'तुम्हाला दुप्पट पैसे भरायला लावू'; डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेनला धमकी का दिली?

फोटो स्रोत, Getty Images
"आपण त्यांना दुप्पट पैसे भरायला लावू", अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेनला दिली आहे.
स्पेन हा नाटोमधील असा एकमेव देश आहे जो संरक्षणावर जीडीपीच्या 5 टक्के खर्च करण्यास नकार देत आहे.
संरक्षणावरील खर्च वाढवण्याबद्दल नाटो देशांनी स्विकारलेल्या निर्णयावर स्वाक्षरी करूनही संरक्षणावर जीडीपीच्या 5 टक्के खर्च करण्यास स्पेननं नकार दिला. त्यामुळे ट्रम्प यांनी व्यापाराच्या माध्यमातून दुप्पट पैसे भरायला लावण्याची धमकी स्पेनला दिली.
नेदरलँडमधील हेग इथं 24 आणि 25 जून अशी दोन दिवस शिखर परिषद झाली. यावेळी अटलांटीक अलायन्सच्या 32 सदस्यांनी 2035 पर्यंत संरक्षणासाठी 3.5 टक्के आणि अतिरिक्त लष्करी खर्चात 1.5 टक्क्यापर्यंतची पातळी गाठण्याचं मान्य केलं.
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी या घोषणेवर स्वाक्षरी केली असली, तरी ते म्हणाले आमचा देश संरक्षण खर्चात जीडीपीच्या फक्त 2.1 टक्के खर्च करेल. याला अटलांटिक संघटनेची मान्यता मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
स्पेनच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे ट्रम्प संतापले. त्यांनी बुधवारी (25 जून) पत्रकार परिषद घेत सांचेझ यांना उत्तर दिलं.
"तुम्ही एकमेव असा देश आहात जे पैसे देत नाही. मला माहिती नाही तुम्हाला काय अडचण आहे? तुम्हाला अधिक पैसे भरायला लागतील", असं ट्रम्प म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
स्पनेनं नाटोला दिलेलं वचन पूर्ण न केल्यास अमेरिका त्याची भरपाई मागेल. आम्ही स्पेनसोबत व्यापार करारावर वाटाघाटी करत आहोत. त्यांना दुप्पट पैसे भरावे लागतील, असंही ट्रम्प म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "मी स्पेनसोबत स्वतः वाटाघाटी करणार आहे. मी स्वतः या गोष्टी करेन जेणेकरून त्यांना जास्त पैसे द्यावे लागतील."
स्पेनचे परकीय व्यापार युरोपीय संघाच्या चौकटीत हाताळले जातात. त्यामुळे अमेरिका त्यांच्यावर शुल्क किंवा इतर प्रकारचे कर कसे लावू शकते, हे अजूनही स्पष्ट नाही.
युरोपियन युनियनचे 27 सदस्य राष्ट्र स्वतंत्रपणे व्यापार करार करत नाही. हे करार युरोपियन कमिशनच्या कार्यकारी शाखेद्वारे हाताळले जातात.
आता 9 जुलैपासून शुल्कवाढ लागू होणार आहे. त्यामुळे युरोपियन युनियन अमेरिकेच्या सरकारसोबत व्यापार करारावर चर्चा करणाऱ्या भागीदांरापैकी एक आहे.
स्पेन आणि नाटो
फक्त 2.1 टक्के खर्च करूनही योग्यवेळी संघटनेच्या लष्करी क्षमतेसाठी दिलेलं वचन पूर्ण केलं जाईल, अशी संमती स्पेननं नाटोकडून मिळवली असल्याचं पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी स्पष्ट केलं.
स्पेनला आवश्यक तांत्रिक योगदान साध्य करण्यासाठी संरक्षण तज्ज्ञांनी शिफारस केलेला हा आकडा असल्याचं ते म्हणाले.
पण, त्याचवेळी नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनी उत्तर देत स्पष्ट केलं की, स्पेनचा सहभाग इतर सर्व सहयोगी देशांसारखचा असायला हवा. स्पेनला संरक्षण खर्च 3.5 टक्के आणि त्यासोबत 1.5 टक्के इतर लष्करी खर्च करायला लागेल.

फोटो स्रोत, EPA
हेगमध्ये उपस्थित असलेल्या माध्यमांनी देखील सांचेझ इतर नेत्यांपासून दूर राहत असल्याचं आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं. सांचेझ इतर नेत्यांसोबत फार कमी संवाद साधताना दिसले. तसेच फोटोसेशनवेळी सुद्धा ते दूर उभे होते.
यावेळी पत्रकारांनी स्पेनबद्दल ट्रम्प यांना काही प्रश्न विचारले. त्यावेळी ते म्हणाले, "स्पेननं जे केलं ते भयानक आहे. स्पेनची अर्थव्यवस्था चांगली आहे. ते असं का करत आहेत माहिती नाही."
स्पॅनिश लोक छान आहेत. पण, हाच एकमेव देश आहे की जो भरपाई करायला नकार देत आहे. नाटोच्या छत्रछायेखाली स्पेन फुकटात संरक्षण मिळवू पाहत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.
तसेच स्पेनची भूमिका नाटोसाठी अन्यायकारक असल्याचं ते म्हणाले.
हेग करार
हेग येथे झालेल्या परिषदेत ट्रम्प यांनी आश्वासन दिलं की, संरक्षण खर्चात वाढ करण्यासाठी जो करार झाला आहे त्याला 'हेग संरक्षण प्रतिज्ञा' म्हणून ओळखलं जाईल.
ते म्हणाले की, इतर नाटो देशांनी युरोपच्या संरक्षणाची जबाबदारी उचलण्याची गरज आहे हा आतापर्यंतच्या चर्चेतील प्रमुख मुद्दा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तसेच त्यांनी हेगमध्ये झालेल्या या नव्या कराराचे श्रेय देखील स्वतःच घेतले.
ते पुढे म्हणाले की, 2017 मध्ये आपण इतर सदस्यांकडून अधिक मागणी सुरू केली. तेव्हापासून नाटोचा संरक्षण खर्च 700 अब्ज डॉलरने वाढला. जेव्हा नाटोमधील सर्व 32 देश आपआपल्या जीडीपीच्या 5 टक्के संरक्षण खर्च करतील तेव्हा वर्षाकाठी 1 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक निधी सामूहिक संरक्षणासाठी उपलब्ध होईल.
"हा अमेरिका, युरोप आणि पाश्चात्य संस्कृतीसाठी एक मोठा विजय आहे" असंही ते म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











