महाराष्ट्र पाऊस : 'मी मदतीसाठी हाक मारली, पण सगळेच मातीखाली गाडले गेले होते'

आंबेघर
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

"कमरेवर वीटा पडल्या होत्या. गाळात पाय रुतले होते…दरवाजा उघडून बाहेर आले…पाहिलं तर माझी सर्व माणसं नाहीशी झाली होती."

संगीता कोळेकर, आंबेघर दरड दुर्घटनेच्या एकमेव साक्षीदार आहेत.

ती काळरात्र संगीता कधीच विसरू शकत नाहीत. 23 जुलैच्या पहाटे कोळेकर कुटुंबावर काळाने घाला घातला. डोंगर खचला आणि अख्खं गाव उध्वस्त झालं. या दुर्घटनेत फक्त जीव वाचला तो संगीता यांचा.

साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील आंबेघर गावात, दरड कोसळल्यामुळे 15 लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यापैकी 11 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

NDRF चं बचावकार्य तब्बल 36 तासांनी सुरू झालं. पण, अजूनही काही मृतदेह ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे.

"मी ओरडले… मला काढा कोणीतरी"

आंबेघर

23 जुलै….पहाटेचे 1 वाजले असतील. तुफान पाऊस सुरू होता. निसर्गाने रुद्रावतार धारण केला होता. वीजांचा कडकडाट आणि पावसाचा आवाज फक्त ऐकू येत होता.

"रात्री 1 वाजता मी झोपयला गेले. पण अचानक मोठा आवाज झाला. काय झालं कळलंच नाही. मी ओरडायला लागले…माझं घर पडलंय मला वाचवा…" संगीता बीबीसीशी बोलताना त्या रात्राची प्रत्येक घटना सांगत होत्या.

ती काळरात्र, संगीता यांनी अनुभवलीय…त्या रात्रीचा प्रत्येक क्षण डोळ्यांनी अनुभवलाय. संगीता यांनी मदतीसाठी टाहो फोडला. पण….

"मी मदत मागितली. पण मदत कोण करणार? सर्व मातीखाली गाडले गेले होते. मी एकटेच होते," संगीता पुढे सांगतात.

"बाहेर पडायला जागा नव्हती. उभं राहून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण दोन वेळा खाली पडले. गाळात अडकले. कशीतरी बाहेर आले."

आंबेघऱ

रात्रीचा मिट्ट काळोख… कडाडणाऱ्या वीजा आणि अस्मान फाटल्यासारखा पडणारा पाऊस…निसर्गाच्या रौद्र रूपाचा सामना करण्यासाठी संगीता एकट्याच होत्या.

संगीता कशाबशा बाहेर पडू शकल्या. त्यांचे इतर नातेवाईक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

त्याच्या अंगावर वीट पडली होती. कपाट कलंडलं होतं. रात्रीच्या मिट्ट काळोखात सर्व दिसेनासं झालं होतं.

"कमरेभर पाण्यातून ओढा पार केला"

संगीता यांच्या मदतीसाठी कोणीच नव्हतं. लोक झोपेत असताना दरड कोसळली. त्यामुळे लोकांना जीव वाचवण्यासाठी बाहेर पडता आलं नाही.

संगीता पुढे म्हणतात, "रस्ता मिळेल तिकडे चालत निघाले. रात्री काहीच दिसत नव्हतं. वाटेत ओढा लागला. प्राण्याचा प्रवाह भयंकर होता. पण, कमरेभर पाण्यातून ओढा पार केला. रस्ता दिसत नव्हता. पण पडत-झडत गुहेगरपर्यंत पोहोचले. एक घर दिसल…मी म्हटलं.. मला घरात घ्या.. माझं सर्व संपलंय…"

आंबेघर

संगीता यांनी या दुर्घटनेत आपल्या कुटुंबाला गमावलंय. त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. निसर्गाने त्याचं सर्वकाही लुटलंय.

आंबेघरमध्ये पाच घरांवर दरड कोसळली. सर्व घरं लाल मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली.

"मी फक्त एकटीच वाचले. बाकी सर्व गायब झाले." संगीता धाय मोकलून रडू लागल्या.

बचावकार्य आव्हानात्मक का आहे?

शुक्रवारी (23 जुलै) पहाटे दरड कोसळूनही आंबेघरमध्ये मदत पोहोचली 24 जुलैला दुपारी 12 वाजता.

तब्बल 36 तासांनंतर पहिलं NDRF चं पथक दाखल झालं. तोपर्यंत फक्त आसपासच्या गावातील गावकरी आणि स्थानिक प्रशासन पोहोचलं होतं.

आंबेघर

आंबेघंरचं मदतकार्य खूप आव्हानात्मक आहे. गाव मोरणा-गुहेगर धरणाच्या जवळ आहे. त्यामुळे गावात पोहोचण्यासाठी फक्त पायी रस्ता आहे. पण, डोंगर खचल्याने रस्त्याला चिरा पडल्या आहेत.

त्यामुळे गाळ आणि माती काढण्यासाठी मशिनरी नाही तर NDRF चे जवान कुदळ, फावडं याने खोदकाम करतायत.

NDRF च्या टीमचे प्रमुख डेप्युटी कमांडंट अरुण देवगम सांगतात, "बचावकार्य खूप कठीण आहे. गाड्या पाच किलोमीटर लांब ठेवून पायी चालत यावं लागलं. संपूर्ण डोंगर खाली आलाय. त्यामुळे गुडघाभर चिखलात काम करावं लागतंय."

"मातीने घरं 50 मीटर पुढे सरकली"

डोंगराळ भाग असल्याने या भागात पाऊसही सुरू आहे. त्यामुळे मातीचा गाळ सुकत नाहीये. माती काढली की, पुन्हा माती घसरून पुढे येतेय.

आंबेघर

"जवळपास 300 फूट डोंगर खचलाय. पाण्याच्या फोर्ससोबत दरड आणि माती घरांवर आली. घर होतं त्या ठिकाणापासून 50 मीटर खालच्या बाजूला सरकलंय," अरुण देवगम पुढे सांगत होते.

त्यामुळे ज्या ठिकाणी घर आहे अशी माहिती लोकांनी दिली. त्याठिकाणी घर आता नाहीये. रस्ता नसल्याने जेसीबी पोहोचू शकत नाही. त्यामुळे हातानेच माती आणि गाळ बाहेर काढावा लागतोय.

अरूण देवगम म्हणाले, "रविवारी (25 जुलै) दुसरी टीम येणार आहे. ढिगाखाली गाडले गेलेल्यांचा शोध घेणं फार कठीण आहे."

"पाच किलोमीटर…दीड तास चालल्यानंतर पोहोचलो आंबेघरमघ्ये"

आंबेघर

मी आणि माझा सहकारी नितीन दुपारी तीन वाजता आंबेघरमध्ये पोहोचलो. पण गाडीने पुढे जाणं अशक्य होतं.

त्यामुळे गावापासून पाच किलोमीटर गाडी उभी करून पायी निघालो. आंबेघरची वाट माहीत नव्हती. फक्त या डोंगरापलिकडे धरणाजवळ आहे, असं लोक सांगत होते.

गुहेघर धरणापर्यंत खरंतर रस्ता आहे. पण पावसाने रस्ता चिरून निघालाय. ओढ्यांनी प्रवाह बदललाय.

आम्ही चालत पुढे निघालो. रस्त्यात स्थानिक तहसील कार्यालयात काम करणारे सोनावणे भेटले. "माझी जमीन आहे आंबेघरजवळ. ते सांगत होते. आंब्याची झाडं आहेत. पण, पावसाने सर्वकाही नेलंय"

त्यांच्यासोबत वाट काढताना गुरेघर धरण दृष्टिक्षेपात आलं. चहूबाजूंनी डोंगर. डोंगरावरून पडणारे धबधबे दिसत होते. बाजूने मोरणा नदी दुथडीभरून वाहत होती.

गावाकडे निघालेले गावकरी म्हणाले, "ज्या रस्त्यावरून चाललोय हा रस्ता पाण्याखाली होता. पाच-सहा फूट पाणी होतं. भातशेती पार संपलीये."

पण, पुढची वाट अधिक खटतंर होती. कारण पुढे कच्चा रस्ता होता. चिखल, पाणी…मातीत पाय रूतत होते. निसरडं असल्यामुळे घड चालताही येत नव्हतं.

चिखलात पाय रूतला की काढणं शक्य होत नव्हतं. पण हळूहळू आम्ही पायपीट सुरू ठेवली. एकमेकांच्या साथीनेच पुढे जावं लागत होतं.

वाटेत ओढा आला. पाण्याला प्रचंड वेग होता. ओढा पार करणं सोपं नव्हतं. झाडाला पकडून एकमेकांचा हात धरत-धरत आम्ही ओढा पार केला.

नितीन हातातील मोबाईल सावरत-सावरत पुढे चालत होता. गावात काय परिस्थिती असेल, याचा बहुधा विचार त्याच्या मनात सुरू असावा.

गावाच्या दिशेने निघून 40 मिनिटं झाली असतील. लांबून धूर येताना दिसत होता. हेच आहे का आंबेघर? धूर कशाचा? वाटेत भेटलेल्या एका व्यक्तीला विचारलं.

"मृतदेहांवर अत्यसंस्कार केले जात आहेत. मृतदेह बाहेर नेणे शक्य नाही. त्यामुळे, गावाच्या बाजूलाच चिता पेटवण्यात आलीये," वाटेत चालणारे लोक सांगत होते.

त्यातील काही स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी होते. तर काही बाजूच्या गावातील गावकरी.

डोंगर चढून, निमुळत्या पायवाटेने लोकांच्या मागे आम्ही चालत होतो.

कपडे चिखलाने माखले होते. निसकड्या रस्त्यावर पडलो देखील. काही ठिकाणी तोल जात होता. पण, मदतीला कोणीना-कोणी पुढे यायचं.

तब्बल दीड तास चालल्यानंतर अखेर आम्ही आंबेघरमध्ये पोहोचलो. गावात काहीच उरलं नव्हतं. दिसत होते ते फक्त निसर्गाच्या रूद्रावताराने मागे ठेवलेले भग्न अवशेष.

आपले गेल्याचं दुःख करणारंही गावात कोणी उरलं नव्हतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)