Retaining walls)बांधणे. संरक्षक भिंती बांधल्यामुळं उताराच्या वरील भागात जरी भूस्खलन झालं तरी, भिंतींमुळं ते अडून राहतं आणि अपघाताची शक्यता कमी होते.
  • आणखीन एक उपाय म्हणजे खडकांचे बोल्टिंग (Rock bolting) करणे. खडकांमध्ये मोठे बोल्ट्स ठोकून त्याच्यात लोखंडाची जाळी लावली जाते. त्यामुळं पडणारे खडक लोखंडी जाळीत अडकतात आणि खाली पडत नाही.
  • संरक्षक भिंत बांधणं शक्य नसेल तर उतारावर खड्डे खणून त्यांच्यात उच्च दाबानं काँक्रीट भरलं जातं. याला ग्युनाटिंग म्हणतात. त्यामुळं जमिनीत घर्षण वाढतं आणि भूस्खलन होत नाही.
  • वनीकरणामूळं (Forestation) भूस्खलनपासून संरक्षण करता येऊ शकतं. कारण झाडांची मूळं जमीन घट्ट धरून ठेवतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)