Just Neel Things : लॉकडाऊनमध्ये नोकरी सोडून इन्स्टाग्राम स्टार झालेल्या नील सालेकरचा प्रवास

फोटो स्रोत, Neel Salekar
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत यश मिळवणाऱ्या, स्वतःचं विश्व समृद्ध करणाऱ्यांचा प्रवास सांगणारी बीबीसी मराठीची ही मालिका
"मी ऐन लॉकडाऊनमध्ये नोकरी सोडली. ज्यावेळी अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात होत्या. पण मला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. म्हणून मी ते धाडस केलं" इन्स्टाग्रामवर लोकप्रिय असलेला नील सालेकर सांगत असतो.
'जस्ट नील थींग्ज' या नावाने नीलचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. मार्च 2020 नंतर लॉकडाऊनच्या काळात नील सालेकरने सोशल मीडियावर कॉमेडी आणि उपहासात्मक व्हिडिओ बनवण्यास सुरूवात केली.
बघता बघता अवघ्या काही महिन्यांत इन्स्टाग्रामवर त्याचे 6 लाख 48 हजार फॉलोअर्स झाले.
आपण करत असलेल्या कामाला सोशल मीडियावर एवढा प्रतिसाद मिळतोय हे बघून नीलनेही पूर्ण वेळ हेच काम करायचं ठरवलं आणि त्याच्या करिअरची दिशा बदलली.
'करिअर घडवण्यासाठी रिस्क घेणं महत्त्वाचं'
"हातातली सुरक्षित नोकरी सोडून नवीन काहीतरी स्वतंत्रपणे सुरू करताना एका प्रक्रियेतून जावं लागतं हे खरं आहे. पण हीच खरी मजा आहे असं मला वाटतं. आयुष्यात असा सरप्राईजचा क्षण असायला हवा. कायम सुरक्षित चौकटीत राहून यश मिळत नाही असं मला वाटतं," असं नील सांगतो.

फोटो स्रोत, Neel Salekar
नील सालेकरने जेजे स्कूल ऑफ आर्ट या मुंबईतील महाविद्यालयातून फाईन आर्ट या विषयाची पदवी घेतली आहे.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका सामान्य तरुणाप्रमाणे त्यानेही नोकरी करण्यास सुरुवात केली.
क्रिएटिव्ह क्षेत्रातच यापूर्वीही त्याने काम केलं. नील सांगतो, "काही काळानंतर मला नोकरी करताना मी तेच तेच करतोय किंवा साचेबद्ध पद्धतीचं काम करतोय असं वाटत होतं. मला सतत काहीतरी क्रिएटिव्ह करायची इच्छा होती. म्हणून मी नोकरी सोडून स्वतंत्र काम करण्याचा निर्णय घेतला."
लोकांना हसवण्यासाठी किंवा त्यांचं मनोरंजन करण्यासाठी गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा वापर वाढला आहे.
अगदी बॉलिवूड कलाकरांपासून ते राजकारणी आणि सामान्य जनतेपर्यंत बहुसंख्य लोक ट्वीटर, इन्स्टाग्राम, फेसबुक वापरतात.
या माध्यमातून लोकांपर्यंत आपलं काम आणि कला पोहचली पाहिजे असा नीलने विचार केला. त्याने स्वतंत्रपणे आपल्या अकाऊंट्सवर विनोदी व्हिडिओ आणि रिल्स पोस्ट करायला सुरूवात केली.
नील सालेकर सांगतो, "आम्ही असेच व्हिडिओ अधिक बनवतो जे दैनंदिन जीवनात आपल्या सगळ्यांशी संबंधित असतात. म्हणजे सामान्य लोक त्याला स्वत:शी रिलेट करू शकतील.
उदाहरणार्थ, पावसाळ्यात आम्ही व्हिडिओ केला की आपण कितीही अंगभर रेनकोट घातला, छत्री घेतली तरी कपडे भिजतातच, गाडीवर बसलो असू तर सीटची जागा सोडून आपण चिंब ओले होते. मग यावर एक गाणं वापरून आम्ही व्हिडिओ केला. कॉमेंट्समध्ये लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. कारण त्यांच्यासोबत हे कायम होतं असंही त्यांनी लिहिलं."
'सेलिब्रिटी झालो की काय असं वाटू लागलं'
एवढ्या कमी कालावधीत मिळालेला प्रतिसाद आणि फॉलोअर्सची वेगाने वाढती संख्या पाहून खुद्द इन्स्टाग्रामनेही नील आणि त्याच्या टीमशी संपर्क साधला.
"इन्स्टाग्रामनेही आमचं कौतुक केलं. त्यांनी नुकतेच मुंबईत एक फोटोशूटही केलं. त्यात माझेही काही फोटो काढले. मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या बॅनर्सवर इन्स्टाग्रामने ते फोटो छापले. मला विश्वास बसत नव्हता," असंही नील सांगतो.
नील सालेकर आणि त्याच्या टीमने आतापर्यंत शेकडो व्हि़डिओ बनवले आहेत. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि हजारोच्या संख्येत शेअर्स आहेत. .
काही दिवसांपूर्वी नीलने मेघालय, लेह-लदाख अशा पर्यटन स्थळांनाही भेट दिली. तिथलं सौंदर्य तर आपल्या कॅमेऱ्यात त्याने कैद केलंच पण त्यासोबत तिथल्या स्थानिक विषयांना हेरून आपल्या स्टाईलने त्यावरही व्हिडिओ केले.
नीलने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासोबतही नुकतेच एका जाहिरातीत काम केले.

फोटो स्रोत, Neel Salekar
यासंदर्भात तो म्हणाला, "सचिन सरांसोबत काम केल्याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही. यापूर्वी त्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही माझे व्हिडिओ पाहून प्रशंसा केली होती."
मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या एका वेब सिरीजमध्येही कलाकार म्हणून काम करण्याची संधी नीलला मिळाली आहे. त्यामुळे वेब सिरीजच्या माध्यमातूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'कॉमेडी असली तरी मी गांभीर्याने करतो'
मी करत असलेलो काम लोकांना हसवणारं असलं तरी काम करताना ते मी गांभीर्यानेच करतो असंही नील सांगतो.
सोशल मीडियावर अनेकदा वाद, ट्रोलिंग झालेलीही अनेक उदाहरणं पहायला मिळतात.
आज मोठ्या संख्येने तरुण वर्ग सोशल मीडियावर सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करणं, व्हिडिओ आणि रिल्स करणंही हल्ली सामान्य मानलं जातं. पण लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही की अनेकांच्या हाती निराशा येते असंही दिसून येतं.
याबाबत बोलताना नील सांगतो, "सोशल मीडिया कोणीही आपल्या आनंदासाठी वापरू शकतं. पण तुम्ही केवळ टाईमपास किंवा मनोरंजन म्हणून ते करत असाल तर लाईक्सच्या अपेक्षा ठेऊ नयेत असं मला वाटतं. माझ्यासाठी हे माझं पूर्ण वेळ काम आहे. मी ते खूप गांभीर्याने करतो. त्यात सातत्य आणावं लागतं. कुठे चुकतंय हे पहावं लागतं."

फोटो स्रोत, Neel Salekar
कॉमेडी करत असताना किंवा उपहासात्मक काही क्रिएटिव्ह व्हिडिओ करत असताना यावरूनही अनेकदा वाद निर्माण होताना दिसतो. "हे खरं आहे पण मी या गोष्टीची सुरुवातीपासूनच काळजी घेत आलोय," असं नील म्हणाला.
तो पुढे सांगतो, "कॉमेडी करताना करताना कोणीही लवकर ऑफेंड होऊ शकतं. नकळत आपण कोणाला तरी दुखावू शकतो याची जाणीव मला आहे. शिवाय, सोशल मीडियावर लोक लगेच प्रतिक्रिया देतात. ते काहीही कॉमेंट करू शकतात. पण मी व्हिडिओ करताना तो जबाबदारीने करतो."
"व्हिडिओ बनल्यानंतर मी पुन्हा तो हे चेक करण्यासाठी पाहतो की नकळत कुठला चुकीचा अर्थ त्यातून जात नाही ना? महिलांच्या किंवा कोणाच्याही भावना दुखावतील असं माझ्या व्हिडिओत काही आहे का? हे मी पोस्ट करण्यापूर्वी आवर्जून तपासतो,"
सोशल मीडिया एकाचवेळी लाखो,करोडो: लोकांपर्यंत पोहचण्याची क्षमता असलेलं एक माध्यम आहे. त्यामुळे त्यावर काम करताना ते जबाबदारीनेच करायला हवं असंही नील सांगतो.
---------------------
तुम्हीही असंच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं विश्व समृद्ध केलंयत का? किंवा तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या एखाद्या व्यक्तीची कहाणी तुम्हाला जाणून घ्यायची आहे का?
आम्हाला अशा व्यक्तींची नावं सुचवा [email protected]या ईमेल आयडीवर. सोबत पुढचा तपशील द्यायला विसरू नका.
तुमचं पूर्ण नाव
वय
तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव सुचवताय ती व्यक्ती
या व्यक्तीशी तुमचं काय नातं आहे?
तुमची (स्वतःचे नाव देत असल्यास) वा त्या व्यक्तीची यशोगाथा थोडक्यात
संपर्कासाठीचा तपशील (आमच्या संपादकीय टीमला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








