क्रिकेटमुळे बळकट होत असलेल्या दिव्यांग महिलांची कहाणी

- Author, तेजस वैद्य आणि इनाक्षी राजवंशी
- Role, बीबीसी प्रतिनिधी आणि द ब्रिज
कल्पना करा की हातात काठी घेऊन स्लीप किंवा थर्ड मॅनच्या ठिकाणी फिल्डिंग करणे, किंवा फक्त मागच्याच पायाचा आधार घेऊन कट शॉट मारणे, आणि ते पण तेव्हा जेव्हा तो पाय हलत नाहीये. हे अशक्य वाटतं ना? पण या सुपरवूमनने ते प्रत्यक्षात उतरवलं आहे
26 वर्षांच्या तस्नीमचं बालपण झारखंडच्या वासेपूर मध्ये गेलं. कुप्रसिद्ध गणल्या गेलेल्या या भागात महिलांनी घराबाहेर पडणं किंवा मग रणरणत्या उन्हात एकटीनेच खेळ खेळणं तसं निषिद्धच मानलं गेलं होतं. पण आज ती शाळेत शिक्षक म्हणून काम करते, लोक तिच्याकडे पाहून प्रेरणा घेतात.
BBCShe या प्रकल्पातील या गोष्टीसाठी बीबीसीने द ब्रिज संस्थेसोबत काम केलं आहेत. वाचकांची आवडनिवड, प्राधान्य अधिक चांगल्याप्रकारे समजून घेणं या प्रकल्पाचा उद्देश आहे.
BBCShe बाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
सव्वीस वर्षांची ललिता गुजरातमधील एका आदिवासी खेड्यात वाढली. या खेड्यात पोटापाण्यासाठी लागणारी संसाधने अत्यंत मर्यादित आहेत. तिला एक लहान मुलगी आहे. पण तिच्या घरात आजही दूरदर्शन नाही, वीज आहे पण ती ही मर्यादितच.
तस्नीम आणि ललिता देशाच्या वेगवेगळ्या भागात वाढल्या. या दोघींपैकी एकजण क्रिकेट बघत बघत लहानाची मोठी झाली. तर दुसरीला क्रिकेट पाहणं कधीच शक्य झालं नाही. पण आज या दोघीही भारताच्या पहिल्या महिला अपंग क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहेत.

या दोघींनाही एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे पोलिओ.
तस्नीम सांगते, "लहानपणी मी इरफान पठाणची मोठी फॅन होती. मी त्याची एकही मॅच चुकवली नव्हती. पण माझ्या मर्यादा माहीत होत्या.
मी एकतरी मॅच स्टेडियममध्ये पाहीन असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला पोलिओ झाल्यामुळे आयुष्याकडून काहीच अपेक्षा नव्हत्या. त्यामुळे मी नेहमीच उदास असायचे."
ती पुढे सांगते, "पण आज माझ्याकडे आत्मविश्वास आहे, लोक मला ओळखतात."
शारीरिक मर्यादा असूनही क्रिकेट खेळणाऱ्या कित्येक तस्निम आणि ललिता आज भारतात आहेत. आजही क्रिकेटवर पुरुषांचंच वर्चस्व आहे.
आजच्या घडीला भारतात 1.2 कोटींहून जास्त विकलांग महिला आहेत. यापैकी जवळजवळ 70% महिला ग्रामीण भागातील असून त्यांच्याकडे प्राथमिक संसाधनांची देखील कमतरता आहे.
आणि इतक्या अडचणी असून देखील या महिलांनी आपली क्रिकेटची आवड जपण्यासाठी सामजिक बंधनं झुगारली, संसाधनांची व्यवस्था केली, शहरांमध्ये प्रवास केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामुळे समाजातील प्रतिकूल परिस्थितींविरुद्ध स्वप्न पाहणाऱ्यांना प्रेरणा मिळत आहे.

पहिला दिव्यांग महिला क्रिकेट संघ
2019 मध्ये बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने गुजरातमध्ये भारतातील पहिल्या विकलांग महिला क्रिकेट शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं.
यासाठी प्रयत्न करणारे मुख्य प्रशिक्षक नितेंद्र सिंग सांगतात, "दिव्यांग असलेल्या मुली खूप दृढनिश्चयी असतात. त्यामुळे इतर कोणत्याही सक्षम व्यक्तीपेक्षा त्या स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करतील."
या शिबिरातून मूठभर महिलांना नवा मार्ग मिळाला. या शिबिरातून एक नव्या पर्वालाच सुरुवात झाली. यातून असं समजलं की कोण चांगलं खेळतं आणि पुढे यातूनच भारतातील दिव्यांग महिलांची टीम तयार झाली.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना ओळखण्यात मदत केली आणि अखेरीस भारताचा पहिला दिव्यांग महिला क्रिकेट संघ तयार करण्यात ती उत्प्रेरक ठरली.
पण त्यानंतर मात्र म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. दिव्यांग महिला क्रिकेटपटूंची टीम तयार करण्यासाठी बहुतेक राज्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
2021 मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी एक समिती स्थापन केली. मात्र या समितीला कोणताही निधी मिळाला नाही.
दिव्यांग क्रिकेटपटूंना आर्थिक मदत मिळेल असं एकही सरकारी धोरण अस्तित्वात नाही. या दिव्यांग क्रिकेटपटूंना नोकरी मिळेल अशी कोणतीही तजवीज नाही.
पॅरा-बॅडमिंटन आणि पॅरा-अॅथलेटिक्स सारख्या खेळांमध्ये चांगल्या संधी आहेत. कारण या स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जातात. शिवाय पॅरालिम्पिक्स मध्ये देखील हे खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करू शकतात. त्यामुळे त्यांना स्पोर्ट्स कोट्यातून नोकरी मिळते.

मात्र, दिव्यांग क्रिकेटमध्ये नेमकं करियर आहे की नाही हे स्पष्ट नसताना देखील यापैकी कित्येक महिला चिकाटी आणि समर्पण देऊन खेळत आहेत.
आजही दर रविवारी गुजरातच्या विविध भागातून 15-20 मुली एकत्र येऊन प्रशिक्षण घेत आहेत. मात्र, या टीमचं भविष्य अंधकारमय आहे.
गुजरातच्या दाहोद उमरिया गावातील 26 वर्षीय ललिता देखील याच टीममध्ये खेळते. ती प्रशिक्षणासाठी रोज 150 किलोमीटरचा प्रवास करून वडोदरापर्यंत येते.
वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओ ग्रस्त झालेल्या ललिताच्या डाव्या पायात काहीच त्राण नव्हते. मात्र, तरीही फलंदाजी करताना तिला अडचण आली नाही. काठीचा आधार घेऊन ती उभी राहते.
ललिता म्हणते, "2018 साली पहिल्यांदाच मी माझ्या फोनवर क्रिकेटची मॅच पहिली. ती मॅच बघून मलाही क्रिकेट खेळावंस वाटलं. क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी माझ्याकडे टीव्ही नाहीये, पण तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं माझा स्वप्न आहे."

पण ललिताला भक्कम पाठिंबा आहे. तिचा नवरा प्रवीण रोजंदारीवर काम करतो. तिला प्रशिक्षण मिळावं यासाठी तो तिच्यासोबत आठ तास प्रवास करतो. शिवाय त्यांच्या 5 महिन्यांच्या मुलीची काळजी घेतो.
प्रवीण सांगतो, "आम्ही प्रशिक्षणासाठी जातो तेव्हा लोक ललिताच्या कपड्यांकडे बघून आम्हाला टोमणे मारतात. आमच्या गावात कोणतीही महिला टी-शर्ट आणि ट्राउजर पँट घालत नाही. ती कशीबशी चालते, मग क्रिकेट कधी खेळणार, यावरून देखील टोमणे मारतात. पण आम्ही त्यांच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. कारण माझ्या पत्नीने चांगली कामगिरी करावी असं मला वाटतं."
खेळाला कोणतंही लिंग कळत नाही, तर खेळाला केवळ पाठिंबा अपेक्षित असतो आणि हीच एक गोष्ट प्रवीण सारख्या लोकांना कळते. महिला खेळाडू हे साध्य करू शकतात यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे.
क्रिकेट म्हणजे भारतीयांचा आवडता खेळ. पण त्याकडे कधीच समानतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं नाही. यात तस्नीम आणि ललिता यांच्यासारख्या खेळाडूंना तर इतरही समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यांना गृहीत न धरता त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं जातं.

पाठिंब्याचा अभाव
दिव्यांग क्रिकेटला खेळाच्या साहित्यापेक्षाही जास्त गोष्टींची गरज आहे. यात स्पेशल फील्ड सेटिंग, पायाने विकलांग असलेल्या फलंदाजांसाठी धावपटू आणि पॉवरप्ले दृष्टिकोनाची आवश्यकता आहे.
भारताच्या पहिल्या दिव्यांग महिला क्रिकेट संघाची कर्णधार आलिया खान सांगते, "आज वुमेन्स प्रीमियर लीगमुळे लोक काही महिला खेळाडूंना ओळखायला लागलेत. पण आमचा सामना खेळवायला मात्र काहीच सोय नाही."
ती पुढे सांगते की, आम्ही साधं खेळायचा प्रयत्न केला तरी आमच्याकडे तुच्छतेनं पाहिलं जात.
"बऱ्याचदा लोक टोमणे मारतात की, इथे सामान्य मुलींनाही क्रिकेट खेळता येत नाही आणि तुम्हाला एका हाताने खेळायचं आहे का? समाजात स्त्रियांना किती दर्जा मिळतो हे तर तुम्हाला माहितीच आहे. घरी बसा, मुलांची काळजी घ्या, घराबाहेर जाण्यात वेळ वाया घालवू नका अशा कित्येक गोष्टी कानावर पडत असतात."
दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया (DCCBI) ने नुकतीच महिलांसाठी एका वेगळ्या समितीची स्थापना केली आहे. पण शारीरिकदृष्ट्या विकलांग महिला क्रिकेटपटूंसाठी स्थापन केलेल्या समितीचं नेतृत्व करणाऱ्या महिला प्रशासकांची कमतरता आहेच.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (CABI) यांनी संयुक्तपणे निधी दिल्यामुळे देशातील अंध महिला क्रिकेटपटूंना थोडं बळ मिळालं आहे.
प्रशिक्षक नितेंद्र सिंग म्हणतात की, "हे सगळं बघता डीसीसीबीआय असो की, सीएबीआय आणि बीसीसीआय असो, या सगळ्यांनी एकत्र येऊन या क्रिकेटला सपोर्ट करणारी रचना तयार केली पाहिजे. खेळाडू येतात, खेळतात आणि जिंकतात, पण ते बघायलाही कोणी येत नाही. ते देखील खेळू शकतात हे लोकांना कसं समजेल?"
एक असं जग आहे जिथे त्यांच्यासारखाच खेळ खेळणाऱ्या सक्षम खेळाडूंना लीगमध्ये खेळण्यासाठी करोडो रुपये मिळतात, जाहिरातदार जाहिरात स्लॉटसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची बोली लावतात, लोक त्यांना पाहण्यासाठी तिकिटं विकत घेतात. पण दुसऱ्या बाजूला हेच विकलांग खेळाडू कशाचीही अपेक्षा न करता प्रशिक्षण घेत आहे.
त्या स्वत:साठी, समाजातील आपलं स्थान बळकट करण्यासाठी आणि अशा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रशिक्षण घेतायत ज्यांच्यात समाजाने घातलेल्या बेड्या तोडण्याचं धैर्य नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









