संगीतबारी : पायात घुंगरू बांधून नाचणाऱ्या आयांचा मुलींच्या भविष्यासाठी चाललेला झगडा

- Author, अनघा पाठक, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी, टीम बाईमाणूस संयुक्तरित्या
मुलीचा जन्म झाला तर पेढे वाटले जातात ती ही संगीतबारी.
या संगीतबारीत म्हणे मुलगी जन्माला आली की पेढे वाटले जातात. आनंद साजरा केला जातो, कारण... नाचणारे दोन पाय आले, उत्पन्नाचा स्रोत आला. पण इथल्या आयांना मुलीच्या जन्माचा आनंद होत नाही. कारण – आपल्या नशिबी जे दुःख आलं तेच आता मुलीला भोगावं लागणार म्हणून.
महाराष्ट्रातल्या कोल्हाटी समाजातल्या बायका अशा केंद्रांतून नाचतात. आता इतर दलित, भटक्या विमुक्त जातींमधल्या स्त्रिया या व्यवसायात आल्या आहेत. त्या इथेच जेवतात, इथेच राहातात, इथेच नाचतात. एकेका नाचणारीच्या जीवावर 15-20 माणसांची कुटुंब चालतात. कुटुंबात दुसरं कोणी पैसे कमवत नाही. त्या नाचणाऱ्या बायका आणि त्यांच्या ही मुलींची कहाणी.
जामखेड....बीड-अहमदनगर रस्त्यावर वसलेलं, धुळीनं माखलेलं, दिवसा निवांत पहुडलेलं पण रात्री महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या 'रांगड्या' गाड्यांच्या प्रकाशाने झगमगलेलं कलाकेंद्रांचं गाव. जामखेडच्या कलाकेंद्रांची आणि या कलाकेंद्रांमध्ये लावण्या सादर करणाऱ्या कलाकारांची चर्चा राज्यभर केली जाते. एकट्या जामखेडमध्ये तब्बल 10 कलाकेंद्र आहेत. एकाच गावात एवढी कलाकेंद्र महाराष्ट्रात इतर कुठेही नाहीत.
ही स्टोरी बीबीसीच्या #BBCSHE या प्रोजेक्टचा भाग असून बीबीसी मराठीच्या सहकार्याने केली आहे. या प्रोजेक्टचा उद्देश महिलांसाठी विशेष पत्रकारिता कशी करता येईल हे शोधणं आहे. त्याबद्दल अधिक वाचा इथे...
कलाकेंद्र म्हटलं की चर्चा व्हायचीच. तिथल्या बायकांची, नाचगाण्याची, तिथे सादर केल्या जाणाऱ्या लावण्यांची आणि ‘खाजगी बैठकींचीही’.
मोठमोठ्या राजकारण्यांपासून ते गावखेड्यातल्या खिशात नुकताच पैसा खुळखुळू लागलेल्या तरुणांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीचा विषय म्हणजे ही कलाकेंद्र... अर्थात इथे 'तसले' उद्योग चालतात, 'बाई आणि बाटलीचा हा व्यापार आहे', अनेकांनी या 'नादात' त्यांच्या इस्टेटी गमावल्यात असे अनेक किस्से कानावरून जात असतात.
पिढ्यान् पिढ्या इथल्या मुली नाचगाणं करत आलेल्या आहेत. म्हणूनच कदाचित या समाजात अजूनही मुलीचा जन्म झाला तर आनंद साजरा करतात. हा समाज मातृसत्ताक आहे असं म्हणतात, पण इथे सत्तेबरोबर जबाबदारीही येते. इथल्याच एका नाचणाऱ्या महिलेच्या भाषेत सांगायचं झालं तर, “भाऊ कधी स्वतःच्या कमाईने मीठाचा पुडाही आणत नाहीत.”
संध्याकाळ टळून गेली, की यांची कामाची गडबड सुरू होते. नटून थटून बसायचं. या कलाकेंद्रांची रचनाही तशीच असते. मध्ये मोकळी जागा. त्याच्या चारीबाजूने खोल्या. या खोल्यांवर प्रत्येक पार्टी मालकिणीचं नाव टाकलेलं.
पार्टी मालकीण म्हणजे एक जरा सिनियर बाई, तिची स्वतःची पेटी, गाणारी, तबला/ढोलकीवाला आणि चार-दोन नाचणाऱ्या मुली. एकेका कलाकेंद्रात 8-10 पार्ट्या असतात.
आता ही पार्टी म्हणजे नेमकं काय? एका पार्टीत किमान 8 ते 10 लोक काम करतात. 18 (असं नुसतं म्हणायला, खरंतर नाचायला 14-15 वर्षांच्या मुलीही आणतात) ते 40 वयोगटातल्या 5 नाचणाऱ्या कलावंतिणी, त्यांच्यासाठी गाणारी एक गायिका आणि हार्मोनियम, ढोलकीच्या आवाजाने बैठकीची खोली दणाणून सोडणारे मास्तर आणि वस्ताद.

अशा 7 ते 10 पार्ट्या एका कलाकेंद्रात असतात. रात्रभर नाचून जमा होणाऱ्या पैश्यांची कलाकेंद्राचे मालक आणि पार्टी मालकी यांच्यात विभागणी केली जाते. पार्टी मालकीणीच्या हातात आलेले पैसे त्या पार्टीत काम करणाऱ्या कलाकारांना वाटले जातात.
पार्टी मालकीणीने कलाकेंद्र चालकाला दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात कलाकेंद्रचालक त्यांना एक सुरक्षितता, महिन्याला लागणारं राशनपाणी आणि जगण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा देऊ करतो असा सरळ सरळ व्यवहार आहे.
प्रत्येक पार्टीच्या वाटेला दोन खोल्या. तेवढ्या खोलीत सगळ्या बायकांनी राहायचं, जेवायचं, झोपायचं, नटायचं. वरच्या मजल्यावर किंवा मागच्या साईडला साथीदारांच्या म्हणजे पेटी,ढोलकी,तबलावाल्यांची खोली.
दिवसा या जागेत एक रिकामपण असतं, त्याला भकासपणा असं नाव देणार नाही मी, उगाच आपल्या मध्यमवर्गीय पांढरपेशीय समजुती कोणावर लादून त्यांचा उद्धार करण्याचा भाव नाहीच. ना आपली कुवत.
रिकामपण असतं. पहाटे 4 वाजेपर्यंत या बायकांचा दिवस चालतो. नाचून नाचून थकल्या की जेवण करायचं आणि कपडे बदलून अंग पसरून द्यायचं. या बायका उठतातच सकाळी 11 नंतर. तोवर स्वयंपाकीणबाई आलेली असते. ती एका बाजूला पोळ्यांचे रद्दे लाटते आणि भाजी रटरटत ठेवते.
बायकांची निवांत आंघोळ, कपडे धुणं – कपडे म्हणजे काय अंगात अडकवलेला एक गाऊन, परकर आणि अंतवस्त्रं. संध्याकाळी नाचताना नेसायच्या साड्या तर ड्रायक्लीनिंगला जातात.
जामखेडच्याच एका संगीत बारीबाहेर भेटलेले माने. “माझ्याकडे रोजच्या 300 साड्या असतात ड्रायक्लिनिंगला,” असं सांगत होते.
कसं असतं या भिंतीमागचं जग?
या प्रश्नाचं उत्तर खूप इंटरेस्टिंग आहे. या भिंतींमागे आयुष्य जगण्याचा धडपड करणाऱ्या शेकडो बायका आहेत. या भिंतींमागे एक सहकारी चळवळ आहे, या भिंतींमागे कलेचं एक उजाड जग आहे, इथे न शिकलेल्या पण प्रचंड पुढारलेल्या विचारांची माणसं आहेत आणि याच भिंतींमागे आता एक विद्रोह उभा ठाकतो आहे, एक तीव्र आंदोलन आकार घेत आहे...आंदोलन आहे ते भविष्यातील पिढयांना या भिंतींमागे येण्याची गरज पडू नये यासाठी.
संगीतबारीत नाचणाऱ्या एकाही बाईला असं वाटत नाही की त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी हे काम करावं. कदाचित जगाच्या पाठीवर ही एकमेव कला असेल जिचा एवढा द्वेष केला जातो. इथं या संगीतबारीच्या भिंतींमागे राहणं कुणालाही आवडत नाही पण कुटुंबांनी टाकून दिलेल्या, परिस्थितीने पिचलेल्या, अनेक वर्ष उपाशीपोटी झोपलेल्या या बायकांना या कलेनेच आजवर जगवलं आहे.
हरवत जाणारी कला
म्हणजे आधी अशी पद्धत होती की कलाकेंद्रात असणाऱ्या एका मोठ्या सभागृहात जुजबी पैश्यांचे तिकीट खरेदी करून शेकडो लोकांना कलाकेंद्रातील पार्ट्यांचे सादरीकरण बघता यायचे.
त्यामध्ये जी पार्टी आवडली तिच्यासोबत मग नंतर खाजगी बैठका व्हायच्या. पण जामखेड्या जय अंबिका कलाकेंद्रात काम करणाऱ्या पार्टी मालक चिऊ अक्कलकोटकर म्हणतात की, "कोरोना आला आणि समदंच बदललं बघा. आता लोकांना नाच पाहण्यात रस राहिलेला नाही. लोक येतात, खुर्चीवर बसलेल्या पोरींची तोंडं पाहून पार्टी फायनल करतात आणि बैठक लावतात. बैठकीतही चित्रपटाची गाणी वाजविण्याची मागणी वाढलीय त्यामुळे आमची पारंपरिक कला सादर करण्याची संधी आम्हाला मिळत नाही. आता आम्ही तरी कुठवर ते अवजड घुंगरू बांधून नाचणार म्हणा.”

त्यामुळे बाजारात ज्याची मागणी आहे त्यानुसार नाचून पोट भरणं इतकंच या कलावंतिणींच्या हातात असतं.
“पूर्वी होते ते रसिक राहिलेले नाहीत. प्रत्येकाला चामडीचा रंग महत्वाचा झालाय. जेवढी तुमची कातडी टाईट, तेवढा तुमचा भाव...” त्या म्हणतात.
सूर्य मावळू लागला की कपाळावर लावलेला टिळा, नामपट्टा मिटवून, अंगावर असणारे कडक इस्त्रीचे पांढरे कपडे ढिले करत एकेक गिऱ्हाईक कलाकेंद्रात येऊ लागतो. अर्थात इथे येण्यासाठी अशा गणवेशाची सक्ती नाही पण बहुतेक असेच कपडे असतात.
काही विशीतले तरुण दबकत दबकत कलाकेंद्रात पाऊल टाकत असतात, त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्याच वयाच्या पोरांच्या कानात खुर्चीवर बसलेल्या बायकांकडे पाहून काहीतरी कुजबुजत असतात, दबक्या आवाजात हसत असतात. त्यांच्यापैकीच कुणीतरी 'अनुभवी' पुढे येऊन बोली करतो आणि बैठक ठरते.
एकदा का बैठक ठरली की ज्या पार्टीची बुकिंग आहे त्या पार्टीत काम करणारा प्रत्येक जण गडबड करू लागतो. हार्मोनियम मास्तर हार्मोनियम स्वच्छ करतात, ढोलकीवाला थाप मारून ढोलकी तपासून घेतो, ज्या प्रकारची खोली बुक केलीय तिथे गिऱ्हाईकाची गादीवर बसण्याची व्यवस्था केली जाते, प्रत्येक पार्टीत एक हरकाम्या असतो, बैठकीतल्या गिऱ्हाईकाला काय हवं नको ते तो पाहत असतो, मेकअप केलेल्या पार्टीतल्या पोरी त्या खोलीत जातात आणि दरवाजा बंद होतो...बंदिस्त बैठकांची ही पद्धत.

प्रत्येक कलाकेंद्रातील बंदिस्त बैठकांचा भाव वेगवेगळा, प्रत्येक तासाला काही हजार रुपये मोजले की रसिकांना बंदिस्त बैठकीत लावणीचा आस्वाद घेता येतो अर्थात आता लावणीपेक्षा चित्रपटातील ढिनच्यॅक गाण्यांची मागणी वाढली असल्याने ती गाणी वाजवली जातात. मधूनच एखादा माणूस उठतो आणि नाच आवडला तर या कलावंतीणींवर 'दौलतजादा' करतो.
बंदिस्त बैठका झाल्या आणि गिऱ्हाईकाला एखादी नाचणारी बाई आवडली तर तो तिला 'बाहेर' घेऊन जातो. नुकतीच एक बैठक संपवून बसलेली एक पार्टी मालकीण सांगत होती, "साहेब बाहेर घेऊन गेलं तर आम्हाला दोन पैसे मिळतात. बैठकीत नाचून पाहिजे तेवढे पैसे मिळत नाहीत. आता माझ्या पार्टीत चांगल्या तरण्या पोरी असल्यानं माझ्या पार्टीला बैठकांसाठी सतत मागणी असते पण त्या पैशात हिस्से असतात. गिऱ्हाईक बाहेर घेऊन गेलं तर त्यात मात्र हिस्सा नसतो. ज्या पार्टीत तरुण पोरी नाहीत त्यांना बैठक मिळत नाहीत, उपासमार होते आमचीही झालीय..."
आई आणि बाई...
कलाकेंद्रात केवळ दोनच गोष्टी महत्वाच्या असतात एक नाचणारी बाई आणि तिच्यातली आई बस्स...कलाकेंद्रांची व्यवस्था मातृसत्ताक राहिलेली आहे. इथे जन्माला येणाऱ्या बाळांना त्यांच्या वडिलांची नावं माहिती नसतात. कलावंतिणीच्या पोटी जन्माला आलेलं मूल हे संपूर्णतः आईवरच अवलंबून असतं. कलाकेंद्रात जन्माला आलेल्या मुलांना त्यांच्या आईच्या नावाची ओळख मिळते.
आपल्यावर जी परिस्थिती आली ती आपल्या मुलींवर येऊ नये म्हणून या नाचणाऱ्या बायका जीवाचं रान करतात. त्यांना शिकवतात. एखादीला शिकण्यात रस नसेल तर तिचं लग्न लावून देतात. पण या व्यवसायात येऊ देत नाहीत.
पिढ्यान् पिढ्या इथल्या बायका-मुली नाचगाणं करत आलेल्या आहेत. आपल्यावर जी परिस्थिती आली ती आपल्या मुलींवर येऊ नये म्हणून या नाचणाऱ्या बायका जीवाचं रान करतात. त्यांना शिकवतात. एखादीला शिकण्यात रस नसेल तर तिचं लग्न लावून देतात. पण या व्यवसायात येऊ देत नाहीत. गीता बर्डे आता अकरावीत शिकते. तिला नर्स व्हायचंय. समाजाच्या वाईट नजरांपासून तिची आणि तिच्या आईची सुटका करण्यासाठी तिची धडपड चालूये.
तिच्या आईला अनेकदा लोकांनी टोमणे मारलेत, ,सहेतूक सल्ले दिलेत की आता तू कशाला नाचते, मुलीला या व्यवसायात आण.

गीताच्या आई उमा नवऱ्याच्या निधनानंतर दोन लहान मुलांचं पालनपोषण करण्यासाठी या व्यवसायात आल्या.
त्यांच्यावर हसणाऱ्या, त्यांना टोमणे मारणाऱ्या लोकांना उमाला चांगलाच धडा शिकवायचा आहे.
“आमच्यावर हसणाऱ्या लोकांचे दात पाडावेत, एवढीच माझी इच्छा आहे. आपले म्हणवणारे फसवतात. पण मी मागे हटणार नाही. मी माझ्या मुलीला चांगलं भविष्य मिळेल यासाठी माझ्या जीवाचं रान करेन. तिला शिकून नर्स व्हायचं आहे, तर तिला शिकून नर्स करणार,” त्या म्हणतात.
आपल्या मुलांना वाईट वळण लागू नये म्हणून मनावर दगड ठेवून आया आपल्या मुलांना लांब करतात.
“मी मुलीला माझ्या जवळ ठेवलंच नाही. तिला घरीच ठेवलं असतं, तर आमचं राहणं, वागणं, मेक-अप पाहून मुली बिघडतात, वाईट वळणाला लागतात. इथलं वातावरणही सुरक्षित नसतं. इथे किती प्रकारचे पुरुष येतात, त्यामुळे मी तिला लांबच ठेवलं,” इथल्याच एक पार्टी मालकीण लता परभणीकर म्हणतात.
त्यांची मुलगी आता सुशिक्षित आहे आणि मोठ्या शहरात नोकरी करते. तिचं लग्न लावून दिलं की मोकळी असा काहीसा स्वर लता लावतात.
म्हणूनच या कला केंद्रांच्या मालकिणींनी, इथे नाचणाऱ्या महिलांनी एकत्र येत आपल्या तुटपुंज्या कमाईतून आपल्या मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी एक आश्रमशाळा उभी केलीये. गीताही गेली चार वर्षं इथेच आहे. मुलांना सणाला कपडे, शाळेच्या वस्तू सगळं पुरवण्यात या नाचणाऱ्या बायका हातभार लावत असतात.

या आश्रमशाळेचे संचालक अरूण जाधव एक किस्सा सांगतात.
“पुण्याचं एक कलाकेंद्र आहे आर्यभूषण. त्या ठिकाणी आमची एक भगिनी आहे सविता नावाची. त्या भगिनीने पावती पुस्तक ठेवलं आणि बैठकीची लावणी झाल्यावर त्या ठिकाणी त्याच्याकडून 500 रूपये घ्यायची. असं करत करत तिने 50 ते 60 हजार गोळा केले.”
आम्ही तिथे होतो त्यादिवशी बुधवार होता. दोन माणसं गाडीवर आली आणि एक मोठा डबा आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांकडे देऊन गेली.
आम्ही विचारलं काय आहे तर कळलं चिकनचं जेवण. तिथल्या एका संगीतबारीतल्या मुलीने या लहान मुलांसाठी मेजवानी पाठवली होती.
अरूण सांगतात ही आश्रमशाळेची वास्तूही अशीच उभी राहिली. “या नाचकाम करणाऱ्या भगिनी त्यांच्या जवळच्या माणसाला, त्यांच्या गिऱ्हाईकाला विनंती करायच्या की तुम्ही मदत करा. कोणत्या भगिनीने वाळूच्या पोत्यांची व्यवस्था केली, कोणी सिमेंटची पोती आणली तर कोणी आणखी साहित्य आणि मग अशी ही वास्तू उभी राहिली.”
गरिबी, विंवचना आणि शोषण हे दुष्टचक्र इतक्या लवकर संपणारं नाही. या व्यवसायात अजूनही नवीन मुली येतच राहातात. बऱ्याचशा एकल असतात, कोणाला नवऱ्याने सोडलेलं असतं, कोणाला प्रियकराने फसवलेलं असतं, कोणाचा नवरा मेलेला असतो, तर कोणावर अत्याचार झालेला असतो. या सगळ्या बायकांना एक हक्काचं, पैसे कमवण्याचं ठिकाण म्हणजे संगीतबारी.
संध्याकाळ झाली की दिवसभराची मरगळ झटकून इथे रंगत चढायला लागलीये, बायका-मुली सजूनधजून तयार आहेत. तिकडे लांब आश्रमशाळेतली मुलं आता संध्याकाळची प्रार्थना म्हणताहेत. इथे असलेल्या अनेक आयांचा झगडा चालूये की हा उंबरठा आपल्या मुलींनी ओलांडू नये.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









