झोहरान ममदानींच्या विजयी भाषणात 'नियतीशी करार', नेहरूंचा उल्लेख करत काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
न्यूयॉर्कमध्ये बुधवारी (5 नोव्हेंबर) भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव दुमदुमत होतं. निमित्त होतं न्यूयॉर्कचे नव्यानं निवडून आलेले महापौर झोहरान ममदानी यांच्या भाषणाचा.
ममदानी तिथे जमलेल्या गर्दीसमोर भाषण करताना जवाहरलाल नेहरू यांनी 1947 च्या मध्यरात्री भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रसंगी केलेल्या भाषणाचा संदर्भ दिला.
याप्रसंगी झोहरान ममदानी यांनी नेहरूंच्या शब्दांची पुनरुक्ती केली. ते म्हणाले, "इतिहासात असे क्षण फार कमी वेळा येतात, जेव्हा आपण जुन्या युगातून नव्या युगाकडे पावलं टाकतो. जेव्हा एक युगाचं शेवट होतो आणि एका राष्ट्राच्या आत्म्याला नवीन अभिव्यक्ती मिळते. आजच्या रात्री आपण जुन्या युगातून एका नव्या युगाच्या दिशेनं पाऊल टाकत आहोत."
प्रचारात बॉलीवूडच्या दृश्यं आणि संवादांचा वापर
ममदानी यांचं भाषण संपताच, 'धूम' या 2004 मधील बॉलीवूडच्या चित्रपटाचं शीर्षक गीत संपूर्ण हॉलमध्ये वाजू लागलं. त्यानंतर जे-जी आणि एलिसिया कीज यांचं 'एम्पायर स्टेट ऑफ माईंड' हे गीत वाजू लागलं.
हे गीत आता नव्या अर्थांनी वाजत होतं. न्यूयॉर्कच्या भारतीय वंशाच्या पहिल्या महापौरानं इतिहास घडवला होता.

फोटो स्रोत, Getty Images
काही महिन्यांपूर्वी, ममदानी यांनी निवडणुकीचा प्रचार करताना बॉलीवूडचा वापर केला होता. ममदानी यांच्या दक्षिण आशियातील मूळाचं ते प्रतीक होतं.
प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या मीरा नायर या झोहरान ममदानी यांच्या आई आहेत. तर झोहरान यांचे वडील महमूद ममदानी हे भारतीय वंशाचे विद्वान आहेत.
झोहरान ममदानी यांनी इन्स्टाग्रामवर हिंदीमधून अनेक संदेश पोस्ट केले. यातील बहुतांश संदेशांमध्ये बॉलीवूडच्या गाजलेल्या चित्रपटांमधील मजेशीर दृश्य आणि संवादांचा वापर करण्यात आला होता.
बुधवारी (5 नोव्हेंबर) जिंकल्यानंतर केलेल्या भाषणात झोहरान ममदानी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा संदर्भ देणं, हादेखील त्या श्रृंखलेचा एक भाग होता.

फोटो स्रोत, Reuters
नेहरूंचं ते ऐतिहासिक भाषण
ममदानी यांनी नेहरूंच्या ज्या वक्तव्याचा संदर्भ दिला, ते ऐतिहासिक आहे. दिल्लीतील संविधान सभेत नेहरू भाषणाच्या सुरूवातीला जे शब्द बोलले होते, ते कालातीत आहेत.
"खूप वर्षांपूर्वी आपण नियतीला वचन दिलं होतं. आता वेळ आली आहे की आपण ते वचन पूर्ण करावं. पूर्णपणे किंवा संपूर्णपणे नाही, तर बऱ्याच अंशी निश्चित स्वरुपात. मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा सर्व जग झोपलेलं असेल, तेव्हा भारत जीवन आणि स्वातंत्र्यानिशी जागा होईल."
15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्रीच्या बरोबर आधी, दोन शतकांपासून असलेल्या ब्रिटिश राजवटीतून भारत स्वतंत्र होणार होता.
जवाहरलाल नेहरू यांच्या या शब्दांमध्ये उत्साह आणि गांभीर्य दोन्ही होतं. यात जबाबदारीचं वचन आणि एका राष्ट्राला त्याची अस्मिता मिळाल्याची जाणीवदेखील होती.

फोटो स्रोत, Reuters
अनेकजणांना वाटतं की, नेहरू यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन ममदानी यांनी संकेत दिला की न्यूयॉर्कमध्ये काहीतरी नवीन आणि संभाव्यरित्या परिवर्तन करणारं काम सुरू झालं आहे.
अनेक दशकांपूर्वी, नेहरू त्यांच्या भाषणातून एका राष्ट्राच्या पुनर्जन्मासारख्या मोठ्या घटनेकडे इशारा करत होते.
नेहरू त्यांच्या भाषणात पुढे म्हणाले होते की स्वातंत्र्य शेवट नाही, तर एक सुरूवात आहे. ही 'आराम किंवा विश्रांतीची नाही, तर सातत्यानं करायच्या प्रयत्नांची' सुरूवात आहे.
त्यांनी या गोष्टीवर भर दिला होता की, भारताच्या सेवेचा अर्थ म्हणजे लाखो पीडितांची सेवा करणं. याचा अर्थ आहे, 'गरिबी, अज्ञान, आजारपण आणि संधीतील असमानता' नष्ट करणं.
त्यांनी प्रतिज्ञा केली की, भारताचं कार्य तोपर्यंत संपणार नाही, जोपर्यंत अश्रू आणि वेदना असतील.
'स्वतंत्र भारतातील सर्व नागरिकांची प्रगती व्हावी अशा महान राष्ट्राची निर्मिती करता यावी,' म्हणून त्यांनी 'लहान-मोठ्या टीके'च्या ऐवजी एकजुटीचं आवाहन केलं.
भारताच्या पहिल्या पंतप्रधानाचं जवळपास 1,600 शब्दांचं हे भाषण इतिहासातील सर्वात प्रसिद्ध भाषणांपैकी एक मानलं जातं.
इतिहासानं नेहरूंच्या भाषणाची घेतलेली दखल
द न्यूयॉर्क टाइम्सनं त्यावेळेस लिहिलं होतं की नेहरूंनी 'त्यांच्या देशवासियांना त्यांच्या वक्तृत्वानं रोमांचित केलं होतं.'
इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी हे 'भावना आणि वक्तृत्व कौशल्यानं ओतप्रोत भरलेलं' भाषण असल्याचं म्हटलं.
इतिहासकार श्रीनाथ राघवन यांनी एका मुलाखतीत म्हटलं की 'हे भाषण आजदेखील भारतात दुमदुमतं. कारण ज्याप्रकारे महान भाषणांमध्ये अशा क्षणाला व्यक्त केलं जातं, तसंच या भाषणात व्यक्त करण्यात आलं होतं.'
1947 च्या त्या रात्री तीन प्रमुख वक्ते होते.
पहिले स्वत: नेहरू होते, दुसरे चौधरी खलीकुज्जमान होते आणि तिसरे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होते.
मात्र ती रात्र नेहरूंचीच होती.
नेहरू यांच्या भाषणाची पार्श्वभूमी अतिशय रंजक होती. टाइम मासिकानं म्हटलं की भारतीय नेते मध्यरात्र होण्याच्या एक तास आधी संविधान सभेच्या हॉलमध्ये जमले होते.
सर्व हॉल 'भारताच्या नव्या तिरंगा झेंड्यांच्या रंगांनी उजळून निघाला होता.'
टाइम मासिकात नेहरूंच्या भाषणाबद्दल काय म्हटलं होतं?
टाइम मासिकानं नेहरूंच्या ते भाषण 'प्रेरणादायी' असल्याचं म्हटलं. त्यानंतर जे घडलं, ते इतिहासाचं अद्भूत नाट्यमय प्रदर्शन होतं.
टाइम मासिकानं लिहिलं होतं, 'आणि मध्यरात्रीची बारावी घंटा वाजताच, पहाटेच्या पारंपारिक उद्घोषणेचं प्रतीक असलेला शंखनाद संपूर्ण सदनात दुमदुमू लागला. राज्यघटना सभेचे सदस्य उभे राहिले. या पवित्र क्षणी त्यांनी एकजुटीनं भारत आणि भारताच्या नागरिकांची सेवा करण्याचा संकल्प केला.'

फोटो स्रोत, ZohranMamdani/ YouTube
संविधान सभेच्या हॉलबाहेर भारतीय लोक आनंदानं नाचत होते.
रामचंद्र गुहा यांनी 'इंडिया आफ्टर गांधी' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी एका अमेरिकन पत्रकाराच्या वृत्ताचा संदर्भ दिला आहे.
'हिंदू, मुस्लीम आणि शीख सर्वजण एकत्रितपणे आनंदानं जल्लोष करत होते. नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला टाइम्स स्क्वेअर असं तसं हे दृश्य होतं. लोकांचं इतर कोणापेक्षाही नेहरूंवर अधिक प्रेम होतं.'
नेहरूंसमोरील तेव्हाची आव्हानं आणि आता ममदानींसमोरील आव्हानं
मात्र, स्वातंत्र्याच्या या उत्साहादरम्यान अराजकता आणि हिंसाचार आधीपासून सुरू होता.
संपूर्ण भारतीय उपखंडात दंगली सुरू होत्या.
दोन दिवसांनी भारत आणि पाकिस्तानच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. यातून इतिहासातील सर्वात मोठ्या आणि रक्तरंजित स्थलांतराची सुरूवात झाली.
दीड कोटी लोक नवीन सीमेपलीकडे निघून गेले. एका अंदाजानुसार, यापैकी दहा लाखांहून अधिकजण हिंसाचारात मारले गेले.
प्रचंड उलथापालथीच्या त्या काळात नेहरूंचे शब्द दुमदुमले. भारताच्या अपूर्ण वचनाची आठवण देत आणि त्या नेत्याची देखील, ज्याचं भाषेवरील प्रभुत्व त्या क्षणाच्या महतीनुसारच होतं.
एक उत्कृष्ट वक्ते म्हणून नेहरूंची ख्याती आधीच झालेली होती. ते राजकारण, विज्ञान, कला आणि नीतीमूल्य यासारख्या विविध विषयांवर सहजपणे भाषण करत असत.
ऑस्ट्रेलियातील राजकारणी वॉल्टर क्रोकर म्हणाले होते की, नेहरूंच्या भाषणांचा व्यापकपणा आणि सहजपणा अद्वितीय होता.
ऑगस्ट 1947 चं ते ऐतिहासिक भाषण संपवताना नेहरू म्हणाले होते, "आपल्याला कठोर परिश्रम करायचे आहेत. आपण जोपर्यंत आपलं वचन पूर्ण करत नाही, प्रत्येक भारतीय नागरिकाला नियतीनं ठरवलेल्या ठिकाणी पोहोचवत नाही, तोपर्यंत विश्रांती घ्यायची नाही."
सात दशकांनी, न्यूयॉर्कमध्ये ममदानी यांच्यासमोर आता वेगळी आव्हानं आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











