सिमरन शेख : धारावीच्या 'गल्लीगर्ल'चा WPL मधील सर्वात महागडी खेळाडू बनण्यापर्यंतचा प्रवास

सिमरन शेख
फोटो कॅप्शन, सिमरन राईट हॅन्ड बॅट्समन आणि लेग ब्रेक बॉलर आहे.
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

वुमेन्स प्रिमियर लीगच्या लिलावात मुंबईच्या धारावीत लहानाची मोठी झालेली सिमरन शेख सर्वात महागडी क्रिकेटपटू ठरली आहे. गुजरात जॉयंट्सनं 1.90 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावून तिला संघात घेतलं.

धारावीच्या गल्लीतून सुरू झालेला सिमरनचा प्रवास आता वुमन्स प्रिमियर लीग पर्यंत पोहोचला आहे. तिची ही कामगिरी कौतुकास्पद आहे.

सिमरन या यशाबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाली की, आजवरचा हा प्रवास सर्वांच्या सहकार्याने झाला असून त्यामुळंच मी इथपर्यंत पोहोचले आहे. मला अजून खूप लांबचा प्रवास करायचा आहे. मला कामगिरीही खूप सुधारायची आहे.

"देशासाठी खेळून मला आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव मोठं करायचं आहे. वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये मला निवडल्याबद्दल गुजरात जॉयंट्सचे आभार. "

"या टीमचे प्रतिनिधी काही दिवसांपासून मला खेळताना पाहत होते. त्यामुळं त्यांनी माझं सिलेक्शन केलं. माझ्यावर जो विश्वास सर्वांनी टाकला तो सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करीन. माझ्या या कामगिरीमुळे मला भारतीय संघात स्थान मिळण्यास मदत होईल, अशी आशा आहे."

धारावीत राहणारी 22 वर्षीय सिमरन शेख ही आता फक्त धारावी आणि मुंबईपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. देशभरात ती चर्चेचा विषय ठरली आहे.

सिमरन आशिया खंडातील प्रसिद्ध झोपडपट्टी असलेल्या धारावीतील बालिका नगर आणि आझाद नगर परिसरातल्या झोपडपट्टीत राहते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत लहानाची मोठी होत, ती या यशापर्यंत पोहोचली आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

स्वप्नांची सुरुवात

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सिमरन शेख हिचा जन्म 12 जानेवारी 2002 रोजी मुंबईतील धारावी येथे झाला. ती धारावीत बालिकानगर आझाद मैदान झोपडपट्टी भागात आई-वडील, भाऊ आणि बहिणीसोबत राहते.

सिमरन दहावीपर्यंत शिकली. पुढे अभ्यासात मन रमत नसल्याने शिकली नाही, पण आता ती शिकणार आहे. दहावीपर्यंतचं शिक्षण आर सी माहीम महापालिका शाळेतून झालं. तिला 3 बहिणी आणि 2 भाऊ आहेत.

मुंबईतील धारावी परिसरात वयाच्या 12-13 व्या वर्षी मुलांसोबत सिमरनने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. जवळच असलेल्या मैदानामध्ये ती क्रिकेट टेनिस बॉलने खेळायची. सिमरन राईट हॅन्ड बॅट्समन आणि लेग ब्रेक बॉलर आहे.

तिचा खेळ पाहून नातेवाईक असलेल्या झुबेर अली यांनी तिला आझाद मैदानजवळ असलेल्या क्रॉस मैदानात महिलांसाठी दिल्या जाणाऱ्या मोफत प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून दिला.

तिथं स्थानिक पातळीवर ती रुमदा क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून क्रॉस मैदानात खेळायची. पुढे सिमरनचा क्रिकेट प्रवास युनायटेड क्लबमध्ये वेगात आला. नंतर ती अनेक क्लब आणि संस्थांमार्फत खेळली.

स्थानिक क्रिकेट लीगमधील कामगिरी पाहून सिमरनला मुंबईत अंडर 19 महिला टीममध्ये निवडण्यात आलं.

सिमरन यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये झालेल्या सिनियर महिला टी-ट्वेंटी ट्रॉफी दरम्यानही मुंबईसाठी खेळली. तिने अकरा सामन्यांत 100.57 स्ट्राइक रेटनं 176 रन केले.

हीच कामगिरी पाहता गुजरात जायंटसने तिला सर्वोत्तम बोली लावून यंदा आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतलं.

स्थानिक क्रिकेट लीगमधील कामगिरी पाहून सिमरनला मुंबईत अंडर नाईन्टीन महिला टीममध्ये निवडण्यात आलं.
फोटो कॅप्शन, स्थानिक क्रिकेट लीगमधील कामगिरी पाहून सिमरनला मुंबईत अंडर 19 महिला टीममध्ये निवडण्यात आलं.

सिमरनचे वडील जाहीद अली शेख वायरमन म्हणून काम करतात. दिवसालाचा हजार-पाचशे रुपये कमावून ते घर चालवत होते. त्यातून शिल्लक राहणाऱ्या पैशांमधून मुलांचे शिक्षण आणि सिमरनच्या खेळाचा खर्च ते उचलायचे.

घराची संपूर्ण जबाबदारी असताना मुलीला अशा खेळासाठी प्रोत्साहन दिल्यानंतर आज मानसन्मान मिळतोय ही ईश्वराची कृपा असल्याचं ते म्हणतात. यात तिचं कौशल्य आणि मेहनत आहे. तिला लहान असल्यापासून क्रिकेटची आवड आहे.

लहानपणी तिला मैदानात अनेक जण ओरडायचे पण तिने यावर लक्ष न देता खेळावर लक्ष दिलं. जे लहानपणी ओरडत होते, ते आज तिचं कौतुक करतायत.

गायतोंडे आणि लोमडे सरांनी प्रशिक्षण घेताना तिला खूप मदत केली. आम्हाला आता तिला निळ्या जर्सीमध्ये खेळताना पाहायचं आहे.

धारावी ते WPL पर्यंतचा प्रवास

झोपडपट्टीत क्रिकेट खेळत असताना मावस भाऊ झुबेरनं तिला प्रशिक्षण घेण्यासाठी सुचवलं. यासाठी स्वतः आझाद मैदानाजवळील क्रॉस मैदानात प्रशिक्षण देणाऱ्या लोमडे सरांशी तिचा संपर्क करून दिला.

सिमरनच्या या कामगिरीबद्दल आणि तिच्या प्रवासाबद्दल बोलताना झुबेर अली म्हणतात की, ती लहानपासून छान खेळत होती, त्यामुळे ती काहीतरी करू शकते या विश्वासाने आम्ही तिला चांगले प्रशिक्षण देण्यासाठी लोमडे आणि गायतोंडे सरांशी संपर्क करून दिला.

तिला तिथे मोफत प्रशिक्षण आणि क्रिकेट खेळण्याचा साहित्य मिळत गेलं. सिमरनच्या कारकिर्दीत गायतोंडे सर, लोमडे सर आणि मैदानाची निगा राखणाऱ्या रामू यांनी खूप मदत केली.

रामू हा मैदानाची निगा राखणारा व्यक्ती फार महत्त्वाचा आहे. कारण मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये टीम सिलेक्शन बद्दलची सर्व माहिती तो सिमरनला देत असायचा आणि सिमरन त्या ठिकाणी जाऊन प्रयत्न करत असे.

सिमरनचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

लहानपणी बाहुलीबरोबर खेळायच्या वयात सिमरनने हातात बॅट पकडली. आता मेहनत प्रयत्न आणि चिकाटीने सिमरनने महिला इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच खेळातही आपलं करिअर घडवू शकतात हे दाखवून दिलं.

लहानपणी धारावीच्या झोपडपट्टीत खेळणारी सिमरन आता भारतात नावाजलेल्या वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंटसकडून खेळणार आहे. त्यामुळे सिमरनला आता क्रिकेट खेळताना जगभर पाहिलं जाणार आहे.

सिमरनने यापूर्वी 2022 वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सचे प्रतिनिधित्व केलं होतं. पण स्पर्धेच्या पहिल्या हंगामात तिची कामगिरी निराशाजनक होती. नऊ सामन्यांमध्ये ती केवळ 29 धावाच करू शकली होती. सर्वोच्च धावसंख्या 11 होती.

त्यामुळं गेल्या हंगामात 2023 लिलावात तिला मागणी नव्हती. मात्र, पुन्हा डोमेस्टिक पातळीवर चांगली कामगिरी करत यावेळी तिनं सर्वोच्च रक्कम मिळवली. सिमरन आता डब्ल्यूपीएलच्या पुढील मोसमात गुजरात जायंट्सकडून खेळणार आहे, त्यामुळे तिच्यावर चांगली कामगिरी करण्याचे दडपण असेल.

फ्रँचायजीला तिच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सिमरनने नुकत्याच पार पडलेल्या सिनियर वुमेन्स टी-20 ट्रॉफीमध्ये 11 सामन्यांमध्ये 47 च्या सर्वोच्च स्कोअरसह 176 धावा केल्या. त्यामुळे या सिझनमध्ये ती काय कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

यंदाच्या WPL मधील सर्वात महागडी खेळाडू

सिमरनच्या खेळाबाबत तिचा भाऊ नायब शेख म्हणतो की, "सिमरनला सर्वाधिक बोली लावून गुजरातने संघात घेतले. त्यामुळे साहजिकच तिच्याकडून टीमला खूप अपेक्षा असतील आणि आम्हालाही आहेत.

तिने सुरुवातीपासूनच खेळात प्रगती केली. तिच्या अशाच परफॉर्मन्सने तिला आम्हाला भारतीय टीममध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळताना निळ्या जर्सी मध्ये पाहायचं आहे."

सिमरन (मध्यभागी) तिच्या कुटुंबीयांसमवेत
फोटो कॅप्शन, सिमरन (मध्यभागी) तिच्या कुटुंबीयांसमवेत

बेंगळुरू आणि दिल्लीमध्ये होणाऱ्या महिला प्रिमियर लीगकडे सगळ्यांचं लक्ष असेल. अनेक भारतीय महिला क्रिकेटपटू या लीगमध्ये कशी कामगिरी करतात याकडं लक्ष असतं.

भविष्यातील कारकिर्दीसाठीही ते महत्त्वाचं ठरतं. या लीगमध्ये चांगली कामगिरी करू शकली तर पुढे भारतीय महिला टीममध्ये तिचं सिलेक्शन होऊ शकतं असं क्रीडा समीक्षक सांगतात.

त्यामुळे गल्लीबोळातून सुरू झालेला सिमरनचा क्रीडा प्रवास वुमन प्रीमियर लीग खेळल्यानंतर भारतीय टीम पर्यंत पोहोचतो का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.