नॉर्थ सेंटिनल : अंदमानातलं आदिवासींचं गूढ बेट, जिथे बाहेरच्या कुणालाच प्रवेश मिळत नाही

फोटो स्रोत, Indian Coast Guard
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतात एक असं बेट आहे, जिथले गूढ रहिवासी कुणा बाहेरच्या व्यक्तीला पाऊल टाकू देत नाहीत. इतकंच नाही, तर बाहेरच्या कुणालाही तिकडे जायला बंदी आहे.
हे बेट आहे. अंदमान द्वीपसमूहातलं नॉर्थ सेंटिनल बेट आणि इथे हजारो वर्षांपासून राहणारे आदिवासी लोक 'सेंटिनली' म्हणून ओळखले जातात.
हे लोक आजही शिकार, फळं-कंदमुळांवर पोट भरतात, अश्मयुगातल्या माणसासारखंच आदिम जीवन जगतात. त्यांच्याविषयी बाहेरच्या जगाला फारच थोडी माहिती आहे कारण ते बाहेरच्या कुणाच्या संपर्कात नाहीत.
एरवी आपल्या बेटावर कुणी आलंच, तर हे लोक त्यांना हाकलून लावतात आणि प्रसंगी हल्ला करतात. त्यामुळे इथे येण्याचा प्रयत्न करणंही जीवावर बेतू शकतं.
अलीकडेच मिखाइल व्हिक्टोरोविच पॉलिकोव्ह नावाचा अमेरिकन पर्यटक परवानगी नसतानाही या बेटावर घुसला.
त्यानं आपला प्रवास व्हिडियोवर रेकॉर्ड केला आणि जाताना किनाऱ्यावर नारळ आणि सोडा कॅन सोडून आला. फॉलोअर्स मिळवण्यासाठी त्यानं हे केल्याचं सांगितलं जातंय.
स्थानिक पोलिसांनी मिखाईलला अटक केली असून, तो या बेटावर कसा पोहोचला याचा तपास सुरू आहे. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा सेंटिनली आदिवासी चर्चेत आले आहेत.
काही दशकांपूर्वी भारतीय अभ्यासकांनी या बेटाला भेट दिली होती, पण पुढे त्या मोहिमाही सरकारनं बंद केल्या.
मात्र त्यातून या आदिवासींचं जीवन कसं आहे, याची झलक पाहायला मिळाली.


सेंटनली कोण आहेत?
दक्षिण अंदमान बेटाच्या पश्चिमेला बंगालच्या उपसागरात नॉर्थ सेंटिनल बेट आहे.
भारताच्या मुख्य भूमीपासून साधारण 1200 किलोमीटरवर असलेल्या या बेटाचा आकार जेमतेम 60 चौरस किलोमीटर इतकाच आहे.

या छोट्याशा बेटावर सेंटिनल आदिवासी हजारो वर्षांपासून राहात आहेत. काही अंदाजानुसार सेंटिनलींचे पूर्वज तीस ते दहा हजार वर्षांपासून या भागात राहात आहेत.
मानववंशशास्त्रज्ञ सांगतात की आजच्या मानवाचे पूर्वज आफ्रिकेतून बाहेर पडले आणि पश्चिम आशिया, भारत, दक्षिण पूर्व आशिया मार्गे ऑस्ट्रेलियात गेले. साधारण 30,000 वर्षांपूर्वी अंदमान निकोबार बेटांमध्येही माणसं येऊन राहू लागली.
इथल्या पाचशेहून अधिक बेटांमध्ये वेगवेगळ्या जमातींचे लोक विखुरलेले होते. यातल्या काही जमातींचा बाहेरच्या जगाशी अजिबातच संपर्क नसल्यानं त्यांची स्वतंत्र ओळख टिकून राहिली.
अशा जमातींना 'अनकॉन्टॅक्टेड ट्राईब' म्हणजे जगाशी संपर्क न ठेवलेल्या जमाती म्हणून ओळखलं जातं. सेंटिनली हे त्यापैकीच एक आहेत.
त्यांची संख्या नेमकी किती आहे, हे सांगता येणार नाही, पण तज्ज्ञांच्या मते हा आकडा जेमतेम 50 ते 200 च्या आसपास असू शकतो.

सेंटिनली लोकांची भाषा अंदमानच्या इतर भाषांशी मिळतीजुळती वाटते, पण ती पूर्णतः वेगळी आहे.
त्यामुळेच कुणी त्यांच्याशी संवाद साधू शकलेलं नाही आणि त्यांच्या संस्कृतीविषयी कुणालाच फारसं माहिती नाही. इतकंच काय तर ते स्वतःला काय नावानं ओळखतात, हेही माहिती नाही.
सेंटिनली छोट्या समूहांमध्ये राहतात, असं दिसून आलं आहे. हे लोक भाले आणि धनुष्यबाणासारख्या शस्त्रांचा वापर करतात.
आदिमानवासारखं शिकार, मासेमारी आणि जंगलातून अन्न गोळा करून आपलं पोट भरतात.
जगापासून दूर राहणारी जमात
नॉर्थ सेंटिनल बेट अंदमानच्या किनाऱ्यापासूनही 36 किलोमीटर दूर आहे. या दुर्गम भागातही सेंटिनली आपलं अस्तित्व टिकवून आहेत.
अगदी 2004 साली आलेल्या विनाशकारी त्सुनामीनंतरही सेंटिनलींनी त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवलं.
त्यावेळी भारतीय नौदलाच्या एका हेलिकॉप्टरनं बेटाची पाहणी केली होती. जवळून पाहणी करण्यासाठी हेलिकॉप्टर थोडं खाली आलं, तेव्हा काही आदिवासींनी त्यांच्यावर बाण मारण्यास सुरुवात केली होती.
त्यावरूनच ही जमात त्सुनामीतही सुरक्षित राहिल्याचं समजलं, असं नौदलानं तेव्हा जाहीर केलं होतं.

फोटो स्रोत, Indian Coast Guard
एका बेटावर राहात असल्यानं सेंटिनली इतर मानव प्रजातीपासून हजारो वर्ष वेगळे राहिले. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातल्या इतर जमातींशीही त्यांचा फारसा संपर्क आलेला नाही.
त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांशी संपर्कात आल्यावर त्यांना फ्लू किंवा अन्य आजारांचा संसर्ग होण्याचा आणि ही संपूर्ण जमातच नष्ट होण्याचा मोठा धोका आहे. कारण या आजारांविरोधात लढण्याची रोगप्रतिकारक क्षमता त्यांच्याकडे नाही.
कदाचित याच कारणामुळे ते बाहेरच्या लोकांशी फटकून वागतात, असं तज्ज्ञांना वाटतं. बाहेरच्या जगासोबतचा आधीचा अनुभवही यासाठी कारणीभूत ठरला आहे.
सेंटिनली बेटावरची ब्रिटिश मोहीम
19 व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिश नौदलातले एक अधिकारी आणि अंदमानचे तेव्हाचे प्रभारी मॉरिस विदाल पोर्टमन काही हत्यारबंद लोकांसोबत सेंटिनली बेटावर आले होते.
अंदमानमधल्या समुदायांच्या भाषा आणि संस्कृतींचा अभ्यास करणे आणि त्यांना 'सभ्य' जगाची ओळख करून देणे, हा त्यांचा उद्देश होता.
इतिहासकार अॅडम गुडहार्ट यांनी 2000 साली पोर्टमन यांच्या मोहिमांविषयी सविस्तर लिहिलं होतं.
ते सांगतात की पहिल्यांदा पोर्टमन इथे आले, तेव्हा त्यांच्या सोबत अंदमानच्या ओंगे जमातीचे काही स्थानिक आदिवासीही होते.

फोटो स्रोत, WIKICOMMONS
सुरुवातीला बेटाची पाहणी केली असता त्यांना इथे कोणी दिसलं नाही. गुडहार्ट सांगतात, "सेंटिनलींना युरोपियन लोक आल्याचं दिसलं, तेव्हा ते जंगलात कुठेतरी गायब झाले."
पोर्टमन यांनी नॉर्थ सेंटिनल बेटावरची माती आणि झाडा झुडुपांचे नमुने गोळा केले. काही दिवस बेटावर राहिल्यावर त्यांना एक वयस्कर जोडपं आणि चार मुलं सापडली.
या सहा जणांना ताब्यात घेऊन ते अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर (आताचं श्रीविजयापुरम) इथे पोहोचले. त्यांना या आदिवासींचा अभ्यास करायचा होता.
पण अपहरण करून आणलेल्या त्या सहा जणांपैकी दोन वयस्कर व्यक्तींचा काही दिवसांतच आजारी पडून मृत्यू झाला. त्यानंतर चारी आदिवासी बालकांना भेटवस्तूंसोबत त्यांच्या बेटावर पाठवण्यात आलं.
कदाचित या घटनेमुळेच हे आदिवासी बाहेरच्या लोकांविषयी एवढे सतर्क राहतात.
त्या काळात सेंटिनलींविषयी अनेक कहाण्या प्रचलित झाल्या होत्या, जसं की लोक चुकून या बेटावर गेले तर त्यांना हे लोक मारून टाकतात, मारलेल्या अशा व्यक्तींची मुंडकी भाल्यावर रोवून पाण्यात टाकतात.

अशा कहाण्यांमुळे आणि या जमातीविषयी गूढ कायम राहिल्यामुळे अनेकांना सेंटिनली लोक अतिशय आक्रमक असल्यासारखं वाटतं.
पण ते प्रत्यक्षात तसे नसल्याचं निकोबारी वंशाचे पहिले मानववंशशास्त्रज्ञ अँस्टिस जस्टिन सांगतात.
"लोकांना हे लोक आक्रमक आणि मागासलेले वाटतात, कारण याआधी अशा काही घटना घडल्या आहेत. पण आम्हाला वेगळं चित्र दिसलं आहे. हे लक्षात घ्यायला हवं की सेंटिनली फक्त स्वत:चं रक्षण करण्यासाठी असं करत आहेत आणि आपल्या हद्दीचं रक्षण करणं हा त्यांचा हक्क आहे."
अँस्टिस पुढे म्हणतात, "आदिवासी निसर्गाशी एकरूप होऊन राहतात. हे लोक तर हजारो वर्ष इथे टिकून राहिले आहेत. आपण ज्याला बाहेरच्या जगात विकास म्हणतो, त्यात त्यांना रस नाही, त्यांची स्वतःची जीवनपद्धती आहे."
मानववंशशास्त्रज्ञ टीएन पंडित यांनीही असंच मत मांडलं होतं. त्यांच्यामते सेंटिनली हिंसक आहेत असं मानणं हा "चुकीचा दृष्टीकोन आहे. इथे आपण आक्रमणकर्ते आहोत, आपण त्यांच्या हद्दीत जातो आहोत. सेंटिनली शांतताप्रिय आहेत. ते जाणूनबुजून हल्ला करत नाहीत, आसपासच्या प्रदेशातही कुठे जात नाहीत"

टीएन पंडित हे त्या मोजक्या संशोधकांपैकी एक आहेत ज्यांनी सेंटिनलींशी यशस्वीरित्या संवाद साधला होता.
भारत सरकारच्या आदिवासी मंत्रालयानं आणि स्थानिक प्रशासनानं 1960-90 च्या काळात सेंटिनली समुदायासोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न केले होते.
तेव्हा पंडित यांच्यासह काही अभ्यासक आणि आदिवासींच्या पथकानं या बेटाला अनेकदा भेट दिली आणि सेंटिनलींशी संपर्क साधण्यातही ते यशस्वी ठरले.
भारतीय मोहिमा
सेंटिनल बेटावर गेलेल्या तिथे जाण्याआधी वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्या लागल्या आणि त्याना कुठलाही संसर्गजन्य आजार झालेला नाही, हे निश्चित केलं गेलं.
पंडित यांनी 1967 साली पहिल्यांदा नॉर्थ सेंटिनल बेटाला भेट दिली होती. सुरुवातीला हे पाहुणे बेटावर आल्याचं पाहून सेंटिनली जंगलात लपले. त्यानंतरच्या काही भेटींदरम्यान त्यांनी या पथकावर बाण सोडले.

फोटो स्रोत, TN Pandit
पंडित यांच्या पथकानं सोबत काही भेटवस्तू नेल्या होत्या. "आम्ही काही भांडी, मोठे नारळ, हातोडीसारखी लोखंडी अवजारं आणि चाकू घऊन गेलो होतो. आमच्यासोबत ओंगे जमातीचे तीन पुरुष होते. सेंटिनलींची भाषा समजून घ्यायला ते मदत करतील असं आम्हाला वाटलं.
"पण आम्ही पोहोचलो, तेव्हा सेंटिनली योद्धे रागावले. मोठी धनुष्यं आणि बाण घेऊन ते त्यांच्या जमिनीचं रक्षण कऱण्यासाठी सज्ज झाले," असं पंडित एका निबंधामध्ये लिहितात.
फारसं यश मिळत नसतानाही पंडित यांची टीम या लोकांचं मन वळवण्यासाठी बेटावर भेटवस्तू सोडून यायची. एकदा त्यांनी एक डुक्कर इथे भेट म्हणून बांधलं होतं. पण सेंटिनलींना ते आवडलं नाही. त्यांनी डुकराला लगेच मारलं आणि वाळूत पुरून टाकलं.
अनेक प्रयत्न केल्यावर 1991 साली त्यांना यश आलं. त्या वर्षी काही सेंटिनली लोक या पथकाला भेटण्यासाठी शांततेनं समुद्रात उतरले.
"त्यांनी आम्हाला का येऊ दिलं हे कोडंच होतं. आम्हाला भेटण्याचा निर्णय सर्वस्वी त्यांचा होता. आम्ही बोटीतून उतरलो आणि खांदा बुडेल एवढ्या पाण्यात उभं राहून त्यांना नारळ आणि इतर भेटी दिल्या. पण त्यांनी आम्हाला बेटावर पाऊल टाकू दिलं नाही," असं पंडित नमूद करतात.

फोटो स्रोत, TN Pandit
आपल्यावर हल्ला होईल अशी भीती वाटली नाही, पण तरीही आम्ही सजग राहिलो, असं पंडित स्पष्ट करतात. त्यांच्या पथकातील आदिवासींनी सेंटिनलींशी संभाषण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भाषा कुणालाच नीट समजली नाही.
अशाच एका मोहिमेदरम्यान एका सेंटिनली तरुणानं पंडित यांना धमकावलं.
"आम्ही नारळ वाटत होतो, तेव्हा मी टीमपासून थोडा विलग झालो आणि किनाऱ्याच्या दिशेनं जाऊ लागलो. तेव्हा एका सेंटिनली मुलानं विकट हास्य करत माझ्याकडे पाहिलं. त्यानं हातात चाकू घेऊन माझं डोकं उडवलं जाईल असा इशारा केला.
"मी लगेचं आमची नौका बोलावली आणि आम्ही लवकरच तिथून निघालो. त्या मुलानं केलेल्या खाणाखुणा महत्त्वाच्या होत्या. आम्ही तिथे जाणं खपवून घेतलं जाणार नव्हतं."
भारत सरकारनं त्यानंतर अशा भेटवस्तू देण्याच्या मोहिमा बंद केल्या आणि साठच्या दशकापासूनच बेटावरच नाही, तर बेटाजवळ जाण्यासही मनाई केली.
'माणसाच्या शोधातला माणूस'
1974 साली फिल्म्स डिव्हिजननं अंदमान बेटांविषयी एक लघुपट तयार केला होता. त्याचं नाव होतं 'मॅन इन सर्च ऑफ मॅन' अर्थात माणसाच्या शोधातला माणूस.
प्रेम वैद्य यांनी दिग्दर्शित केलेल्या या डॉक्युमेंट्रीमध्ये सेंटिनली लोकांची झलक पाहायला मिळते.
पण याच लघुपटाच्या चित्रिकरणादरम्यान सेंटिलींनी मारलेला एक बाण प्रेम वैद्य यांच्या पायाला लागला. त्यांच्यावर लगेच बोटीतच उपचार करण्यात आले.

फोटो स्रोत, Films Division
काहीवेळा चुकून किंवा काही वेळा मुद्दाम इथे आलेले लोक अडकल्याच्या आणि त्यांना सेंटिनलींनी धमकावल्याच्या घटनाही घडल्या.
1977 मध्ये एम व्ही रसली आणि 1981 मध्ये एम व्ही प्रिमरोज अशी दोन जहाजं नॉर्थ सेंटिनल बेटाभोवतीच्या प्रवाळ भिंतीला अडकून रुतून बसली.
एमव्ही प्रिमरोजच्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांनी किनाऱ्यावर हालचाल होताना दिसली.
हातात धनुष्यबाण घेतलेले काही सेंटिनली किनाऱ्यावर बोटी तयार करत होते. प्रिमरोज जहाजावरील कर्मचाऱ्यांनी हत्यारांची मागणी केली, पण समुद्र खवळला असल्यानं लगेच मदत पोहोचू शकली नाही.
आठवडाभरानं ओएनजीसीच्या ताफ्यातील हेलिकॉप्टरनं जहाजावरील कर्मचाऱ्यांची सुटका केली. पुढे अशा बुडालेल्या जहाजांवरचं लोखंड सेंटिनली वापरत असल्याचं दिसून आलं.
पण सगळेच या जहाजावरच्या कर्मचाऱ्यांएवढे नशीबवान नव्हते.
या बेटाजवळ मासेमारी करण्यास बंदी असतानाही 2006 साली दोन भारतीय मच्छीमार इथे आले होते. त्यांची बोट बेटाजवळ गेल्यावर सेंटिनलींनी त्यांना मारून टाकलं.
2013-14 साली मासेमारी करणाऱ्या बोटीवरून सेंटिनलींची पाहणी करत असलेल्या एका भारतीय उद्योगपतीला कोस्ट गार्डनं फटकारलं होतं.

फोटो स्रोत, Google Earth
नोव्हेंबर 2018 मध्ये 27 वर्षीय अमेरिकन नागरीक आणि ख्रिश्चन धर्मप्रचारक जॉन अलन चाऊनं सेंटिनलींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला मारून टाकण्यात आलं.
जॉननं स्थानिक मच्छीमाराला लाच देऊन हे बेट गाठलं होतं असं तपासात समोर आलं.
त्यानंतर आता मिखाइल व्हिक्टोरोविच पॉलिकोव्हला अटक झाली आहे.
'फॉलोअर्स मिळवण्यासाठी काहीही'
भारतीय माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार मिखाइलनं असं पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. ऑक्टोबर 2023 मध्ये त्यानं असा प्रयत्न केला होता, पण हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांनी त्याला रोखलं.
मिखाईलनं जानेवारीतही असंच एक पाऊल उचललं होतं. बंदी असतानाही त्यानं अंदमानच्या जारवा जमातीचे व्हिडियो काढले होते.
मग त्याला पुन्हा अंदमानमध्ये प्रवेश कसा मिळाला आणि त्याला आधीच का रोखलं गेलं नाही, असा प्रश्न या द्वीपसमूहात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर विचारला आहे.

फोटो स्रोत, Survival International
प्राणीसंग्रहालयात प्राण्यांना पाहण्यासाठी लोक जातात, तसं एखाद्या जमातीला पाहायला जाणं हे अनैतिक असल्याचं ते स्पष्ट करतात आणि अंदमानच नाही तर अनेक आदिवासी भागांमध्ये अशा पद्धतीचं पर्यटन वाढत असल्याची खंत व्यक्त करतात.
अलीकडच्या काळात काही यूट्यूबर्सनी फॉलोअर्स मिळवण्यासाठी अशी 'अॅडव्हेंचर्स' – साहसं केली आहेत किंवा इथे येण्याचा मानस सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.
असे इन्फ्लुएन्सर्स ही अंदमानमधल्या अतीअसुरक्षित जनजातींसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचं सर्व्हायवल इंटरनॅशनल या संस्थेचं म्हणणं आहे.
कायदा आणि वास्तव
आदिम समुदायांच्या हक्कांचं संरक्षण करणं, हे त्या त्या देशातल्या सरकारचं कर्तव्य आहे, असं संयुक्त राष्ट्रांच्या मूलनिवासी आणि आदिवासींविषयीच्या परिषदेनं स्पष्ट केलं होतं.
भारतात सरकारच्या मतेही सेंटिनली लोकांना त्यांच्या पद्धतीनुसार जगण्याचा, त्यांची जीवनशैली जतन करण्याचा अधिकार आहे आणि त्या इच्छेचा आदर ठेवायला हवा.
आदिवासी समुदायांसाठी भारत सरकारनं अनेक योजना आणल्या आहेत, मात्र त्यांची योग्य रित्या अंमलबजावणी होत नसल्यानं सरकारवर अलीकडच्या काळात टीकाही झाली आहे.
खरंतर अंदमान आणि निकोबार बेटे (आदिवासींचं संरक्षण) नियम 1956 मध्येच या बेटांवरच्या आदिवासींच्या संरक्षित क्षेत्रात पर्यटक आणि इतर कुणालाही जाण्यास मनाई केलेली आहे.
इथल्या जमातींचे फोटो किंवा व्हिडियो काढणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असं भारत सरकारनं 2017 साली स्पष्ट केलं होतं. भारतीय तटरक्षक दलाची पथकं इथे गस्तीही घालतात.
या द्वीपसमूहातल्या सेंटिनलीं, जारवा, ग्रेट अंदमानी, ओंगे आणि शाँपेन या पाच समुदायांना पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स' म्हणजे PVTG म्हणून कायद्यानं संरक्षण मिळालं आहे.
पण पर्यटकांची घुसखोरी आणि वाढती विकासकामं यांमुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात येत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











