अमेरिका निवडणूक : 'प्रेसिडेन्शियल डिबेट'चे काय असतात नियम?

फोटो स्रोत, REUTERS
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील दुसरं प्रेसिडेन्शियल डिबेट काही वेळातच सुरू होणार आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फियाच्या स्थानिक वेळेनुसार हे डिबेट मंगळवारी (10 सप्टेंबर) रात्री 9 वाजता हे डिबेट झाले.
या डिबेटमध्ये गर्भपात, स्थलांतर, अर्थव्यवस्था हे मुद्दे गाजले.
जो बायडन यांच्याऐवजी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची झाली आहे.
कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रंप यांच्यातील लढतीवर फक्त अमेरिकेचंच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. दोघांमध्ये होणारं प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणूनच अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांमधील वादविवाद.
यात दोन्ही उमेदवार आपापल्या भूमिका, मतं मांडतात. प्रतिस्पर्ध्यावर शाब्दिक हल्ला चढवतात. या डिबेटमधून दोन्ही उमेदवार राष्ट्राध्यक्षपदासाठी तेच कसे योग्य आहेत हे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात.
या डिबेटचं वैशिष्ट्यं म्हणजे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
साहजिकच या डिबेटविषयी फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभरात कुतुहल आहे.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान होणारी ही प्रेसिडेन्शियल डिबेट अमेरिकन नागरिक मोठ्या संख्येनं टीव्हीवर पाहतात.
असं मानलं जातं की, या डिबेट्सचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदानावर मोठा प्रभाव पडू शकतो.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या एक कुशल डिबेटर म्हणून ओळखल्या जातात, तर दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 आणि 2020 मधील प्रेसिडेन्शियल डिबेट दाखवून दिलं होतं की ते एक तगडे प्रतिस्पर्धी आहेत.

फोटो स्रोत, bbc

प्रेसिडेन्शियल डिबेट आणि त्याचे नियम
अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं 10 सप्टेंबरला दोन्ही उमेदवारांमध्ये प्रेसिडेन्शियल डिबेट होणार आहे. स्थानिक वेळेनुसार हे डिबेट रात्री 9 वाजता सुरू होणार आहे.
यंदाच्या म्हणजे 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील हे दुसरं प्रेसिडेन्शियल डिबेट आहे. याआधी जून महिन्यात डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात पहिलं डिबेट झालं होतं.
या डिबेटमधील खराब कामगिरीचा परिणाम बायडन यांच्या उमेदवारीवर झाला आणि ते राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर फेकले गेले. त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती.
त्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षानं बायडन यांच्या जागी कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषीत केलं. यावरून या डिबेटचं महत्त्व लक्षात येतं.
या डिबेटचं प्रसारण एबीसी चॅनलवर केलं जाणार आहे. त्याचबरोबर एबीसी न्यूज लाइव्ह, डिस्नी प्लस आणि हुलु यावर देखील या डिबेटचं प्रसारण केलं जाणार आहे.

प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये वेळेच्या मर्यादेचं अतिशय कठोरपणे पालन केलं जातं.
यात प्रत्येक उमेदवाराला मॉडरेटर किंवा सूत्रसंचालकाच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी जास्तीत जास्त दोन मिनिटांचा वेळ मिळतो. त्यानंतर प्रतिस्पर्धी उमेदवाराची मतं खोडून काढण्यासाठी देखील दोन मिनिटांचाच वेळ मिळतो.
डिबेटच्या दरम्यान जेव्हा एक उमेदवार बोलत असेल तेव्हा इतर उमेदवारांचे माइक बंद केले जातात. जिथे हे डिबेट होतं त्या खोलीत कोणताही प्रेक्षक उपस्थित नसतो.
कमला हॅरिस यांची इच्छा होती की सर्व उमेदवारांचे माइक पूर्ण वेळ सुरू राहावेत. मात्र या नियमाचं पालन करण्यासाठी काही दिवसांपूर्वी त्या राजी झाल्या.
हा नियम चार वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. त्यामागचं कारण देखील तसंच घडलं होतं. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातील डिबेटमध्ये अतिशय गोंधळ माजला होता. व्यत्यय आणि भांडणांमुळे ते डिबेट चांगल्या रितीनं पार पडलं नव्हतं.
मंगळवारी होणाऱ्या प्रेसिडेन्शिल डिबेटमध्ये दोन मध्यस्थ किंवा सूत्रसंचालक असतील. डेव्हिड मुइर आणि लिन्से डेव्हिस हे दोघे या डिबेटचं सूत्रसंचालन करतील. हे दोघेही एबीसी न्यूजवर बातमी पत्र सादर करतात.
कमला हॅरिस यांची बलस्थानं काय आहेत?
2003 पासून कमला हॅरिस निवडणुकांमधील डिबेट्समध्ये भाग घेत आहेत. त्यावेळेस त्यांनी सॅन फ्रान्सिस्को च्या जिल्हा अॅटर्नीची निवडणूक जिंकली होती.
त्या कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल आणि कॅलिफोर्नियासाठीच्या सिनेटर म्हणून निवडल्या गेल्या होत्या. त्या यशस्वी निवडणूक प्रचार मोहिमांमध्ये देखील त्यांनी डिबेटमध्ये भाग घेतला होता.
2019 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी त्यांनी जो बायडन यांच्याबरोबर डिबेट केलं होतं.
तर 2020 च्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या डिबेटमध्ये त्यांच्यासमोर माइक पेंस होते.
आतापर्यंत कमला हॅरिस यांनी दाखवून दिलं आहे की त्या व्यासपीठावर नियंत्रण ठेवू शकतात. 2020 मध्ये झालेल्या डिबेटमध्ये कमला हॅरिस बोलत असताना माईक पेंस मध्ये मध्ये बोलत होते. त्यावेळेस कमला हॅरिस यांनी माइक पेंस यांना फटकारलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, "उपराष्ट्राध्यक्ष महोदय, मी अजून बोलते आहे."
कमला हॅरिस यांना अमेरिकन सीनेट आणि त्याआधी कॅलिफोर्नियाच्या न्यायालयांमध्ये फिर्यादी वकील म्हणून वादविवाद करण्याचा दांडगा अनुभव आहे. फिर्यादी वकील विरोधी बाजूच्या कच्च्या दुव्यांना समोर आणण्याचं काम करतो.
त्यामुळे या अनुभवाचा फायदा कमला हॅरिस यांना डिबेट मध्ये होऊ शकतो.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
वादविवाद करण्याच्या किंवा आपली मतं जोरदारपणे मांडण्याच्या कौशल्याचा फायदा कमला हॅरिस यांना होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर वादविवाद करताना ट्रम्प यांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी त्यांना या कौशल्यांचा उपयोग येऊ शकतो.
असं असलं तरी, 2020 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड होण्यात कमला हॅरिस यांना अपयश आलं होतं. अमेरिकेतील आयोवा इथे झालेल्या पहिल्या डिबेटआधीच त्या स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेल्या होत्या.
त्यांच्यावर अशीही टीका करण्यात आली होती की त्या मांडत असलेल्या धोरणांमध्ये स्थैर्य किंवा सातत्य नव्हतं.
यंदाच्या निवडणुकीसाठी 10 सप्टेंबरला होणाऱ्या प्रेसिडेन्शियल डिबेट मध्ये कमला हॅरिस यांना त्यांच्या धोरणासंदर्भात सूत्रसंचालकांकडून विचारण्यात आलेल्या अवघड प्रश्नांना तोंड द्यावं लागू शकतं.
विविध सार्वजनिक कार्यक्रमांमधून असं दिसून आलं आहे की कमला हॅरिस खूप जास्त बोलतात.
अलीकडेच सीएनएन ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, "हा एक आवश्यक मुद्दा आहे, ज्यासाठी आपण एक आराखडा किंवा मॅटिक्स लागू करण्यात आला पाहिजे. यात वेळेच्या मर्यादेचं पालन करण्याचाही सहभाग आहे."
राष्ट्रध्यक्ष पदासाठीच्या डिबेट मध्ये बोलण्यासाठी असलेल्या वेळेच्या मर्यादेला खूपच गांभीर्यानं घेतलं जातं. या ठराविक वेळेतच निवडणूक प्रचारातील मुद्दे मतदारांसमोर स्पष्ट स्वरूपात मांडण्याचं आव्हान उमेदवारांसमोर असतं.
डोनाल्ड ट्रंप कुठे ठरू शकतात वरचढ
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरल्यानंतर, डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधातील 10 सप्टेंबरचं प्रेसिडेन्शियल डिबेट हे कमला हॅरिस समोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे.
डोनाल्ड ट्रंप यांनी 2016 आणि 2020 मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या प्रेसिडेन्शियल डिबेटच्या दोन सत्रांमध्ये भाग घेतलेला आहे. साहजिकच प्रेसिडेन्शियल डिबेट चा चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
ट्रंप हे लढवय्ये आहेत आणि चाकोरीपेक्षा वेगळ्या प्रकारचे प्रतिस्पर्धी असल्याचं या डिबेटमधून दिसून आलं आहे.
हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात 2016 मध्ये झालेल्या डिबेटमध्ये ते व्यासपीठावर सर्वत्र फिरत होते. तसंच हिलरी क्लिंटन बोलत असताना ते थेट त्यांच्या मागे उभे राहिले होते.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
हिलरी यांनी सांगितलं होतं की ट्रम्प यांच्या या कृतीमुळे त्या अस्वस्थ झाल्या होत्या. त्यांच्यासाठी हे गैरसोयीचं झालं होतं.
2020 मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी पहिल्या डिबेटमध्ये बायडन बोलत असताना ट्रम्प यांनी सातत्यानं त्यांना मध्ये-मध्ये टोकलं होतं. त्यांनी बायडन यांच्या बोलण्यात व्यत्यय निर्माण केला होता. त्यावर बायडन ओरडून म्हणाले होते की, "तुम्ही गप्प बसाल का?"
अशा विचित्र कृत्यांमुळे ट्रम्प यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना हैराण केलं आणि त्यांचं लक्ष स्वत:वर केंद्रित करून घेतलं.
मात्र त्याचबरोबर याची दुसरी बाजू अशी आहे की वादविवादात अनेकदा डोनाल्ड ट्रंप भरकटतात. त्यांनी केलेल्या अनेक दाव्यांना 'फॅक्ट चेकर्स'नी चुकीचं ठरवलं आहे.
निवडणुकीत कोण आहे आघाडीवर?
जुलै महिन्यात मतदारांचं सर्वेक्षण झालं होतं. त्यावेळेस राष्ट्राध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे जो बायडन पिछाडीवर तर डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर होते.
'रिअल क्लियर पॉलिटिक्स' ही राजकीय विश्लेषण करणारी संस्था आहे. या संस्थेनं राष्ट्रीय सर्वेक्षणांच्या सरासरीचं संकलन केलं आहे. त्यांच्यानुसार उमेदवारी जाहीर झाल्यापासून कमला हॅरिस यांना त्यामध्ये तीन गुण मिळाले आहेत.
यात म्हटलं आहे की 3 सप्टेंबरपर्यंत त्या राष्ट्रीय स्तरावर ट्रम्प यांच्यापेक्षा 1.9 गुणांनी आघाडीवर होत्या.
2016 मध्ये अशाच स्थितीत हिलरी क्लिंटन यांना राष्ट्रीय निवडणुकीत पाच गुणांची आघाडी मिळाली होती. मात्र तरीदेखील ट्रंप यांनी त्यांचा निवडणुकीत पराभव केला होता.
अमेरिकेत राज्यांच्या निवडणुकांना राष्ट्रीय निवडणुकीच्या तुलनेत जास्त महत्त्वाच मानलं जातं.
इलेक्टोरल कॉलेजमध्ये उमेदवारांना मिळणाऱ्या मतांची संख्या वेगवेगळ्या राज्यांमधील निवडणुकांच्या निकालावर अवलंबून असते. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार हे या इलेक्टोरल कॉलेजकडून निश्चित होतं.
(इलेक्टोरल कॉलेज म्हणजे एक प्रक्रिया असते, ज्यात राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांसाठी काही निश्चित मतदारांकडून मतदान होतं.)

फोटो स्रोत, GETTY IMAGES
अमेरिकेत अरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, उत्तर कॅरोलिना आणि पेनसिल्व्हेनिया सारखी काही राज्ये आहेत, ज्यांना 'स्विंग स्टेट' म्हणतात. म्हणजेच उमेदवारांनी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीकोनातून ही राज्ये खूपच महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर या सर्व राज्यांमध्ये चुरशीची लढत आहे.
सप्टेंबरच्या सुरुवातीला 'रिअल क्लियर पॉलिटिक्स'नं म्हटलं होतं की मिशिगन आणि जॉर्जियामधील निवडणुकीत कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकलं होतं.
तर पेनसिल्व्हेनिया मध्ये हे दोघेही बरोबरीत होते. मात्र, अरिझोना आणि उत्तर कॅरोलिना मध्ये कमला हॅरिस अजूनही पिछाडीवर होत्या.
राजकीय विश्लेषकांमध्ये याबाबत सर्वसाधारण एकमत आहे की, दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर असून ही अटीतटीची लढत आहे.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल कॉलेज मतांची आवश्यकता असते.
सद्य परिस्थितीत सर्वेक्षणां मधून असं दिसून येतं की डेमोक्रॅटिक पक्षाला 226 इलेक्टोरल कॉलेज मतांची ग्वाही देण्यात आली आहे. तर रिपब्लिकन पक्षाला 219 मतांची ग्वाही देण्यात आली आहे. तर उर्वरित 93 मतं कोणाच्याही बाजूनं जाऊ शकतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन.)











