डायनासोर ज्याचा जन्म होता होता राहिला

फोटो स्रोत, AFP
डायनासोर म्हटलं की सगळ्यांच्याच मनात एक कुतुहल असतं. एकेकाळी पृथ्वीवरच्या सगळ्यात मोठ्या प्राण्यांपैकी एक असणाऱ्या या डायनसोरबद्दल येत्या काळात आणखीन नवीन गोष्टी समजण्याची शक्यता आहे.
संशोधकांना डायनासोरचं एक असं अंड मिळालंय ज्यातल्या भ्रूणाची पूर्णपणे वाढ झालेली होती आणि ते पिल्लू अंड फोडून बाहेर पडण्यासाठी तयार होतं. म्हणजे अगदी अंड्याचं कवच फोडून कोंबडीची पिलं बाहेर येतात त्याप्रमाणेच.
चीनच्या दक्षिणेकडच्या ग्यांझोऊमध्ये डायनासोरचं हे अंड सापडलं असून हे किमान 66 दशलक्ष वर्षांपूर्वीचं असण्याचा संशोधकांचा अंदाज आहे.
दात नसलेल्या थॅरॉपॉड डायनोसोर किंवा मग ऑविरॅप्टोरोसोरचं हे पिलू असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय. अंड्यातल्या या पिलाला बेबी येंगलियांग नाव देण्यात आलंय.
आतापर्यंत डायनोसोरची जितकी भ्रूण असलेली अंडी सापडली त्यापेक्षा हे अंड सुस्थितीत असल्याचं संशोधक डॉ. फियोन वायसम यांचं म्हणणं आहे.
डायनासोर आणि आजच्या पक्ष्यांमधलं नातं समजण्याच्या दृष्टीने पिलू असलेलं हे अंड मिळणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
जीवाश्मात मिळालेल्या डायनोसोरच्या अंड्यातलं हे भ्रूण ज्या स्थितीत आहे त्याला 'टकिंग' म्हटलं जातं.
पक्ष्यांमध्येही ही स्थिती आणि असं वर्तन पहायला मिळतं. या टप्प्यामध्ये पक्ष्यांची पिल्लं अंड्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यांची शारीरिक स्थितीही या डायनासोरच्या अंड्यातल्या पिलाप्रमाणेच असते.
संशोधक डॉ. मा यांनी AFP वृत्तसंस्थेला सांगितलं, "आधुनिक पक्षी ज्याप्रमाणे वागतात ती वागणूक त्यांचे पूर्वज असणाऱ्या डायनासोरमध्ये आधी विकसित झाल्याचं यावरून समजतं."
ऑविरॅप्टोरोसोरस या शब्दाचा अर्थ होतो अंड चोरणारी पाल.

फोटो स्रोत, AFP/ UNIVERSITY OF BIRMINGHAM
या डायनासोरसना पंख असायचे आणि सध्याचा आशिया आणि उत्तर अमेरिकेच्या भागात ते राहायचे. हा क्रेटेशियस कालावधीचा शेवटचा टप्पा होता. या काळात डायनासोरचं अस्तित्त्वं होतं.
जीवाश्म अभ्यासक प्रा. स्टीव्ह ब्रुसेट हे देखील चीनमध्ये सापडलेल्या या जीवाश्माचा शोध घेणाऱ्या पथकाचा हिस्सा होते.
याविषयी त्यांनी एक ट्वीट केलंय. ते म्हणतात, "आतापर्यंत मिळालेल्या आणि कोड्यात टाकणाऱ्या डायनासोर जीवाश्मांपैकी हे एक आहे."
यापूर्वी कधीही आपण असं काही पाहिलं नसल्याचं त्यांनी म्हटलंय. हे पिलू अंड्यातून बाहेर पडण्याच्या अगदी जवळ होतं.
चीनमध्ये मिळालेलं डायनासोरचं हे अंड्यातलं पिलू - बेबी येंगलियांग हे डोक्यापासून शेपटीपर्यंत 10.6 इंच लांब आहे. 2000 साली हे अंड पहिल्यांदा आढळलं होतं. पण 10 वर्षं ते स्टोरेजमध्ये ठेवण्यात आलं होतं.
संग्रहालयामध्ये काम सुरू झालं आणि जुन्या जीवाश्मांना कापून पाहिलं जात असताना संशोधकांचं लक्ष या अंड्याकडे गेलं. या अंड्यामध्ये पिलू असू शकतं, असा त्यांचा अंदाज होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








