अलमट्टी धरणामुळे कोल्हापुरात खरंच पूर येतो का?

कोल्हापूर- पुराचे संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, NDRF

फोटो कॅप्शन, कोल्हापूर- पुराचे संग्रहित छायाचित्र
    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी

आज 26 जुलै रोजी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात गेल्या 24 तासांत सतत पाऊस झाल्यामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.

काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूरातील परिस्थितीबद्दल बोलताना म्हटलं की, राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले. 6 दरवाजे उघडले तर 2019 सारखी परिस्थिती होईल. अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडले तर स्थिती गंभीर होईल कर्नाटक सरकारशी यासाठी बोलावं लागेल.

त्यांनी पुढे म्हटलं की, कर्नाटक सरकारशी चर्चा कशी होतेय ते माहिती नाही अलमट्टीचं नियोजन योग्य पद्धतीने केलं तर परिस्थिती गंभीर होणार नाही.

महाराष्ट्राच्या विनंतीनंतर कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून 6671 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दोन दिवसांपूर्वीच सुरू केला आहे. अलमट्टी धरण उत्तर कर्नाटकात कृष्णा नदीवर बांधण्यात आले आहे. त्याचं बांधकाम 2005 साली पूर्ण झालं. त्याची उंची 524.26 फूट इतकी आहे. हे धरण कर्नाटकात विजापूर जिल्ह्यात आहे. या धरणाची जलधारणक्षमता 123.08 टीएमसी इतकी आहे. हे धरण समुद्रसपाटीपासून 519 मीटर उंचीवर आहे. तर कोल्हापूर 546 मी उंचीवर आहे. म्हणजेच कोल्हापूर अलमट्टीपासून जास्त उंचीवर आहे.

साधारणपणे प्रत्येक पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरात पाऊस सुरू झाला की कोल्हापूर शहरासह आजूबाजूच्या गावांना पुराचा विळखा पडतो. त्याची चर्चा सुरू होते, पुरामुळे नुकसान होतं, थोड्या दिवसांनी पाणी ओसरलं की ही चर्चाही ओसरून जाते.

तीन वर्षांपूर्वी कोल्हापूर शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यांना पुराचा मोठा फटका बसला होता. 2020मध्येही ऑगस्ट महिन्यातल्या चार दिवसांच्या पावसामुळे पुन्हा पाण्याची पातळी झपाट्याने वाढली होती.

कोल्हापूरमध्ये पूर का येतो, गेल्या काही वर्षांमध्ये कोल्हापूरमध्ये नक्की कोणते बदल झाले आहेत? कोल्हापुरातला पूर आणि अलमट्टी धरण यांचा काही संबंध आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यांची उत्तरे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याची रचना आणि नद्या

कोल्हापूर शहर आणि करवीर, हातकणंगले, शिरोळ या पूर येणाऱ्या तीन तालुक्यांचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्यातील तुळशी, कुंभी, कासारी, भोगावती या नद्यांच्या थेट संबंध दिसून येतो.

2005 च्या पूरक्षेत्राचे अवलोकन

फोटो स्रोत, RADARSAT/AMOL JARAG

फोटो कॅप्शन, 2005 च्या पूरक्षेत्राचे अवलोकन

कोल्हापूर जिल्ह्याची रचना पाहिल्यास पश्चिमेस उंच प्रदेश आणि हळूहळू त्याची उंची पूर्वेस कमी होताना दिसते. त्यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातून पूर्वेस वाहाणाऱ्या या नद्या पावसाचं पाणी वेगाने घेऊन खाली येतात.

पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड हे तालुके पश्चिमेला आहेत. या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण पूर्वेच्या तालुक्यांच्या तुलनेत फारच जास्त आहे. राधानगरी, काळम्मावाडीसारखी मोठी धरणं आणि इतर लहान पाटबंधारे प्रकल्प याच भागात आहेत.

पावसाचं प्रमाण आणि त्यातले बदल

कोल्हापुरात येणाऱ्या पुराचा विचार करता पावसाच्या बदललेल्या प्रमाणाकडेही पाहिलं पाहिजे. कोल्हापूरमध्ये कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस पडण्याचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं. यामुळे धरणांची पाणी साठवण्याची क्षमता लवकर संपते आणि त्यांचे दरवाजे उघडावे लागतात.

राधानगरीपेक्षा गगनबावडा येथे पावसाचं प्रमाण जास्त आहे, तेथून येणारं तसंच इतर तालुक्यांमधलं पाणी कुंभी-कासारी नद्यांमधून पंचगंगा नदीमध्ये वेगानं येतं.

शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागातील प्राध्यापक डॉ. सचिन पन्हाळकर यांच्या निरीक्षणानुसार कुंभी आणि कासारी खोऱ्यामधील पाटबंधारे प्रकल्पांची क्षमता कमी असल्यामुळे तेथे पाणी साठवून ठेवणं अशक्य आहे. त्याचप्रमाणे या नद्यांमधील पाणी राधानगरीमधून सोडलेल्या पाण्यापेक्षा कमी वेळात कोल्हापूरपर्यंत येऊन पोहोचतं.

कोल्हापूर- पुराचे संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, SWATI PATIL

फोटो कॅप्शन, कोल्हापूर- पुराचे संग्रहित छायाचित्र

कोल्हापूरच्या पूर येणाऱ्या प्रदेशातले पाणी चटकन का ओसरत नाही याबद्दल सांगताना डॉ. पन्हाळकर म्हणाले, "कोल्हापूर शहर समुद्रसपाटीपासून 540 मीटर उंचीवर आहे. परंतु त्याच्या पूर्वेस म्हणजे ज्या दिशेने नद्या वाहतात त्या बाजूला सपाट प्रदेश आहे. साहजिकच तेथून पाण्याचा निचरा वेगाने होत नाही, तेथे पाणी साचून राहातं."

नद्यांमध्ये, धरणांमध्ये साचलेला गाळ

डॉ. सचिन पन्हाळकर आणि शिवाजी विद्यापीठातले अभ्यासक अमोल जरग यांनी गेली काही वर्षं कोल्हापूरच्या पूरस्थितीचा अभ्यास करून त्यामागची काही कारणं समोर आणली आहेत.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

जरग यांनी बीबीसी मराठीशी बोलताना पुरामागच्या कारणांमध्ये जमिनीचा बदलता वापरही असल्याचं सांगितलं.

ते म्हणाले, "पश्चिमेच्या तालुक्यांमध्ये झालेली मोठी वृक्षतोड, शेतजमिन तयार करण्यासाठी झालेली तोड यामुळे मोठ्या प्रमाणात धूप होते. पावसाच्या पाण्यामुळे वाहून आलेला गाळ साचल्यामुळेही नद्यांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे जेव्हा मुसळधार आणि सतत पाऊस पडतो तेव्हा पावसाचं पाणी कमी वेळात पात्राबाहेर पडतं."

कोल्हापूरच्या पश्चिमेच्या तालुक्यांमध्ये होणाऱ्या बॉक्साइटच्या खाणकामाचाही गाळाशी संबंध आहे असं कोल्हापूरमधील पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड सांगतात.

"खाणकाम केल्यावर मातीचा जो दहा ते बारा फुटांचा थर बाहेर काढला जातो. तो पुन्हा आत टाकून वृक्षारोपण करावे असा नियम आहे. मात्र त्याचे पालन होत नाही. याच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होतो आणि ही सगळी माती वाहून जाते" असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

पंचगंगेचं पाणी कृष्णेत सामावण्यात येणारा अडथळा आणि अलमट्टी

पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा ही सर्वांत महत्त्वाची नदी आहे. या नदीला कोयना, वारणा, पंचगंगा या मोठ्या नद्या येऊन मिळतात. पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम होण्याआधी उत्तरेस कोयना आणि वारणा या नद्या कृष्णेमध्ये सामावतात.

सर्वांत आधी कऱ्हाड येथे कोयना नदी कृष्णेला मिळते. त्यानंतर सांगलीमध्ये हरिपूर येथे वारणा नदी कृष्णेत सामावते त्यानंतर पंचगंगेचं पाणी नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथे कृष्णेत जातं.

कोयनेचं आणि कृष्णेचं पाणी पंचगंगेच्या तुलनेत जास्त असतं. त्याचप्रमाणे पश्चिम घाटात पाऊस वाढल्यावर कोयनेतूनही पाणी सोडलं जातं. अशा स्थितीत पंचगंगेचं पाणी सामावून घेणं कृष्णेला अशक्य होतं. त्यामुळे हे पाणी कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये पसरतं. एकाबाजूने कृष्णेचं पाणी आणि दुसरीकडे पंचगंगेतून आलेलं पाणी अशी कोंडी या परिसराची होते.

कोल्हापूरला येणाऱ्या पुरासाठी कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाकडेही बोट दाखवले जातं. परंतु डॉ. सचिन पन्हाळकर आणि अमोल जरग यांना अलमट्टी धरणापेक्षा कृष्णेत पंचगंगेचं पाणी सामावून घेण्यावर असलेली मर्यादा पुरासाठी जास्त कारणीभूत वाटते. अलमट्टी धरण या जागेपासून 195 ते 200 किमी दूर असून दोन्ही प्रदेशांच्या उंचीमध्येही फरक असल्याकडे ते लक्ष वेधतात.

पूररेषेचं महत्त्व

कोल्हापूर शहराची लोकसंख्या आणि शहराचा विस्तार वेगाने वाढत गेला आहे. या कालावधीत नदीपात्राच्या जवळपास होणाऱ्या बांधकामाला रोखण्याची गरज शहरातले नागरिक बोलून दाखवतात.

कोल्हापूर- पुराचे संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, SWATI PATIL

फोटो कॅप्शन, कोल्हापूर- पुराचे संग्रहित छायाचित्र

शहराच्या विकास आराखड्यात पूररेषेचा समावेश व्हावा आणि तो केला असेल तर त्याची नागरिकांना माहिती द्यावी अशी मागणी कोल्हापुरात होते. लोकांना पूररेषेबद्दल आधीच माहिती मिळाली तर ते घर घेताना किंवा घर बांधताना त्याचा विचार करतील आणि संभाव्य नुकसान टळेल.

महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी)च्या महासंचालकांनी पूररेषेच्या दोन व्याख्या स्पष्ट केल्या आहेत. त्यातील ब्लू झोन म्हणजे प्रोहिबिटेड झोन म्हणून ओळखला जातो.

गेल्या 25 वर्षांमध्ये आलेल्या सर्वोच्च पुराच्या पातळीपर्यंतचा भाग किंवा नदीच्या पूरधारणक्षमतेच्या दीडपट भाग यापैकी जो जास्त असेल तो प्रोहिबिटेड झोन म्हणून ओळखला जातो. तर रेस्ट्रिक्टिव्ह झोन किंवा रेड झोनची गेल्या शंभर वर्षांतील सर्वोच्च पुराच्या पातळीचा विचार करून आखणी केली जाते.

वडनेरे समितीचा अहवाल काय सांगतो?

गेल्या वर्षी आलेल्या पुराचा अभ्यास करण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये विनय कुलकर्णी, संजय घाणेकर, रवी सिन्हा, नित्यानंद रॉय, प्रदीप पुरंदरे आणि राजेंद्र पवार यांचा समावेश होता.

या समितीने यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस आपला अहवाल शासनाला सादर केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

नदीच्या पूरवहन क्षमतेत झालेली घट, पुराच्या पाण्याचा निचरा होण्यात येणारा अडथळा, पूरप्रवण क्षेत्रात बांधकामं होणे, अतिक्रमण अशा अनेक मुद्द्यांकडे या समितीने लक्ष वेधलं आहे. अलमट्टीपेक्षा पावसाचं प्रमाण जास्त होणं हे पुराचं कारण असल्याचं मत यामध्ये मांडण्यात आलं आहे.

अलमट्टीचा मुद्दा पूर्णपणे सोडायला नको- प्रदीप पुरंदरे

वडनेरे समितीमधील एक सदस्य आणि जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्यामते अलमट्टी धरणाचा मुद्दा पूर्णपणे सोडून देऊ नये.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "आपण सर्व एकाच कृष्णेच्या खोऱ्यामध्ये आहोत. अलमट्टीचा पुराशी संबंध नाहीच असा निष्कर्ष काढून तो मुद्दा निकालात काढण्यात येऊ नये.

सॅटेलाइट इमेजरीच्या साहाय्याने या धरणाचा पुराशी काही संबंध आहे का हे तपासण्याची गरज आहे. त्यासाठी इस्रोची मदत घेता येऊ शकेल.

कोल्हापूर परिसरात नदीपात्रातील अतिक्रमणं काढून नुकसान कमी करता येऊ शकेल. मातीचं, पाण्याचं संवर्धन करण्यासाठी लहान प्रकल्पांची आवश्यकता आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)