डॉ. आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या पहिल्या मसुद्यात 'भारत' शब्द नव्हता, मग तो कुठून आणि कसा आला?

राज्यघटनेतलं पहिलं कलम

फोटो स्रोत, Indian Constitution

भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करताना देशाच्या नावावर झालेल्या चर्चेत काय निर्णय घेण्यात आला? राज्यघटनेच्या पहिल्या मसुद्यात 'भारत' हे नाव होतं का?

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 1945 च्या ब्रिटनच्या निवडणुकीत हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष या दोघांनीही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याची आश्वासनं समाविष्ट केली होती.

मजूर पक्षाने निवडणूक जिंकली. सप्टेंबर 1945 मध्ये भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी जाहीर केलं की, "ब्रिटिश सरकार भारताला संपूर्ण स्वायत्तता देण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास कटिबद्ध आहे."

यानंतर गोष्टी वेगाने घडू लागल्या.

सरतेशेवटी भारत आणि पाकिस्तान हे दोन देश तयार झाले आणि दोघांना अनुक्रमे 14-15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर केंद्रीय विधानसभा आणि राज्य विधानसभांचं विलीनीकरण करून भारताची संविधान सभा स्थापन करण्यात आली. या संविधान सभेतील चर्चेच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला.

राज्यघटनेच्या पहिल्या मसुद्यात 'भारत' शब्द नव्हता

डॉ. आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटना समितीत हा मसुदा मांडला. या पहिल्या मसुद्यात देशाच्या नावाचा उल्लेख असलेल्या कलम 1 मध्ये 'भारत' हा शब्द दिसत नव्हता.

त्यात ‘India Shall be a Union of States' असं म्हटलं होतं.

त्यानंतर जवळपास वर्षभरानंतर 17 सप्टेंबर 1949, रोजी डॉ. आंबेडकरांनी काही सुधारणा सुचवल्या. एक दुरुस्ती म्हणून, "India, that is, Bharat shall be a Union of States" असंही प्रस्तावित केलं गेलं.

त्या दिवशी 'राज्यांचा संघ' (Union of States ) या शब्दांबद्दल सर्व सदस्य चिंतेत होते, परंतु 'इंडिया म्हणजे भारत' (India, that is, Bharat ) याबद्दल कोणी बोललं नाही. त्याच दिवशी मतदान घेण्यात आलं आणि आंबेडकरांनी आणलेली दुरुस्ती झाली.

नावात दुरुस्तीसह प्रस्ताव

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दुसऱ्या दिवशी 18 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातून एच. व्ही. कामत यांनी भारताच्या नावाचा उल्लेख करणाऱ्या पहिल्या विभागात दोन दुरुस्त्या आणल्या.

म्हणजेच, पहिल्या दुरुस्तीत देशाचं नाव "भारत किंवा इंग्रजी भाषेत इंडिया, राज्यांचा संघ असावा" असं म्हटलं आहे. दुसर्‍या दुरुस्तीत 'हिंद किंवा इंग्रजी भाषेत इंडिया, राज्यांचा संघ असेल' असं म्हटलं आहे.

परंतु सभागृहाचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी या दोन दुरुस्त्या परस्परविरोधी असल्याचं निदर्शनास आणून दिलं.

या चर्चेत बोलताना कामत म्हणाले, "भारतीय प्रजासत्ताकाला काय नाव द्यायचं याबाबत अनेक सूचना करण्यात आल्या. भारत, हिंदुस्थान, हिंद, भारतभूमी, भारतवर्ष असं सुचवण्यात आलं. काही लोकांचं म्हणणं आहे की, नवीन नाव द्यायचं तर भारत नाव ठेवावं. ते पुरेसे आहे. भारत, भारतवर्ष, भारतभूमी ही नावे आहेत.

हे या भूमीचं सर्वात प्राचीन नाव आहे. अनेक इतिहासकारांनी भारत नावाच्या उत्पत्तीबद्दल संशोधन केलं आहे. ते त्याच्या उत्पत्तीबद्दल एकमत होऊ शकले नाहीत. काहीच्या मते दुष्यंत-शकुंतला पुत्राच्या नावावरून या देशाला भारत म्हणतात. काही जण म्हणतात की वैदिक काळापासून हे नाव अस्तित्वात होतं."

डॉ. आंबेडकर

फोटो स्रोत, Getty Images

कामत असं बोलत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मध्येच त्यांना थांबवलं आणि म्हणाले "आता हे सगळं तपासून पाहण्याची गरज आहे का? मला त्यामागचा उद्देश समजला नाही. अन्य ठिकाणी हे बोलणं रंजक ठरू शकतं. आपल्याकडे या सर्वांवर चर्चा करायला वेळ कमी आहे."

पुन्हा बोलताना कामत यांनी ‘इंडिया' म्हणजेच भारत’ असं नाव देणं चांगलं नाही, अशी टिप्पणी केली.

या चर्चेत बोलताना जबलपूर येथील सेठ कोविंद दास म्हणाले की, "इंडियाऐवजी नाव भारत ठेवावं. वेदांमध्ये इंडिया हे नाव नाही, फक्त भारत हे नाव आहे. भारत हे नाव महाभारत, विष्णू पुराण आणि ब्रह्मपुराणातही आहे. युआन चुआंग यांनीही आपल्या पुस्तकात भारताचा उल्लेख केला आहे. भारत असं नाव दिल्यानं आपल्या देशाला प्रगतीला कोणती बाधा येणार नाही."

मद्रास प्रांताचे मंत्री काय म्हणाले?

काला व्यंकट राव नावाचे सदस्य, जे तत्कालिन मद्रास प्रांताचे महसूल मंत्री होते, त्यांनीही सेठ कोविंद यांच्याच युक्तिवादाचं समर्थन केलं.

"भारत हे नाव खूप जुनं आहे. ऋग्वेदातही त्याचा उल्लेख आहे. विष्णूपुराणात भारताच्या सीमा परिभाषित केल्या आहेत. त्यामुळं 'इंडिया'ला भारत म्हणायला हवं. हिंदी भाषेत नाव ‘भारती’ असायला हवं," असं ते म्हणाले.

या वादाला कंटाळून डॉ. आंबेडकर यांनी प्रश्न विचारला की, इंडियानंतर भारत हे नाव येण्याबद्दल आपण एवढी लांबलचक चर्चा करायला हवी का?

या चर्चेत भाग घेतलेले संयुक्त प्रांताचे काँग्रेसचे नेते कमलापती त्रिपाठी यांनी म्हटलं, "इंडिया म्हणजेच भारत ऐवजी 'भारत म्हणजेच इंडिया' असं करता येऊ शकतं. किंवा आपण कामत यांनी आणलेली दुरुस्ती स्वीकारू शकतो, ज्यानुसार भारत हे नाव इंग्रजी भाषेत इंडिया म्हणून ओळखलं जाईल.”

वेद आणि पुराणातही भारत हे नाव आहे. 'भारत' नाव घेतल्यास भारत एक महान राष्ट्र होईल आणि मानवतेची सेवा देईल, असा युक्तिवाद ते करत राहिले.

दुरुस्तीचा प्रस्ताव अयशस्वी झाला

तत्कालीन संयुक्त प्रांताचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी भारताचा उल्लेख भारत किंवा भारतवर्ष असा केला पाहिजे, असं म्हटलं.

"आम्ही आमची धार्मिक कर्तव्य पार पाडताना भारतवर्ष, भारत खंड यांचा उल्लेख करतो?" असा सवाल त्यांनी केला.

यानंतर, सभागृहाच्या अध्यक्षांनी कामत यांच्या दुरुस्तीच्या प्रस्तावावर मतदान घेतलं.

राज्यघटनेचं पहिलं कलम

फोटो स्रोत, Constitution

कामत यांच्या 'India that is Bharat' हे बदलून हिंदीत ‘भारत’ म्हणावं आणि इंग्रजी भाषेत ‘इंडिया’ म्हणा आणि ते 'राज्यांचे संघराज्य' असेल.

या ठरावावर मतदान झालं. या ठरावाच्या बाजूनं 38 तर विरोधात 51 मतं पडली.

ठरावाच्या विरोधात मतदान झालं.

त्यामुळे 'India that is Bharat' हे नाव निश्चित करण्यात आलं.

भारताच्या नावाबाबत संविधान सभेत वाद

मात्र, त्यानंतरही भारताच्या नावाबाबत संविधान सभेत अधूनमधून वाद होत होते.

17 नोव्हेंबर 1949 रोजी सभागृहात बोलताना सेठ गोविंद दास यांनी म्हटलं,"केवळ देशाच्या नावाचा विचार केला तर इंडिया म्हणजेच भारत असं राज्यघटनेत नमूद केलं आहे. भारत या नावाचा समावेश करणं खरंच समाधान देणारं आहे. पण ज्यापद्धतीने ते समाविष्ट केलं आहे, ते खटकणारं आहे. इंडिया म्हणजेच भारत हे विचित्र वाटतंय.”

ओडिशातील लक्ष्मीनारायण साहूंनी म्हटलं, "आमच्या देशाचं पहिलं नाव भारत आहे. पण बाकीच्या जगाला भारत हे समजत नसल्याने ' इंडिया म्हणजे भारत' असं म्हटलं. हे काय आहे?"

18 नोव्हेंबर 1949 रोजी बोलताना गुजरातमधील कांथुभाई देसाईंनी म्हटलं की, "नावात कोणतीही मोठी अडचण नाही. माझ्या अनेक मित्रांचा राज्यघटनेत ‘इंडिया म्हणजे भारत’ असा उल्लेख करण्यावर आक्षेप आहे. पण मला त्यात फार आक्षेपार्ह वाटत नाही. जग आपल्याला इंडिया या नावानं ओळखत. आपल्यासाठी भारत हाच आत्मा आणि हृदय असेल. जग आम्हाला ‘इंडिया’ म्हणून ओळखेल. आम्ही स्वतःला ‘भारत’ म्हणू."

आंबेडकरांवर टीका करणारे नेते

त्याच वर्षी 21 नोव्हेंबर रोजी सभागृहात बोलताना अलकू राय शास्त्री म्हणाले, "देशाच्या नावाबाबत, इंडिया म्हणजेच भारत एक संघराज्य असेल, असा उल्लेख आहे. यावरून आपण आपल्या गुलाम मानसिकतेतून बाहेर पडलेलो नाही, हे दिसून येतं. आपल्या देशाचं नाव काय आहे, हे आपण स्पष्टपणे सांगितलेलं नाही.

आपण या भूमीचं नाव 'इंडिया म्हणजेच भारत’ असं ठेवलं आहे. जगातील कोणत्याही देशाचं नाव इतकं गुंतागुंतीचे नाही. आम्ही आपल्याच देशाला योग्य नाव देण्यात अयशस्वी झालो आहोत."

अलकू राय शास्त्री हे काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. ते आर्य समाजाचे सदस्य होते. ते हिंदीचे कट्टर समर्थक होते.

24 नोव्हेंबर 1949 रोजी चर्चेत सहभागी झालेले बिहारचे मुहम्मद ताहीर यांनी म्हटलं की, डॉ. आंबेडकरांनी भारताला गोंधळात टाकणारं नाव दिलं.

डॉ. आंबेडकर

फोटो स्रोत, Getty Images

"आपली राज्यघटना आपल्या देशाला नाव देऊ शकली नाही, हा आंबेडकरांच्या प्रतिभेचा पुरावा आहे. त्यांनी गोंधळलेलं नाव दिलं आहे. ते स्वीकारलं गेलं आहे. जर कोणी तुमच्या देशाचं नाव काय आहे, असं विचारलं तर इंडिया, भारत किंवा हिंदुस्थान असं उत्तर दिलं असतं. पण आदरणीय डॉक्टरसाहेब, आता मला उत्तर द्यावं लागेल की 'इंडिया म्हणजे भारत' आहे."

मात्र, या चर्चेचा कोणताही परिणाम झाला नाही.

कलम 1 मध्ये "इंडिया, म्हणजे भारत, 'राज्यांचा संघ' असेल" असा उल्लेख करण्यात आला होता. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाला अंतिम रूप देण्यात आलं आणि घटना समितीने राज्यघटना स्वीकारली.

26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना लागू झाली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)