भारताच्या बुद्धिबळपटू कोनेरू हंपी दुसऱ्यांदा 'वर्ल्ड रॅपिड चेस' चॅम्पियन, ISWOTY च्याही ठरलेल्या विजेत्या

फोटो स्रोत, Getty Images
भारताच्या बुद्धिबळपटू कोनेरू हंपी यांनी दुसऱ्यांदा वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपचं पदक जिंकलं आहे. त्यांनी इंडोनेशियाच्या इरिन सुकंदर यांना पराभूत केलं.
कोनेरू हंपी यांचा हा विजय ऐतिहासिक आहे. त्यांनी यापूर्वी 2019 साली जॉर्जियात हीच स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे आता कोनेरू हंपी यांनी चीनच्या जु वेन्जुन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच भारताच्या डी. गुकेश यानं सिंगापूरमध्ये चीनच्या डिंग लिरेन याला पराभूत करत वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. त्यानंतर आता कोनेरू हंपी यांच्या विजयानं भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बीबीसीतर्फे दिला जाणारा इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर या पुरस्कारानेही 2021 साली बुद्धिबळ खेळाडू कोनेरू हंपी यांना गौरवण्यात आलं होतं. प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारावर बीबीसीचा हा पुरस्कार जाहीर झाला होता.
नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या पुरस्कार सोहळ्यात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.
कोनेरू हंपी यांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देणारा व्हीडिओही बीबीसीनं केला होता. तो व्हीडिओ तुम्ही इथे पाहू शकता.

कोनेरू हंपी आता दोनदा जागतिक रॅपिड चेस स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या आहेत. तसंच, केर्न्स कपही त्यांच्या नावावर आहे.
बीबीसीतर्फे दिला जाणारा ISWOTY हा पुरस्कार जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या होत्या की, " हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे तर भारतीय बुद्धिबळ विश्वासाठी मोलाचा आहे. बुद्धिबळ हा क्रिकेटसारखा मैदानी खेळ नाही. मात्र या पुरस्कारामुळे जगाचं लक्ष बुद्धिबळाकडे वेधलं जाईल असा मला विश्वास आहे."

फोटो स्रोत, Getty Images
त्या पुढे म्हणाल्या होत्या, "आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर मी अनेक स्पर्धा जिंकल्या. महिला खेळाडूंनी खेळाची साथ सोडू नये. लग्न आणि मातृत्व हा आयुष्याचा भाग आहे. त्यामुळे आयुष्याची दिशा बदलायला नको."
हंपी यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. बुद्धिबळमधलं त्यांचं प्राविण्य त्यांच्या वडिलांनी लहानपणीच ओळखलं होतं. 2002 साली वयाच्या पंधराव्या वर्षी सर्वांत तरूण ग्रँडमास्टर हा खिताब मिळवून त्यांनी हे सिद्ध केलं होतं. चीनच्या होऊ युफान यांनी हा विक्रम 2008 मध्ये मोडला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











