डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा बनले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, सरन्यायाधीशांनी दिली शपथ, पाहा त्यांचा प्रवास

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी न्यूज
डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीत त्यांचा शपथविधी सोहळा झाला. तर जेडी वेन्स यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.
शपथविधीनंतर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे, असं म्हटलं.
"अमेरिकेच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेशी कधीही तडजोड करणार नाही. अमेरिका लवकरच यापूर्वी कधी नव्हता एवढा आणखी महान आणि बळकट बनवू. अमेरिकेला मोठी संधी आहे, पण त्याचवेळी आव्हानांचाही विचार करावा लागेल," असंही ट्रम्प यावेळी म्हणाले.
अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी देवाने माझी निवड केली आहे, असंही ट्रम्प यावेळी म्हणाले.
अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांसह अनेक मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती आहे. यात इलॉन मस्क, सुंदर पिचाई, टिम कूक यांच्यासह अनेकांचा समावेश होता.
(पाहा, ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा)
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला. अमेरिकन मतदारांनी ट्रम्प यांच्यावर विश्वास दाखवला.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा या निवडणुकीत पराभव करत, 2020 सालच्या पराभवानंतर चार वर्षांनी ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले.
'न्यूयॉर्क रिअल इस्टेटचा बादशाह' म्हणून बिरूदावली मिळवलेला हा उद्योगपती 2015 - 16 ला पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याआधी टॅबलॉईड्स आणि टीव्हीवर विविध कारणांसाठी झळकलेले दिसायचे.
घराघरात पोहोचलेले त्यांचे नाव आणि आपल्या बिनधास्त प्रचाराच्या शैलीमुळे त्यांनी कसलेल्या राजकारण्यांचा पराभव केला. पण त्याचवेळी त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा काळ वादग्रस्त ठरला.
2020 सालच्या पुढच्या निवडणुकीतही ते रिपब्लिकन पक्षातर्फे उभे राहिले. पण यावेळी मात्र डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांनी त्यांचा पराभव केला.
ओद्यौगिक वारसा
न्यूयॉर्कचे प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक फ्रेड ट्रम्प यांचं डोनाल्ड हे चौथं मूल होते. घरात अमाप पैसा असला तरी त्यांना वडिलांच्या कंपनीत अगदी छोट्या हुद्द्यापासून सुरुवात करावी लागली. वयाच्या 13 वर्षी त्यांना सैनिक शाळेत पाठवण्यात आले होते पण तिथे खोडकरपणा केल्यामुळे त्यांना तिथून काढून टाकले होते.
नंतर पेन्सिल्वेनिया विद्यापीठाच्या व्हॉर्टन स्कूलमधून पदवी मिळवली. डोनाल्ड यांचे भाऊ फ्रेड (ज्युनिअर) पायलट झाल्यामुळे फ्रेड ट्रम्प यांनी डोनाल्ड यांचीच पुढे वारस म्हणून निवड केली.
डोनाल्ड यांचे भाऊ फ्रेडचं (ज्युनिअर) अतिमद्यपानामुळे 43 व्या वर्षी निधन झाले. यामुळेच डोनाल्ड हे नेहमी मद्यसेवन आणि सिगरेटपासून दूर राहिल्याचे म्हटले जाते.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या घरच्या व्यवसायाचे व्यवस्थापन हाती घेण्यापूर्वी वडिलांकडून 1 मिलियन डॉलर इतकं 'छोटं' कर्ज घेऊन आपण रिअल इस्टेट व्यवसायात उतरल्याचं ट्रम्प सांगतात.


ट्रम्प यांच्या वडिलांच्या कंपनीने न्यूयॉर्क शहर आणि उपनगराभोवती अनेक निवासी वसाहतींची निर्मिती केली होती. या कामात त्यांनी वडिलांना सहकार्य केले.
1971 मध्ये डोनाल्ड यांच्याकडे कंपनीची सुत्रं आली आणि 'ट्रम्प ऑर्गनायजेशन' हे नवं नाव त्यांनी या कंपनीला दिलं.
डोनाल्ड ट्रम्प आपल्या वडिलांची ओळख 'माझे प्रेरणास्रोत' अशी करत. 1999 साली फ्रेड ट्रम्प वृद्धापकाळाने मरण पावले.
ट्रम्प नावाच्या ब्रॅन्डचा उदय
ट्रम्प यांनी कंपनीची सुत्रं हाती घेतल्यावर, त्यांनी कंपनीचे मुख्यालय मॅनहटनमध्ये हलवले. त्याआधी त्यांच्या कंपनीचे कामकाज क्वीन्स आणि ब्रुकलीन या ठिकाणाहून चालत असे. या ठिकाणाहून स्थलांतर करुन त्यांनी व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागात आपले मुख्यालय नेले.
मॅनहटनमधील सर्वांत मोक्याच्या समजल्या जाणाऱ्या फिफ्थ अॅवेन्यू भागात त्यांनी ट्रम्प टॉवर उभारले. ट्रम्प यांच्या व्यावसायिक प्रकल्पांपैकी ही इमारत सर्वांत प्रसिद्ध मानली जाते.
त्यानंतर फारसं न चालणारे कोमोडोर हॉटेल घेत त्यांनी त्या ठिकाणी 'ग्रँड हयात' हॉटेल सुरू केले.
ट्रम्प यांचे जगभरात अनेक बांधकाम प्रकल्प आहेत. मोठमोठ्या राहिवासी इमारतींपासून आलिशान महाल, मॉल्स, हॉटेल्स, कसिनोज, गोल्फ कोर्सेस आणि बरंच काही.
अमेरिकेत न्यूयॉर्कसह अटलांटिक सिटी, शिकागो, लास वेगास ते अगदी भारत, तुर्की, फिलीपिन्स सारख्या देशांमध्ये हजारो कोटींचे बांधकाम प्रकल्प डोनाल्ड ट्रम्प यांनी उभारले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
डोनाल्ड ट्रम्प यांनी मनोरंजन क्षेत्रातही नाव कमावले. त्यांनी मिस युनिव्हर्स, मिस यूएसए आणि मिस टीन यूएस सारख्या सौंदर्य स्पर्धा भरवल्या. पण डोनाल्ड ट्रम्प खऱ्या अर्थानं सेलिब्रिटी बनले ते द अपरेंटिस या टेलिव्हिजन रिॲलिटी शो मुळे.
अपरेंटिस या टेलिव्हिजन रिॲलिटी शोचे डोनाल्ड ट्रम्प सहनिर्माते होते. शिवाय परीक्षक देखील. उद्योजक बनू पाहणाऱ्या तरूणांची पारख करणारा हा कार्यक्रम होता. नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनी (एनबीसी) ने 2004 साली हा शो सुरू केला. द अपरेटिंस या शोचे 14 सीजन आले.
आपलं उद्योग कौशल्य दाखवून परीक्षकांना प्रभावित करणाऱ्या शो च्या विजेत्याला डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीसोबत स्वत:चा नवीन व्यवसाय उभारण्याची संधी मिळायची. कोण जिंकणार आणि हरणार हे अर्थातच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्यासोबतचे सहपरीक्षक ठरवायचे, असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं.
एखाद्या स्पर्धकाला बाद करताना डोनाल्ड ट्रम्प हे ‘You Are Fired’ असं म्हणायचे. त्यांचं हे वाक्य खूप प्रसिद्ध झालं होतं.
ट्रम्प यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिली आहेत. अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत तसेच प्रो-रेसलिंग (WWE ) सारख्या कार्यक्रमातही त्यांनी हजेरी लावत प्रसिद्धीचा वापर व्यवसायवृद्धीसाठी त्यांनी केला आहे. कोल्ड्रिंकपासून ते नेकटायपर्यंत सारंकाही त्यांनी विकलं आहे. असं असलं तरी त्यांची संपत्ती 4 अब्ज डॉलर्सपर्यंत घटली असल्याचे फोर्ब्सने म्हटले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो स्रोत, Getty Images
आजतागायत तब्बल सहा वेळा त्यांच्या कंपनीला दिवाळखोरी जाहीर करावी लागली. ट्रम्प स्टीक्स आणि ट्रम्प युनिव्हर्सिटी हे त्यांचे दोन उद्योग तोट्यात गेल्यामुळे बंद देखील करावे लागले.
त्यांनी कर चुकवण्याच्या उद्देशाने उत्पन्नाची माहिती दडवली होती. न्यूयॉर्क टाइम्सने 2020 मध्ये प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार त्यांनी अनेक वर्षं कर चुकवला तसेच ते सातत्याने तोट्यातही होते.
कौटुंबिक जीवन
ट्रम्प यांचं वैयक्तिक आयुष्य माध्यमांत आणि लोकांमध्ये नेहमी चर्चेचा विषय बनले.
डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला विवाह 1977 साली चेक रिपब्लिकची मॉडेल इवाना झेल्निकोव्हासोबत झाला. या लग्नापासून त्यांना डोनाल्ड ज्युनियर, इवांका आणि एरिक ही अपत्य आहेत.
1990 त्यांचा घटस्फोट झाला होता. इवाना आणि ट्रम्प यांच्यात बऱ्याच काळासाठी न्यायालयीन लढाई चालली. त्यांच्यातील घडामोडी टॅबलॉइडसमधून सतत येत असत. ट्रम्प यांनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचा आरोपही इवाना यांनी लावला होता. नंतर त्यांनी तो मागे घेतला.
1993 साली मार्ला मेपल्ससोबतच ट्रम्प यांचा दुसरा विवाह झाला. या लग्नापासून त्यांचा एक अपत्य (मुलगी टिफिनी) आहे. 1999 साली त्यांचा पुन्हा घटस्फोट झाला.
2005 साली डोनाल्ड यांनी तिसरा विवाह केला. स्लोव्हेनियाच्या मॉडेल मेलानिया क्नॉस यांच्या सोबत ते आजही लग्नबंधनात आहेत. त्यांना झालेला बॅरॉन हा मुलगा डोनाल्ड ट्रम्प यांचं सर्वांत छोटं अपत्य आहे. 2006 साली जन्मलेला बॅरॉन नुकताच 18 वर्षांचा झालेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रम्प यांच्यावर लैंगिक दुराचार आणि विवाहबाह्य संबंधाचे आरोप झाले आहेत.
पत्रकार आणि लेखिका E. जीन कॅरोल यांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. पण हे फेटाळताना ट्रम्प यांनी त्यांच्याबाबत अपमानस्पद वक्तव्य केल्याचे दोन स्वतंत्र ज्युरींसमोर सिद्ध झाले. ट्रम्प यांनी कॅरोल यांना 88 मिलियन डॉलर्स अब्रुनुकसानीची भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले होते पण ट्रम्प यांनी याविरोधात अपील केले आहे.
पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्स यांच्यासोबतचे कथित संबंध उघड होऊ नयेत म्हणून त्यांनी आपल्या कंपनीतील व्यवहारांच्या नोंदीमध्ये फेरफार केल्याबद्दल ट्रम्प हे दोषी आढळले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
राजकारणातील प्रवेश
1980 सालच्या आपल्या एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की, राजकारण हे पाताळयंत्री लोकांचे जग आहे आणि जे खरंच कर्तृत्ववान असतात ते व्यवसाय उद्योगात जातात.
1987 साली त्यांनी पहिल्यांदा त्यांना राष्ट्राध्यक्षपद खुणावू लागलं होतं. 2000 साली झालेल्या निवडणुकीत रिफॉर्म पार्टीतर्फे त्यांनी उमेदवारी मिळवली होती. तर 2012 मध्ये रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार होण्यासाठी देखील त्यांनी प्राथमिक फेऱ्यांमध्ये चाचपणी करुन पाहिली होती.
ट्रम्प हे 'जन्मवादा'चे खुले समर्थक असल्याचं म्हटलं जातं. "बराक ओबामा यांचा जन्म खरंच अमेरिकेत झाला आहे का?" अशी एक कॉन्स्पिअरसी थिअरी त्या काळात अस्तित्वात होती आणि त्यांनी त्याचे समर्थन केले. ही गोष्ट खोटी असल्याचे त्यांनी 2016 पर्यंत कधीच मान्य केले नाही आणि याबद्दल त्यांनी कधीच माफी मागितली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
16 जून 2015 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मॅनहॅटनमधील आपल्या ट्रम्प टॉवरमधून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी घोषणा केली. ग्रेट अमेरिकन ड्रीमचा चुराडा झाल्याचे त्यांनी म्हटले होते आणि अमेरिकेला पुन्हा महान आणि विशाल बनवण्याचा संकल्प करत त्यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली होती.
या भाषणात त्यांनी त्यांना मिळालेल्या व्यावसायिक यशाबद्दल आणि त्यांच्या संपत्तीची अभिमानाने वाच्यता केली.
मेक्सिको त्यांच्या देशातून अमेरिकेत ड्रग्ज, बलात्कारी आणि गुन्हेगार पाठवत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण निवडून आल्यावर सीमेवर भिंत घातली जाईल आणि याचा खर्च मेक्सिकोकडून वसूल केला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले होते.
अमेरिकेला पुन्हा महान बनवायचे या त्यांच्या घोषवाक्याने रिपब्लिकनच्या पक्षातील उमेदवारांना त्यांनी सहज मागे टाकले आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात ते उभे टाकले.

फोटो स्रोत, Getty Images
ऐन प्रचार शिगेला पोहोचलेला असताना बलात्काराचं समर्थक करणारी त्यांची ऑडियो क्लिप समोर आल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात वातावरण तापलं होतं. ओपनियन पोल्सनुसार निवडणुकांमध्ये ते मागेच होते.
पण सर्वांचे अंदाज चुकवत डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांना मात दिली.
20 जानेवारी 2017 रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष बनले.
राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ
डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष पदाचा पहिला कार्यकाळ हा अनेक वाद आणि विरोधाभासांनी भरलेला राहिला.
राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची काम करण्याची शैली ही कायम चर्चेचा आणि बऱ्याचदा टीकेचा विषय बनली.
सरकारचे अधिकृत निर्णय पत्रक काढून किंवा पत्रकार परिषदेत सांगण्याऐवजी ते ट्विटरवरुनच जाहीर करत तर कधी ते परराष्ट्रीय नेत्यांसोबत असलेले मतभेद खुलेपणाने जाहीर करत.
राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सात मुस्लीम बहुल देशांमधील नागरिकांना अमेरिकेत येण्यापासून निर्बंध घातले. अनेक पर्यावरणाविषयी कायदे हटवून आंतरराष्ट्रीय करारातूनही त्यांनी माघार घेतली. चीनमधील उत्पादनांवर आयात कर लादून त्यांनी नवं व्यापार युद्ध सुरू केलं. अनेक कर व कराचा दर देखील कमी केला. आखाती देशासोबतच्या संबंधांबाबत पुनर्विचार केला.

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाची मदत घेऊन अमेरिकेच्या निवडणुकीत परकीय हस्तक्षेपाला परवानगी दिल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 2018 साली खटला देखील चालला.
आपले प्रतिस्पर्धी जो बायडन यांची बदनामी करण्यासाठी युक्रेनचं सहकार्य घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर 2019 साली महाभियोग खटला देखील चालवला गेला, पण यातून ते सहीसलामत सुटले.

फोटो स्रोत, Getty Images
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा अखेरचा कार्यकाळ कोव्हिड महासाथीने प्रभावित झाला होता.
कोरोना हाताळण्यात त्यांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. कोव्हिड हा काही आजार नसून शत्रूराष्ट्रांनी पसरवलेलं षड्यंत्र आहे असं म्हणण्यापासून शरीरात जंतूनाशक टोचल्याने कोरोना बरा होतो, असं त्यांनी यावेळी म्हटलं होतं. यावर देखील त्यांच्यावर जगभरातून टीका झाली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनाच कोरोनाची लागण झाल्यावर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी त्यांना प्रचारातून पंधरा दिवस माघार घ्यावी लागली होती.
2020 च्या निवडणुकीतील पराभव
3 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागला आणि जो बायडन मताधिक्याने विजयी झाले. पण अजूनही राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निकाल स्वीकारायला नकार दिला.

फोटो स्रोत, Getty Images
पहिल्यांदा त्यांनी निवडणुकीचा निकाल अजून स्पष्ट झालेला नसताना आधीच मी विजयी झाल्याचं घोषित करुन टाकलं. त्यानंतर जो बायडन यांना निवडणूक आयोगानं अधिकृतरित्या विजयी घोषित केल्यानंतर मतमोजणीत घोटाळा झाल्याचा कांगावा करत निकालच अमान्य केला.
त्यांनी हा निकाल अमान्य केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस परिसरात गोंधळ घातला. त्यानंतर त्यांच्यावर दुसऱ्यांदा महाभियोगचा खटला चालवण्यात आला. यावेळीही ते सहीसलामत सुटले.
राष्ट्राध्यक्ष असलेल्या ट्रम्प यांनी निवडणूक निकालाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने त्यांचे सर्व दावे फेटाळून लावत निकाल वैध ठरवला.
दमदार पुनरागमन
कॅपिटल हिल वरील हल्ल्यानंतर तर डोनाल्ड ट्रम्प यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपल्यात जमा होती. 2016 - 2020 हा राष्ट्राध्यक्षपदाचा त्यांचा पहिला कार्यकाळ बहुतांशी चुकीच्या कारणांमुळेच चर्चेत राहिला. याची परिणती 2020 च्या निवडणुकीतील पराभवात झाली.
डोनाल्ड ट्रम्प यांची राजकीय कारकीर्द आता संपुष्टात आल्याचं सगळ्याचंच एकमत होतं. फक्त विरोधकच नव्हे आपल्या रिपब्लिकन पक्षातील सहकाऱ्यांचही समर्थन डोनाल्ड ट्रम्प यांनी गमावलं होतं. तरीही आपल्या अति उजव्या समर्थक आणि रिपब्लिकन पक्षातील काही निष्ठावंतांमध्ये त्यांची लोकप्रियता अजूनही कायम होती.
राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिगामी विचारसरणीच्या आपल्या पसंतीच्या न्यायाधीशांची अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली होती.
2022 साली सर्वोच्च न्यायालयातील याच ट्रम्प नियुक्त न्यायाधीशांनी अमेरिकन संविधानानं महिलांना दिलेला गर्भपाताचा अधिकार काढून घेतला.
15 नोव्हेंबर 2022 रोजी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा 2024 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपण उतरणार असल्याची घोषणा केली. रिपब्लिकन पक्षामधील आपला प्रभाव आणि लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी पक्षाची उमेदवारी आरामात जिंकली.
आता उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या जो बायडन यांच्या सहकारी कमला हॅरिस या 2024 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत. देशातील उदारमतवादी मतदार हे कमला हॅरिस यांच्या बाजूने तर प्रतिगामी विचारसरणीचे मतदार डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देत आहेत.
दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी मैदानात उतरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अजूनही तब्बल 91 वेगवेगळे खटले चालू आहेत. वादग्रस्त वर्णद्वेषी वक्तव्य करून आपल्या पारंपरिक मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं जुनं धोरण डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळेसही चालू ठेवलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी प्रचारात कुठलीही कसर ठेवली नसून आपली वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच ठेवली आहे.
स्थलांतरितांविषयी त्यांची वर्णद्वेषी शेरेबाजी आणखी कडवी झाली असून या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘हे स्थलांतरित अमेरिकेत गुन्हेगारी पसरवत असल्यापासून ते हे लोक मांजरी खातात, असे धादांत खोटे दावे डोनाल्ड ट्रम्प यांच्याद्वारे केले गेले आहे.
आपल्या प्रतिगामी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या अति उजव्या षडयंत्रांना डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान वेळोवेळी खतपाणी घातलेलं आहे
13 जुलै 2024 रोजी पेन्सिल्वेनियामध्ये एक प्रचारसभेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला देखील झाला. ट्रम्प सभेत भाषण करत असताना थॉमस मॅथ्यू क्रूक या 20 वर्षीय हल्लेखोरानं एआर - 15 रायफलमधून ट्रम्प यांच्या दिशेनं चालवलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली.
सुरक्षा रक्षकांनी वेळीच मध्यस्थी करत या हल्लेखोराला मारून टाकलं. ट्रम्प यांच्यावर हा प्राणघातक हल्ला कोणत्या उद्देशानं केला गेला होता, याबाबत पुरेसं स्पष्टीकरण अजूनही आलेलं नाही.
हल्ल्यात ट्रम्प यांना झालेली इजा फारशी गंभीर नव्हती. कारण गोळी कानाला चाटून गेल्यानंतर लगेच ते पुन्हा हात वर करून उभे राहिले. शिवाय दोन दिवसांनीच त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यक्रमात देखील हजेरी लावली.

फोटो स्रोत, Getty Images
हात वर करून आवळलेली मूठ, कानातून आणि गालावरून वाहणारं रक्त आणि मागे पडद्यावर झळकणारा अमेरिकेचा झेंडा हा त्यांचा फोटो या निवडणुकीतील सर्वात गाजलेलं चित्र बनलं.
यानंतर दोन महिन्यांनी पुन्हा 16 सप्टेंबर रोजी फ्लोरिडामधील डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्स मध्ये त्यांच्यावर आणखी एक प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पण हल्ला करण्याआधीच सुरक्षा रक्षकांनी सजगता दाखवत रायन राऊथ या हल्लेखोराला हेरून पिटाळून लावलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











