प्रजासत्ताक दिन: आदिवासींना संविधानाची ओळख व्हावी म्हणून बनवली माडिया, कोलाम भाषेत उद्देशिका

फोटो स्रोत, Avinash Poinkar/FACEBOOK
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"आम भारताताद लोकूर, भारताताद ओक्कोद सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, घडिपेकाट पेणा आवरेत सदरमांधी नागरीकुलग." थांबा तुम्ही चुकीच्या भाषेतला एखादा लेख वाचायला सुरुवात केलेली नाही. तर ही आहे आदिवासी कोलाम भाषेतील संविधानाची उद्देशिका.
भारतीय लोकशाही व्यवस्थेत अनेक आदिम समुदाय अजूनही अजूनही विकासाच्या परिघापासून कोसो दूर आहेत.
त्यातच गडचिरोली, चंद्रपूर या भागात राहणाऱ्या माडिया आणि कोलाम जमातीच्या 94% लोकांना 'संविधान' हा शब्दच माहीत नाही, अशी माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली होती.
लोकशाही व्यवस्थेत राहणाऱ्या आपल्या बांधवांना संविधानाची ओळख व्हावी म्हणून याच जमातीतील काही उपक्रमशील तरुणांनी आदिवासींना लोकशाही आणि संविधानाची ओळख व्हावी आणि प्रजासत्ताक या शब्दाचा खरा अर्थ त्यांना त्यांच्या भाषेत समजावा म्हणून संविधानाच्या मूळ उद्देशिकेचं आदिम कोलाम आणि माडिया भाषेत भाषांतर केलं आहे.
भारतात सुमारे दहा कोटी आदिवासी राहतात. प्रजासत्ताक व्यवस्था स्वीकारलेल्या या देशात अजूनही सुमारे 75 आदिम समुदाय त्यांचं अस्तित्व, संस्कृती आणि भाषा टिकवून आहेत.
आदिवासींच्या पारंपरिक ज्ञान आणि संस्कृतीबाबत आजही जगभरात कुतूहल असतं. तंत्रज्ञानाच्या त्सुनामीत स्वतःला आणि स्वतःच्या संस्कृतीला वाचवून ठेवण्याचा प्रयत्न आजवर अनेक आदिवासी जमातींनी केला आहे.
माडिया आणि कोलाम भाषेत लिहिलेली ही संविधानाची उद्देशिका हा त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणावा लागेल. चंद्रपुरातील जागृत संस्थेचा पुढाकार आणि समन्वयातून या उद्देशिका पुढे आल्या आहेत.
2023 मध्ये आदिम माडिया समुदायातले पहिले वकील ॲड. लालसू नोगोटी, तसंच हेमलकसामधले आदिवासी कार्यकर्ते चिन्ना महाका आणि चंद्रपूर येथील तरुण आदिवासी लेखक अविनाश पोईनकर यांनी मिळून भारताच्या संविधानातील उद्देशिकेचा आदिम माडिया भाषेत अनुवाद केला होता.

फोटो स्रोत, Avinash Poinkar/FACEBOOK
यावर्षी 2024 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जागृत संस्थेकडून आदिम कोलाम भाषेत संविधानाची उद्देशिका प्रकाशित करण्यात आली आहे.
मागील वर्षी कोल्हापूर येथे पहिले आदिम जनजाती संमेलन पार पडले होते. यात पहिल्यांदाच महाराष्ट्रात असलेल्या कोलाम, कातकरी आणि माडिया या तीनही आदिम समुदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संविधानिक मुल्यांवर या जमातीत काम करण्यासाठी या भाषेतच उद्देशिका तयार व्हावी, हा विचार पुढे आला. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील कोलाम समुदायातील कार्यकर्ते देवू शिडाम, नामदेव कोडापे, कोडापे, बाबाराव आत्राम आणि अजय आत्राम या तरुणांनी भारतीय संविधान उद्देशिकेचा आदिम कोलाम भाषेतला अनुवाद केला आहे.
संविधानाच्या उद्देशिकेचं केलेलं हे भाषांतर केवळ संविधानाची ओळख करून देण्यासाठीच नव्हे तर आदिम जमातीतील प्रत्येकाला लोकशाहीत त्याला किंवा तिला दिल्या गेलेल्या हक्क आणि अधिकारांची ओळख व्हावी यासाठी सुद्धा खूप गरजेचं असल्याचं हे तरुण सांगतात.
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या आदिवासी जमातीच्या नागरिकांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे.
महाराष्ट्रातील आदिम(PVTG) जमातींची परिस्थिती
महाराष्ट्रात कोलाम, कातकरी आणि माडिया असे तीन आदिम आदिवासी समुदाय आहेत.
या प्रत्येक जमातीची स्वतंत्र भाषा आहे. प्रथा, परंपरा, स्वतंत्र संस्कृती आहे. जल, जंगल, जमीनीशी निगडीत उपजिविका करणारे हे समुदाय असून स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही यातील बहुतांश समाज उपेक्षित राहिला आहे.
महाराष्ट्रातील आदिम जनजाती समुदायाचं जनसंख्यात्मक आणि भौगोलिक अस्तित्व बघता, कोलाम हा समुदाय नांदेड, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात राहतो.
2011 च्या जनगणनेनुसार कोलाम समुदायाची लोकसंख्या केवळ 1,95,671 इतकी आहे. कातकरी समुदाय हा मुंबई-रायगड-ठाणे-पालघर या शहरी भागालगत असून या समुदायाची लोकसंख्या 2,85,334 इतकी आहे.
माडिया ही जमात गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भामरागड, एटापल्ली, अहेरी, चामोर्शी, धानोरा, कोरची भागात वास्तव्यास असून या समुदायाची लोकसंख्या अवघी 62,000 इतकी आहे.

फोटो स्रोत, Avinash Poinkar/FACEBOOK
आदिवासींच्या प्रश्नांचा अभ्यास करणारे अविनाश पोईनकर म्हणतात की,
"सद्यस्थितीत या समुदायांची लोकसंख्या एक तर स्थिर आहे किंवा कमी होत आहे. भविष्यात हे आदिम समुदाय लुप्त होतील की काय? हे नाकारता येत नाही. अंदमान निकोबार राज्यातील आदिम ओंगे जमातीचे केवळ 19 तर आदिम जारवा जमातीचे केवळ 29 लोक शिल्लक आहेत.
हे समुदाय संपुष्टात येण्याचा धोका नाकारता येत नाही. या समुदायांच्या स्वतंत्र संस्कृती, प्रथा, परंपरा आहेत. मात्र त्याचे जतन आणि संवर्धनाचा प्रश्न तसा नेहमीच उपेक्षित राहिलाय.
जागतिकीकरणाच्या काळात आता आदिम समाजाच्या संस्कृतीसह मानवी जीवन आणि त्यांचा अधिवास दिवसेंदिवस धोक्यात येतोय.
या काळात आदिम जमातींचे हक्क आणि संस्कृतीचें जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. 94 टक्के आदिम माडिया तर 92 टक्के आदिम कोलाम समुदायांनी संविधान हा शब्दच ऐकला नाही असा धक्कादायक अहवाल पुढे आला.
या पार्श्वभूमीवर आदिम कोलाम आणि माडिया भाषेतील संविधान उद्देशिकेमुळे संविधानिक जनजागृती घडण्यास मदत झाली. शासनाने या आदिम भाषेतील संविधान उद्देशिका या समुदायातील गावागावात, शाळा-महाविद्यालयातूनही पोहोचवून जनजागृती करणे आवश्यक आहे."
गडचिरोलीतील माडिया समुदायात अतिनक्षल प्रभावित भामरागड, एटापल्ली तालुक्यात ग्रामसभांच्या माध्यमातून संविधान उद्देशिकेचे वाचन नागरिकांनी केलं आहे. तर चंद्रपूरातील जिवती तालुक्यातील कोलाम समुदायात पहिल्यांदाच कोलाम भाषेतून संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं.
देशातील आदिम जमातींची लोकसंख्या कमी होत असताना हळूहळू लुप्त होत चाललेल्या माडिया आणि कोलाम भाषेत केलेला संविधानाच्या उद्देशिकेचा अनुवाद अत्यंत महत्त्वाचा म्हणता येईल.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








