शास्त्रज्ञांनी शोधला लॅब्राडॉरच्या आकाराचा नवीन डायनासोर, लंडनच्या संग्रहालयात ठेवणार

या नवीन प्रजातीचं नाव हे, एनिग्मॅकर्सर मोलीबॉर्थविके डायनासोर असं आहे.

फोटो स्रोत, Gwyndaf Hughes/BBC News

फोटो कॅप्शन, या नवीन प्रजातीचं नाव हे, एनिग्मॅकर्सर मोलीबॉर्थविके डायनासोर असं आहे.
    • Author, जॉर्जिना रॅनार्ड
    • Role, विज्ञान प्रतिनिधी नॅचरल हिस्ट्री म्युझियम, लंडन येथून रिपोर्टिंग

स्टिव्हन स्पिलबर्ग यांच्या ज्युरासिक पार्क या हॉलिवूड सिनेमामुळे सर्वसामान्यांनाही अब्जावधी वर्षांपूर्वीच्या महाकाय अशा डायनासोरबद्दल माहिती झाली.

अवाढव्य आकाराचे आणि पाहताक्षणीच भीती वाटावे असे डायनासोर या पृथ्वीवर होते. परंतु, शास्त्रज्ञांनी आता डायनासोरच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे.

अगदी घरात पाळल्या जाणाऱ्या लॅब्राडॉर जातीच्या कुत्र्याच्या आकाराचा डायनासोर शास्त्रज्ञांनी शोधला आहे. त्या काळी इतके छोटे डायनासोरही अस्तित्वात होते.

मोठ्या डायनासोरच्या पायात घुटमळणारा 'एनिग्मॅकर्सर'

या डायनासोरचे अंश जेव्हा सापडले होते, तेव्हा त्याचे चुकीचे वर्गीकरण किंवा त्याला चुकीच्या प्रकारात ठेवण्यात आलं होतं. परंतु, शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात ही एक नवीन प्रजाती असल्याचं शोधून काढलं आहे.

या नवीन प्रजातीला त्यांनी एनिग्मॅकर्सर म्हणजे 'गूढ धावपटू' असं नाव दिलं आहे. साधारण 150 दशलक्ष वर्षांपूर्वी तो अस्तित्वात होता असं म्हटलं जातं.

हा छोटा डायनासोर स्टेगोसोरससारख्या महाकाय अशा डायनासोरच्या पायाभोवती धावत किंवा घुटमळत असत.

मूळ नॅनोसोरस डायनासोर पाहण्यासाठी प्रा. सुसानाह मेडमेंट अमेरिकेला गेल्या.

फोटो स्रोत, Gwyndaf Hughes/BBC News

फोटो कॅप्शन, संवर्धक लू ऑलिंग्टन-जोन्स आणि किरन माइल्स यांनी हा डायनासोर प्रदर्शनासाठी धातूच्या फ्रेमवर एकत्र जोडला आहे.

सुरुवातीला याचं नॅनोसोरस असं वर्गीकरण करण्यात आलं होतं. परंतु, आता शास्त्रज्ञांनी हा एक वेगळ्या प्रजातीचा प्राणी असल्याचं म्हटलं आहे.

2014 नंतर लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये (एनएचएम) दाखवण्यात येणारा हा पहिला नवीन डायनासोर बनेल. गुरुवारी हा कार्यक्रम होणार आहे.

हा नवीन डायनासोर लोकांसमोर येण्यापूर्वी बीबीसी न्यूजनं त्याच्या पडद्यामागच्या तयारीचं दर्शन घडवलं आहे.

प्रोफेसर पॉल बॅरेट, संग्रहालयातील एक प्रागैतिहासिक (पॅलेओन्टोलॉजिस्ट) शास्त्रज्ञ आहेत.

'नवीन माहिती समोर येणार'

या नव्यानं सापडलेल्या डायनासोरमुळे प्राचीन काळातील लहान डायनासोर मोठे आणि 'विचित्र' प्राणी कसे झाले याबाबतची माहिती मिळेल, त्यांची उत्क्रांती समजेल, असं ते म्हणाले.

आम्ही भेट दिल्यावर, डिझायनर एनिग्मॅकर्सरसाठी खास काचेच्या प्रदर्शन पेटीच्या (डिस्प्ले केस) शेवटच्या तपासण्या करत होता.

डायनासोरचं नवीन घर हे संग्रहालयातील भव्य अशा अर्थ हॉलमधील एका बाल्कनीत आहे. त्याखाली स्टेफ नावाचा स्टेगोसोरस आहे, जो पश्चिम अमेरिकेतील मॉरिसन फॉर्मेशनमध्ये राहत असत.

छोट्या डायनासोरच्या सुरुवातीच्या काळातील जीवाश्म अवशेष हे जगातील सगळ्यात पूर्ण असलेले (परिपूर्ण) आहेत.

फोटो स्रोत, Gwyndaf Hughes/BBC News

फोटो कॅप्शन, छोट्या डायनासोरच्या सुरुवातीच्या काळातील जीवाश्म अवशेष हे जगातील सगळ्यात पूर्ण असलेले (परिपूर्ण) आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एनिग्मॅकर्सर स्टेगोसोरसच्या तुलनेत खूप लहान आहे. त्याची उंची सुमारे 64 सेमी आणि लांबी 180 सेमी आहे, जी अगदी लॅब्राडॉर कुत्र्यासारखी आहे.

पण त्याचे पाय खूप मोठे आहेत आणि त्याची शेपटी 'बाकीच्या डायनासोरच्या शरीरापेक्षा कदाचित थोडी जास्त लांब' होती, असं प्रा. सुसानाह मेडमेंट म्हणतात.

"त्याचं डोकंही तुलनेनं लहान होतं, त्यामुळे तो कदाचित फार हुशार नसावा. मृत्यूच्या वेळी तो कदाचित तरुण होता," असं त्या म्हणाल्या.

त्याच्या हाडांचे जीवाश्म अवशेष हातात घेतलेले संवर्धन तज्ज्ञ लू ऑलिंग्टन-जोन्स आणि किरन माइल्स हे अत्यंत काळजीपूर्वकपणे त्या सांगाड्याला धातूच्या फ्रेमवर जोडत होते.

"हे सर्वांसमोर सादर करण्यापूर्वी याचं कसलंही नुकसान होऊ नये अशी माझी इच्छा आहे," असं संवर्धन/जतन विभागप्रमुख ऑलिंग्टन-जोन्स म्हणाल्या.

"इथे तुम्ही पाहू शकता की त्याच्या कमरेच्या खालचा भाग (नितंब) मजबूत आणि घट्ट दिसतो. यावरून तो वेगानं धावणारा डायनासोर होता, हे लक्षात येतं.

पण त्याचे पुढचे हात खूप लहान आणि जमिनीपासून वर होते. कदाचित तो हातांनी झाडझुडपं तोंडात घालण्यासाठी त्यांचा वापर करत असावा," असं माइल्स म्हणाले.

'शास्त्रज्ञ म्हणतात, नॅनोसोरस ही वर्गवारीच चुकीची'

हाडांमधून मिळालेल्या काही संकेतांवरून एनएचएम मधील शास्त्रज्ञांनी हा जीव एक नवीन प्रजाती असल्याचा निष्कर्ष काढला.

एनिग्मॅकर्सरच्या मागच्या उजव्या पायाचं हाड हातात धरून मेडमेंट म्हणाल्या की, "जेव्हा आम्हाला एखादी नवीन प्रजाती ओळखायची असते, तेव्हा आम्ही त्या प्रजातीसारख्या इतर डायनासोरशी तुलना करून छोटासा फरक शोधतो. या बाबतीत पायांची हाडं खूप महत्त्वाची असतात," असं ते म्हणाले.

जेव्हा हा डायनासोर संग्रहालयाला देण्यात आला, तेव्हा 1870 च्या दशकापासून नाव असलेल्या इतर लहान डायनासोर प्रमाणेच त्याचे नॅनोसोरस असं ठेवण्यात आलं होतं.

ही वर्गवारी चुकीची आहे, असं शास्त्रज्ञांना वाटतं.

छोट्या डायनासोरच्या सुरुवातीच्या काळातील जीवाश्म अवशेष हे जगातील सगळ्यात पूर्ण असलेले (परिपूर्ण) आहेत

फोटो स्रोत, Gwyndaf Hughes/BBC News

फोटो कॅप्शन, मूळ नॅनोसोरस डायनासोर पाहण्यासाठी प्रा. सुसानाह मेडमेंट अमेरिकेला गेल्या.

अधिक माहिती मिळवण्यासाठी त्यांनी सांगाड्याचे स्कॅन आणि तपशीलवार छायाचित्रं घेऊन अमेरिका गाठली, जेणेकरून मूळ नॅनोसोरस (जो आदर्श नमुना मानला जातो) पाहता येईल.

"पण त्यात खरं तर कोणतीही हाडं नव्हती. तो फक्त एक खडक आहे, ज्यामध्ये हाडांचे काही ठसे आहेत. तो कोणताही डायनासोर असू शकतो," असं प्रा. मेडमेंट म्हणाल्या.

याच्या उलट, नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील नमुना एक अत्याधुनिक आणि जवळपास संपूर्ण सांगाडा होता, ज्यामध्ये पायांच्या हाडांमध्ये खास वैशिष्ट्ये होती

ही नावं आणि वर्गीकरणाभोवतीचं रहस्य उलगडणं फार गरजेचं आहे, असं जीवाश्मशास्त्रज्ञ सांगतात.

"आपल्याकडे प्रत्यक्षात किती प्रजाती आहेत हे समजणं आपल्या कामासाठी अगदी महत्त्वाचं आहे. जर ते चुकलं तर बाकी सगळं काम बिघडेल," असं प्रा. मेडमेंट म्हणतात.

शास्त्रज्ञांनी आता नॅनोसोरस नावाची संपूर्ण वर्गवारीच औपचारिकरित्या रद्द केली आहे.

'ज्युरासिक काळातील विविधता समजण्यास मदत'

त्यांना वाटतं की, या काळातील इतर लहान डायनासोरचे नमुने देखील वेगवेगळ्या प्रकाराच्या प्रजाती असू शकतात.

या सापळ्यामुळे शास्त्रज्ञांना ज्युरासिक काळातील डायनासोरची विविधता समजण्यास मदत होईल.

लहान डायनासोर हे मोठ्या डायनासोरांच्या गटांच्या उत्पत्तीच्या अगदी जवळ असतात, असं प्रा. बॅरेट म्हणतात.

"अशा नमुन्यांमुळे आपल्या ज्ञानातील काही उणीवा भरून काढण्यास मदत होते आणि हे बदल हळूहळू कसं होतात, हेही दिसून येतं, असंही ते म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)