अमेरिकेतले लोक 'नो किंग्ज' म्हणत रस्त्यावर का उतरले होते? जाणून घ्या 10 फोटोंमधून

फोटो स्रोत, Getty Images
ट्रम्प सरकारच्या स्थलांतरित आणि सीमा शुल्कासंदर्भातील आक्रमक धोरणाच्या अंमलबजावणीविरोधात अमेरिकेत मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
शनिवारी (14 जून) विविध ठिकाणी एकत्र येत नागरिकांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं केली. 'नो किंग्ज' या नावाखाली याचं आयोजन करण्यात आलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये एका लष्करी परेडचं आयोजित केली होती. या प्रकारची परेड तिथे दुर्मिळ आहे. या परेडविरोधातही निदर्शनं करण्यात आली आहेत.
शनिवारी (14 जून) संध्याकाळी या विशेष लष्करी परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकन सैन्याच्या 250 व्या वर्धापन दिनानिमित्त ही परेड आयोजित करण्यात आली होती.
विशेष म्हणजे त्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवसदेखील होता. याच परेडला विरोध करत नागरिकांनी निदर्शनं केली.
न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया आणि ह्यूस्टनसह अनेक शहरांमध्ये लोकप्रतिनिधी, कामगार नेते आणि कार्यकर्ते यांनी गर्दीसमोर भाषणे केली. या गर्दीत लोक अमेरिकेचा झेंडा आणि ट्रम्पविरोधी फलक घेऊन उपस्थित होते.

फोटो स्रोत, Getty Images
डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला होता की, परेडमध्ये कोणत्याही प्रकारची निदर्शनं झाल्यास त्याविरोधात 'बळा'चा वापर केला जाईल.
निदर्शनांच्या आयोजकांनी सांगितलं की, शेकडो निदर्शनं झाली आणि त्यात लाखोंच्या संख्येनं लोक सहभागी झाले.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रम्प यांच्या लष्करी परेडविरोधात जी निदर्शनं झाली त्याला 'नो किंग्ज' असं नाव देण्यात आलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात राष्ट्राध्यक्षांना असलेल्या अधिकाराच्या मर्यादा ओलांडल्या असल्याचं या शब्दांमधून सूचित करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
'नो किंग्ज' आंदोलनकर्त्यांनी न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, शिकागो, फिलाडेल्फिया, ह्यूस्टन, अटलांटासह अमेरिकेतील विविध शहरांमध्ये रस्त्यावर उतरून ट्रम्प यांच्या हुकूमशाहीविरोधात निदर्शने करत निषेध नोंदवला.

फोटो स्रोत, Getty Images
आंदोलनादरम्यान प्रदर्शनकर्त्यांनी 'लव्ह USA, हेट ट्रम्प' आणि 'सेव्ह USA' असे फलक धरले होते.
'नो किंग्ज' या ट्रम्पविरोधी मोठ्या आंदोलनाचा भाग असलेल्या 'नो टायरंट्स' आंदोलनासाठी गर्दी USA च्या दूतावासाबाहेर जमली होती.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेत ज्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक गोळा झाले होते, त्यात लॉस एंजेलिसचाही समावेश होता. स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी घालण्यात आलेल्या छाप्यांच्या मालिकेविरोधात अनेक दिवसांपासून तिथं निदर्शनं सुरू होती.
काहीवेळा ही निदर्शनं हिंसकदेखील झाली होती. त्या दिवसांमध्ये नेते आणि कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणा अतिशय सतर्क होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांना आळा घालण्यासाठी ट्रम्प यांनी एक आठवड्यापूर्वी नॅशनल गार्ड तैनात केले होते. त्यांनी हा निर्णय गव्हर्नर गॅविन न्यूसम यांच्या इच्छेविरुद्ध घेतला होता. स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये देखील याविरोधात रोष होता.

फोटो स्रोत, Getty Images
लष्करी परेडमध्ये हजारो गणवेशधारी अमेरिकन सैनिक सहभागी झाले होते. या सैनिकांनी, डझनावारी रणगाडे आणि लष्करी वाहनं तसंच लष्करी वाद्यवृदांसह संचलन केलं. तेव्हा त्यांना सॅल्यूट करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प उभे राहिले.

फोटो स्रोत, Getty Images
फेडरल बिल्डिंगच्या जवळ नॅशनल गार्ड आणि निदर्शकांमध्ये संघर्ष झाला होता. त्यानंतर जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या.
मात्र, एक किंवा दोन ब्लॉक अंतरावर, शेकडो निदर्शक शांततेच्या मार्गानं निदर्शनं करत राहिले.
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यानंतर झालेल्या मोठ्या प्रमाणात निदर्शनांच्या घटना झाल्या आहेत. मात्र, तरीही ट्रम्प यांचं स्थलांतरितांविषयीचं धोरण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असल्याचं जनमत चाचण्यांमधून दिसून येत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सीबीएस/ यूगोव्हच्या गेल्या आठवड्यातील सर्वेक्षणात दिसून आलं आहे की, जे लोक अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत आहेत अशा स्थलांतरितांना हद्दपार करण्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण 54 टक्के अमेरिकन लोकांना मान्य आहे. 46 टक्के अमेरिकन लोकांना हे धोरण मान्य नाही.
बहुसंख्य अमेरिकन लोकांनी (42 टक्के) म्हटलं आहे की ट्रम्प यांच्या धोरणामुळे ते अधिक सुरक्षित होत आहेत. तर 53 टक्के लोकांनी म्हटलं की ट्रम्प यांनी धोकादायक गुन्हेगारांच्या हद्दपारीला प्राधान्य दिलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











