भारताचं ‘ज्युरासिक पार्क’ जिथे डायनासोरच्या अंड्यांची पूजा होते आणि तस्करीही

डायनोसॉर अंडं
    • Author, सलमान रावी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मध्य प्रदेशातल्या धारमध्ये या पृथ्वीवर फिरणाऱ्या विशालकाय जीवांच्या आणि कोट्यवधी वर्षांपूर्वी या पृथ्वीवर उगवणाऱ्या वनस्पतींचे अवशेष पडलेले आहेत.

नुसतंच मध्य प्रदेशाच्या इको टुरिझम बोर्डाच्या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या वैज्ञानिकांनी इथे संशोधन करून आपला अहवाल तयार केला आहे.

इको टुरिझम विभागाच्या मुख्याधिकारी समिता राजौरा बीबीसीशी बोलताना म्हणाल्या की, या अहवालाचं संकलन करून युनेस्कोला पाठवण्यात येईल. म्हणजे बाग आणि धार जिल्ह्यांच्या मोठ्या प्रदेशाला ‘इको हेरिटेज’ चा दर्जा मिळू शकेल.

सोसायटी ऑफ अर्थ सायन्सेसच्या रिपोर्टनुसार, एका मोठ्या कालखंडात पृथ्वीवर आणि तिच्या पोटात काय घडत होतं त्याचे अवशेष या भागात इतस्ततः विखरून पडले आहेत.

भूगर्भ वैज्ञानिक आणि जीवाश्म अभ्यासकांच्या मते, डायनासोरच्या आठ वेगवेगळ्या प्रजाती या भागात वेगवेगळ्या काळात उदयाला आल्या आणि लुप्त झाल्या. त्यांना असंही वाटतं की फक्त डायनासोर नाही तर त्याहूनही मोठ्या टायनोसोरचेही जीवाश्म या भागात आढळून आलेत.

धारच्या या भागात संशोधन करणाऱ्या संशोधकांना अभ्यासाअंती लक्षात आलंय की, पृथ्वीवर संहार कधी भयानक भूकंपामुळे झाला तर कधी ज्वालामुखीचा स्फोट झाल्याने. तर कधी प्रचंड पुरांमुळे समुद्राचं पाणी जमिनीवर आल्याने झाला. प्राण्याच्या अनेक प्रजाती जन्माला येत गेल्या आणि विलुप्त होत गेल्या.

दिल्ली विद्यापीठात जीवाश्मांचा अभ्यास करणारे प्राध्यापक गुंटूपल्ली वी प्रसाद यांनी बीबीसीला सांगितलं की, "दख्खनचे पठार एका भयानक ज्वालामुखीच्या स्फोटातून बाहेर पडलेल्या लाव्हारसामुळे बनले आहेत. कधी ज्वालामुखी, कधी भूकंप तर कधी समुद्राच्या पाण्याने पृथ्वीवर जीवन संपवलं आहे. याचे अवशेष आजही धारमध्ये सापडणारे खडक आणि जमिनीच्या थरांमध्ये सापडतात."

प्रसाद म्हणतात की, धारशिवाय याचे अवशेष नर्मदेच्या किनाऱ्यावरही सापडतात. त्यांच्या मते, नर्मदेच्या खोऱ्यात एक हजार किलोमीटरच्या परिघात कितीही वेळा विनाश झाला तरी जीवनाची नव्याने सुरुवात होत राहिली. या भागात विलुप्त झालेल्या अनेक जीवांचे जीवाश्म सापडतात.

डायनासोरवर जगभरात जेवढं संशोधन झालंय त्यात असं समोर आलं की, डायनासोरच्या सगळ्या प्रजातींचा पृथ्वीवरचा जीवनकाळ साधारण दोन ते तीन लाख वर्षं इतका होता. त्या काळात इतरही प्राणी पृथ्वीवर वावरत होते. या प्राण्यांचेही अवशेष मध्य प्रदेशात सापडतात.

डायनोसॉरची अंडी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

समुद्रात सापडणाऱ्या जीवांचे जीमाश्म सापडल्याने ही सिद्ध झालं आहे की, मध्य प्रदेशातला हा भाग कधी काळी एका मोठ्या समुद्राचा भाग होता.

धार जिल्ह्यात डायनासोरच्या वेगवेगळ्या प्रजातींची 300 अंडी आणि 30 घरट्यांचे जीवाश्म मिळाले आहेत. हे जीवाश्म जमिनीवर सापडले आहेत. इथे अजून योजनाबद्ध रितीने उत्खनन झालेलं नाही.

त्यामुळे इथे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना वाटतं की, जमिनीच्या पृष्ठभागावर जे जीवाश्म सापडलेत त्यामुळे कोट्यवधी वर्षांपूर्वी काय झालं याची माहिती मिळतेय. तर व्यवस्थित नियोजन करून उत्खनन केलं आणि संशोधन केलं तर पृथ्वीच्या पोटातली अनेक रहस्य बाहेर येतील.

धारमध्ये तर जीवाश्म शेतात काम करता कोणा शेतकऱ्याला सापडतात किंवा गुरं चरायला नेणाऱ्या गुराख्याच्या हाती लागतात.

महताब मंडलोई धार जिल्ह्यातल्या बाग भागात राहातात. इथे सर्वांत जास्त जीवाश्म विखरून पडले आहेत. आम्ही त्यांच्या गावी गेलो आणि त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलेली माहिती फारच रंजक होती.

ते म्हणतात, “गावकरी आपली जनावरं घेऊन जंगलात चरायला घेऊन जातात. माझं म्हणाल तर मला सगळ्यात पहिल्यांदा डायनासोरची अंडी सापडली होती. मी ती अंडी इथे संशोधन करणाऱ्या सरांना दिली. त्यांनी आम्हा गावकऱ्यांना सांगितलं की अशी अंडी, दात किंवा आणखी काही सापडलं तर त्यांना कळवायचं. मी विचार करायचो की आपल्याला तर यातलं काही कळत नाही. पण मला एका दगडाच्या आत एक अंडं सापडलं. मग एक समुद्री जीवाचा दात सापडला आणि मग पुन्हा एक डायनासोरचं अंड सापडलं.”

धारच्या या भागात गोलाकार दगड नेहमी सापडायचे पण कोणाला त्याचं महत्त्व माहिती नव्हतं.

इथल्या रहिवासी नुक्ता बाई म्हणतात की, “लहान मुलं असे दगड नेहमी उचलून आणायची.”

काही काळाने इथल्या गावकऱ्यांनी या गोल दगडांची पूजा करणं सुरू केलं. पण दुसरीकडे याची तस्करीही सुरू झाली.

शास्त्रज्ञ या जीवाश्मांपर्यंत पोहचून त्यांना संरक्षित करू शकतील याच्या आत अनेक जीवाश्म तस्करांच्या हाती लागले.

वेस्ता मंडलोई यांचं दुकान आहे आणि या भागात ते जीवाश्म संरक्षणाचं काम करतात. ते म्हणतात की, बाहेरून अनेक लोक या भागात यायला लागले आणि इथल्या गावकऱ्यांना प्रलोभन देऊन गोल दगड विकत घ्यायला लागले. हे गोल दगड म्हणजे डायनोसॉरची अंडी होती.

वेस्ता मंडलोई
फोटो कॅप्शन, वेस्ता मंडलोई

ते स्वतःचा अनुभव सांगताना म्हणतात की, “काही काळानंतर फार दूरवरून लोक यायला लागले. गोल दगडांची मागणी करायला लागले. मग आम्हाला भीती वाटायला लागली की हे लोक इथून काहीतरी घेऊन जातील आणि आम्हाला अडकवतील. माझ्या बाबतीत असंच झालं होतं. एक माणूस मागणी करायला लागला की हा दगड दे आणि पैसै घे.”

गोल दगडा म्हणजे शिवलिंग

या भागात डायनासोरच्या अंड्याची पूजा करण्याची पद्धत आहे. अर्थात इथल्या गावकऱ्यांना ती डायनासोरची अंडी आहेत हे माहिती नव्हतं.

याचा आकार पाहून ते शिवलिंग आहेत असं वाटतं.

वेस्ता मंडलोई म्हणतात की, “याची पूजा आम्ही आमच्या अनेक पिढ्यांपासून करतोय. इथले गावकरी याला गुल/गोल दगडा म्हणतात. पण ही डायनोसॉरची अंडी आहेत. यांना शिवलिंग समजून शेताच्या बांधावर ठेवून द्यायचे. त्याची पूजाअर्चा व्हायची.”

पर्यटकांना आणण्याचे प्रयत्न

मध्य प्रदेश इको टुरिझम बोर्डाच्या प्रयत्नांनी बागमध्ये ‘डायनोसॉर फॉसिल पार्क’ बनला आहे जिथे अनेक प्रकारचे जीवाश्म ठेवले आहेत. याशिवाय इथून 50 किलोमीटर मांडूमध्ये डायनोसॉर म्युझियम बांधलं आहे. इथे आता पर्यटक येतात.

इको टुरिझम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी समिता राजौरा म्हणतात की, आता कुठे स्थानिक लोक जागरुक झालेत की, त्यांच्या जमिनीवर आणि जंगलात जो खजिना विखुरला आहे तो किती अमुल्य आहे आणि पृथ्वीच्या इतिहासाच्या शोधात किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

इथे सापडलेल्या सर्वांत मोठ्या घरट्यात 12 पेक्षा जास्ती अंडी सापडली आहेत. याचा उल्लेख इथे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आपल्या अहवालात केला आहे.

मग आम्ही धारच्या त्या खडकांना पाहायला गेलो ज्यात पृथ्वीच्या अंतरगांची रहस्य दडलेली आहेत. विक्रम वर्मा त्या खडकांकडे बोट दाखवून म्हणतात की संपूर्ण पृथ्वीवरून जेव्हा डायनासोर विलुप्त होत होते तेव्हाची कहाणी इथून कळेल.

डायनोसॉरची घरटी या खडकांंमध्ये सापडली आहेत
फोटो कॅप्शन, डायनासोरची घरटी या खडकांंमध्ये सापडली आहेत

ते म्हणतात, “डायनासोरचा लास्ट वॉक, म्हणजे ते स्वतःला वाचवायला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होते, तेव्हाच्या त्याच्या पावलांचा पायारव या खडकांमध्ये सामावला आहे.”

सगळ्यात वरच्या खडकांकडे इशारा करून ते म्हणतात, “हे खडक त्या काळातले आहेत जेव्हा दख्खनच्या ज्वालामुखींचा स्फोट होत होता. इथली प्रत्येक गोष्ट लाव्हा आपल्या पोटात घेत होता. सगळ्या गोष्टी जळून नष्ट झाल्या होत्या.”

फक्त बागच नाही इथल्या इतर भागांचाही आम्ही तज्ज्ञांसोबत दौरा केला. इथे ठीक-ठिकाणी जीवन वसण्याचे आणि उद्धवस्त होण्याचे अवशेष आहेत. त्यांचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. कारण इथले बेसॉल्टचे खडकांचं घर्षण होऊन खडीत रूपांतर होतंय. या प्रक्रियेमुळे चुनखडीचं सिमेंट तयार होतंय. तात्पर्य हे खडक आणि त्याबरोबरीने इथले जीवाश्म नष्ट होताहेत.

त्यात इथे जवळच उभ्या राहिलेल्या सिमेंटच्या कारखान्यांनी इको टुरिझम बोर्ड आणि मध्य प्रदेश वन विभागाची चिंता वाढवली आहे. शास्त्रज्ञांनाही भीती आहे की हे सगळं नष्ट तर होणार नाही ना?

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)