'भारत बुद्धिबळात पहिल्या नंबरवर जाऊ शकतो', ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांची BBC मराठीला मुलाखत

भारत बुद्धिबळात पहिल्या नंबरवर जाऊ शकतो, प्रवीण ठिपसे यांनी सांगितलं सूत्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, विजय तावडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

नुकत्याच झालेल्या 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतानं खुल्या आणि महिला अशा दोन्ही विभागात सुवर्णपदकं जिंकली आहेत. मागील काही वर्षांपासून भारतीय खेळाडू चांगलं यश मिळवत आहेत. भारताचे बुद्धिबळपटू विविध स्पर्धांमधून ठसा उमटवत आहेत.

भारताच्या पुरुष आणि महिला बुद्धिबळ संघांचं यश, हा भारतीय बुद्धिबळासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे.

त्यानिमित्तानं बीबीसीशी बोलताना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बुद्धिबळपटू आणि भारताचे पहिले ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे यांनी भारतीय बुद्धिबळपटूंविषयी आणि भारतातील बुद्धिबळाची स्थिती यावर रोखठोक मतं व्यक्त केली.

ते म्हणाले, "भारतानं बुद्धिबळाच्या खेळात मोठा पल्ला गाठला आहे. एकाचवेळी महिला आणि पुरुष संघांनी सुवर्णपदक पटकावणं हा बुद्धिबळ क्षेत्रासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. बुद्धिबळ खेळासंदर्भात भारतानं टप्प्या टप्प्यानं प्रगती केली आहे.

"विशेषतः 2022 मध्ये 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचं आयोजन भारतानं केलं होतं. त्यानंतर देशातील खेळाडूंची कामगिरी आणि दर्जा अतिशय उंचावला आहे."

गुकेश, दिव्या देशमुख आणि वंतिका यांच्याबद्दल बोलताना प्रवीण ठिपसे म्हणाले की, "गुकेश हा आगामी काळात भारताचा नवा जगज्जेता असणार आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी वर्ल्ड चॅम्पियनशिप तो जिंकेल याबद्दल कोणतीही शंका नाही.

"दिव्या देशमुख किंवा वंतिका या अत्यंत गुणी बुद्धिबळपटू आहेत. त्यांनी जगज्जेतेपदावर लक्ष ठेवत अधिक प्रयत्न केले पाहिजेत. दिव्या देशमुख ही भारताची महिला बुद्धिबळ जगज्जेती बनू शकते."

ग्राफिक्स
ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते पुढे म्हणाले, "अर्थात महिला खेळाडूंच्या बाबतीत आपण अधिक प्रयत्न करून नवीन खेळाडू तयार केले पाहिजेत. तेच तेच खेळाडू संघात असणं ही चांगली बाब नाही.

"कार्लसनसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंनी देखील भारताच्या युवा खेळाडूंची क्षमता ओळखून त्यांचं कौतुक केलं आहे."

"बुद्धिबळाच्या बाबतीत आपण प्रचंड मोठा पल्ला गाठला आहे, जागतिक पातळीवर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे, यात शंकाच नाही. प्रशिक्षण आणि इतर सुविधांच्या बाबतीत आपण जर नियोजनपूर्वक अधिक प्रयत्न केलेत तर या खेळात भारत नंबर देखील होऊ शकतो."

बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांची सविस्तर मुलाखत तुम्हाला इथे वाचता येईल :

प्रश्न - भारतानं 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या आणि महिला अशा दोन्ही विभागात सुवर्णपदकं जिंकली आहेत. या यशाचं भारतातील बुद्धिबळाच्या दृष्टीकोनातून असलेलं महत्त्व काय?

प्रवीण ठिपसे - हे आपलं स्वप्नंच होतं. साधारण चार, पाच किंवा सहा दशकांआधी जेव्हा भारतीय बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळत असत, त्यावेळी ऑलिम्पियाडमध्ये पदक मिळवता येईल असं स्वप्न पाहणं देखील त्यावेळी शक्य नव्हतं.

भारत बुद्धिबळात पहिल्या नंबरवर जाऊ शकतो, प्रवीण ठिपसे यांनी सांगितलं सूत्र

फोटो स्रोत, Getty Images

त्यावेळेस भारतीय बुद्धिबळपटूंना वाटायचं की आपल्याला ऑलिम्पियाडमध्ये पदक पटकावता येईल का? अशा पार्श्वभूमीवर पाच-सहा दशकांनी भारतीय बुद्धिबळ विश्वाचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

अर्थात यामागे या खेळात भारतानं टप्प्याटप्प्यानं केलेली सुधारणा कारणीभूत आहे. बुद्धिबळपटू, केंद्र सरकार आणि बुद्धिबळ संघटनेचे सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध प्रयत्न यामागे आहेत.

प्रश्न - गुकेश डोम्माराजूकडे सर्वजण मोठ्या अपेक्षेनं पाहत आहेत. नोव्हेंबर महिन्यात तो वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळणार आहे. ऑलिम्पियाडमधील विजयाचा, कामगिरीचा गुकेश त्या स्पर्धेत किती फायदा होईल? तिथे त्याच्याकडून कशा खेळाची अपेक्षा आहे?

प्रवीण ठिपसे - गुकेशला त्याच्या क्षमतेची पूर्ण कल्पना आहे. डिंग लिरेन या सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियनदेखील स्वत:च सांगितलं आहे की, माझा खेळ हा काही गुकेशच्या तोडीचा नाही. माझ्या विरुद्धच्या सामन्यात गुकेशच जिंकण्याची शक्यता आहे. त्यानं ही गोष्ट मोकळेपणानं मान्य केली आहे.

माझ्या मते वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्यात गुकेशला फारशी अडचण येऊ नये. चौदा सामन्यांच्या स्पर्धेत दहाव्या किंवा अकराव्या सामन्यात जगज्जेतेपदाचा निर्णय होईल. गुकेश कमीत कमी चार सामने जिंकेल तर डिंक लिरेन एकही सामना जिंकू शकणार नाही.

दहाव्या किंवा अकराव्या डावाला हा सामना संपेल. कारण ज्याला साडेसात गुण मिळतील तो जिंकेल. त्यामुळे हा सामना अगदी एकतर्फी होण्याचीच शक्यता आहे.

ऑलिम्पियाड मधील कामगिरीमुळे गुकेशचं मनोधैर्य नक्कीच उंचावणार आहे. या स्पर्धेत अचानक नवीन प्रकारचा डाव समोर आल्यावर किंवा नव्या चालींना उत्तर देण्याची क्षमता गुकेशनं दाखवून दिली. अनपेक्षित स्थिती देखील त्यानं त्याची क्षमता सिद्ध केली.

गुकेशला त्याच्या क्षमतेची पूर्ण जाणीव आहे.

प्रश्न - पुरुष संघातील इतर खेळाडू, विदित गुजराती, अर्जुन इरिगासी, आर प्रज्ञानंद आणि पंतला हरिकृष्ण यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं?

प्रवीण ठिपसे - या स्पर्धेतील अर्ध्याहून अधिक गुण गुकेश आणि अर्जुन या दोन खेळाडूंनीच मिळवले आहेत. परंतु इतर खेळाडू देखील खूप उत्तम खेळले.

भविष्यात चांगली कामगिरी करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. संघातील न खेळणारे खेळाडू देखील खेळणाऱ्या खेळाडूंच्या मदतीला धावून येत होते. संघभावनेनं सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.

भारत बुद्धिबळात पहिल्या नंबरवर जाऊ शकतो, प्रवीण ठिपसे यांनी सांगितलं सूत्र

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न - महिला संघाच्या खेळाडूंची कामगिरी कशी झाली आणि आगामी काळात त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवता येईल?

प्रवीण ठिपसे - महिला संघानं उत्तम कामगिरी केली. 2022 मध्ये देखील महिला संघ पहिल्या रेटिंगवर होता. त्यावेळेस फक्त वैशाली ही एकच खेळाडूच्या तिशीच्या आतली होती. बाकीच्या इतर खेळाडू तिशीच्या वरच्या वयोगटातील होत्या.

त्यावेळेस आपल्याला दुसरा आणि तिसरा संघ खेळवण्याची संधी मिळाली. त्यावेळेस दिव्या देशमुख आणि वंतिका अग्रवाल दुसऱ्या संघात होत्या. त्यांना या गोष्टीची जाणीव झाली होती की पुढील वेळेस जर आपल्याला संघात स्थान मिळवायचं असेल तर सध्याच्या 'अ' संघातील खेळाडूंपेक्षा उजवी कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.

भारत बुद्धिबळात पहिल्या नंबरवर जाऊ शकतो, प्रवीण ठिपसे यांनी सांगितलं सूत्र

फोटो स्रोत, ani

त्या दृष्टीनं या दोघींनी खूप प्रयत्न केले. सध्याच्या महिला संघातील पाच खेळाडूंपैकी तीन खेळाडू पंचवीस वर्षांखालील होत्या. दोन वर्षांपूर्वी चार खेळाडू तिशीच्या वरील होत्या. ही खूप मोठी सुधारणा आहे.

या पंचविशीच्या आतील मुलींनी कमाल करून दाखवली. हा एक खूप सकारात्मक बदल आहे. कारण एकच संघ वर्षानुवर्षे तुमच्यासाठी खेळतो ही काही चांगली गोष्ट नाही. नव्या खेळाडूंनी पुढे आलं पाहिजे.

ही परिस्थिती मागील दोन वर्षात बदलली. आपल्याकडे ऑलिम्पियाडचं आयोजन केल्यामुळे ही परिस्थिती बदलण्यास सुरूवात झाली.

प्रश्न - दिव्या देशमुखच्या क्षमतेबद्दल काय वाटतं? भविष्यात तिच्याकडून काय अपेक्षा ठेवता येतील?

प्रवीण ठिपसे - वयाच्या 17 व्या वर्षी तिनं केलेली कामगिरी खूपच असामान्य आणि कौतुकास्पद आहे. मागील काही काळात तिची कामगिरी आणि दर्जा उंचावत गेला आहे.

मात्र पुढील तीन किंवा चार वर्षात मी जगज्जेती होणार हे जोपर्यंत ती ठरवून खेळत नाही, तोपर्यंत ती कुठेतरी स्वत:ला ती कमी लेखते आहे, असंच म्हणावं लागेल.

दिव्या देशमुख

फोटो स्रोत, @DivyaDeshmukh05

फोटो कॅप्शन, दिव्या देशमुख

वंतिकाच्या बाबतीत देखील मीच हेच सांगेन. मात्र आजमितीला मला दिव्या देशमुख जगज्जेती होण्याची शक्यता अधिक वाटते.

महिला वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी दिव्या देशमुख ही सर्वात योग्य खेळाडू आहे.

प्रश्न - जागतिक पातळीवर भारतीय बुद्धिबळपटूंचा दबदबा कसा वाढत गेला आहे? गेल्या काही दशकांमध्ये हा बदल कसा घडला आहे?

प्रवीण ठिपसे - बुद्धिबळात भारतानं मोठा पल्ला गाठला आहे. अर्थात ही प्रगती काही दशकांमध्ये टप्प्या-टप्प्यानं होत गेली आहे.

1956 सालचं मॉस्कोमधील ऑलिम्पियाड जर पाहिलं तर तेव्हा भारतीय खेळाडू स्वत:चे पैसे खर्च करून तिथे गेले होते. त्यावेळेस ते रेल्वेने भारतातून पाकिस्तानात आणि तिथून अफगाणिस्तानात गेले होते.

अफगाणिस्तानातून ते ताश्कंद गेले होते आणि तिथून पुढे विमानानं मॉस्कोला जावं लागलं होतं. ऑलिम्पियाड स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत पोहोचणं हेच एक मोठं दिव्य होतं.

भारत बुद्धिबळात पहिल्या नंबरवर जाऊ शकतो, प्रवीण ठिपसे यांनी सांगितलं सूत्र

फोटो स्रोत, ani

त्यानंतर साधारण 1964 सालापासून भारतानं जागतिक स्तरावर बुद्धिबळ खेळणं थांबवलं होतं. कारण 1978 पर्यंत आपण ऑलिम्पियाड खेळतच नव्हतो. 1978 मध्ये ऑलिम्पियाडमध्ये फक्त महिला बुद्धिबळपटूंचा संघच जाऊ शकला होता.

त्याकाळात खेळ विभागाला मिळणारी आर्थिक मदत फारच कमी असायची. त्यामुळे खेळाडूंना फारच मर्यादित परदेश दौरे करता यायचे.

सत्तरच्या दशकात जेव्हा आम्ही खेळायला लागलो तेव्हा इराण, फिलिपाईन्स हे आशियाई देश खूपच पुढे होते. त्यामानानं भारताचं या खेळात तेवढं स्थान नव्हतं. कारण साठच्या दशकात आपण जे थोडंसं कमी खेळलो त्याचा परिणाम आपल्या खेळाडूंचा दर्जा मागे राहण्यात झाला होता.

ज्यावेळी मला एशियन ज्युनियर स्पर्धेत कांस्य पदक मिळालं तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की आशियाई स्तरावर पदक मिळवणारे तुम्ही पहिलेच भारतीय बुद्धिबळपटू आहात. त्यावेळेस मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं होतं.

त्यानंतर आपल्याकडे एशियन टीम चॅम्पियनशिपला भारत सरकारनं निधी उपलब्ध करून दिला होता. त्यावेळेस सुवर्णपदक चीनच्या संघाला मिळालं होतं. मात्र वैयक्तिक खेळासाठीचं सुवर्णपदक मला मिळालं होतं. अशाप्रकारे भारताला वैयक्तिक पातळीवर पदकं मिळत होती.

त्यानंतर 1985 मध्ये कॉमनवेल्थ मध्ये सुवर्णपदक मिळालं होतं. 1987 मध्ये विश्वनाथन आनंद वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन झाला तेव्हा जागतिक स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवणारा तो पहिला आशियाई खेळाडू ठरला होता. त्यापूर्वी आशियाच्या कोणत्याही खेळाडूला जागतिक विजेतेपद मिळालं नव्हतं.

2006 मध्ये बुद्धिबळाच्या दृष्टीकोनातून एक वेगळाच काळ आला. भारतीय बुद्धिबळ संघटनेमध्ये दिल्लीचे ध्रुव साहनी आणि कालिकतचे उमर कोया यांनी रशियातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाद्वारे भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची पद्धत सुरू केली. त्यासाठी सरकारकडून निधी मिळवण्यास सुरूवात केली.

1997 ते 2004 या दरम्यान सरकारी निरीक्षक म्हणजे गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर होतो. त्यावेळेस स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना या गोष्टीचं महत्त्व पटवून देण्याचे फेडरेशनच्या बरोबरीनं आमचे प्रयत्न असायचे.

त्यावेळेस 2500 रेटिंगचे आम्ही तीनच खेळाडू होतो. मी, विश्वनाथन आनंद आणि दिब्येंदु बरुआ. त्यानंतर शशीकिरण, हरीकृष्ण, हंपी आणि इतर अनेक खेळाडू 2500 रेटिंगच्या वर गेले. 2000 च्या आसपास आपला बुद्धिबळ संघ चांगला तुल्यबळ असायला लागला होता.

विश्वनाथन आनंद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विश्वनाथन आनंद

2002 मध्ये आपल्याला म्हणता येईल की भारतातील बुद्धिबळ या खेळाचा पुढचा टप्पा सुरू झाला.

विश्वनाथन आनंद जेव्हा वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकला होता, तेव्हा एक वेगळा टप्पा सुरू झाला होता. त्यावेळेस जागतिक दर्जाचा खेळाडू आपल्याकडे तयार झाला होता.

मात्र 2002 मध्ये पुढचा टप्पा सुरू झाला होता. त्यावर्षीच्या ऑलिम्पियाडमध्ये मी 43 वर्षांचा होतो, मात्र संपूर्ण संघातील पाच जणांचं सरासरी वय फक्त 21 वर्षे होतं. त्यावेळेस हा खूप महत्त्वाचा बदल व्हायला सुरूवात झाली होती. तरुण खेळाडू चांगली कामगिरी करू लागले होते.

2006 ते जवळपास 2012 पर्यंत फार काही लक्षणीय कामगिरी घडली नाही.

दरम्यान विश्वनाथन आनंद एकूण पाचवेळा वर्ल्ड चॅम्पियन झाला. मात्र त्या गोष्टीचा भारतीय बुद्धिबळ जगतावर फारसा विशेष फरक पडत नव्हता.

2014 मध्ये मात्र आनंदच्या अनुपस्थितीत भारतीय संघानं कांस्य पदक जिंकलं. विश्वनाथन आनंदशिवाय देखील आपण आघाडीच्या संघात असू शकतो ही भावना भारतीय बुद्धिबळपटूंमध्ये उत्पन्न झाली. भारतातील बुद्धिबळाच्या प्रगतीचा हा पुढचा टप्पा होता.

2018 मध्ये चीनला खुल्या आणि महिला विभागात ऑलिम्पियाडमध्ये विजेतेपद मिळालं. हा देखील भारताला एक धक्का होता की आपल्याला जरी कांस्यपदक मिळालं तरी चीननं सुवर्णपदक जिंकलं आहे. रशियानंतर चीन बुद्धिबळाच्या खेळात पुढे आला होता.

दरम्यान 2019 पासून भारतीय बुद्धिबळ संघटनेमध्ये काही आमुलाग्र बदल झाले. तर 2022 मध्ये आपण ऑलिम्पियाडच्या आयोजनासाठी पुढे सरसावलो. ही एक फार महत्त्वाची गोष्ट ठरली. कारण ऑल इंडिया चेस फेडरेशनच्या खिशात एक पैसा नसताना देखील त्यांनी हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलं.

मग त्यांनी ही जबाबदारी घेतल्यावर फिडे (FIDE) नं त्यांना सांगितलं की आम्हाला दोन दिवसांमध्ये 80 कोटी रुपयांची बॅंक गॅरंटी द्या नाहीतर आम्ही दुसऱ्या कोणाची तरी निवड करू.

त्यावेळी ऑल इंडिया चेस फेडरेशनने नऊ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क करत सांगितलं की या स्पर्धेचं बजेट 100 कोटी रुपयांच्या वर जाणार आहे. 80 कोटी रुपयांची बॅंक गॅरंटी द्यायची आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे (डावीकडे) आणि हॉकीचे महान खेळाडू गुरबक्स सिंग (उजवीकडे)

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे (डावीकडे) आणि हॉकीचे महान खेळाडू गुरबक्स सिंग (उजवीकडे)

दिल्ली, ओडिशा आणि तामिळनाडू या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब 80 कोटींची बँक गॅरंटी द्यायची तयारी दाखवली.

तामिळनाडू हा भारतातील बुद्धिबळाचं केंद्र आहे. त्यामुळे मग तामिळनाडूकडे ही जबाबदारी द्यायचं ठरलं. प्रशिक्षणाच्या बाबतीत देखील ऑल इंडिया चेस फेडरेशननं पुढाकार घेतला. तीन प्रशिक्षण शिबिरं घेतली. त्यात रशियन प्रशिक्षक भारतात येऊ लागले.

बुद्धिबळाच्या दृष्टीनं खरी प्रगती मग मार्च 2022 ते जुलै 2022 दरम्यान खेळाडूंना जे प्रशिक्षण मिळालं त्यातून सुरू झाली. कारण खेळाडूंचा दर्जा त्यातून उंचावला. त्याचबरोबर आपल्याला तीन तीन संघ खेळवण्याची संधी मिळाली. कारण स्पर्धेच्या यजमानाला अधिक संघ खेळवता येतात.

भारत बुद्धिबळात पहिल्या नंबरवर जाऊ शकतो, प्रवीण ठिपसे यांनी सांगितलं सूत्र

या बातम्याही वाचा :

भारत बुद्धिबळात पहिल्या नंबरवर जाऊ शकतो, प्रवीण ठिपसे यांनी सांगितलं सूत्र

2014 पासून तेच तेच खेळाडू भारतीय संघासाठी खेळत असत.

मात्र 2022 आपल्याला दुसरा आणि तिसरा संघ खेळवायची संधी मिळाली तेव्हा सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या रेटिंगच्या खेळाडूंना देखील खेळता आलं.

त्यावेळेस मॅग्नस कार्लसन (जगज्जेता बुद्धिबळपटू) दिल्लीत आला होता. तेव्हा त्यानं एक खळबळजनक विधान केलं की भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा संघ हा पहिल्या संघापेक्षा चांगला आहे. त्याचं म्हणणं खरं ठरलं.

अकरावं रेटिंग असलेला भारतीय संघ स्पर्धेत तिसरा आला आणि दुसरं रेटिंग असलेला भारतीय संघ मात्र चौथा आला. भारताच्या दुसऱ्या संघाला पदक मिळालं होतं. जी प्रशिक्षण शिबिरं घेण्यात आली त्यामुळे या सर्व तरुण खेळाडूंचा दर्जादेखील सुधारला.

भारतीय बुद्धिबळपटूंच्या वाटचालीकडे अशा टप्प्यांमधून आपल्याला पाहता येईल. यामध्ये चाळीस ते पन्नास वर्षांची सातत्यपूर्ण प्रगती आहे. आपल्या देशातील बुद्धिबळाच्या खेळाचा हा चढता आलेख आहे.

प्रश्न - भारतातील महिला बुद्धिबळपटूंची स्थिती, त्यांची संख्या आणि कामगिरी याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

प्रवीण ठिपसे - आज जगभर महिला बुद्धिबळपटूंची स्थिती लक्षात घेता, चाळीस-पंचेचाळीस वयोगटातील महिला खेळाडूच खेळत आहेत. त्यात तुलनेत भारतातील तरुण महिला खेळाडूंची संख्या जास्त आहे.

मात्र जगभरात महिला खेळाडूंची एकूण संख्या सात-आठ टक्क्यांच्या आसपासच आहे.

भारतात थोडीशी बरी स्थिती आहे. कारण अलीकडच्या भारतात पालक थोडा रस घेत आहेत. त्यामुळे तरुण खेळाडूंना संधी मिळते आहे.

मात्र जागतिक पातळीवर वयस्कर खेळाडूच स्पर्धेत उतरत असल्यामुळे तुलनेनं भारतीय महिला संघाला विजय मिळवणं सोपं होतं. त्यामुळे भारतीय महिला खेळाडू जगज्जेती होण्याची शक्यता पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे.

मात्र एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की अजूनही त्या प्रमाणात महिला बुद्धिबळपटू तयार होत नाहीत किंवा पुढे येत नाहीत. कारण मुलींना बुद्धिबळपटूंना स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर तिच्या पालकांना आणि त्यातही आईला सोबत जावं लागतं.

आता कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळून प्रत्येक वेळेस आईला हे शक्य होत नाही. त्यामुळे महिला खेळाडू जिथे वर्षभरात तीन-चार स्पर्धांमध्ये भाग घेतात. तिथे पुरुष खेळाडू मात्र सात-आठ स्पर्धा खेळलेले असतात.

कारण पुरुष खेळाडूंना स्पर्धेत भाग घेण्यास तशी अडचण येत नाही. या स्थितीत सुधारणा होण्याची आवश्यकता आहे.

अर्थात मागील दहा वर्षात नवीन महिला खेळाडू तयार होताना दिसत आहेत. मात्र त्यांचा खेळ एका मर्यादेत जाऊन अडकतो आहे. त्यात सुधारणा व्हायला हवी.

अलीकडे दिव्या आणि वंतिका सारख्या खेळाडूंनी कामगिरी उंचावून दाखवली आहे.

त्यांच्याप्रमाणेच इतर महिला खेळाडूंनी देखील त्यांचा खेळ उंचावत नेण्याची आवश्यकता आहे. युवा खेळाडूंनी दिव्या किंवा वंतिका सारख्या सध्याच्या आघाडीच्या खेळाडूंपेक्षा चांगली कामगिरी करून रेटिंग उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे.

भारत बुद्धिबळात पहिल्या नंबरवर जाऊ शकतो, प्रवीण ठिपसे यांनी सांगितलं सूत्र

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न - नव्या खेळाडूंना देशातील अनुभवी खेळाडूंचं प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण मिळणं किती महत्त्वाचं आहे? त्यासंदर्भात काय स्थिती आहे?

प्रवीण ठिपसे - मी किंवा विश्वनाथन आनंदसारखे खेळाडू मागील काही वर्षांपासून देशातील खेळाडूंना प्रशिक्षण देत आहोत. त्याचा त्यांना फायदा देखील होतो आहे. मात्र चांगलं रेटिंग असणाऱ्या खेळाडूंना परदेशातील उत्तम दर्जाच्या प्रशिक्षकांचं मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे.

2022 नंतर जागतिक स्तरावरील प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर आपल्या खेळाडूंचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावला आहे. मात्र वर्षभर असं दर्जेदार प्रशिक्षण आपल्या खेळाडूंना मिळालं पाहिजे.

रशियात ज्या प्रकारे प्रशिक्षणाचं जाळं तयार झालं आहे, तशी व्यवस्था भारतात अद्याप तयार झालेली नाही. म्हणजेच 2550 पर्यंत रेटिंग असणाऱ्या खेळाडूंना भारतीय प्रशिक्षकांनी मार्गदर्शन दिलं पाहिजे तर त्यावरील रेटिंग असणाऱ्या खेळाडूंना परदेशातील चांगल्या प्रशिक्षकाचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे.

प्रशिक्षणासंदर्भात मुख्यत: शासकीय पातळीवरून प्रयत्न होत आहेत. त्या तुलनेत खासगी क्षेत्राकडून प्रयत्न नाहीत. खासगी क्षेत्राने देखील प्रायोजकत्वासाठी पुढे आलं पाहिजे.

अर्थात हे देखील तितकंच खरं आहे की दर दहा वर्षात आपल्या देशातील बुद्धिबळाच्या खेळाचा दर्जा उंचावत गेला आहे.

मात्र अधिकाधिक खेळाडू कसे पुढे येतील आणि त्यांना अधिक सुविधा, मार्गदर्शन कसं मिळेल याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी नियोजनबद्ध आणि शिस्तबद्द प्रयत्न करून तशी व्यवस्था निर्माण केली जाण्याची आवश्यकता आहे.

खासकरून महिला खेळाडूंसाठी स्थानिक पातळीवर स्पर्धांचं आयोजन केलं गेलं पाहिजे. त्यातून दर्जेदार नवीन खेळाडू तयार होत जातील.

आपल्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आणि योग्य दिशा मिळाल्यास या खेळात आपण जगात नंबर वन होण्यास वेळ लागणार नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)