कोकणातील या छोट्याशा गावात 'या' मुलींनी पुरुषी मानसिकतेविरोधात कसा मारला कबड्डीचा सूर?

- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
मीनाची नजर डावीकडून उजवीकडे भिरभिरतेय, ती एका संधीच्या प्रतिक्षेत आहे, ती मिळाली आणि बस झेप घेतली!
कबड्डीचा खेळ रंगात आलाय, मीना चढाई करून पॉईंट घेण्याच्या बेतात आहे, पण तिला माहितेय की हा संघर्ष फक्त इथे...या क्षणाला एक पॉईंट मिळवण्याचा नाहीये.
कबड्डी खेळणारी 14 वर्षांची मीना नेहमीच्या मीनापेक्षा वेगळीच आहे.
तिच्या मागचा घरची कामं, पाणी भरणं, मुलीच्या जातीने कसं राहावं असल्या अनंत गोष्टींचा तगादा थोड्या काळासाठी का होईना थांबलाय.
"मला खेळताना वेगळंच वाटतं," ती आमच्याशी बोलताना लाजते.
तिला शब्द सापडत नाही, पण खेळताना तिचा वेग आणि तिची ताकद पाहून डोळे विस्फारतात.
"कुठलीच कामं नाहीत मागे, कोणता दबाव नाही, फक्त मी आणि विरोधी टीम लोक पाहात असतात, आम्ही मध्ये कबड्डी खेळत असतो. तेव्हा असं वाटतं की मी पावरफुल आहे," ती पुन्हा कॅमेरा पाहून लाजते.
कोकणातल्या खेड तालुक्यातल्या भरणे या गावापासून थोडं दूर असलेल्या एका आदिवासी पाड्यावर मीना झोरे राहते.
आसपास अशी अनेक छोटी छोटी गावं, वाड्या वस्त्या आहेत.
तिथपर्यंत रस्ता पोचताना रस्त्याचाच जीव मेटाकुटीला येतो. माणसं कशी पोचत असतील देव जाणे.
इंटरनेट सापडलं तर तुम्हाला गुलबकावलीचं फुल गवसलं समजा.
अशा वातवरणात राहाणाऱ्या, मोठ्या होणाऱ्या मुलींच्या वाटेला आयुष्य ते काय येणार?
घरकाम, लग्न, संसार आणि मुलं.

पण 15 वर्षांपूर्वी काही शिक्षकांनी या मुलींसाठी संधींची दार उघडण्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं.
"मला एकच मुलगी आहे. ती खेळायची, तंदुरुस्त आहे, शिकतेय. तिला चांगलं करियर करण्याचे पर्याय आहेत. संधी आहेत, स्वतःच्या पायावर उभं राहाण्यासाठी सपोर्ट आहे. मग हे सगळं इथल्या ग्रामीण भागातल्या गरीब मुलींना का मिळू नये असं आम्हाला वाटलं," कबड्डी प्रशिक्षक आणि शारिरीक शिक्षण विषयाचे शिक्षक दाजी राजगुरू म्हणतात.
दाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या भागातला पहिला फक्त मुलींसाठी असलेला 'अनिकेत' कबड्डी क्लब सुरू केला.
सुरुवातीला त्यांनी सगळ्यांनी स्वतःचेच पैसे टाकले. ते ज्या शाळेत शिकवतात त्याच शाळेच्या ग्राऊंडवर या मुलींना शिकवायचं ठरवलं. सुरुवातीला दोन-तीनच मुली आल्या.
"काय व्हायचं, मुलींचे पालक कबड्डीत पाठवायला तयार व्हायचे नाहीत. त्यांना भीती वाटायची. कबड्डीच्या मॅचेस रात्री होतात, त्यात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो, मग पालकांना मुलींच्या सुरक्षिततेची काळजी असायची," दाजी सांगतात.

"बरं इतकंच नाही, पालकांना वाटायचं मुलींच्या चारित्र्यावर कोणी संशय घेतला तर? पालकांना ही भीती असते की आपली मुलगी आहे, तिचं लग्न आहे, भविष्य आहे, उद्या पुढचं. मग आम्हाला त्यांना कन्व्हिन्स करावं लागायचं. खूपदा मुलींच्या घरी जायचो त्यांच्या पालकांना समजवायला," दाजी जुन्या दिवसांबद्दल सांगतात.
अजूनही त्यांना मुलींना पालकांना समजावं लागतंच. बऱ्याचदा मुलींमध्ये कौशल्य असतं, पण घरचे परवानगी देत नाहीत म्हणून त्या मागे राहातात.
आमची एक मुलगी होती. चांगली उंच होती. आम्ही त्यांना बऱ्याच वेळा कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. आम्ही तीन चार पाच वेळेस गेलो तरी ते काही पाठवायला तयार होत नव्हते. आम्हाला ती मुलगी अपेक्षित होती, यायला पाहिजे होती, दाजी किस्सा सांगतात.
"आम्ही चार पाच वेळेस कन्विन्स केल्यानंतर पण ते ऐकायला तयार नव्हते. शेवटी आम्ही स्थानिक पुढाऱ्यांना भेटलो, गावचे सरपंच असतील, पोलीस पाटील असतील. त्यांना घेऊन मुलींच्या घरी गेलो. त्यांनी त्या पालकांना समजावलं की हे शिक्षक आपलेच आहेत, मुली सुरक्षित राहतील, गावाचं नाव होईल आणि मुलींचं भवितव्य पण उज्ज्वल होईल."
एवढं करूनही ती मुलगी आधी आली पण नंतर आलीच नाही.
घरोघरी जाऊन मुलींच्या पालकांना समजावणं की तुमच्या मुली सुखरूप राहतील हे काम आजही सुरूच आहे.

ते पालकांना हाही विश्वास देतात की मुलींचं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही, त्या चुकीचं वागणार नाहीत, फक्त खेळावरच फोकस करतील याकडे शिक्षक/कोचेस जातीने लक्ष देतील.
मुलींच्या सुरक्षिततेसाठी अनेकदा हे शिक्षक मुलींना घरी घ्यायला किंवा सोडायलाही जातात.
अर्थात रोजच सगळ्या मुलींना आणणं-सोडणं शक्य होईल असं नाही.
सध्या क्लबमध्ये 25-30 मुली खेळतात आणि आतापर्यंत जवळपास 300 हून अधिक मुलींना इथे प्रशिक्षण मिळालं आहे.
मीनाचा दिवस सकाळी लवकर सुरू होतो. ती शाळेत जायच्या आधी दोन तास प्रॅक्टिस करते आणि शाळा सुटल्यावर संध्याकाळी दोन तास. सुरुवातीला तिला खेळायला येताना भीती वाटायची.
"सकाळी निघते तेव्हा काळोख वगैरे असायचा ना. आपल्याला कोण हे करेल की काय अशी भीती वाटायची. एकटी असायचे ना, घरी पण सपोर्ट नव्हता. घरचे ओरडायचे. सकाळी साडेपाचला जायची, संध्याकाळी साडेसातला यायचे. घरचे ओरडायचे की एवढ्या सकाळी जायचीस, उशीरा येतेस, मुलगी आहेस, मग भीती वाटायची."

मीनाच्या घरच्यांना अजूनही कबड्डी तितकीशी पसंत नाही. तिने अभ्यास करावा, जमली तर नोकरी करावी असंच तिच्या आईला वाटतं.
पण मीनाची स्वप्नं वेगळी आहेत.
"मला बेस्ट रेडर बनायचं आहे," ती म्हणते.
तिच्यासमोर आदर्श आहेत क्लबच्या सीनियर खेळाडू, समरीन बुरांडकर आणि सिद्धी चाळके.
या लहान मुलींच्या समरीन आणि सिद्धीताई.
या दोघी क्लबच्या पहिल्या प्रशिक्षणार्थींपैकी एक होत्या. आता त्या ठाणे महानगरपालिकेच्या संघात खेळतात.
"म्हणजे दोन तासांच्या प्रॅक्टिसचे आम्हाला पंधरा हजार मिळतात. एवढा पेमेंट आमच्या आसपास कोणाला, आमच्या घरातपण कोणाला नाहीये," समरीन म्हणते.
कबड्डीचं भूत यांच्या डोक्यावरून कधी ना कधी उतरेल असं त्यांच्या घरच्यांना वाटत होतं. पण या दोघींनी कबड्डी सोडली नाही.
एका बाजूला घरच्यांना त्यांचं कौतुकही आहे पण आता त्यांच्यामागे लग्नासाठी तगादा लागलाय.
"आमच्या कम्युनिटीत तर असं कोणी कबड्डी खेळत नाही आणि चालत पण नाही. आता घरचे पण म्हणतात लग्न कर, पण मला नाही करायचं लग्न. मला कबड्डीत करियर करायचं आहे. मला आशा आहे होईल काहीतरी (स्पोर्ट्स कोट्यातून सरकारी जॉब मिळेल)" समरीन निर्धाराने सांगते.

सिद्धी आणि समरीनची मैत्री बहरली ती कबड्डीच्याच मैदानावर. आता त्या ठाण्यात एकाच घरात राहातात आणि एकच संघाकडून खेळतात.
"मी जे आहे ते कबड्डीमुळेच," सिद्धी म्हणते.
"कबड्डीमुळे मला वेगवेगळ्या ठिकाणी जाता आलं, फिरता आलं. नाहीतर मी गावाबाहेर कधी गेले असते की नाही माहिती नाही. लग्न करून नवऱ्याच्या घरी गेले असते आणि भांडी घासत असते," सिद्धी हसत म्हणते. "ग्रामीण भागातल्या मुलींचं हेच आयुष्य असतं."

कबड्डडी खेळणाऱ्या मुलींची स्वप्नं आहेत की काहीतरी उत्तम कामगिरी करून दाखवावी म्हणजे सरकारी नोकरी मिळेल, करियर होईल आणि त्या आयुष्यभरासाठी स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. त्यांना स्वतःची काहीतरी ओळख मिळेल.
"आम्ही क्लब सुरू केला तेव्हा या मुलींना कोणी ओळख नव्हतं," या क्लबचे तरुण कोच विलास बेंद्रे म्हणतात. "त्यांना घरात काय किंवा घराबाहेर काय कायम दुय्यमच वागणूक मिळायची."

"पण ग्रामीण भागातल्या मुली जेव्हा खेळायला लागतात, तेव्हा त्यांच्यात खूप बदल होतो. त्यांच्यात आत्मविश्वास येतो. त्यांची जीवनशैली बदलते आणि जेव्हा त्या चांगली कामगिरी करतात, त्यांचं नाव पेपरात येतं, त्यांचं कौतुक होतं तेव्हा घरच्यांचाही त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो," विलास पुढे म्हणतात.
या क्लबच्या मुली भले अजून देश पातळीवर पोचल्या नसल्या तरी महाराष्ट्र राज्याच्या टीमपर्यंत पोचल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या टीममध्ये तर आहेतच. आणि अनेक मुली वेगवेगळ्या विद्यापिठांच्या टीममध्ये सिलेक्ट झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना उच्च शिक्षणाची दारंही खुली झालीत.
मुलींकडे बघण्याची समाजाचीही नजर बदलली आहे. आता मीना जेव्हा सकाळी जॉगिंगला जाते, किंवा तिच्या व्यायाम करते तेव्हा कोणाच्या भुवया उंचावत नाहीत.
या क्लबसाठी शिक्षक अजूनही स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करतात. या मुली जेव्हा स्पर्धा जिंकतात तेव्हा त्यात मिळणारी रोख बक्षीसाची रक्कमही मुलींना क्लबमध्ये चांगल्या सुविधा देण्यासाठी वापरली जाते. कधीमधी देणग्याही मिळतात.

यातल्या बहुतांश मुली गरीब घरांमधून येतात.
कोचेस आपले पैसे खर्च करून मुलींना चांगलं डायट देतात, त्यांच्यासाठी समर कँपचं आयोजन करतात, आणि एखाद्या खेळाडून दुखापत झाली तर तिच्या औषधांचाही खर्च करतात.
आता पालकांचाही विरोध कमी झालाय. पण तरीही अनेकदा या शिक्षकांच्या हेतूवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जातं.
दाजी एक किस्सा सांगतात.
"एकदा काय झालं की एकाने वर्गात पत्र टाकलं, निनावी. हे मुलींचंच कोचिंग करतात, मुलींच्याच बरोबर असतात हे कसंकाय? त्यावेळेस आमच्या संस्थाचालकांनी ते पत्र पाहिलं आणि निनावी असल्याने फाड़ून टाकलं. अशा अनेक घटना घडतात की समाजाकडूनही आम्हाला अप्रत्यक्षरित्या ऐकायला येतं की मग मुलांच्या का टीम करत नाहीत. मुलींच्याच का करता? असे अनुभव येतात."
पण आम्ही फक्त या मुलींचे कोच नाही आहेत, विलास म्हणतात. "आम्ही त्यांचे शिक्षक आहोत, कधी कधी आम्हाला त्यांचे पालक व्हावं लागतं, त्यांना योग्य मार्ग दाखवावा लागतो, त्यांना शिस्त लावावी लागते, त्यांनी योग्य मार्ग निवडावा यासाठी दिशा दाखवावी लागते."
आपल्यावर किती मेहनत घेतली जातेय याची मीनाला कल्पना आहे. त्यामुळेच तिला या संधीचं सोनं करायचं आहे.
"मला बेस्ट रेडर व्हायचं आहे. माझं स्वप्न आहे इंडिया कॅप्टन," ती म्हणते.
एका खेड्यातल्या मुलीचं सरधोपट आयुष्य मागे सोडून मेडल्स आणि विजेतेपदाची स्वप्नं बघण्याची ती हिंमत करतेय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)









