'जमीन वाजली, आम्ही जीव घेऊन पळालो; माझ्या मोठ्या दीराचं सगळं कुटुंब गेलं'

इर्शाळवाडी

"रात्री दहा-साडेदहाच्या दरम्यान झालं. जमीन एकदम वाजली. आमचं घर गावाच्या एका बाजूला आहे. आम्ही जीव घेऊन पळालो. आमच्या दोन्ही घरातली दहा-बारा जणं होती."

"माझ्या नणंदा, दीर, सासू असे आम्ही सगळे बाहेर पडलो. रात्रभर पावसातच राहिलो."

"माझा मोठा दीर होता. त्याचं सगळं कुटुंब गेलं. फक्त एक मुलगा वाचला. धाकट्या दीराचा एक मुलगा घरातच राहिला. तो पण नाही सापडला."

हा आक्रोश आहे इर्शाळवाडीतल्या भूस्खलनात गाडल्या गेलेल्या गावकऱ्यांच्या नातेवाईक महिलेचा.

जिथं प्रत्यक्ष ही दुर्घटना घडली आहे तिथं जाण्यापासून या महिलांना मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे गावाच्या पायथ्याशी या महिला त्यांच्या नातेवाईकांची वाट पाहत आहेत.

पुढे काय होईल याची त्यांना कल्पना नाही. त्यामुळे अनेकींचा टाहो फुटला आहे. त्याच्याबरोबर आलेली लहान मुलंसुद्धा रडत आहेत.

लाल रेष
त्यांच्यातली आणि एक महिला तिचा अनुभव सांगते

त्यांच्यातली आणि एक महिला तिचा अनुभव सांगते,

"फोन आला तेव्हा मला कळलं. आमचं घर होतं वरती. आई, भाऊ, वहिनी सगळे होते. मोठ्या वहिनीचं सगळं घरच गेलं. तिचा एक मुलगा दुसरीकडे झोपायला गेला होता, तो तेवढा वाचला."

"असं कधीच घडलं नव्हतं. डोंगर कोसळेल असं वाटलं नव्हतं कधी, म्हणूनच तर लोक तिथे राहात होते ना...हे अचानकच झालं...कमालीची गोष्ट झाली."

"एक मुलगा घरामध्येच अडकला. त्याला निघताच आलं नाही."

लाल रेष

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावातील महिला आणि इतर गावातील महिला त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी आणि नातेवाईकांसाठी आक्रोश करत होत्या. आपले नातेवाईक सुखरूप आहेत की नाही हेच त्यांना माहीत नव्हतं.

इर्शाळवाडीवर बुधवारी (20 जुलै) रात्री दरड कोसळली. आवाजाने हादरलेले लोक जीव वाचवण्यासाठी बाहेर पडायला लागले. पण काही जण मागे राहिले, तर काही अडकले.

मागे राहिलेले आपले कुटुंबीय कुठे आहेत, कसे आहेत, ते आपल्याला भेटतील की नाही याच काळजीने बचावलेले लोक व्याकूळले आहेत.

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 103 जणांना शोधण्यात यश आलं आहे. अजून 139 जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफनं ही माहिती दिली आहे.

मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत असल्यामुळे सध्या बचावकार्य थांवण्यात आलं आहे. उद्या सकाळी ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची सर्व माहिती क्रमवार सांगितली.

  • इर्शाळवाडी उंच डोंगरावर पायथ्याशी वसलेली आहे. इथे जाण्यासाठी रस्ता नाही. मानवली गावातून पायी जावे लागते.
  • 48 कुटुंब वास्तव्यास आहेत. 228 लोकसंख्या
  • गेल्या तीन दिवसात 499 mm पावसाची नोंद
  • सदर घटना रात्री साडे दहा- अकराच्या सुमारास घडली. जिल्हा प्रशासनाला साडे अकराच्या सुमारास माहिती मिळाली
  • वाडी उंचावर दुर्गम भागात असल्याने उतार जास्त असल्याने दळणवळण प्रमुख रस्त्याला जोडलेले नाही
  • दरड प्रवण क्षेत्रात ही इर्शाळवाडी समाविष्ट करण्यात आलेली नाही. यापूर्वी अशी कोणतीही घटना घडलेली नाही

कुठे आहे इर्शाळगड?

इर्शाळगड

मुंबई-पुणे प्रवासात जुन्या महामार्गावरून गेला असाल, किंवा कर्जत-पनवेल रेल्वे लाईननं प्रवास केला असेल, तर तुम्हाला इर्शाळगड दिसेल.

रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातल्या चौक गावाच्या उत्तरेकडचा हा छोटा किल्ला त्याच्या सुळक्याच्या विशिष्ट आकारामुळे लगेच लक्ष वेधून घेतो. याच सुळक्याच्या भागाखाली, साधारण पूर्वेला डोंगरपठारावर इर्शाळवाडी ही आदिवासी वस्ती आहे.

याच इर्शाळवाडीवर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. हा परिसर नेमका कसा आहे? जाणून घेऊयात.

ज्या डोंगरावर हे गाव वसलं आहे, त्याच्या ईशान्येला माथेरानचा डोंगर आहे आणि पायथ्याशी मोरबे धरणाचा नवी मुंबईला पाणी पुरवणारा जलाशय आहे.

दुर्ग अभ्यासक आणि रायगड जिल्ह्यातील 59 किल्य्यांची माहती देणाऱ्या इये ‘देशीचे दुर्ग’ या पुस्तकाचे लेखक सुखद राणे यांना हा परिसर परिचयाचा आहे.

ते सांगतात की, इर्शाळगडाच्या पश्चिमेस पनवेल, वायव्येस प्रबळगड व मलंगगड, उत्तरेस चंदेरी व पेब, नैऋत्येला कर्नाळा किल्ला, दक्षिणेला माणिकगड व सांकशी हे किल्ले आहेत तर पूर्वेस खंडाळा घाट व नागफणी आहे.

इर्शाळगडाचा इतिहास

इर्शाळगड

इर्शाळगडाचा इतिहासात फार कुठे उल्लेख येत नाही. पण आसपासचे गडकिल्ले आणि या परिसरातून बोरघाटाकडे म्हणजे आजच्या खंडाळा घाटाकडे जाणारी वाट पाहता, टेहळणीसाठी आणि मुख्यतः संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी या गडाचा वापर होत असावा, असं या परिसरातले इतिहास अभ्यासक सांगतात.

शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा मुलुख घेतला तेव्हा हा गड देखील त्यांच्या ताब्यात आला असावा, असं स्थानिक संशोधक सांगतात.

या गडाचं नाव फारसं कुठे इतिहासात घेतलं जात नसलं, तरी जवळच्या चौक गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाजी महाराजांचे सरनौबत आणि निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म याच चौक गावात झाला होता.

स्थानिकांकडून मदतीचा ओघ

इर्शाळगड

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत-खालापूरचे सर्व अधिकारी, पोलीस यंत्रणा, NDRF टीम यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत महाजन, आदिती तटकरे, आमदार महेश बालदी, सामाजिक कार्यकर्ते गुरूनाथ साठीलकर यांच्या टीमचे सदस्य घटना स्थळी पोहचले आहेत.

या माध्यमातून इर्शालवाडीकडे मदतीचा ओघ चालू झाला आहे. 10 टेन्ट घेऊन कोंढाणा टीमचे प्रथमेश जाधव, प्रदिप गोगटे घटनास्थळी पोहचले.

रोटरी क्लबच्या माध्यमातून चादरी, ब्लँकेट, पाणी, बिस्कीट पुडे घेऊन सुनील सोनी आणि सदस्य कर्जतमधून रवाना झाले आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.