सचिन तेंडुलकर, झहीर खान यांच्या ट्वीटमुळे व्हायरल झालेल्या सुशीलाची खरी कहाणी

फोटो स्रोत, Anshul Verma/BBC
- Author, अनघा पाठक, मोहर सिंह मीणा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, राजस्थान
छोटासा डांबरी रस्ता संपतो आणि धुळीने भरलेला कच्चा रस्ता सुरू होतो. तिथून थोडं पुढे गेलं की लागते सुशीला मीणाची शाळा. सरकारी प्राथमिक विद्यालय, रामेरतालाब.
डांबरी रस्ताही नुकताच दुरुस्त केलेला दिसतो, कच्च्या रस्त्यावर झाडझूड केलेली दिसते. इथून येणाऱ्या-जाणाऱ्या मोठमोठ्या गाड्यांना शक्य तेवढी कमी अडचण व्हावी म्हणून ही तजवीज.
या बारक्या रस्त्याने एवढ्या गाड्या उभ्या आयुष्यात पाहिल्या नसतील.
रस्त्यात उभे असणारे लोक आमच्या गाडीकडे बघून काहीतरी समजल्यासारखी मान हलवतात. जणू काही म्हणतात, 'हो, हो बरोबर!'
पत्ता विचारायला थांबलो तर काही बोलायच्या आत एकजण समोर बोट दाखवत म्हणतो, "सुशीला मीणाच्या घरी जायचं आहे ना? आजकाल सगळ्यांनाच तिच्याकडे जायचं असतं."
शाळेपासून थोडं पुढे गेलं की सुशीलाचं घर येतं. राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात राहाणारी ही मुलगी सध्या चर्चेत आहेत. तिचा बॉलिंग करतानाचा एक व्हीडीओ व्हायरल झालाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही तो शेअर केलाय त्याच्या X अकाऊंटवर.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
सचिनने म्हटलं की, 'सुशीला मीणामध्ये झहीर खानच्या बॉलिंगची झलक दिसते.'
झहीरनेही यावर उत्तर देताना म्हटलं की 'अगदी बरोबर आहे.'
हा व्हीडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे पण गंमत म्हणजे सुशीलाला सचिन तेंडुलकर कोण आहे ते आतापर्यंत माहितीच नव्हतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
"मला नव्हतं माहिती सचिन तेंडुलकर यांच्याविषयी. मी आता त्यांच्याविषयी ऐकतेय, पण त्यांचा फोटो तुम्ही दाखवलात तर मी ओळखू शकणार नाही. मी कधीच क्रिकेट पाहिलं नाही, आमच्या घरात टीव्ही नाहीये," ती म्हणते.
पण तरीही ती सचिनबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.
"सचिन सरांमुळे आता मला खूप लोक भेटायला येत आहेत, खूप साऱ्या भेटवस्तू मिळत आहेत. मला छान वाटतंय. मी सचिन सरांचे आभार मानते," ती पुढे म्हणते.
तिचं जग आता बदललंय. सतत सत्कार, कोणी ना कोणी गळ्यात हार घालतंय, गटागटाने लोक येऊन तिच्यासोबत फोटो काढून घेताहेत. अशा गोष्टी तिच्यासाठी विकत घेऊन येत आहेत ज्यांची तिने कधी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती.

फोटो स्रोत, Anshul Verma/BBC
शाळेत अनवाणी जाणाऱ्या या मुलीला आता पाच-सहा बुटांचे जोड मिळालेत.
तिच्या अवतीभोवती लोकांचा गराडा असतो, तेव्हा तिला बोलायला काही सुचत नाही. हो, नाही.. छान अशा एकेका शब्दात ती उत्तर देते. तिच्या या ताज्या प्रसिद्धीचं काय करावं तिलाही समजत नाही.
तिच्या सोबत मोठमोठे राजकीय नेते, सरकारी अधिकारी, स्थानिक कार्यकर्त्यांचा गराडा असतो. सगळ्यांना तिच्या प्रसिद्धीच्या चांदण्यात स्वतःलाही चमकवून घ्यायचं आहे. सगळे फोटो काढून घेत असतात तेव्हा ती फारशी बोलत नाही, क्वचित वेळा कॅमेऱ्याकडे बघते. गळ्यातले हार सांभाळताना अवघडून जाते.

फोटो स्रोत, Anshul Verma/BBC
पण एकदा का भेट म्हणून दिलेला ट्रॅकसूट काढून ठेवून आपला रोजचा शाळेचा युनिफॉर्म घातला, आणि तिच्या आवडत्या ग्राऊंडवर आली की वेगळीच सुशीला दिसते. चपळ, जिद्दी आणि ध्येयाने पछाडलेली.
"माझ्या हातात बॉल असला की मी एकच विचार करते, बॅटिंग करणाऱ्याला कसं आऊट करायचं," ती हलकंस हसत सांगते.
शांतीबाई मीणा सुशीलाच्या आई आहेत. त्यांना आपल्या मुलीचा खूपच अभिमान आहे.
"मी तिला क्रिकेट खेळण्यापासून कधीच थांबवणार नाही," त्या सांगतात.
शांतीबाईंचा फोन सतत वाजतोय. लोक त्यांचं अभिनंदन करायला फोन करत आहेत. दिवसागणिक लोकांचा राबता वाढत चाललाय. पण चेहऱ्यावर हास्य ठेवून त्या आल्यागेल्याचं सगळं करतात.
सुशीलाचे आईवडील रोजंदारी मजूर म्हणून काम करतात. तिचे वडील अहमदाबादला असतात. मुलीचा व्हीडिओ व्हायरल झाला म्हणून सध्या घरी थांबलेत.
सुशीलाचं घर म्हणजे एक बांबू आणि कुडाची झोपडी. त्यात काही फारसं सामानही नाही. चूल मांडून त्यावर सतत चहाचं आधण ठेवलेलं असतं. शांतीबाई एकीकडे चहा गाळत, दुसरीकडे फोनवर बोलत तिसरीकडे आम्हाला उत्तरं देत असतात.
सुशीलाचा मोठा भाऊ सतत आलेल्या पाहुण्यांना चहा द्यायला धावपळ करत असतो.
एखाद्या लग्नासारखा हा सगळा सीन भासतो.

फोटो स्रोत, Anshul Verma/BBC
"चहासाखर संपली तरी मलाच बघावं लागेल कुठून आणायचं ते. एवढे लोक येतात म्हणजे त्याचं करावं लागेलच. आणि लोक येतात ती चांगलीच गोष्ट आहे की. नाहीतर एरवी मयताला कोणी जात नाही. बसल्या जागेवरून लोक उठत नाहीत," शांतीबाई उत्तरतात.
त्यांना आलेल्या फोनवर दोन शब्द बोलतात, फोन ठेवतात आणि माझ्याकडे बघून म्हणतात, "सगळीकडून फोन येत आहेत. जुनागड, दिल्ली, जयपूर, बाडमेर, भरतपूर."
पण प्रत्येकजण सुशीलाचं कौतुक करतोय असं नाही. "काही जण म्हणतात, पोरीला – सुशीलाला – कशाला क्रिकेट खेळू देतेस? ती घरकाम सोडून ग्राऊंडवर काय करतेय? मला म्हणतात, पोरीचा व्हीडिओ व्हायरल केलास मग तिला घरकाम शिकवलं नाहीस का?"
शांतीबाई एक मिनिटभर थांबतात. मग ताडकन उत्तर देतात, "अशांचं मी ऐकतच नाही. मी काही बोलत नाही. आपण काही बोलायचं नाही, काही ऐकायचं नाही. बोलून बोलून त्यांचंच तोंड दुखेल मग आपोआप गप्प बसतील."
रामेरतालाबच्या या शाळेत सगळेच क्रिकेट खेळतात. मुलं आणि मुलीही. याचं कारण म्हणजे इथले शिक्षक ईश्वरलाल मीणा.
ते म्हणतात, "मी 2017 साली जॉईन केलं, तेव्हापासून मुलांना क्रिकेट खेळायला प्रोत्साहन देतोय. सुरूवातीला याची प्रेरणा एकच होती ती म्हणजे मुलांना शाळेत यायला कारण द्यावं. त्यांना शाळेत इंटरेस्ट यावा. नाहीतर इथली मुलं शाळेत कंटाळतात, त्यांना घरी राहायला, जंगलात फिरायला, गुरांच्या मागे जायला आवडतं."
मग ईश्वरलाल आणि इतर शिक्षक मुलांच्या टीम बनवायचे आणि एकमेकांच्याविरोधात खेळायला लावायचे.
जेव्हा ईश्वरलाल यांच्या लक्षात आलं की आपल्या काही मुलांमध्ये खरंच टॅलेंट आहे, ती पुढे जाऊ शकतात मग त्यांनी मुला-मुलींना क्रिकेटची वेगवेगळी टेक्निक शिकवायला सुरूवात केली.

फोटो स्रोत, Anshul Verma/BBC
ईश्वरलाल यांनीही क्रिकेटचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. तेही इंटरनेटवर पाहून पाहूनच क्रिकेट शिकलेत.
ते युट्यूबवर व्हीडिओ पाहातात, स्वतः प्रॅक्टिस करतात आणि मग क्रिकेटच्या तांत्रिक बाजू मुलांना शिकवतात.
मुलं चांगलं खेळायला लागल्यानंतर ईश्वरलाल यांनी मुलांचे व्हीडिओ बनवायला सुरूवात केली. त्यासाठी त्यांनी महागडा फोनही विकत घेतला. आता त्यांनी या मुला-मुलींचे व्हीडिओ टाकायला खास इंस्टाग्राम अकाऊंट काढलं आहे.
"मी सोशल मीडियासाठी शुटिंग आणि एडिटिंग शिकलो. लोक आमच्या व्हीडिओवर कमेंट करतात तेव्हाही मला बरंच शिकायला मिळतं. उदाहरणार्थ मला आधी माहीत नव्हतं की ग्रिप काय असते, मग कोणीतरी बॅटिंग ग्रिपबद्दल कमेंट केली. मग मी ते सर्च केलं आणि त्याबद्दल शिकलो."
अर्थात या लहानशा गावात सगळंच छानछान चालूये असंही नाही.
"आमचे 95 टक्के विद्यार्थी शाळेत अनवाणी येतात. बहुतांश मुलांचे पालक मजूर म्हणून इतर शहरांत काम करतात. त्यांनी आता जे स्वेटर घातलेत ना, तेही त्यांना कोणीतरी काल दान केलेत. आधीच्या वर्षी तर ते थंडीतच कुडकुडत होते," ईश्वरलाल उसास सोडतात.
अर्थात या शाळेतून कोणत्या मुलीचा व्हीडिओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये.
याआधीही मागच्या वर्षी रेणुका पारगी नावाच्या मुलीचा बॅटिंग करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.

फोटो स्रोत, Ishwarlal Meena
आता ती जयपूरच्या एका प्रायव्हेट क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण घेतेय. तिचा सगळा खर्च अकॅडमीने उचलला आहे. पण त्याखेरीज इथे काहीच बदलल नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
"लोक येतात, मोठमोठी आश्वासनं देतात पण काही बदलत नाही," ईश्वरलाल खिन्नतेने म्हणतात.
"तुम्ही आलात तेव्हा इथला रस्ता पाहिलात. आमच्या शाळेचे काही वर्ग धोकादायक झालेत, काही सळया वर आल्यात जमिनीच्या. आम्ही ते बंद करून ठेवलेत. या शाळेतही पाचवीपर्यंत वर्ग आहेत. मग एकदा मुलांची शाळा सुटली की त्यांच्यात कितीही टॅलेंट असलं, त्यांचं क्रिकेट संपतं. कारण त्यांना पुढे काही संधीच मिळत नाहीत."
यावेळीही अनेक आश्वासनं दिली गेलीत. सुशीलाचं घर भेटवस्तूंनी भरून गेलंय. प्रत्येकजण तिला बॅट देतोय, पण तिला, एका बॉलरला, कोणी बॉल गिफ्ट म्हणून दिल्याचं आम्हाला दिसलं नाही. तिने आजतागायत क्वॉर्क बॉलने बॉलिंग केलेली नाही.

फोटो स्रोत, Ishwarlal Meena
कदाचित बॉल ही मोठी भेटवस्तू नाही, फोटोत तरी काहीतरी फार मोठं दिलं असं दिसणार नाही म्हणून कोणी देत नसावं.
प्रतापगडच्या जिल्हा प्रशासनाने म्हटलंय की, गावासाठी आणि इथल्या शाळकरी मुलांसाठी काय करता येईल त्याचा आम्ही आढावा घेत आहोत. इथल्या वनविभागानेही माणूस पाठवून सर्व्हे करायला सुरूवात केलीय की शाळेला लागून असलेली वनविभागाची जमीन शाळेला ग्राऊंडसाठी देता येईल का?
एकदा इथे येणारे लोक यायचे बंद झाले, दुसरा कोणता व्हीडिओ व्हायरल झाला की सुशीला आणि तिच्यासारख्या अनेकांसाठी पुढे काय वाट पाहातंय हा खरा प्रश्न आहे.
पण यावेळी गावकऱ्यांना आशा आहे की सुशीलाचं नशीब गावाचंही भाग्य बदलेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











