डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होऊ शकतो?

फोटो स्रोत, AP
- Author, साराह स्मिथ
- Role, उत्तर अमेरिका संपादक
डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ दिसत आहेत, ते आपल्या हाताची मूठ घट्ट आवळून हवेत उंचावत आहेत. त्यांचे अंगरक्षक सुरक्षेचे कवच तयार करुन त्यांना मंचापासून दूर नेत आहेत. हे छायाचित्र तुम्ही एव्हाना पाहिलं असेल. हे छायाचित्र केवळ इतिहास घडवणारेच नाही तर नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीला कलाटणी देणारे देखील ठरू शकते.
राजकीय हिंसाचाराच्या या धक्कादायक घटनेचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचार मोहिमेवर होणारा परिणाम अपरिहार्य आहे.
अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी संशयितावर गोळ्या झाडल्या आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेतील सूत्रांनी बीबीसीच्या अमेरिकेतील सहकारी असणाऱ्या सीबीएस न्यूजला सांगितलं की ते या हल्ल्याकडे ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न म्हणूनच पाहत आहेत.
रक्ताने माखलेल्या आणि हवेत हाताची घट्ट मूठ उंचावलेल्या ट्रम्प यांना सुरक्षारक्षक घटनास्थळापासून दूर नेते आहे असे छायाचित्र त्यांचा मुलगा एरिक ट्रम्प यांनी लगेचच सोशल मीडियावर टाकले.
त्यात त्यांनी म्हटलं होतं, "अमेरिकेला अशाच लढवय्याची गरज आहे."
ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर लगेचच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी टीव्हीवरून संदेश दिला.
ते म्हणाले, 'यासारख्या राजकीय हिंसाचाराला अमेरिकेत स्थान नाही'. त्यांनी रिपब्लिकन पक्षातील त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या ट्रम्प यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली.
रात्री ट्रम्प यांच्याशी बोलून त्यांची विचारपूस करता येईल अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या घटनेनंतर जो बायडन यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेनं सर्व प्रकारची राजकीय वक्तव्ये थांबवली आहेत.
त्याचबरोबर प्रचारासाठी टीव्हीवर ज्या जाहिराती दाखवल्या जात होत्या, त्यासुद्धा लवकरात लवकर बंद करण्यावर काम केलं जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर या परिस्थितीत राजकीय हल्ला चढवणं अयोग्य ठरेल असं त्यांना वाटतं. त्याऐवजी ट्रम्प यांच्या जो हल्ला झाला आहे, त्याचा निषेध करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे.
एकमेकांशी फारसं सहमत नसलेले, सर्वच राजकीय पक्षातील राजकारणी या हल्ल्याच्या निषेधासाठी आणि लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला स्थान नाही हे सांगण्यासाठी एकत्र येत आहेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज डब्ल्यू बुश, बिल क्लिंटन आणि जिमी कार्टर या सर्वांनी या हिंसाचाराचा तत्काळ निषेध केला. ते म्हणाले, 'ट्रम्प यांना गंभीर दुखापत न झाल्यानं त्यांना दिलासा मिळाला.'
सर्वत्र या हल्ल्याबाबत निषेधाचे सूर उमटत असले तरी ट्रम्प यांच्या जवळचे सहकारी आणि समर्थक मात्र जो बायडन यांनाच या हिंसाचाराचा दोष देत आहेत.

फोटो स्रोत, AP
अमेरिकन काँग्रेसमधील रिपब्लिकन पक्षाच्या एका सदस्यानं तर एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया व्यासपीठावर पोस्ट करत, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या 'ट्रम्प यांच्या हत्येला चिथावणी दिल्याचा' आरोप केला आहे.
ट्रम्प यांच्या टीममध्ये उप-राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्याचं मानले जात असलेले जे. डी. वान्स या सिनेटरनं देखील बायडन यांनाच या हल्ल्याचा दोष दिला आहे.
ते म्हणाले, 'जो बायडन यांनी प्रचार मोहिमेत ज्या प्रकारची वक्तव्ये केली त्याचाच थेट परिणाम होत हा हल्ला झाला आहे.'

फोटो स्रोत, Getty Images
रिपब्लिकन पक्षाचे इतर राजकारणी अशाच प्रकारची वक्तव्ये करत आहेत. अर्थात, अमेरिकेच्या राजकारणातील संवेदनशील क्षणी चिथावणीखोर वक्तव्ये म्हणून या विधानांचा त्यांच्या विरोधकांकडून म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाकडून निषेध केला जाईल.
या धक्कादायक घटनेनंतर घाणेरड्या अशा संघर्षाची परिस्थिती निर्माण होत असल्याचं आपण पाहू शकतो. यातूनच अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराचं स्वरूप बदलणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला कसा झाला ?
पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरात डोनाल्ड ट्रम्प एका प्रचारसभेत भाषण करत असताना अचानक गोळीबाराचा आवाज झाला, ट्रम्प गोळीबारानंतर कानाला हात लावत खाली झुकताना दिसले आणि नंतरच काही क्षणातच सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी त्यांना स्टेजवरून खाली उतरवत, घटनास्थळापासून दूर नेलं.
हल्लेखोराला सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी ठार केलं असून, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून खाली उतरवलं जात असताना ते उपस्थित लोकांकडे बघून अभिवादन करताना दिसून आले. सध्या डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या प्रचार यंत्रणेतील लोकांनी दिली आहे.
या सभेत उपस्थित असलेल्या लोकांनी बीबीसीला सांगितलं की सभास्थळापासून जवळ असणाऱ्या एका इमारतीवर एका माणसाला रायफल घेऊन रांगत असताना त्यांनी पाहिलं होतं.

फोटो स्रोत, AP
या घटनेनंतर जो व्हिडिओ समोर आला त्यात असं दिसत आहे की गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर ट्रम्प खाली झुकले आणि ते पुन्हा उभे राहिले तेव्हा त्यांच्या गालावर रक्त दिसून येत होतं.
सिक्रेट सर्व्हिसने दिलेल्या निवेदनात असं सांगितलं आहे की डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की आता या घटनेचा तपास सुरू असून जी माहिती मिळेल ती लवकरच सांगितली जाईल.
यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. याच निवडणुकीच्या प्रचारासाठी डोनाल्ड ट्रम्प हे पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरात भाषण करत होते. पेन्सिल्वेनिया हे अमेरिकेतील महत्त्वाचं स्विंग स्टेट (राजकीय दृष्ट्या स्पष्ट नसलेलं) राज्य आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर अमेरिकेतील दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बायडन काय म्हणाले?
या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यातर्फे एक लेखी निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
बायडन यांनी लिहिलं की, "डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत हे जाणून मला दिलासा मिळाला आहे. अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही. आपण देश म्हणून एकसंध राहायला हवे. या घटनेचा निषेध केला पाहिजे."
अमेरिकेतील संसदेचे अल्पसंख्याक नेते हकीम जेफ्रीज यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “माझ्या प्रार्थना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत आहेत. हल्ल्यानंतर तात्काळ कारवाई करणाऱ्या अधिकारी आणि पोलिसांचा मी आभारी आहे. अमेरिका ही लोकशाही आहे. कोणत्याही प्रकारची राजकीय हिंसा इथे कधीही स्वीकारार्ह नाही.”
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध झाला आहे.













