मनू भाकर ठरली बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर, शीतल देवी इमर्जिंग प्लेयर तर मिताली राजला जीवनगौरव

नेमबाज मनू भाकरला बीबीसी स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवताना बॉक्सर मेरी कोम आणि बीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेवी.
फोटो कॅप्शन, नेमबाज मनू भाकरला बीबीसी स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवताना बॉक्सर मेरी कोम आणि बीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेवी.
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी न्यूज

ऑलिंपियन मनू भाकर ही बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर (ISWOTY)ची विजेती ठरली आहे. जगभरातील क्रीडा चाहत्यांनी केलेल्या मतदानाच्या आधारे मनू भाकरच्या नावाची घोषणा करण्यात आली.

मनू 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदकं मिळवणारी पहिली महिला क्रीडापटू ठरली होती. याच ऐतिहासिक कामगिरीसाठी मनूचा या पुरस्कारानं गौरव करण्यात आला.

विशेष म्हणजे मनू भाकरला 2021 मध्ये बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

त्याचबरोबर पॅरा-शूटिंगमधील ऐतिहासिक कामगिरीबद्दल अवनी लेखराला बीबीसी पॅरा-स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला.

पॅरालिंपिक स्पर्धेत तीन पदकं मिळवणारी ती पहिली भारतीय महिला क्रीडापटू आहे. तिनं टोकियो 2020 मध्ये सुवर्ण आणि कांस्य तर पॅरिस 2024 पॅरालिंपिकमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. त्या म्हणाल्या की, "'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर' हा स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल मी बीबीसीच्या संपूर्ण टीमचे कौतुक करते.

या उपक्रमाद्वारे गौरवण्यात आलेल्या असामान्य क्रीडापटूंनी केवळ त्यांच्या खेळात नैपुण्य दाखवलेले नाही, तर त्यांनी तरुणींनी निडरपणे स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणाही दिली आहे."

ग्राफिक्स
ग्राफिक्स

दिल्लीत झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे आयोजक आणि बीबीसीचे डायरेक्टर-जनरल टीम डेव्ही म्हणाले की, "मनू भाकरची ऑलिंपिकमधील ऐतिहासिक कामगिरी ही भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी एक निर्णायक क्षण आहे. एक तरुण उत्साही नेमबाज ते विक्रमी कामगिरी करणारी ऑलिंपियन असा असा तिचा प्रवास देशासह जगभरातील क्रीडापटुंना प्रेरणा देणारा आहे.

अवानी लेखराचा 'पॅरा-स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर' म्हणून गौरव करणं ही आमच्यासाठीही अभिमानाची बाब आहे. तिचा संघर्ष आणि विक्रमी यश यामुळं पॅरा स्पोर्ट्समध्ये सर्वसमावेशकतेचा मार्ग अधिक प्रशस्त बनला आहे."

"भारतातील प्रेक्षकांसाठी असेलेली बीबीसीची बांधिलकी ही आपल्यातील नातं आणखी खास बनवते. भारताच्या अशा अतुलनीय महिला क्रीडापटूंच्या यशाचा गौरव करताना आम्हाला अभिमान वाटतो."

बीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेवी.
फोटो कॅप्शन, बीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेवी.

बीबीसी इमर्जिंग प्लेयर अवॉर्ड 18 वर्षीय तिरंदाज शीतल देवीला प्रदान करण्यात आला आहे. भारताची सर्वांत तरुण पॅरालिंपिक पदक विजेती ठरल्याबद्दल तिला या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. अवघ्या तीन वर्षांत तिने 2024 पॅरिस पॅरालिंपिकमध्ये कांस्यपदक, 2022 आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक, तसेच वर्ल्ड पॅरा आर्चरी चॅम्पियनशिपमध्येही रौप्यपदक जिंकले आहे.

मिताली राजला बीबीसी लाईफटाईम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मिताली राज 2004 ते 2022 या काळात 18 वर्षे भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. या विक्रमी कारकिर्दीसाठी तिला हा अवॉर्ड देण्यात आला. कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात तिची कारकीर्द सर्वात मोठी ठरली.

ग्राफिक्स

फोटो स्रोत, बीबीसी मराठी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कलेक्टिव्ह न्यूजरूमने बीबीसी ISWOTY च्या पाचव्या पर्वाची निर्मिती आणि व्यवस्थापन केले आहे.

कलेक्टिव्ह न्यूजरूमच्या सीईओ रुपा झा म्हणाल्या की, "या पुरस्कारांमुळं भारतीय क्रीडा क्षेत्रातील महिलांवर होणारा सकारात्मक प्रभाव पाहून मला आनंद झाला आहे. यामुळं त्यांच्या यशाची व्याप्ती वाढत आहे, येणाऱ्या अडचणींवर मात करत त्या भावी पिढ्यांना प्रेरणा देत आहेत. हे पुरस्कार फक्त सन्मानासाठी नाहीत तर भारतातील आणि त्याही पुढं जात एकूणच क्रीडा क्षेत्रामध्ये दीर्घकालीन प्रभाव पडावा, असा यामागचा उद्देश आहे."

पुरस्कारांची या वर्षाची थिम 'चॅम्पियन्स चॅम्पियन' अशी आहे. या क्रीडापटूंना कारकीर्द घडवून पदकं मिळवण्यासाठी मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन करणाऱ्या पडद्यामागील नायकांच्या योगदानाकडं त्याद्वारे विशेष लक्ष वेधण्यात आलं.

यासंदर्भात दृष्टीहीन धावपटूंसाठी अत्यंत महत्त्वाची कामगिरी करणारे गाईड रनर्स आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांचा अभाव एका विशेष माहितीपटाद्वारे मांडण्यात आला आहे. हा माहितीपट बीबीसीच्या सहा भारतीय भाषा आणि इंग्रजी वेबसाईटच्या विविध व्यासपीठांवर उपलब्ध आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.