शाळाबाह्य आदिवासी मुली क्रिकेटमुळे शिक्षणात इतक्या रमल्या की आता जपानी बोलतात

- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
"आम्ही शाळेत जात नव्हतो. दिवसभर इकडे तिकडे फिरत होतो. खर्रा खात होतो. नाल्याकडे असलेल्या झाडांवर चढत होतो. कोणी कोणी नाल्यातही पडत होतं. जुगार पण खेळत होतो. रस्त्यावर फिरायचं, कधी कोणाच्या घरी चोरी करायची, तर कधी लोखंड वेचायला जायचं आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांतून खाऊ खायचा. पण, आता सगळं बदललं."
निशा मरकाम ही 15 वर्षीय मुलगी आपण कसे बदललो हे तिच्या हातात असलेल्या चेंडूकडे बघून सांगत होती. कारण, याच चेंडूमुळे तिचं आयुष्य बदलतंय. निशा घराजवळच्या मैदानावर दररोज क्रिकेटचा सराव करते आणि झुलन गोस्वामीसारखं बॉलर बनायचं स्वप्न बघते.
तिच्यासारख्या आणखी 20 आदिवासी मुली दररोज सकाळी आणि दुपारी आपल्या वस्तीजवळच्या मैदानावर सराव करतात आणि मोठ्या मैदानावर क्रिकेट खेळण्याचं स्वप्न बघतात.
त्यांनी स्वतःच्या ताकदीवर नागपुरातल्या एका मोठ्या क्रिकेट टूर्नामेंटच्या विजेते संघालाही हरवलं. कुठलंही प्रशिक्षण नसताना त्यांना स्वतःच्या ताकदीवर मिळालेलं हे पहिलं यश आहे.
'वडिलांना काम मिळालं नाही तर त्या दिवशी उपाशीच झोपतो'
या सगळ्या मुली कुठल्याही मोठ्या क्रिकेट क्लबच्या खेळाडू नाहीत. त्या नागपूर शहारातल्या मानेवाडा भागातल्या सिद्धेश्वरी आदिवासी गोंड वस्तीतल्या मुली आहेत.
पिढ्यान् पिढ्या त्यांचं आयुष्य झोपडपट्टीतच गेलंय. या वस्तीत मुलभूत सुविधा तर सोडाच पण कधी घरात खायला अन्नही मिळत नाही.
ज्या दिवशी वडिलांना काम मिळालं नाही त्यादिवशी भातात मीठाचं पाणी टाकायचं आणि ते खायचं अशी यांची परिस्थिती.
या वस्तीतल्या महिला शौचासही उघड्यावर बाहेर जातात. वस्तीत टॉयलेट बांधून दिलेत पण पाणी नसल्यानं बाहेर जात असल्याचं याच वस्तीतली क्रिकेट खेळणारी मुलगी राशी मरकाम सांगतेय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
ती म्हणतेय, माझे बाबा लाकूड तोडायला, नाले साफ करायला मिळेल ते काम करायला जातात. ज्या दिवशी काम मिळालं नाही त्या दिवशी आम्ही उपाशीच झोपतो. आमच्या वस्तीत पाणी नाही. बोरवेल आहे पण त्यालाही पाणी येत नाही. कधी टँकर आलं नाहीतर शेष नगरला जाऊन उन्हात पाणी भरतो. रात्री बाहेर शौचास जातो तेव्हा भीती वाटते.
राशीच्या क्रिकेट संघाची कॅप्टन आणि तिची बहीण राधाला स्मृती मंदानासारखं बनायचं आहे, तर याच क्रिकेट संघातली कुमूद विराट कोहली बनायचं स्वप्न बघतेय.
पण, आपल्या वस्तीची परिस्थिती मांडणारी राशी क्रिकेटच्या माध्यमातून वस्तीचं चित्र बदलवण्याचं स्वप्न बघतेय.

ती म्हणतेय की मला कोणासारखं बनायचं नसून लोकांनी माझ्यासारखं बनावं इतकं मोठं व्हायचं आहे. मला मोठ्या मैदानावर खेळून, देशासाठी खेळून या वस्तीतल्या लोकांना बाहेर काढायचं आहे.
राशी तीन बहिणी आहेत आणि या तिन्ही बहिणी क्रिकेट खेळतात. राशीची बहीण राधा त्यांच्या संघाची कॅप्टन आहे. मुलींचं स्वप्न आणि त्यांची क्रिकेटसाठीची मेहनत बघून वडिल किरण मरकाम यांना अभिमान वाटतो.
ते म्हणतात, "माझ्या मुली क्रिकेटची कुठलीच मॅच सोडत नाही. आयपीएल बघतात, आता झालेली चॅम्पियन ट्रॉफी बघितली. आता त्यांना प्रत्यक्ष मैदानावर बघून आनंद वाटतो. आमच्या मुलींची चांगली प्रगती झाली पाहिजे. आम्ही जे झोपडपट्टीत भोगतोय ते त्यांच्या वाट्याला येऊ नये."
शाळाबाह्य मुली इंग्रजी शब्द आणि जपानी भाषा कशा बोलू लागल्या?
किरण मरकाम यांच्या तिन्ही मुली क्रिकेट खेळतात. पण, शाळेत नाव असूनही त्या शाळेत जात नाहीत. फक्त या तीनच मुली नाहीतर या वस्तीतल्या 5-6 मुली सोडल्या जवळपास 30 मुली शाळाबाह्य आहेत.
कारण, घरापासून शाळा 10-12 किलोमीटर दूर आहे आणि रिक्षाही येत नाही. शिवाय गोंडी आणि हिंदी या दोनच भाषा येत असल्यानं मराठी शाळेत मनही रमत नाही. त्यामुळे या मुली शाळेत जात नाहीत.
पण, सरकारी शाळेकडे पाठ फिरवलेल्या या मुली आता इंग्रजीचे शब्द आणि जपानी भाषा बोलायला लागल्यात. सॉरी, थँक्यू, वेलकम अशा अनेक इंग्रजी शब्दांना जपानी भाषेत काय म्हणतात हे या मुली अगदी पटापट सांगतात. तसेच त्यांना हिंदीतून वाक्य सांगितलं ते इंग्रजीत काय म्हणतात? हे देखील या मुली सांगतात.

पण, शाळाबाह्य असताना या मुली हे सगळं कसं शिकल्या? तर हे शक्य झालं फक्त सेवा सर्वदा या सामाजिक संस्थेमुळे. कारण, सामाजिक कार्यकर्ते खुशाल ढाक यांनी या वस्तीत दोन वर्षांपूर्वी पत्र्याची शाळा उभारली.
खुशाल ढाक हे नागपुरातल्या झोपडपट्ट्यांमधल्या मुलांना शिक्षण देतात. ज्या भटक्या लोकांच्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्येही ते गेल्या 19 वर्षांपासून शिक्षण देण्याचं काम करतात. त्याप्रमाणे त्यांनी या वस्तीतही पत्र्याची शाळा उभारून या मुलींना शिक्षण द्यायला सुरुवात केली.
ते सांगतात, मी या वस्तीत आलो तेव्हा इथं शिक्षण शून्य प्रमाणात असल्याचं जाणवलं. मग मी 19 वर्षांपासून ज्या वस्त्यांमध्ये शिक्षण द्यायचं काम करतो त्याला ही वस्तीही जोडायची ठरवली.
आम्ही कसंतरी पत्र्याचं शेड उभारून एका मुलीपासून ही शाळा सुरू आहे. सुरुवातीला विद्यार्थी कमी होते. पण, हळूहळू त्यांची संख्या वाढली.

सिद्धेश्वरी गोंड वस्तीत दररोज सायंकाळी 5 वाजता ही शाळा भरते. यामध्ये मुलांना काळाच्या गरजेनुसार बेसिक शिक्षण, वाचण, लिखाण, बोलायचं कसं, वागायचं कसं अशा सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. त्यांच्या या पत्र्याच्या शाळेत मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे हे विशेष.
वस्तीपासून शाळा जवळ असलेल्या मुली दिवसभर सरकारी शाळेत जातात आणि सायंकाळी पुन्हा या शाळेत शिकतात. पण, या मुली अगदी बोटावर मोजण्याइतक्या आहेत. वस्तीतल्या 5-6 मुली सोडल्या तर इतर मुली शाळेतच जात नव्हत्या.
शाळा दूर आहे म्हणून शाळेत न जाणाऱ्या मुली या वस्तीतल्या शाळेत मात्र आवडीनं येतात. या शाळेत त्यांना समजेल अशा भाषेत त्यांना शिकवलं जातं. या मुलांना शिकवण्यासाठी खुशाल ढाक यांनी वस्तीतजवळच्या एका महिलेची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. त्या दररोज सायंकाळी मुलांना खेळीमेळीच्या वातावरणात शिकवतात. गेल्या 3 महिन्यांपासून मुलांना जपानी भाषा बोलायलाही शिकवलं जातंय.
या शाळाबाह्य मुली क्रिकेटमुळे शिक्षणात कशा रमल्या?
पण, गेल्या काही वर्षांपासून शाळाबाह्य असणाऱ्या मुली शिक्षणात सहज रमतील असं नव्हतं. मग त्यासाठी खुशाल ढाक यांनी मुलांना खेळ खेळवणं सुरू केलं. मुलांना आवडेल ते खेळ मुलं खेळत होती. या माध्यमातूनच त्यांना शिक्षणही देणं सुरू ठेवलं.
ढाक सांगतात, पहिल्यांदा धावणं, कबड्डी आणि फूटबॉल सुरू केला. पण, यामध्ये मुलींचा रस दिसला नाही. मग त्यांना आवडेल ते खेळ खेळायला लावले. तर मुली विटी दांडू उत्तम खेळत होत्या. पण, या खेळाच्या कुठेही टूर्नामेंट होत नाहीत. त्यामुळे आपण गिल्ली दांडू खेळणाऱ्या मुलींच्या हातात क्रिकेटची बॅट दिली तर असा विचार डोक्यात आला. सुरुवातीला त्यांच्याकडे बॉल फेकला तर त्यांची पकड जबरदस्त होती. मग त्यांचा क्रिकेटचा सराव सुरू केला."

पुढे ते म्हणतात, "शिक्षणात मागासलेपणा होताच. त्यामुळे फक्त खेळ खेळून भागणार नव्हतं. त्यांचं शिक्षणातही मन रमणं गरजेचं होतं. मग त्यासाठी बॉल पकडून "बे एक बे एक बे दुणे चार", बॅटच्या माध्यमातून "ए फॉर ॲपल बी फॉर बॉल" असं शिकवलं. त्यांना क्रिकेटच्या माध्यमातून शिक्षणात गोडी निर्माण झाली."
आता क्रिकेटच्या माध्यमातून शिक्षणातला मागासलेपणा दूर करत या शाळाबाह्य मुली शिक्षणात रमताना दिसतात. त्यामुळे आधी वस्ती आणि वस्तीच्या शेजारच्या लोकांना बघण्याचा जो दृष्टीकोन होता तो आता पूर्णपणे बदलल्याचं राशी सांगतेय.

ती म्हणतेय "मी क्रिकेट खेळते आणि अभ्यासही करतेय. आधी आम्ही इकडे तिकडे भटकत होतो तर आम्हाला लोक काहीही बोलायचे. पण, आता आम्ही जापानी भाषा बोलतोय, क्रिकेट खेळून जिंकून येतो तेव्हा वस्तीतल्या लोकांना आनंद होतो. बाहेरचे लोकही म्हणतात आता या मुलींमध्ये बदल झालाय."
युनिसेफच्या आकडेवारीनुसार जगभरात 12 कोटी 20 लाख मुली शाळाबाह्य आहेत. त्यापैकी साधारण साडेतीन कोटी मुली प्राथमिक शाळेपर्यंतही पोहोचू शकत नाही. क्रिकेटसारखे खेळ त्यांना शेाळेपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करतायत. पण अजूनही त्यांना सरकारी शाळेपर्यंत पोहचण्याचा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











