महाराष्ट्र पाऊस : अतिवृष्टी आणि पूर असे प्रसंग हवामान बदलामुळे होत आहेत का?

- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी
चिपळूण, सांगली, कोल्हापूर सगळीकडे पुराने हे असं थैमान घातलं. घरं, दुकानं पाण्याखाली गेली, गाई-गुरं, वाहनं वाहून गेली. गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी आणि पुराचं प्रमाण वाढत गेलंय.
पण एकीकडे हे चित्र आहे आणि दुसरीकडे अजूनही उन्हाळा आला की पाणीटंचाई, टँकरने पाणीपुरवठा यांसारख्या बातम्या येतातच. एकाचवेळी आपण दोन टोकाच्या समस्यांशी का लढतोय? यामागे हवामान बदल आहे की आणखी काही कारणं?
गेल्या काही वर्षांत पूर, दुष्काळ, ढगफुटी याच्या किती घटना तुम्हाला आठवतायत? 2019 चा कोल्हापूरचा पूर, सिंधुदुर्गात फुटलेलं तिवरे धरण, उत्तराखंडमधली ढगफुटी आणि हिमस्खलन, चेन्नईमध्ये दोन वर्षांपूर्वी आलेला पूर आणि गेल्या वर्षी पाण्यासाठी वणवण, त्यापूर्वी 2018 मध्ये महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ आणि अनेक भागातली तीव्र पाणीटंचाई.
जून महिन्यात महाराष्ट्रात पाऊस येतो तो गणपती विसर्जनानंतर सप्टेंबर महिन्यात कमी व्हायला लागतो असा आपला साधारण आडाखा असतो. पण अवकाळी पाऊस आणि त्यामुळे पिकांची होणारी नासाडीही गेल्या काही वर्षांत वाढलीय.
हल्ली वातावरण नॉर्मल राहिलेलं नाही असं आपण सहज बोलून जातो, पण नेमकं झालंय काय? हवामान बदल इतका गंभीर झालाय का?
हवामान बदलामुळेच दुष्काळ आणि पूर?
हवामान बदल, तापमान वाढ हे शब्द आपण अनेकदा ऐकतो. शाळकरी मुलं निबंध लिहतात, भाषणं करतात, मोठमोठे ब्रँड्स त्यांची उत्पादनं कशी इको फ्रेंडली आहेत याच्या जाहिराती करतात, सरकारं अधेमध्ये आपल्या नवनवीन योजना आणि उद्दिष्टं जाहीर करतं. पण एखादी नैसर्गिक आपत्ती येईपर्यंत याचं गांभीर्य बहुतेकांच्या लक्षात येत नाही.
आपण आधी महाराष्ट्रापुरतं बोलू या, इथे पावसाचा पॅटर्न बदललाय की आहे तितकाच पाऊस होऊनही पुराची आणि दुष्काळाची परिस्थिती उभी राहतेय?

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, पूरपरिस्थिती निर्माण होण्यासाठी पडणारा पाऊस आणि पाण्याचा विसर्ग ही कारणं आहेत. अतिवृष्टी होतीये असं म्हणता येणार नाही. जुलै महिन्यात इतका पाऊस या आधी देखील पडला आहे. त्याची फ्रिक्वेनसी कमी जास्त होत असते.
"हवामान बदलामुळे पाऊस बदलला आहे. जोराचा पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. या बदलामुळे पावसाचं क्षेत्र दक्षिण भारतापूरत सीमित राहत आहे. हा दीर्घकालीन हवामान बदलाचा परिणाम आहे. पाऊस लांबण्यालासुद्धा हवामानबदल आणि निसर्गाची हानी ही कारणं आहेत," असं डॉ. कुलकर्णी यांनी म्हटलं.
हवामान बदल म्हणजे नेमकं काय?
हवामान बदलाची अगदी ढोबळ व्याख्या करू या. औद्योगिक क्रांतीनंतर कारखाने आणि त्याबरोबर येणारं प्रदूषण वाढलं, कालांतराने लोकांची जीवनशैली बदलली. AC, Fridge यांसारखी उपकरणं, टूव्हीलर आणि फोर व्हीलर वाहनं वाढली, या सगळ्यातून धूर, उष्णता यांच्या उत्सर्जनामुळे वातावरणातला कार्बन डायऑक्साईड वाढत केला.
तापमान वाढायला लागलं. यामुळे आपल्याला ज्याप्रकारच्या हवामानाची सवय होती, ते बदलायला लागलं. यामुळे चर्चा सुरू झाली कार्बन कपातीची.

फोटो स्रोत, Reuters
हवामान बदलावर नियंत्रण मिळवण्यासाठी 2015 मध्ये पॅरिस शहरात एक जागतिक बैठक झाली ज्याला 'पॅरिस अकॉर्ड' म्हणतात. या शतकाच्या अखेरीस जगाचं तापमान औद्योगिक कालखंडापूर्वी जितकं होतं त्यापेक्षा दोन अंश सेल्यिअसनेच वाढलेलं असेल असं या बैठकीत ठरलं, जगातल्या अनेक देशांनी ते मान्यही केलं.
पण अनेक विकसनशील देशांनी याला विरोध केला. तापमान वाढ रोखताना त्या देशांच्या उद्योगक्षेत्राला फटका बसणार होता. यातून गरीब-श्रीमंत ही दरी वाढेल अशीही त्यांना भीती होती.
अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू न देता पर्यावरणाची हानी कशी रोखायची हे आव्हान जगासमोर आहे आणि त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चीन, युकेसारख्या प्रगत देशांनी यापूर्वीच कार्बनकपातीची महत्त्वाकांक्षी उद्दिष्टं जगापुढे मांडली आहेत.
मार्च महिन्यात बोलताना पंतप्रधनान मोदींनी म्हटलं होतं, की 'भारताने GDP च्या प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जनाची मर्यादा 2005 च्या पातळीच्या 30 ते 35 टक्के खाली आणण्यात 2030 पर्यंत यशस्वी होईल. भारत हा प्रदूषण करणारा देश किंवा तापमान वाढीचं कारण नाहीय.'
2021 च्या नोव्हेंबर महिन्यात स्कॉटलंडच्या ग्लास्गो शहरात संयुक्त राष्ट्रांची 26 वी हवामान बदल परिषद होईल. या परिषदेत काही महत्त्वाचे निर्णय होणं अपेक्षित आहे.
हवामान बदल रोखायचे कसे?
तापमान वाढ रोखणं हे जागतिक हवामान बदलाचा वेग मंदावण्यासाठीचं महत्त्वाचं पाऊल आहे.
जीवाश्म इंधनांचा म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा यांचा वापर कमी करून सौरउर्जा, पवनउर्जा यांचा वापर करण्याकडे कल वाढवण्यावर तज्ज्ञ भर देतायत.
आपल्याकडे इलेक्ट्रिक कार, ई बाईक्स, सौरचूल, सौरबंब यांसारख्या वस्तूंना सरकारी योजनांचा पाठिंबा मिळताना तुम्ही पाहिलाय ना? कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या आपल्या योजनेचा तो एक भाग आहे. तसंच औद्योगिक क्षेत्राला उत्सर्जन कमी करण्यासाठी जगभरातल्या सरकारांवर दबाव आणला जातोय.

फोटो स्रोत, Getty Images
पॅरिस करारात तापमान वाढ 2 डिग्रीपेक्षा कमी ठेवण्यावर एकमत झालं असलं तरी त्यानंतर ती दीड डिग्रीपर्यंतच रोखता येईल का यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही शक्यता वाजवी ठरायची असेल, तर आपल्याला एकूण उत्सर्जन 2030 सालापर्यंत अर्ध्यावर आणणं गरजेचं आहे, असं संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या 'इंटरगव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज' या संस्थेने म्हटलं आहे.
कार्बनउत्सर्जनामध्ये तत्क्षण कपात सुरू करणाऱ्या धोरणांसाठी जगभरातील राष्ट्रांनी कायदेशीर मान्यता द्यावी, हे आव्हान ग्लास्गो परिषदेसमोर असणार आहे.
2050 सालापर्यंत कोळशाचा वापर पूर्णतः संपावा, जीवाश्म इंधनांना मिळणारं अंशदान थांबवलं जावं आणि जागतिक समूहाने कार्बनउत्सर्जनाची 'नेट झिरो' पातळी गाठावी, अशी इच्छा संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.
चिपळूण, कोल्हापूर, सांगलीचा पूर किंवा मराठवाडा, विदर्भातला दुष्काळ, उत्तर महाराष्ट्रातलं पाण्याचं दुर्भिक्ष्य याचा सामना करण्यासाठी नियोजनाची कमतरता राहिली का हा प्रश्न नागरिक म्हणून आपण आपल्या प्रतिनिधींना विचारायलाच हवा.
पण मुळात या नैसर्गिक आपत्ती येण्यात आपला जो काय लहानसा वाटा असेल तो आपण कसा कमी करू शकतो याचं आत्मपरिक्षण आपण माणूस म्हणून करायला हवं. हवामान बदल ही फक्त एक संकल्पना नाहीय, ते वास्तव आहे. त्यावर लवकरात लवकर आणि टिकू शकतील अशा उपाययोजना करणं ही काळाजी गरज आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








