डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सुरू आहेत 'हे' 4 गुन्हेगारी खटले, ते तुरुंगात जाऊ शकतात का?

फोटो स्रोत, Getty Images
भारतात जशी सध्या निवडणुकीची धामधूम आहे, तसंच काहीसं वातावरण अमेरिकेतही तयार होतंय. कारण तिथे नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होतील.
पुन्हा एकदा जो बायडन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशी लढत होण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बातम्यांमध्ये आहेत. कारण त्यांना एकीकडे निवडणूक प्रचार करतानाच दुसरीकडे अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर लढाईला तोंड द्यावं लागतंय.
77 वर्षांचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातले असे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांच्यावर अशाप्रकारचे गुन्हेगारी आरोप दाखल झाले आहेत. ट्रम्प यांच्यावर चार वेगवेगळ्या केसेसमध्ये डझनभर आरोप आहेत. इतकंच नाही तर ट्रम्प यांच्यावर त्यांच्या उद्योगांशी संबंधित दिवाणी (Civil) केसेसही आहेत.
ट्रम्प यांच्यावरचे 4 गुन्हेगारी खटले कोणते आहेत :
- न्यूयॉर्क हश मनी
- कॅपिटॉल दंगल आणि 2020 निवडणूक
- जॉर्जिया 2020 निवडणूक
- गोपनीय कागदपत्रं (Classified Documents)
न्यूयॉर्क हश मनी
अॅडल्ट फिल्म अभिनेत्री स्टॉर्मी डॅनिअन्स यांना 2016 च्या निवडणुकीच्या काही काळ आधी पैसे दिल्याचं हे प्रकरण आहे. ट्रम्प यांनी त्यांच्यासोबतच्या संबंधांविषयी मौन बाळगण्यासाठी 130,000 अमेरिकन डॉलर्स आपल्याला दिले असं स्टॉर्मी डॅनिअल्स यांचं म्हणणं आहे, तर आपलं अफेअर नव्हतं, असं ट्रम्प यांनी म्हटलंय.
ट्रम्प यांचे माजी वकील, ज्यांनी डॅनिअल्स यांना पैसे दिले, त्यांनी ते नंतर ट्रम्प यांच्याकडून वळते करून घेतले. त्यांची नोंद ट्रम्प यांच्या अकाऊंट्समध्ये आहे.
कायदेशीर फीच्या नावाखाली या पैशांची नोंद करण्यात आली आणि याबद्दल घोटाळ्याच्या 34 तक्रारी त्यांच्या विरोधात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
पण राजकीय हेतूने या तक्रारी करण्यात आल्या असून, आपण कोणताही घोटाळा केला नसल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे.
या केसची सुनावणी सुरू झालीय. या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प दोषी आढळले, तरी त्यांना तुरुंगवास होण्याची शक्यता कमी असून दंड आकारला जाईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
कॅपिटॉल दंगल आणि 2020 निवडणूक
2020च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील पराभव उलथवून टाकण्यासाठी ट्रम्प यांनी बेकायदेशीरपणे योजना आखल्याचा हा खटला आहे.
निकाल फिरवण्यासाठी ट्रम्प यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणला, खोटी माहिती पसरवली, आणि बायडन यांच्या विजयाची घोषणा पुढे जाऊन अजून काही काळ सत्तेत राहता यावं यासाठी 6 जानेवारी 2021 ला कॅपिटॉलमध्ये झालेल्या दंगलीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, असे त्यांच्यावर आरोप आहेत.
याबद्दलचे 4 फौजदारी गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. यामध्ये अमेरिकेची फसवणूक करण्यासाठीचं कारस्थान रचणं आणि नागरिकांच्या हक्कांच्या विरोधात कारस्थान रचण्याचाही गुन्हा आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका अपिलामुळे या मुख्य खटल्याची सुनावणी पुढे गेलीय.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेच्या इतर कोणत्या सामान्य नागरिकासारखा माजी राष्ट्राध्यक्षावर खटला चालवता येऊ शकत नाही, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.
त्यावर आधी अमेरिकेचं सुप्रीम कोर्ट जून 2024 पर्यंत निकाल देईल. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होईपर्यंत कॅपिटॉल दंगलीबाबतच्या या प्रकरणावर सुनावणी होईल का, याबाबत शंका आहे.
जर ट्रम्प निवडून आले, तर ते स्वतःवरचा हा खटला रद्द करू शकतात.
पण हा खटला चालला, आणि ट्रम्प दोषी ठरले, तर अमेरिकेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडेल. या खटल्याशी संबंधित आरोपांमध्ये 5 ते 20 वर्षं अशा कालावधीच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. पण ट्रम्प खरंच तुरुंगात जातील का, कुठल्या, तिथल्या सुरक्षा, राजकीय भविष्य असे सगळेच प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत.
जॉर्जिया 2020 निवडणूक
2020 च्या निवडणुकीत जॉर्जिया राज्यात ट्रम्प यांचा अगदी कमी फरकाने पराभव झाला. हा निकाल फिरवण्यासाठी कट रचल्याचा गुन्हा ट्रम्प आणि इतर 18 जणांवर आहे.
ट्रम्प या राज्याच्या एका मोठ्या निवडणूक अधिकाऱ्याला 'find 11,780 votes' (11,780 मतं शोधा) सांगतानाचा फोन कॉल लीक झाला होता.
याप्रकरणी ट्रम्प यांच्यावर 13 गुन्हे आहेत आणि या प्रकरणाची सुनावणी ऑगस्टमध्ये सुरू होण्याचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गोपनीय कागदपत्रं (Classified Documents)
अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी काही गोपनीय कागदपत्रं व्हाईट हाऊस (राष्ट्राध्यक्षांचं अधिकृत निवासस्थान) मधून फ्लोरिडातल्या स्वतःच्या मार-अ-लागो (Mar-a-Lago)मधल्या घरी नेली असा आरोप आहे. या फाईल्स पुन्हा मिळवण्याच्या FBI च्या प्रयत्नांत ट्रम्प यांनी अडथळा आणला आणि ज्याप्रकारे ट्रम्प यांनी ही कागदपत्रं हाताळली, त्याबद्दलचे आरोपही आहेत.
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती जाणीवपूर्वक स्वतःकडे ठेवल्याचे आरोप हे अमेरिकेत Espionage Act म्हणजे हेरगिरीच्या गुन्ह्यांत येतात.
ही सुनावणी जुलैमध्ये सुरू करण्याची फिर्यादी पक्षाची इच्छा आहे. पण नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्यानंतर ही सुनावणी व्हावी असं ट्रम्प आणि त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे.
या प्रकरणी ट्रम्प दोषी आढळले तर ट्रम्प यांना मोठा तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात त्यांच्यावर असलेल्या आरोपांसाठी 10 ते 20 वर्षांची शिक्षा कायद्यात आहे.
पण एका माजी राष्ट्राध्यक्षाला तुरुंगवास झालाच तर तो इतर सामान्य गुन्हेगारासारखा असेल का, याबाबत तज्ज्ञांना शंका आहे.
ट्रम्प तुरुंगातून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतात का?
अमेरिकेच्या कायद्यांनुसार एखाद्या व्यक्तीवर गुन्हेगारी आरोप असतील किंवा ती तुरुंगांत असेल तरीही राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकते. त्यामुळे तोच नियम डोनाल्ड ट्रम्प यांनाही लागू होईल.
यापूर्वी दोन वेळा असं घडलेलं आहे. 1920 मध्ये सोशलिस्ट उमेदवार युजीन डेब्स यांच्यावरचा एक आरोप सिद्ध झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
तर 8 वेळा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणाऱ्या कॉन्स्पिरसिस्ट लिंडन लारूश यांनी 1992 ची निवडणूक मिनिसोटामधल्या तुरुंगातून लढवली होती.
या दोघांचाही त्यावेळी पराभव झाला होता.
खटला आणि निवडणुकीकडे जगाचं लक्ष
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सुरू असलेल्या कायदेशीर खटल्यांकडे जसं जगाचं लक्ष आहे. तसंच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडेही जगाचं लक्ष आहे. कारण येऊ घातलेल्या नव्या राष्ट्राध्यक्षाच्या धोरणांचा परिणाम जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या अमेरिकेसोबतच्या संबंधांवर होईल.
सध्या युक्रेन आणि गाझा या दोन्ही युद्धांमध्ये अमेरिकेची भूमिका महत्त्वाची आहे. इस्रायल-इराण तणावातही अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावतोय.
अमेरिका-चीन यांच्यातले संबंधे खराब झालेयत आणि एशिया-पॅसिफिक भागातही तणाव निर्माण झालेला आहे.
अमेरिकेमध्ये दक्षिणेतील बॉर्डर पलिकडून येणाऱ्या निर्वासितांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. या बॉर्डरवर भिंत उभारून, निर्वासितांना परत पाठवण्याची ट्रम्प यांची गेल्या राष्ट्राध्यक्ष कार्यकाळातली भूमिका वादग्रस्त ठरली होती.
युद्धामुळे स्थलांतरित, निर्वासित यांच्यासोबतच अमेरिकेमध्ये शिक्षण - नोकरीसाठी स्थायिक झालेल्यांबद्दल व्हिसा नियमांबद्दल ट्रम्प यांची भूमिका महत्त्वाची असेल. याचा परिणाम भारतासोबतच जगभरातून अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर होईल.










