अमेरिकेच्या राजकारणात भारतीय वंशाच्या नागरिकांनी कसे निर्माण केले स्थान?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दिव्या आर्य
- Role, फिलाडेल्फिया, अमेरिका
एक भारतीय व्यक्ती राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे. शिवाय, अमेरिकन काँग्रेसमध्ये भारतीयांची संख्या आत्तापर्यंत सगळ्यात जास्त आहे. अमेरिकेत भारतीयांनी पाडलेल्या प्रभावाचं आणि त्यांच्या तिथल्या नेतृत्वाची कल्पना देणारं हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. भारतीय इथंपर्यंत पोहोचले कसे हेच बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य सांगत आहेत.
“वयाच्या 16 व्या वर्षी मी अमेरिकेत आले तेव्हा खिशात एक पैसा नव्हता. पण आता अमेरिकेतल्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हमध्ये निवडली जाणारी मी पहिली भारतीय वंशाची अमेरिकन महिला ठरली आहे,” मूळच्या केरळच्या प्रमिला जयपाल फिलेडेल्फियाच्या भारतीय वंशांच्या अमेरिकन लोकांसमोर बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या ते खरंतर टाळ्यांच्या कडकडात विरून गेलं.
“मी पहिली आहे, पण शेवटची नसेन,” असं ते वाक्य होतं.
प्रमिला जयपाल 2016 मध्ये अमेरिकेतल्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हमध्ये निवडून आल्या होत्या. त्याच रात्री कमला हॅरिस याही अमेरिकन सीनेटमध्ये निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या पहिल्या अमेरिकन व्यक्ती म्हणून पुढे आल्या होत्या.
हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह आणि सीनेट अशा दोन्हींनी बनलेल्या अमेरिकन काँग्रेसमधे निवडल्या गेलेल्या या दोघी पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन महिला होत्या.
पण, तेव्हापासून बरंच काही बदललं आहे.
जयपाल सलग चार वेळा निवडून आल्यानंतर आता पाचव्यांदा हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हच्या निवडणुकीसाठी लढणार आहेत. तर उप-राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर हॅरिस आता राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत.
2024 हे वर्ष फक्त भारतीय वंशांच्या लोकांसाठीच नाही तर भारतीय वंशांच्या महिलांसाठीही अमेरिकन राजकारणातला महत्त्वाचा मैलाचा दगड ठरलं आहे.
यावर्षी अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्ष पदासाठी तीन भारतीय वंशाच्या लोकांनी दावा केला. त्यातल्या दोन महिला होत्या. रिपब्लिकन पक्षाच्या निक्की हेली आणि विवेक रामास्वामी यांना डोनल्ड ट्रम्प यांनी हरवलं. पण डेमोक्रेटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांनी त्यांच्या पक्षाची उमेदवारी जिंकली.

पण इथंपर्यंत पोहोचणं जयपाल यांच्यासारख्या भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलांसाठी सोपं नव्हतं.
“मी पहिल्यांदा निवडणूक लढवत होते तेव्हा भारतीय अमेरिकन समाजातल्या अनेकांना मदतीसाठी बोलवायचे. या समाजातला बराचसा पैसा हा पुरूषांच्या हातात खेळत असतो. मी निवडणूक जिंकू शकणार नाही, असं ते म्हणत,” फिलेडेल्फियातल्या एका प्रचार सभेत जयपाल म्हणाल्या होत्या.
पण फक्त महिलाच नाही. एकूणातच भारतीय वंशाच्या लोकांनी अमेरिकेतल्या राजकारणात त्यांची स्वतःची जागा तयार करणं गेल्या दशकातच सुरू केलं आहे.
तसं पहायला गेलं तर अमेरिकन राजकारणातलं भारतीयांचं पहिलं पाऊल 1957 ला दलीप सिंग सौद यांनी डेमोक्रेटिक पक्षाकडून ठेवलं होतं. पण त्यानंतर 50 वर्ष शांतताच होती.
रिपब्लिकन पक्षाच्या बॉबी जिंदल यांनी 2005 मध्ये हे चित्र बदललं. पण ते स्वतःला आधी अमेरिकन आणि मग भारतीय वंशाचे म्हणायचे.
2015 मध्ये ते राष्ट्राध्यक्ष पदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीच्या शर्यतीत दाखल झाले तेव्हा म्हणाले होते की, “आपण भारतीय-अमेरिकन, आफ्रिकन - अमेरिकन, आयरिश-अमेरिकन, श्रीमंत किंवा गरीब अमेरिकन नाही. आपण सगळे अमेरिकन आहोत.”

अमी बेरा 2013 मध्ये काँग्रेसमधे निवडून आले तेव्हापासून भारतीय वंशाच्या नेत्यांनी अमेरिका खऱ्या अर्थानं आपलीशी करायला सुरुवात केली.
डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमिला जयपाल, राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, कमला हॅरिस 2017 मध्ये आणि श्री ठाणेदार 2023 मध्ये काँग्रेसमध्ये निवडून गेले.
भारतीय वंशांच्या नेत्यांचं अमेरिकन काँग्रेसमधलं हे आत्तापर्यंतचं सगळ्यात चांगलं प्रतिनिधित्व आहे.
पण या सगळ्याचा वेग इतका हळू का?
अमेरिकेत स्थलांतरित होऊन आलेला भारतीय समाज अजून खूप नवा आहे असं कॅलिफोर्नियाच्या सहा काँग्रेसल जिल्ह्यांमधून गेली दहा वर्ष निवडून येणारे अमी बेरा म्हणतात.
“मी अमेरिकेत वाढत होतो तेव्हा फक्त दहा हजार भारतीय होते. आज एक पूर्ण पिढी इथंच जन्मली-वाढली आहे. वैद्यकीय आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण पुढे आहोत. पण ही नवी पिढी सरकारमध्ये प्रतिनिधित्व करू पाहते,” असं वॉशिंग्टनमध्ये एका मुलाखतीत ते म्हणाले.
हे भारतीय वंशाचे अमेरिकन फक्त राजकारणात प्रवेश करून कोणत्यातरी महत्त्वाच्या सरकारी पदावर रूजू होत नाहीत. तर ते रिपब्लिक आणि डेमोक्रेटिक पक्षासाठी निधी जमवण्याचंही काम करतात.
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यावर 2015 मध्ये बनलेली रिपब्लिकन हिंदू आघाडी (आरएचसी) याचंच उदाहरण आहे.


शिकागोत राहणारे आरएचसीचे संस्थापक शलभ शैली कुमार यांनी अनेक कार्यक्रमांत डोनाल्ड ट्रम्प यांना बोलावलंय. तिथं ट्रम्प यांनी भारतीय अमेरिकन समुदायासमोर भाषणं दिली.
याच दरम्यान डेमोक्रेटला मत देणारे भारतीय वंशाचे मतदाते रिपब्लिककडे आकर्षित होताना दिसू लागले. पण यावेळेच्या निवडणूक प्रचारात त्यांचा आवाज कमी होता.
रिपल्बिकन पक्षाचं बदलणारं स्वरूप हे यामागचं कारण असल्याचं आरएचसीचे संस्थापक शलभ शैली कुमार यांनी म्हटलंय.
“हा श्वेतवर्णीय अमेरिकन लोकांचा पक्ष असल्याचं हिंंदू अमेरिकन समजतात. त्यांना हात दाखवत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा विचार 2016 ला संपवला होता. पण गेल्या वर्षांत पक्षाची मोहीम ठरवणारे व्यवस्थापक पुन्हा जुन्या विचारांवर चालले आहेत,” असं ते म्हणाले.
यावेळी ‘लोटस फॉर पोटस’ म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला यांचं नाव घेणारे भारतीय जास्त दिसतायत.
यामधले अनेकजण डेमोक्रेटिक पार्टी आणि त्यासोबतीच्या संघटनांसोबत स्वयंसेवक म्हणून घरोघरी जाऊन दक्षिण आशियाई मतदात्यांशी बोलत आहेत.
वॉल स्ट्रीटच्या एका कंपनीच्या प्रमुख सुबा श्रीनी आणि त्यांची मैत्रीण शुभ्रा सिन्हाही प्राचारासाठी निघाल्या आहेत.
आम्ही त्यांच्यासोबत दहा घरात गेलो. आठ घरांमध्ये कुणीही सापडलं नाही. एका घरात डेमोक्रेटिकचे समर्थक आणि एकात रिपब्लिकनचे. रिपब्लिकनचे समर्थक त्यांच्याशी बोलत नाहीत.
“हे फार अवघड काम आहे. खूप वेळ लागतो. फक्त 20% लोकच घरी सापडतात. पण या सगळ्या कसरतीत आम्हाला एका व्यक्तीचंही मन वळवता आलं तरी ते पुरेसं आहे.” प्रचारमोहिमेच्या ऑफिसमधून या स्वयंसेवकांना मतदात्यांच्या घराची यादी मिळते.
स्वयंसेवक लोकांशी बोलतातच. सोबत त्यांच्या राजकीय आवडीनिवडींबद्दल पक्षाला माहिती देतात.
जवळच्याच गल्ल्यांमध्ये सोफी घरोघरी जातात. एका घरात रिपब्लिकन समर्थकासोबत भरपूर वेळ गप्पा झाल्यावर त्या म्हणाल्या की, “मी त्यांना माझा आणि माझ्या कुुटुंबातल्या लोकांचा अनुभव सांगितला. मागच्या सरकारच्या चुकांचा आमच्यावर काय परिणाम झाला ते सांगतो. पण आम्हाला सन्मानापूर्वक वागावं लागतं. ही अमेरिका आहे. इथे प्रत्येकाला त्यांच्या आवडीप्रमाणे मत द्यायचं स्वातंत्र्य आहे.”
2016 मध्ये स्थापन झालेलं ‘इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट’ हे या स्वयंसेवकांना एकत्र जोडून ठेवणारं मुख्य संघटन आहे. भारतीय वंशाच्या नेत्यांसाठी ते निधी जमा करतात, प्रचारात मदत करतात आणि सामान्य भारतीय अमेरिकन लोकांना मतदानाची प्रेरणा देतात.
मतदात्यांनी कोणत्याही एका पक्षाला मत देण्याचा निर्णय घेतलेला नाही अशा जागी, अमेरिकेतल्या वेगवेगळ्या बॅटलग्राऊंड राज्यांत हे आत्ता प्रचार करतायत.
बॅटलग्राऊंड राज्यांतल्या दक्षिण आशियाई मतदात्यांचं एक सर्वेक्षण केलं असल्याचं पेनिसेल्वेनियाच्या फिलेडेल्फिया शहराचे कार्यकारी संचालक चिंतन पटेल यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
“या सर्वेक्षणात राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि इतर काही महत्त्वाचे मुद्दे विचारले गेले होते. यात उप राष्ट्रपती कमला हॅरिस यांना समर्थन देणाऱ्या दक्षिण आशियाई मतदार आणि बाकींच्याच्या मध्ये 50 पॉईंटचं अंतर आहे.”
चिंतन पटेल यांनी व्यक्त केलेला हा विश्वास किती खरा ठरेल हे तर पाच नोव्हेंबरलाच समोर येईल.
पण दक्षिण आशियाई मतदारांचं समर्थन मिळवण्यासाठी इम्पॅक्टसारख्या संघटनांच्या मदतीने स्वयंसेवक एकत्र करण्याचे प्रयत्न डेमोक्रेटिक पक्षाकडून केले जात आहेत, हे तर स्पष्ट आहे.
भारतीय वंशाच्या पद्मा लक्ष्मी आणि बांग्लादेशी गायिका अरी अफसर यांना भारतीय लोक जास्त असलेल्या फिलेडेल्फियाच्या एका प्रचार सभेत आमंत्रित केलं गेलं होतं.
लेखिका, टिव्ही निर्मात्या आणि मॉडेल पद्मा लक्ष्मी यांच्या मते, राष्ट्राध्यक्ष पदाची ही घोडदौड मूळ, वंश आणि लिंगभेदाबद्दलची आहेच. पण आता गोष्टी त्याही पुढे गेल्या आहेत.
“कमला हॅरिस श्वेतवर्णीय पुरूष असती तर सर्वेक्षणात सगळ्यात पुढे असती. पण या निवडणुकीचा आपल्या सगळ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळेच निवडणूक प्रक्रियेत सामील व्हा असं आवाहन मी करते. कारण, भविष्यात येणाऱ्या अनेक पिढ्यांवर तिचा प्रभाव राहणार आहे,” असं त्या निघताना म्हणाल्या.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











