झोहरान ममदानी बनले न्यूयॉर्कचे महापौर, 'असं' आहे त्यांचं भारतीय कनेक्शन

झोहरान ममदानी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, झोहरान ममदानी

झोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे.

झोहरान ममदानी यांची न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी निवड होणं अनेक कारणांनी उल्लेखनीय ठरलीय.

ममदानी हे 1892 नंतरचे न्यूयॉर्क शहराचे सर्वात तरुण महापौर ठरणार आहेत, तसेच ते पहिले मुस्लिम महापौर आणि आफ्रिकेत जन्मलेले पहिले महापौरही ठरले आहेत.

झोहरान ममदानींचं असं आहे भारतीय कनेक्शन

झोहरान क्वामे ममदानी यांचा जन्म 1991 मध्ये युगांडाची राजधानी कंपाला येथे झाला होता. ममदानी यांच्या वडिलांनी एक क्रांतिकारी नेते आणि घानाचे पहिले पंतप्रधान क्वामे एन्क्रुमाह यांचं 'क्वामे' हे मधलं नाव (मिडल नेम) झोहरान यांना दिलं होतं.

ममदानी हे प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर आणि कोलंबिया विद्यापीठाचे नामांकित प्राध्यापाक महमूद ममदानी यांचे पुत्र आहेत.

आई मीरा नायर आणि वडील महमूद ममदानी यांच्यासोबत झोहरान ममदानी.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आई मीरा नायर आणि वडील महमूद ममदानी यांच्यासोबत झोहरान ममदानी.

झोहरान यांनी आपले सुरुवातीचे दिवस कंपाला इथं घालवले आणि त्यानंतर वयाच्या पाचव्या वर्षी ते दक्षिण आफ्रिकेला गेले.

ममदानी यांचे भारतीय वंशाचे वडील महमूद ममदानी हे केपटाउन विद्यापीठात प्रोफेसर होते.

केपटाउनमध्येच 1848 मध्ये सुरू झालेल्या दक्षिण आफ्रिकेतील सर्वात जुनी शाळा सेंट जॉर्ज ग्रामरमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं.

वयाच्या सातव्या वर्षी ते न्यूयॉर्कमध्ये आले. त्यांनी ब्राँक्स हायस्कूल ऑफ सायन्समध्ये शिक्षण घेतलं.

वर्ष 2014 मध्ये त्यांनी बोडन कॉलेजमधून 'बॅचलर इन आफ्रिकन स्टडीज'मध्ये पदवी मिळवली.

काही वर्षांनंतर, 2018 मध्ये ममदानी हे अमेरिकेचे नागरिक बनले.

ममदानी यांचा राजकीय प्रवास

झोहरान ममदानी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याआधी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे.

राजकारणात येण्यापूर्वी झोहरान ममदानी हे क्वीन्स, न्यूयॉर्कमध्ये फोरक्लोजर काऊंसलर (घर जप्ती प्रकरणातील सल्लागार) म्हणून काम करत होते.

कमी उत्पन्न आणि आर्थिक अडचणीमुळे आपलं घर गमावण्याची शक्यता असलेल्या कुटुंबांची ते मदत करत असत.

हे काम करत असताना त्यांना जाणवलं की, ज्या कुटुंबांना ते मदत करत होते, त्यांच्या समस्या केवळ आर्थिकच नाहीत, तर धोरणात्मक पण आहेत.

या अनुभवानं त्यांना सक्रिय राजकारणात येण्यासाठी प्रेरित केलं, जेणेकरून ते सामान्य लोकांवर परिणाम करणाऱ्या धोरणांमध्ये बदल करू शकतील.

ग्राफिक्स

त्यानंतर, 2020 मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली. त्यांनी न्यूयॉर्क असेंब्लीच्या 36 व्या डिस्ट्रिक्टमधून (एस्टोरिया, क्वीन्स) डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली.

पहिल्याच निवडणुकीत झोहरान ममदानी हे विजयी झाले आणि न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीमध्ये ते पहिले दक्षिण आशियाई आणि पहिले सोशलिस्ट प्रतिनिधी बनले.

आता डेमोक्रॅट ममदानींनी न्यूयॉर्क मेयर प्रायमरीत माजी गव्हर्नर यांना मागे टाकत सर्वांनाच धक्का दिला आहे.

राज्याचे माजी गव्हर्नर 67 वर्षीय कुओमो यांनी 2021 मध्ये लैंगिक छळाशी निगडीत एका प्रकरणामुळे पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता ते पुन्हा राजकीय जीवनात सक्रिय होण्यासाठी प्रयत्न करत होते.

विजयानंतर ममदानी म्हणाले, "आज रात्री आपण इतिहास लिहिला आहे. नेल्सन मंडेला यांनी म्हटल्याप्रमाणे - 'जोपर्यंत ते पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते नेहमी अशक्य वाटतं.' माझ्या मित्रांनो, आपण हे साध्य केलंय. मी डेमोक्रॅटिक उमेदवार म्हणून तुमच्या न्यूयॉर्क सिटीचा महापौर बनेन."

ममदानींची मोदी-नेत्यान्याहू यांच्यावर टीका

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

झोहरान ममदानी यांनी इस्रायलपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत उघडपणाने टीका केली आहे.

मे 2025 मध्ये एका कार्यक्रमात त्यांना विचारलं गेलं की, जर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये रॅली केली आणि नंतर न्यूयॉर्कच्या महापौरांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करायचं असेल, तर ते त्यात सहभागी होतील का?

ममदानी यांनी 'नाही' असं उत्तर देत म्हटलं की, "माझे वडील आणि त्यांचं कुटुंब गुजरातचे आहेत. नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये मुसलमानांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या हत्याकांडाला पाठिंबा दिला आहे.

एवढा हिंसाचार झाला की, आता गुजराती मुसलमानच नाहीत की काय? असं वाटतं. आपण मोदी यांना त्याच दृष्टीने पाहायला हवं जसं आपण बेंजामिन नेतन्याहू यांना पाहतो. ते एक युद्ध अपराधी आहेत."

या वक्तव्यानंतर न्यूयॉर्कमधील काही इंडो-अमेरिकन आणि हिंदू, शीख समाजाने हे विभाजनकारक आणि घृणास्पद विधान असल्याचं म्हटलं आणि ममदानी यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती.

गुजरात दंगलींसंबंधी सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदी यांच्याविरोधातले आरोप फेटाळून लावले होते.

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात नेमलेल्या SIT चा अहवाल तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने स्वीकारत या दंगलींमागे कट नसल्याचंही म्हटलं होतं.

ममदानी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर टीका केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ममदानी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर टीका केली आहे.

पॅलेस्टाईनला पाठिंबा आणि इस्रायलवरील टीकेबद्दल झोहरान ममदानी यांचे डेमोक्रॅटिक पक्षातील अनेक नेत्यांशी मतभेद आहेत.

एका अमेरिकन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इस्रायलच्या ज्यू राष्ट्र म्हणून अस्तित्वाला विरोध केला होता.

ते म्हणाले, "ज्या देशाचे नागरिकत्व धर्माच्या किंवा अन्य कोणत्याही आधारावर विभागले गेले आहे, त्या देशाला मी पाठिंबा देऊ शकत नाही. प्रत्येक देशात समानता असली पाहिजे, हा माझा विश्वास आहे."

ममदानी यांनी इस्रायलविरोधात वापरल्या जाणाऱ्या वादग्रस्त 'ग्लोबलाइझ द इंतिफादा' या घोषणेपासून अंतर राखलं नाही. त्यांनी या घोषणेला पॅलेस्टिनी लोकांच्या मानवाधिकारांसाठीच्या लढ्याचं प्रतीक म्हटलं आहे. त्यांच्या मते ही घोषणा हिंसक नाही, तर समानतेची मागणी करणारी आवाज आहे.

परंतु, टीकाकारांचं म्हणणं आहे की ही घोषणा जागतिक स्तरावर हिंसाचाराचं आवाहन वाटू शकते आणि त्यामुळे ज्यू मतदारांमध्ये भीती निर्माण होत आहे.

निवडणुकीत झोहरान ममदानी यांचे मुद्दे

झोहरान ममदानी यांचा निवडणूक प्रचार 'अन्न, वस्त्र, निवारा आणि मोफत बस सेवा' या मुद्द्यांवर आधारित आहे. आपल्या प्रचारात ते वारंवार सामान्य लोकांचा आवाज बनण्याचं वचन देत आहेत.

आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान झोहरान ममदानी हे नोव्हेंबरच्या निवडणुकीत ट्रम्प यांना मतदान करणाऱ्या न्यूयॉर्कमधील मतदारांना प्रश्न विचारताना दिसले. त्यावेळचे त्यांचे व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाले होते.

कोणत्या मुद्द्यांवर त्यांनी रिपब्लिकन अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला निवडलं आणि डेमोक्रॅटिक पक्षाचं समर्थन मिळवण्यासाठी कोणते बदल गरजेचे आहेत, असा प्रश्न त्यांनी मतदारांना विचारला.

ममदानी यांचा जाहीरनामा अनेक प्रगतिशील योजनांवर आधारित आहे, ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.

• मोफत सार्वजनिक बस सेवा

• सर्वांसाठी बालसंगोपन सुविधा

• महापालिकेच्या मार्फत चालवली जाणारी दुकानं

• परवडणारी निवास व्यवस्था/ घरं

झोहरान ममदानी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, झोहरान ममदानी

या सर्व योजनांसाठी निधी गोळा करण्यासाठी श्रीमंतांवर नवे कर लावण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले आहे.

'बीबीसी'शी बोलताना ममदानी म्हणाले, "हे असं शहर आहे, जिथे प्रत्येक चारपैकी एक व्यक्ती गरिबीत जगतो आणि जिथे पाच लाख मुलं दररोज रात्री उपाशी झोपतात."

ते पुढे म्हणाले, "या शहराला त्याची खास ओळख गमावण्याचा धोका आहे, जी ओळख त्याला विशेष बनवते."

ममदानी यांना त्यांच्या प्रचार काळात काँग्रेस सदस्य अलेक्झांड्रिया ओकासिओ-कोर्टेझ आणि सिनेटर बर्नी सँडर्स यांचे समर्थन मिळाले.

न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक कशी होते?

न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाचा कालावधी 4 वर्षांचा असतो. एखादा व्यक्ती सलग दोन वेळा (म्हणजे जास्तीत जास्त 8 वर्षे) महापौर राहू शकतो.

प्रत्येक पक्ष (जसे डेमोक्रेटिक, रिपब्लिकन) आधी आपला उमेदवार ठरवतात. त्यासाठी एक प्राथमिक (प्रायमरी) निवडणूक होते, जिथे पक्षाचे नोंदणीकृत सदस्य मतदान करतात.

न्यूयॉर्कमध्ये आता रँक-चॉइस व्होटिंगचा वापर होतो. म्हणजे मतदार आपल्या पसंतीनुसार उमेदवारांना क्रमवारीत निवडू शकतात.

मतदार आपल्या पसंतीनुसार 1 ते 5 पर्यंत उमेदवारांना रँक (क्रमांक) देऊ शकतात.

एखाद्याला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मत मिळाले तरच तो थेट विजयी होतो. अन्यथा राउंड-बाय-राउंड (फेरीनिहाय) मतं मोजली जातात.

प्रायमरी जिंकणारे उमेदवार नंतर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक (जनरल) निवडणुकीमध्ये एकमेकांना सामोरे जातात. या निवडणुकीत सर्व नोंदणीकृत मतदार, कोणत्याही पक्षाचे असले तरीही, मतदान करू शकतात.

सर्वाधिक मतं मिळवणारा उमेदवार न्यूयॉर्क शहराचा महापौर होतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)