डायनासोर भारतातील ज्वालामुखी उद्रेकाने नव्हे, ‘अशनी आदळल्यामुळेच’ नामशेष झाले

डायनॉसोर

फोटो स्रोत, Science Photo Library

6.6 कोटी वर्षांपूर्वी डायनासोर पृथ्वीतलावरून नामशेष झाले. पण त्यामागचं नेमकं कारण काय? पृथ्वीवर आदळलेला अशनी की प्रचंड मोठ्या ज्वालामुखीचा स्फोट?

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या चर्चेचं ठोस उत्तर शोधल्याचा दावा आता काही शास्त्रज्ञानी केला आहे.

"अशनी आदळल्यानेच हे झालं!" असं प्राध्यापक पॉल विल्सन यांनी बीबीसीला सांगितलं. विल्सन यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या गटाने समुद्राच्या तळाशी असणाऱ्या गाळाच्या नमुन्यांचा अभ्यास केला.

भारतामध्ये झालेल्या ज्वालामुखींच्या मोठ्या उद्रेकामुळे घडलेल्या हवामान बदलाच्या घटनांतून डायनासोर नामशेष झाले नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

News image

ज्वालामुखींचा उद्रेक होतो तेव्हा वातावरणामध्ये अनेक प्रकारचे वायू मिसळतात. यामुळे वातावरणात बदल घडून येतात. ग्रहाचं तापमान कमी होऊ शकतं किंवा वाढूही शकतं.

दख्खनचं पठारही प्रचंड मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालं. दख्खन भागातल्या या ज्वालामुखीय प्रदेशातल्या (Deccan Traps) उद्रेकातून बाहेर पडलेला लाव्हा पुढची हजारो वर्षं भूभागावर हजारो क्युबिक किलोमीटर्सपर्यंत पसरत राहिला.

काय आहे हे संशोधन?

अमेरिकेतल्या साऊदॅम्पटन विद्यापीठातील प्राध्यापक विल्सन आणि युरोप-अमेरिकेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी याविषयी संशोधन केलं. या ज्वालामुखीच्या स्फोटाचा कालावधी आणि त्याचे परिणाम यामध्ये तफावत असल्याचं या संशोधनातून आढळलं.

त्यानंतर मग उत्तर अटलांटिक महासागराच्या तळाशी खोदकाम करून या गटाने अतिप्राचीन गाळ मिळवला.

डायनॉसोर

फोटो स्रोत, ROBERT DEPALMA

प्राध्यापक विल्सन सांगतात, "समुद्रात खोलवर तळाशी असणाऱ्या या गाळामध्ये 'फोरामिनीफेरा' (Foraminifera) नावाचे अत्यंत सूक्ष्म समुद्री जीव मोठ्या प्रमाणावर आहेत. अगदी चमचाभर गाळामध्ये सुमारे एक हजार जीव आढळले. या जीवांच्या कवचाचा अभ्यास करून समुद्राची केमिस्ट्री आणि त्याचं तापमान याविषयीची अधिक माहिती आपल्याला मिळू शकते.

"डायनासोर नामशेष होण्याइतपत कोणते बदल वातावरणात घडले होते, याचा तपशीलवार अभ्यास आपल्याला यावरून करता येईल."

"आमच्या असं लक्षात आलं की आम्ही या नमुन्यांच्या अभ्यासावरून अंदाज बांधलेली हवामानाची वा पर्यावरणाची स्थिती तेव्हाच निर्माण होईल जेव्हा ज्वालामुखीय उद्रेक आणि त्यानंतर वायूंचं उत्सर्जन ही घटना काही हजार वर्षांपूर्वी घडून गेलेली असेल."

"डायनासोर नामशेष होणं आणि पृथ्वीवर लघुग्रह आदळणं या घटना समकाली असल्याचं आम्हाला आढळलं," त्यांनी सांगितलं.

यासाठी मेक्सिकोच्या आखातातील (Gulf Of Mexico) 200 किलोमीटर व्यासाच्या विवराचाही अभ्यास करण्यात आला. जो अशनी पृथ्वीवर आदळला त्याच्या खुणा इथे आहेत.

एखाद्या शहराच्या आकारमानाएवढा हा अशनी पृथ्वीवर आदळल्यानंतर त्या आघातामुळे त्सुनामी निर्माण झाल्या असतील आणि मोठ्या आगीही लागल्या असतील. शिवाय आघात झाल्यानंतर लगेचच अब्जावजी टनांचे अवशेष चोहोबाजूंना उधळले असतील.

डायनासोर

पण या सगळ्यासोबत वैज्ञानिकांनी काही काळापूर्वीच आणखी एक गोष्ट सिद्ध केली. ते म्हणजे हा अशनी सल्फर (गंधक) असणाऱ्या खडकांवर आदळला. या गंधकाची वाफ तयार झाली आणि वातावरणात वरपर्यंत त्याचं उत्सर्जन झालं. परिणामी हवामान वेगाने आणि अतिशय (अर्थातच तुलनेने कमी कालावधीत) थंड झालं. यामुळेच वनस्पती आणि प्राण्यांना जगणं कठीण झालं.

पक्ष्यांप्रमाणेच डायनासोरही या वातावरण बदलांच्या तणावातून बचावले नाहीत, हे जीवाश्मांच्या अभ्यासावरून सिद्ध होतं. पण दुसरीकडे सस्तन प्राणी मात्र यातून बचावले आणि त्यांना आज मोठं महत्त्व आहे.

'सायन्स' या पत्रिकेमध्ये हे नवीन संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं असून हे लिहिणारे डॉक्टर पिन्सेली हल हे येल विद्यापीठातले आहेत.

पृथ्वीवरचं आयुष्य बदलणारा अशनी पात

  • 12 किलोमीटर रुंदीची एक वस्तू 6.6 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळली, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे
  • यामुळे 200 किलोमीटर व्यासाचं एक विवर तयार झालं आणि जवळपासचं सगळं यात गाडलं गेलं.
डायनासोर

फोटो स्रोत, Getty Images

  • या विवराच्या पृष्ठभागावर चुनखडी (Limestone) आहे. पण याच्या कडेला अनेक खळगे आहेत.
  • या खडकाचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांनी विवरात उत्खनन केलं आणि या हा घटनाक्रम पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला.
  • हा आघात इतका मोठा होता की सर्वच जीवसृष्टी नामशेष होऊ शकली असती, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

BBC Indian Sportswoman of the Year
फोटो कॅप्शन, BBC Indian Sportswoman of the Year

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)