अमेरिकेचं 'बायबल बेल्ट' काय आहे, जिथले लोक म्हणतात, 'ट्रम्पना देवानंच पाठवलंय'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सिसिलिया बारिया
- Role, बीबीसी न्यूज मंडो
- Reporting from, ओक्लाहोमाहून वार्तांकन
अमेरिकेत होऊ घातलेली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक फक्त कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प या दोन व्यक्तींपुरतीच मर्यादित राहिलेली नाही.
एकीकडे लोकशाहीचे पुरस्कर्ते आणि दुसऱ्या बाजूला कट्टर उजव्या विचारसरणीचे समर्थक असादेखील हा संघर्ष आहे.
रिपब्लिकन पक्षाचे समर्थक असलेल्या अमेरिकेतील अतिउजव्या विचारसरणीच्या कट्टरपंथीयांना ट्रम्प, अमेरिकन सरकार, अमेरिकन राज्यव्यवस्था याबद्दल काय नेमकं काय वाटतं आणि त्यांची नेमकी उद्दिष्टे काय आहेत, अमेरिकतील राजकारण कोणत्या दिशेनं चाललं आहे, याचा उहापोह करणारा हा ग्राऊंड रिपोर्ट.
एल्गिन हे अमेरिकेतील ओक्लाहोमा या दक्षिणेतील राज्यातील जवळपास 2,000 लोकसंख्येचं गाव आहे.
एल्गिनमधील ग्रेस रिफॉर्म्ड बाप्तिस्ट चर्चमधील रविवारच्या प्रार्थनेच्या काही मिनिटे आधी चेहऱ्यावर मोठं स्मित हास्य असलेले आणि व्यवस्थित, नीटनेटक्या कपड्यांमधील 36 वर्षांचे पेस्टर (पाद्री) डस्टी डीव्हर्स दिसतात.
बाप्तिस्ट चर्चशी जोडलेल्या जवळपास 100 स्थानिक रहिवाशांना (पॅरिशनर्स) पेस्टर अभिवादन करतात. अनेक मुलं असलेली ती प्रामुख्यानं श्वेतवर्णीय कुटुंब असतात.
चर्चच्या ओसरीवर काही पुस्तिका आहेत. त्यामध्ये एका निर्जिव बाळाचं चित्र आहे.
तुम्ही हा परिच्छेद वाचत असताना, त्या म्हटलेलं असतं, "अमेरिकेत तीन मुलांची त्यांच्या आईच्या पोटातच अन्यायकारकरित्या कत्तल करण्यात आली होती." त्यात गर्भपाताला आपल्या काळातील 'होलोकॉस्ट' (हिटलरच्या छळछावण्या) म्हटलेलं असतं.
अर्थव्यवस्था आणि स्थलांतराबरोबर गर्भपात हा 5 नोव्हेंबरला अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
अमेरिकेतील मतदार नव्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान करण्यासाठी सज्ज होत असताना, या पुस्तिका म्हणजे अमेरिकेतील सर्वांत पुराणमतवादी उजव्या विचारसरणीच्या प्रोटेस्टंट मतदारांमध्ये कशाप्रकारे राजकारण आणि धर्म यांची गुंफण घातली गेली आहे याचे स्पष्ट लक्षण आहे.
उन्हाळ्यातील या उष्ण दिवशी, मुसळधार पाऊस कमी होताच, सकाळी 10:45 वाजता चर्चमधील प्रार्थना सुरू होते. पांढऱ्या, प्लास्टर नसलेल्या उघड्या भिंती असलेल्या साध्या चर्चमध्ये पेस्टर गिटार वाजवत आहेत आणि पॅरिशनर्सबरोबर (चर्चशी जोडलेले स्थानिक) गात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
पेस्टर डीव्हर्स हे एल्गिनमध्ये जन्मलेले सिनेटर आहेत, त्यांना सहा अपत्यं आहेत. त्यांनी धार्मिक अभ्यास आणि मालमत्ताविषयक व्यवसायात पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे.
चर्चमध्ये पाद्री जिथून प्रवचन देतात, त्या मंचावरून ते रविवारी उपदेश देतात. मात्र, सोमवारी ते ओक्लाहोमा राज्याच्या विधीमंडळात कायदे सादर करताना दिसू शकतात.
ओक्लाहोमामध्ये ही एक सर्रास दिसणारी बाब आहे. तिथे राजकारणी स्थानिक चर्चमधील पदांवरदेखील असतात किंवा चर्चबरोबर त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध असतात.
या प्रकारचं राजकारण आणि धर्मातील दुहेरी नेतृत्व अमेरिकेतील तथाकथित 'बायबल बेल्ट'मध्ये नेहमीच दिसून येतं. एल्गिनदेखील या बायबल बेल्टमध्ये येतं.
'बायबल बेल्ट'मध्ये अमेरिकेतील धार्मिक प्रभाव असलेल्या राज्यांचा विशाल प्रदेश आहे. यामध्ये मुख्यत: किमान नऊ प्रोटेस्टंट आणि रिपब्लिकन राज्यांचा समावेश आहे.
याच राज्यांमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. (या राज्यांना फक्त जॉर्जिया या राज्याचा अपवाद होता.)
बायबल बेल्ट हा अमेरिकेतील दक्षिणेला असलेला प्रदेश आहे. या प्रदेशातील राज्ये हाच पुराणमतवादी किंवा उजव्या विचारसरणीच्या प्रोटेस्टंट नेत्यांच्या राजकीय प्रभावाच्या उदयाचा केंद्रबिंदू आहे.
या पट्ट्याच्या केंद्रस्थानी आहे ओक्लाहोमा राज्य. हे अत्यंत धार्मिक राज्य असून तिथले 80 टक्क्यांहून अधिक लोकप्रतिनिधी रिपब्लिकन पक्षाचे आहेत.
देव आणि देश हा ओक्लाहोमामधील राजकारणातील एक प्रभावशाली विचारप्रवाह आहे. कारण कट्टर किंवा पुराणमतवादी ख्रिश्चनांना असं वाटतं की त्यांच्या परंपरागत जीवनशैलीला उदारमतवादी डाव्या विचारसरणीच्या पक्षांकडून धोका आहे.
धर्म आणि राजकारणाचा संबंध
माझ्या धार्मिक श्रद्धा, भावनांचा शोध घेण्याच्या पहिल्याच प्रयत्नात डीव्हर्स मला प्रश्न विचारतात की, "तुम्हाला चर्चमधील सेवा, प्रार्थना याबद्दल काय वाटतं?"
एका प्रदीर्घ संभाषणानंतर, ते मला सांगतात की नजीकच्या काळात गर्भपात बंद करणं, पोर्नोग्राफी बंद करणं आणि प्राप्तिकर आणि मालमत्ता कराचं संकलन थांबवणं हा त्यांचा राजकीय अजेंडा आहे.
मात्र, दीर्घकाळात, डीव्हर्स यांचं उद्दिष्ट प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे. अमेरिकेला एक ख्रिश्चन राष्ट्र बनवणं, हे त्यांचं उद्दिष्टं आहे. आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, राजकीय व्यूहरचनेतील एक अत्यावश्यक बाब म्हणजे राजकारण, सत्तेत सर्वोच्च पदं मिळवणं.
मी त्यांना प्रश्न विचारला की, "तुम्हाला व्हाईट हाऊसचं रुपांतरण देवाच्या राज्यात करायचं आहे का?"
त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, "पृथ्वीवरील सर्व काही देवाचंच राज्य आहे."
"आपल्याला अमेरिकेतील सत्तेची रचना, राजकीय स्वरुप बदलावं लागेल," असं हे रिपब्लिकन सिनेटर सांगतात.

फोटो स्रोत, Reuters
डीव्हर्स आणि बायबल बेल्टमधील असंख्य पुराणमतवादी विचारसरणीच्या लोकांचा जरी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा असला तरीदेखील ट्रम्प त्यांचं पूर्ण प्रतिनिधित्व करत नाहीत असं बायबल बेल्टमधील इतर पाद्री किंवा चर्चच्या पदाधिकाऱ्यांप्रमाणे डीव्हर्स यांनाही वाटतं.
"ट्रम्प रिपब्लिकन पक्षाला डाव्या विचारसरणीकडे झुकवत आहेत," असं ते म्हणतात.
37 वर्षांच्या एरन हॉफमन यांना पाच मुली आहेत. ते डीव्हर्स बरोबर काम करतात. ओक्लाहोमातील एका नव्या बाप्तिस्ट चर्चमध्ये पाद्री होण्यासाठी ते तयार होत आहेत. त्यांना वाटतं की चर्च आणि सरकार यांच्यातील सीमारेषा अस्पष्ट करण्यात काहीच अर्थ नाही.
"ख्रिश्चन धर्माला राजकारणापासून वेगळं करण्याचा कोणताही मार्ग नाही," असं ते साश्रू नयनांनी मला सांगतात. कारण त्यांना वाटतं की "अमेरिकन लोक ख्रिस्ताला विसरले आहेत."
धार्मिक नियम
या सांस्कृतिक युद्धाचा सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो का? तर त्याचं उत्तर 'हो' असंच आहे.
निव्वळ याच वर्षी बायबल बेल्टमधील किमान तीन राज्यांमध्ये धार्मिक गोष्टींवर परिणाम करणारे राजकीय निर्णय घेतले गेले आहेत.
लुइसियाना राज्यात, शाळांमधील सर्व वर्गांमध्ये भिंतींवर टेन कमांडमेंट लावलेले असावेत, असा आदेश देण्यात आला होता.
तर अलाबामा राज्यात सर्वोच्च न्यायालयानं, गोठलेलं भ्रूण हे "बाळ" असल्याचं निकाल दिला होता. या निकालामुळे वंध्यत्वावर उपचार करून आयव्हीएफ (IVF) करणारे काही क्लिनिक तात्पुरते बंद झाले.
आणि ओक्लाहोमामध्ये रायन वॉल्टर्स हे वरिष्ठ शिक्षक अधिकारी संपूर्ण देशभरात चर्चेत आले होते.
त्यांनी जून महिन्यात राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये बायबलमधील शिकवण, विचार शिकवणं सक्तीचं करण्याचे आदेश दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता.
अमेरिकेत ज्या राज्यांमध्ये शिक्षकांचा सर्वाधिक तुटवडा आहे त्यात ओक्लाहोमा राज्यदेखील आहे. त्यामुळे रायन वॉल्टर्स यांचा हा आदेश धार्मिक स्वातंत्र्यांच्या विरुद्ध आहे, असं म्हणणाऱ्या अनेक शिक्षकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.


"आपण चर्च (धर्मसत्ता) आणि सरकार यांना वेगवेगळं ठेवलं पाहिजे," असं 44 वर्षांच्या सुसी स्टीफनसन म्हणतात. त्या प्रोटेस्टंट आहेत आणि प्राथमिक शाळेतील माजी शिक्षिका आहेत.
त्या वॉल्टर्स यांच्यावर टीका करतात. वॉल्टर्स एक ख्रिश्चन रिपब्लिकन आहेत. त्यांनी मे 2023 मध्ये ओक्लोहोमामधील शिक्षक संघटनेला 'दहशतवादी संघटना' म्हटलं होतं.
वॉल्टर्स हे निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. त्यांनी बीबीसीला मुलाखत देण्यास नकार दिला.
त्यांच्या निर्णयानं अनेक पालक अस्वस्थ झाले आहेत. एरिका राईट या त्यापैकी एक पालक आहेत. त्या ओक्लाहोमा रुरल स्कूल्स कोएलिशनच्या संस्थापक आहेत.
"बायबल सक्तीचं करण्यापेक्षा त्यांना शाळांमधील दारिद्र्याची चिंता वाटली पाहिजे."
एरिका राईट ओक्लाहोमामधील एक ख्रिश्चन आणि रिपब्लिकन आहेत. त्यांनी मला सांगितलं की, राज्यातील शाळांना निधीची कमतरता आहे आणि ग्रामीण भागातील काही मुलांना घरी सकस आहार मिळत नाही.
आपण ओक्लाहोमा सिटीच्या दक्षिणेला असणाऱ्या नोबेल शहरातून प्रवास करत असताना, आपल्याला काही लोक ट्रेलर होममध्ये (तात्पुरत्या स्वरुपाच्या आणि इतरत्र वाहतूक करता येणारी घरं) राहताना दिसतात.

फोटो स्रोत, Getty Images
"तिथे बायबल विकत घेण्यासाठी देखील पैसे नाहीत," असं त्या म्हणतात. ओक्लाहोमातील अनेकांची गरिबीत वाढ झाली असून एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के लोक गरीब आहेत. मात्र ओक्लोहोमा राज्यातीलच काही भागांमध्ये यापेक्षाही अधिक गरिबी आहे.
हा सांस्कृतिक संघर्ष सुरू असताना सॅम्युएल पेरी यांना वाटतं की शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश हा एका मोठ्या उद्दिष्टाचा भाग आहे. सॅम्युएल पेरी ओक्लाहोमा विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी राजकारण आणि धर्मावर अनेक पुस्तकं प्रकाशित केली आहेत.
त्यांना वाटतं की, हा कट्टर किंवा जहाल नेत्यांकडून चालवण्यात आलेला अजेंडा आहे. यातून ख्रिश्चन राष्ट्रवादाची मूल्यं अंमलात आणली जात आहेत.
ही एक विचारसरणी आहे, ज्यात अमेरिकन नागरी जीवन आणि पुराणमतवादी अँग्लो-प्रोटेस्टंट वांशिक-संस्कृती यांच्यातील मिश्रणाचा प्रचार केला जातो.
या विचारसरणीचा अमेरिकेवर होत असलेल्या परिणामाबद्दल बोलताना ते म्हणतात, "ख्रिश्चन राष्ट्रवादाच्या विस्तार आणि प्रसारामुळे अमेरिकेतील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे,"
'ट्रम्प यांना देवानंच पाठवलं होतं'
गरीब समुदाय किंवा वस्त्यांमध्ये छोट्या चर्चची स्थापना केल्यामुळं ख्रिश्चन पाद्री किंवा चर्चशी संबंधित लोकांचा, ख्रिश्चन धर्माचं अनुकरण करणाऱ्यांमध्ये मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यातील बऱ्याच जणांना हे रिपब्लिकन पक्षाच्या अधिक पुराणमतवादी विचारांकडे वळवतात.
आणि मागील काही वर्षांमध्ये या गटाला त्यांच्या विचारसरणी आणि प्रभावाचा विस्तार करण्यासाठी ट्रम्प हे एक सर्वोत्तम साधन बनले आहेत.
ओक्लाहोमातील पाद्री जॅक्सन लामेयर हे ट्रम्प यांचे खंदे समर्थक आहेत.
पाद्री जॅक्सन लामेयर म्हणतात, "या देशावर राज्य करण्यासाठी देवानंच ट्रम्प यांना पाठवलं होतं." ते 'पेस्टर्स फॉर ट्रम्प' या गटाचे संस्थापक आहेत.
(पेस्टर म्हणजे पाद्री किंवा चर्चमधील धार्मिक सेवा, विधी करण्याचा अधिकार असलेली व्यक्ती)
आगामी निवडणुकांमध्ये ट्रम्प यांना मदत करण्यासाठी "बायबल आणि ख्रिस्त यांना मानणाऱ्या मतदारांची मतं" ट्रम्पकडे वळवण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे.
जुलैच्या मध्यावर एका राजकीय प्रचारसभेत भाषण करत असताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले होते. लामेयर या घटनेचं वर्णन 'एक दैवी चमत्कार' असा करतात.
लामेयर ओक्लाहोमा राज्यातील टल्सा येथील माजी सिनेट उमेदवार आहेत. फोनवर बोलताना ते म्हणाले, "आमच्या देशात यादवी युद्ध होण्यापासून आम्ही फक्त एक पाऊल दूर आहोत."
ते प्रोटेस्टंट पाद्री आणि राजकीय कार्यकर्ते आहेत. मात्र, स्वत:ला ख्रिश्चन राष्ट्रवादी म्हणून घेण्यास ते नकार देतात.
"आमच्यापासून लोकशाहीला धोका आहे, असं दर्शविण्यासाठी, प्रसारमाध्यमांकडून आम्हाला देण्यात आलेलं हे एक लेबल किंवा विशेषण आहे. मात्र ते खरं नाही," असं ते म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
पाद्री पॉल ब्लेअर, ओक्लाहोमा सिटीमधील एक उपनगर असलेल्या एडमंडमधील फेअरव्यूह बाप्तिस्ट चर्चचे नेते आहेत. पॉल ब्लेअर देखील ख्रिश्चन राष्ट्रवादी अशी स्वत:ची ओळख करून देणं नाकारतात.
चर्चमध्ये माझ्याशी बोलताना ते म्हणाले की, "मी ख्रिश्चन आहे का? हो आहे. मी राष्ट्रवादी आहे का? हो आहे. मात्र त्याचा अर्थ असा होत नाही की ते मला लेबल लावू इच्छितात तसा मी ख्रिश्चन राष्ट्रवादी आहे."
"ख्रिश्चन राष्ट्रवादी असणं हे एक लांच्छन किंवा शरमेची बाब झालं आहे," असं ते म्हणतात.
पॉल ब्लेअर एक पाद्री आणि ओक्लाहोमाचे माजी सिनेट उमेदवार आहेत.
त्यांच्या डेस्कवर बसलेले असताना ते मला त्यांचे काही फोटो दाखवतात. 1980 च्या दशकाच्या शेवटी ते शिकागो बेअर्सच्या पुढच्या फळीत खेळणारे एक व्यावसायिक फुटबॉलपटू होते. त्यावेळेचे हे फोटो आहेत.
आज ब्लेअर हे लिबर्टी पेस्टर ट्रेनिंग कॅम्प्सचे प्रमुख आहेत. या प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्रोटेस्टंट नेत्यांना राजकारणात त्यांचा धार्मिक अजेंडा कसा पुढे न्यायचा हे शिकवलं जातं.
या प्रशिक्षण शिबिरांमध्ये पाद्री, सरकारवरील ख्रिश्चन प्रभाव किंवा स्वातंत्र्याचा नागरी बचाव किंवा संरक्षण यासारख्या मुद्द्यांचा अभ्यास करतात.
ते म्हणतात, "पाद्रींनी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये बायबलच्या आधारे विचार करावा यादृष्टीनं या प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे." ते अमेरिकाभर असलेल्या स्थानिक प्रोटेस्टंट गटांचा एक भाग आहेत. हे नेते स्वत:ला "देशभक्त पाद्री किंवा पेस्टर्स" म्हणवतात.
त्यांच्यातील अनेकांप्रमाणेच ब्लेअर यांना वाटतं की 1776 मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा पत्रावर सह्या करताना अमेरिकेच्या स्थापनेच्या वेळेस असलेल्या मूल्यांचाच देशानं पुन्हा स्वीकार करावा.
"ऐतिहासिकदृष्ट्या, ख्रिश्चनांनी सरकारवर नेहमीच प्रभाव टाकला आहे," असं ते म्हणतात.
ब्लेअर यांना वाटतं की 2020 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे कायदेशीर विजेते डोनाल्ड ट्रम्प हेच होते. जानेवारी 2021 मध्ये कॅपिटल हिलवरील हल्ल्यात सहभागी झाल्याबद्दल तुरुंगवास झालेले लोक "राजकीय कैदी" आहेत.
आता त्यांना आशा वाटते की 5 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील. गेल्या निवडणुकीत ट्रम्प यांना ओक्लाहोमामध्ये 65 टक्के मतं मिळाली होती. अमेरिकेतील ते सर्वोच्च बहुमतांपैकी एक होतं.
बायबल बेल्टमधील पुराणमतवादी प्रोटेस्टंट राजकीय नेत्यांना हीच आशा वाटते आहे. राजकीय शक्तीचा वापर करून त्यांच्या धारणांचा, मूल्यांचा प्रसार करणं हेच त्यांचं 'दैवी कार्य' आहे.
ट्रम्प आणि त्यांचे उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असलेले जेडी वान्स, कसेतरी त्या राजकीय लढ्याला मूर्त स्वरुप देणारे लोक बनले आहेत.
ट्रम्प आणि गर्भपात
इतर अनेक गोष्टींबरोबरच ट्रम्प यांचे पाठिराखे त्यांना एका खास गोष्टीसाठी धन्यवाद देतात.
त्यांच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायमुर्तींच्या ऐतिहासिक नियुक्तीद्वारे अनेक दशकांपासूनचं अमेरिकेच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेतील पुराणमतवाद्यांचं बहुमत राखल्याबद्दल ट्रम्प यांचे समर्थक त्यांचे आभार मानतात.
कॉन्झर्व्हेटीव्ह किंवा पुराणमतवाद्यांच्या बहुमतामुळे 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं अमेरिकेत जवळपास पन्नास वर्षांपासून गर्भपाताचा अधिकार देणारा निर्णय रद्द केला. न्यायालयानं याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक राज्याला दिला.
ओक्लाहोमा आणि अरकान्सास सारख्या बायबल बेल्टमधील राज्यांमध्ये गर्भपातावर अतिशय प्रतिंबधात्मक कायदे आहेत. या राज्यांमध्ये आईच्या जीवाला धोका असेल तेव्हाच गर्भपात तेव्हाच करता येतो.
मात्र टीकाकार म्हणतात, एखादा रुग्ण अशा अपवादात्मक परिस्थितीत होता ही बाब कायदेशीररित्या सिद्ध करणं डॉक्टर्ससाठी खूपच कठीण गोष्ट आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गर्भपात हा अमेरिकेतील यंदाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा मुद्दा बनला आहे. जवळपास रिपब्लिकन पार्टीच्या बहुतांश पुराणमतवादी शाखेला संपूर्ण अमेरिकेत गर्भपाताला पूर्ण बंदी हवी आहे.
बायबल बेल्टमध्ये ही विचारसरणी सर्वात शक्तीशाली आहे. ट्रम्प जर पुन्हा सत्तेत आले तर या प्रकारचा निर्णय अंमलात आणणं शक्य होईल असं त्यांना वाटतं.
या विचारसरणीच्या लोकांचे ट्रम्प यांच्याशी मतभेद असतानाही या उद्योगपतीनं त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात प्रसिद्ध पुराणमतवादी प्रोटेस्टंट नेत्यांसाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे खुले केले होते.
ट्रम्प अजूनही बायबल आणि ख्रिस्तावर श्रद्धा असणाऱ्या कट्टर पाद्रींबरोबर मोठ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. ट्रम्प यांच्याकडे अनेकजण नीतीमूल्यांचा विचार न करता जगणारा एक न्यूयॉर्कर म्हणून पाहतात.
कट्टर ख्रिस्ती व्हाईट हाऊसमध्ये?
राष्ट्राध्यक्षपदाच्या आपल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी, 'फेथ अँड ऑपर्च्युनिटी इनिशिएटीव्ह' या नावानं ओळखलं जाणारं नवीन सरकारी कार्यालय सुरू करण्याच्या आदेशावर सही केली होती.
"विश्वास (धार्मिक श्रद्धा) हा सरकारपेक्षा अधिक शक्तिशाली आहे आणि देवापेक्षा अधिक शक्तिशाली काहीही नसतं," असं त्यावेळेस कागदपत्रांवर सही करताना ट्रम्प म्हणाले होते.
नंतर 2020 च्या निवडणुकीत जेव्हा ट्रम्प यांचा पराभव झाला तेव्हा तथाकथित "देशभक्त पाद्री" किंवा "मागा (MAGA) (मेक अमेरिका ग्रेट अगेन) पाद्री" पुढे सरसावले होते.
त्यांनी दावा केला होता की ट्रम्प यांच्याकडून राष्टाध्यक्षपद हिस्कावून किंवा चोरण्यात आलं आहे.
अनेकजण नव्यानं स्थापन झालेल्या अतिउजव्या रीअवेकन अमेरिका टूर चळवळीत (ReAwaken America Tour movement) सहभागी झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
ओक्लाहोमाचे व्यावसायिक क्ले क्लार्क या चळवळीचे सहसंस्थापक होते.
सध्या या चळवळीकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असतं. या कार्यक्रमांना पाद्री, कट्टर अतिउजवे, बंदूकीचं समर्थन करणारे, स्थलांतरविरोधक, एलजीबीटीक्यू+ विरोधक आणि कम्युनिस्टविरोधी कार्यकर्ते आणि ट्रम्पचा समर्थक असणारा कोणीही हजेरी लावत असतात.
अनेकजण म्हणतात की ते डाव्यांविरोधात अध्यात्मिक युद्ध लढणाऱ्या देवाचे सैनिक आहेत.
यातील काही कल्पनांमध्ये प्रोजेक्ट 25 चा समावेश आहे. प्रोजेक्ट 25 म्हणजे अमेरिकन सरकार आणि अमेरिकन जीवनशैलीतील महत्त्वाच्या पैलूंमध्ये सुधारणा करण्यासाठी ट्रम्प यांच्या माजी सल्लागारांनी सादर केलेला वादग्रस्त प्रस्ताव आहे.
ट्रम्प यांनी या योजनेपासून स्वत:ला दूर ठेवलं आहे. मात्र जर रिपब्लिकन पक्ष पुन्हा सत्तेत परतला तर या उपक्रमामागे असणारे प्रभावशाली पुराणमतवादी आणि विविध धार्मिक गट त्यांचा हे उद्दिष्ट ट्रम्प यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील असं अनेकांना वाटतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











