झोहरान ममदानींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत राजकीय संघर्ष होईल? त्यांच्यासमोर काय आव्हानं आहेत?

झोहरान ममदानी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, झोहरान ममदानी 1892 नंतरचे न्यूयॉर्क शहराचे सर्वात तरुण, पहिले मुस्लिम आणि आफ्रिकेत जन्मलेले पहिले महापौर ठरणार आहेत.
    • Author, अँथनी झर्कर
    • Role, उत्तर अमेरिका प्रतिनिधी

संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी अखेर झोहरान ममदानी निवडून आले आहेत.

झोहरान ममदानी अनेक कारणांसाठी खास आहेत.

ते 1892 नंतरचे शहराचे सर्वात तरुण महापौर ठरणार आहेत. तसेच ते शहराचे पहिले मुस्लिम आणि आफ्रिकेत जन्मलेले पहिले महापौर आहेत.

ते गेल्या वर्षी निवडणुकीच्या शर्यतीत उतरले, तेव्हा त्यांना लोक फारसं ओळखत नव्हते. त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते आणि पक्षांचा ठोस पाठिंबाही नव्हता.

फक्त एवढं कारणच त्यांचा विजय खास बनवायला पुरेसं आहे. कारण त्यांनी माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस सिल्वा यांच्यासारख्या मोठ्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केलं आहे.

पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, ते अशा प्रकारच्या नेत्यांचं प्रतिनिधित्व करत आहेत ज्यांचा डेमोक्रॅटिक पक्षाच्या डाव्या विचारसरणीतील लोक अनेक वर्षांपासून शोध घेत होते.

दिग्गज प्रतिस्पर्धींना केलं पराभूत

ते तरुण आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे आहेत, आणि त्यांच्या पिढीप्रमाणेच त्यांना सोशल मीडियाचा नैसर्गिक वापर चांगला जमतो.

त्यांचा समाजघटक (वांशिकता) पक्षाच्या विविधतेचं प्रतिक आहे. ते राजकीय लढाईपासून कधीही मागे हटले नाहीत.

उलट त्यांनी अभिमानाने डाव्या विचारांच्या मुद्द्यांना पाठिंबा दिला आहे, जसं मोफत बालसंगोपन, अधिक चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि मुक्त बाजारव्यवस्थेत सरकारी हस्तक्षेप.

ममदानी यांनी कामगार वर्गासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या आर्थिक प्रश्नांवर नेमकं आणि ठाम लक्ष केंद्रित करण्याची विलक्षण क्षमता दाखवली आहे.

हे तेच मतदार आहेत जे अलीकडे डेमोक्रॅटिक पक्षापासून दूर गेले होते. तरीही ममदानी यांनी डाव्या विचारसरणीचे सांस्कृतिक मूल्य सोडलेलं नाही.

झोहरान ममदानी यांचे पोस्टर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, झोहरान ममदानी तरुण आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे आहेत, आणि त्यांच्या पिढीप्रमाणेच त्यांना सोशल मीडियाचा नैसर्गिक वापर चांगला जमतो.

परंतु समीक्षकांनी इशारा दिला आहे की, अशा प्रकारचा उमेदवार अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये निवडून येऊच शकत नाही.

रिपब्लिकन पक्षाने तर ममदानींसारख्या समाजवादी नेत्याला डेमोक्रॅटिक पक्षाच्या अतिडाव्या चेहऱ्यासारखं दाखवलं आहे.

तरीही, मंगळवारी (4 नोव्हेंबर) रात्री न्यूयॉर्क शहरात ममदानी विजेते ठरले.

ममदानींनी न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर आणि गव्हर्नरचा मुलगा असलेल्या कुओमो यांना हरवून, डेमोक्रॅटिक पक्षाच्या जुन्या आणि घट्ट बसलेल्या नेतृत्वावर विजय मिळवला आहे.

अनेक डाव्या विचारांच्या लोकांचं असं मत आहे की, हे जुने नेते पक्ष आणि देशाच्या खऱ्या अडचणींपासून दूर गेले आहेत.

यामुळे ममदानी यांच्या महापौरपदाच्या प्रचार मोहिमेने प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधून घेतलं. खरं तर, अमेरिकेतील सर्वात मोठ्या शहराच्या निवडणुकीसाठी इतकं लक्ष मिळणं थोडं जास्तच होतं.

ममदानींकडून मोठ्या अपेक्षा आणि मर्यादाही

याचा अर्थ असा की, आता महापौर झाल्यानंतर त्यांच्या यशापयशाकडे सगळ्यांचे बारकाईने लक्ष असणार आहे.

बारा वर्षांपूर्वी डेमोक्रॅट बिल डी ब्लासिओ हे न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आले होते. त्यांचा उद्देश शहरातील आर्थिक आणि सामाजिक विषमता कमी करणे हा होता.

ममदानींसारखंच, डाव्या विचारसरणीच्या अमेरिकन लोकांना त्यांच्याकडून चांगल्या आणि प्रभावी शासनाचं उदाहरण मिळेल, अशी मोठी अपेक्षा होती.

झोहरान ममदानी समर्थकांसह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ममदानी यांनी प्रचारादरम्यान न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या मोठ्या उद्योगपती आणि व्यावसायिक वर्गावर तीव्र टीका केली होती.

परंतु, आठ वर्षांनंतर डी ब्लासिओ पदावरून पायउतार होताना फारसे लोकप्रिय राहिले नाहीत.

त्यांच्या कामगिरीबाबतही संमिश्र प्रतिक्रिया होत्या, कारण नवीन धोरणं राबवताना महापौरपदाच्या मर्यादांमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.

ममदानींनाही त्याच मर्यादा आणि त्याच मोठ्या अपेक्षा या दोन्हींचा सामना करावा लागणार आहे.

न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल, ज्या स्वतःही डेमोक्रॅट आहेत, त्यांनी आधीच सांगितलं आहे की ममदानींच्या मोठ्या योजना पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या करवाढीला त्यांचा विरोध आहे.

आणि पुरेसा निधी मिळाला तरी, ममदानी एकतर्फी सर्व योजना राबवू शकणार नाहीत.

ज्यांच्यावर टीका त्यांच्याशी समझोताही करावा लागणार

ममदानी यांनी प्रचारादरम्यान न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या मोठ्या उद्योगपती आणि व्यावसायिक वर्गावर तीव्र टीका केली होती. या लोकांनीच मॅनहॅटनला जगाची आर्थिक राजधानी बनवलं आहे.

परंतु, प्रभावीपणे प्रशासन चालवायचं असेल, तर त्यांना या लोकांशी काही प्रमाणात समझोता करावा लागेल. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांनी याची सुरुवातही केली आहे.

ममदानींनी गाझा युद्धादरम्यान इस्रायलच्या कारवाईवर टीका केली आहे.

तसेच, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू न्यूयॉर्कमध्ये आले तर त्यांना युद्ध गुन्हेगार म्हणून अटक करू, अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या कार्यकाळात ही घोषणा खऱ्या अर्थाने आजमावली जाऊ शकते.

झोहरान ममदानी समर्थकांसह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ममदानी यांचा प्रचार देशभर चर्चेत आला असला, तरी अमेरिकेतील अनेक लोकांसाठी ममदानी अजूनही तुलनेने अपरिचित आहेत.

हे सगळे प्रश्न पुढच्या काळासाठी आहेत. सध्या ममदानींसमोरचं सर्वात मोठं काम म्हणजे लोकांसमोर आपली ओळख आणि भूमिका स्पष्ट करणं. आणि हे पण त्यांचे विरोधक सुरू करण्याआधी करावं लागणार आहे.

त्यांचा प्रचार देशभर चर्चेत आला असला, तरी अमेरिकेतील अनेक लोकांसाठी ममदानी अजूनही तुलनेने अपरिचित आहेत.

अलीकडील सीबीएस सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील 46 टक्के लोक न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक फॉलो करत नव्हते. ही ममदानी आणि अमेरिकेतील डाव्या विचारसरणीच्या लोकांसाठी एक संधीही आहे आणि आव्हानही.

ट्रम्प-ममदानी राजकीय संघर्ष

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून अनेक पुराणमतवादी (कंझर्व्हेटिव्ह) लोक ममदानींना धोकादायक समाजवादी नेता म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतील.

त्यांचं म्हणणं असं आहे की, ममदानींच्या धोरणांमुळे अमेरिकेचं सर्वात मोठं शहर उद्ध्वस्त होऊ शकतं आणि जर देशभर असे विचार पसरले, तर ते संपूर्ण राष्ट्रासाठी धोकादायक ठरू शकतात.

ते ममदानींच्या प्रत्येक छोट्या चुका मोठ्या करून दाखवतील आणि अर्थव्यवस्थेतील किंवा गुन्हेगारीतील प्रत्येक नकारात्मक बाब अधोरेखित करतील.

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प यांचा न्यूयॉर्कशी वैयक्तिक संबंध असल्याने ते ममदानींशी राजकीय संघर्ष करण्याची संधी नक्कीच सोडणार नाहीत.

ट्रम्प यांचा न्यूयॉर्कशी वैयक्तिक संबंध असल्याने ते ममदानींशी राजकीय संघर्ष करण्याची संधी नक्कीच सोडणार नाहीत. नव्या महापौरांसमोर अडचणी निर्माण करण्याचे अनेक मार्ग त्यांच्या हातात आहेत.

ममदानींवर आता न्यूयॉर्कचे सिनेटर आणि सिनेटमधील विरोधी पक्षनेते चक शूमर यांच्यासारख्या डेमोक्रॅटिक नेत्यांचा पाठिंबा मिळवण्याचं दडपण असेल. शूमर यांनी ममदानी यांच्या प्रचार मोहिमेला पाठिंबा दिला नव्हता.

निवडणुकीत 'अर्थव्यवस्थे'चा मुद्दा ठरला प्रभावी

परंतु ममदानींसाठी फायदा असा आहे की, त्यांच्या भूतकाळात असं काही नाही ज्याचा वापर विरोधक त्यांच्या विरोधात करू शकतील. प्रचारादरम्यान त्यांनी तसं करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो निष्फळ ठरला.

जानेवारीत जेव्हा ममदानी महापौरपदाची शपथ घेतील, तेव्हा त्यांना नव्याने आपली राजकीय ओळख आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची संधी मिळेल. आणि जर ट्रम्प त्यांच्याशी वाद घालत राहिले, तर त्यामुळे उलट ममदानींना जास्त प्रसिद्धी आणि मोठं व्यासपीठ मिळेल.

आत्तापर्यंत ममदानी आपल्या राजकीय कौशल्य आणि क्षमतेच्या जोरावर इथंपर्यंत पोहोचले आहेत. आणि हे काही छोटं यश नाही. पण पुढील काही वर्षांत त्यांच्यासमोर येणारी आव्हानं त्याहून खूप मोठी असतील.

न्यूयॉर्कचे लोक आपलं शहर जगाचं केंद्र आहे असं मानतात, पण मंगळवारी झालेली महापौरपदाची निवडणूक ही एकमेव मोठी निवडणूक नव्हती. खरं तर, त्या दिवशी देशातील मतदारांचा खरा मूड दाखवणारी ही निवडणूक नव्हतीच.

झोहरान ममदानी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जानेवारीत ममदानी महापौरपदाची शपथ घेतील.

न्यू जर्सी आणि व्हर्जिनिया या दोन्ही राज्यांतही, गेल्या वर्षी डेमोक्रॅट कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर कमी फरकाने विजय मिळवला होता.

तिथे यावेळी गव्हर्नर निवडणुका झाल्या आणि दोन्ही ठिकाणी डेमोक्रॅट उमेदवारांनी आणखी मोठ्या फरकाने विजय मिळवला.

न्यू जर्सीची निवडणूक थोडी चुरशीची झाली होती. पण अंतिम निकालांवरून दिसतं की, गेल्या वर्षी ट्रम्प यांनी कामगार वर्ग आणि अल्पसंख्याक मतदारांमध्ये मिळवलेलं समर्थन या वेळी टिकून राहिलं नाही. कारण या वेळेस मतपत्रिकेवर ट्रम्प यांचं नाव नव्हतं.

ममदानींच्या अगदी विरूद्ध, शेरिल आणि स्पॅनबर्गर यांनी पक्षाच्या मुख्य प्रवाहातील, मध्यममार्गी प्रचार मोहीम राबवली आणि त्यांच्या योजना तुलनेने साध्या होत्या.

तरीही तिघांनीही महागाई आणि जीवनमानाशी संबंधित प्रश्नांवर जास्त भर दिला. एक्झिट पोलनुसार, मतदारांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा अर्थव्यवस्थाच होती.

झोहरान ममदानी पत्नी आणि आईवडिलांसोबत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, झोहरान ममदानी यांची पत्नी आणि आई-वडील

मंगळवारी डाव्या आणि मध्यममार्गी दोन्ही गटातील डेमोक्रॅट उमेदवार विजयी झाले. त्यामुळे भविष्यात निवडणुकीत यश मिळवण्यासाठी पक्षाने नेमकं कोणत्या प्रकारच्या धोरणांवर आणि उमेदवारांवर भर द्यावा, हे ठरवणं आता कठीण होऊ शकतं.मात्र गेल्या आठवड्यात ममदानी यांनी सांगितलं की, पक्षात सर्व प्रकारच्या विचारांना आणि मतांना भरपूर जागा आहे.

ते म्हणाले, "हा पक्ष असा असायला हवा की, ज्यात फक्त राजकारणातील लोकच नव्हे तर सर्वसामान्य अमेरिकन लोक स्वतःचं प्रतिबिंब पाहू शकतील."

"आपण सगळे एकत्र आहोत. कारण आपण ज्या लोकांसाठी लढतो, ते म्हणजे कामगार आणि सर्वसामान्य लोक."

ममदानींच्या विचारांची खरी परीक्षा पुढच्या वर्षी होईल, जेव्हा डेमोक्रॅट मतदार काँग्रेस निवडणुकीसाठी उमेदवार ठरवतील. त्या वेळी पक्षात तणाव आणि जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

पण किमान त्या एका रात्रीसाठी तरी, डेमोक्रॅट पक्ष एकत्र आणि आनंदात आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)