हॉलिवूड स्टार ब्रॅड पिटचं लॉस एंजेलिसमधील घर चोरट्यांनी फोडलं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ख्रिस्तल हेस
- Role, बीबीसी न्यूज, लॉस एंजेलिस
हॉलिवूडमध्ये आपल्या विविधांगी भूमिकांसाठी परिचित असलेला अभिनेता ब्रॅड पिटच्या लॉस एंजेलिस येथील घरात चोरी झाली आहे. तिघा चोरट्यांनी ही घरफोडी केल्याचं समोर आलं आहे.
बुधवारी (25 जून) रात्री ही घटना घडली. बॅड पिटच्या लॉस फेलिझ परिसरातील घरात तिघा संशयितांनी समोरच्या खिडकीतून प्रवेश केला आणि ऐवज लुटला, अशी माहिती लॉस एंजेलिस पोलिसांनी दिली.
हे घर ऑस्कर पुरस्कार प्राप्त ब्रॅड पिटचं असल्याचं पोलिसांनी अधिकृतरित्या सांगितलेलं नाही. परंतु, त्यांनी जो पत्ता सांगितला आहे, तो ब्रॅड पिटनं 2023 मध्ये खरेदी केलेल्या घराशी जुळत असल्याचं दिसून येतं.
'ब्रॅड प्रमोशनमध्ये व्यग्र अन् इकडं घरफोडी'
संशयित चोरट्यांनी घरातील ऐवज घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. परंतु, त्यांनी नेमकं काय चोरलं आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या वेळी अभिनेता ब्रॅड पिट घरी नव्हता.
ब्रॅड पिट हा त्याच्या 'एफ 1' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सध्या तो या सिनेमाच्या प्रीमिअरसाठी लंडनमध्ये गेला आहे. हा सिनेमा शुक्रवारी रिलीज होणार आहे.

फोटो स्रोत, Reuters
लंडनमध्ये त्याच्यासोबत हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ आणि सात वेळचा फॉर्म्यूला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेता लुईस हॅमिल्टनही होता.
बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चोरट्यांनी त्याचं घर फोडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घरातून किती किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे हे पोलिसांना अद्याप निश्चित करता आलेलं नाही. बीबीसीनं याबद्दल अभिनेत्याशी संपर्कही साधला होता.
'सेलिब्रेटींची घरं चोरट्यांच्या निशाण्यावर'
तीन मोठ्या बेडरूमचं घर ग्रिफिथ पार्कच्या अगदी जवळ आहे. या ठिकाणीच हॉलिवूडचा प्रसिद्ध असा साइन (चिन्ह) आहे. वर्दळीपासून घराचं संरक्षण व्हावं म्हणू हे घर मोठ्या कुंपणानं आणि गर्द झाडांनी वेढलेलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या घरफोडीपूर्वी शहरात इतर सेलिब्रिटींच्या घरांमध्येही चोरींच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये निकोल किडमन आणि कीथ अर्बन यांचा समावेश आहे.
मागील महिन्यात एका माणसाला पाठलाग करणे आणि नुकसान पोहोचवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या संशयित आरोपीनं पिटची माजी पत्नी जेनिफर अॅनिस्टनच्या घराच्या गेटमध्ये गाडी घुसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











