'आजीच्या मृत शरीराला मी स्पर्श केला तर ती अपवित्र होईल असं मला सांगितलं गेलं'

- Author, हर्षिता शारदा
- Role, बीबीसी आणि विमेन्स वेबसाठी
माझ्या आजीच्या मृत्यूने मी खचले होते. आमच्या दोघींमध्ये जिव्हाळ्याचं नातं होतं. मी प्रत्येक बाबतीत परिपूर्ण असल्याची जाणीव ती मला नेहमीच करून द्यायची.
मी माझ्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीला गमावण्याचं दुःख माझ्या मनात होतंच, पण तिच्या जाण्याने मला काही गोष्टींची जाणीव झाली. जसं की, समाजात महिलांना भेदभावाची वागणूक दिली जाते हे मला तिच्या अंत्यसंस्कारावेळी समजलं.
माझी आजी निर्मला देवी. यावर्षी 23 जानेवारीला वयाच्या 95 व्या वर्षी तिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तिने कायमच माझं कौतुक केलं.
तिच्या निधनाच्या आदल्या दिवशी मी तिच्यासाठी चहा केला होता. तिने माझ्या चहाचं कौतुक करत म्हटलं होतं की, तू तुझ्या भावापेक्षा उत्तम चहा बनवलायस. (उत्तम चहा कोण बनवतं? यावर माझ्या भावाची आणि माझी स्पर्धा सुरू असते.)
तिचं आमच्या संपूर्ण कुटुंबावर प्रेम होतं, पण माझ्याविषयी तिच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर होता. म्हणजे मी बनवलेलं खारट वरण असो की नकाशेदार पोळ्या...तिला माझं नेहमीच कौतुकच वाटायचं.
तिला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ती आठवडाभर दवाखान्यात अॅडमिट होती. ती घरी आली, मात्र चारच दिवसांनी तिने अखेरचा श्वास घेतला.
BBCShe प्रकल्पातील या गोष्टीसाठी बीबीसीने 'विमेन्स वेब'सोबत काम केलं आहे.
वाचकांची आवडनिवड, प्राधान्य अधिक चांगल्याप्रकारे समजून घेणं या प्रकल्पाचा उद्देश आहे.
BBCShe बाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

शिक्षणानिमित्त मी दिल्लीत असते. पण आजीची तब्येत बिघडल्याचं समजलं तसं मी थेट जालंधर गाठलं. माझी आजी मृत्यूशय्येवर असताना तिने तिची शेवटची इच्छा बोलून दाखवली. तिचे प्राण जमिनीवर जावे असं तिला वाटत होतं. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या वडिलांनी तिला जमिनीवर झोपविण्याचा निर्णय घेतला.
माझे वडील तिला उचलत असताना तिला धरण्यासाठी त्यांनी माझ्याकडे मदत मागितली. मी मदतीला जाणार इतक्यात केअरटेकर बाईने माझा हात हिसकला. ती बाई माझ्या आजीची काळजी घेण्यासाठी नेमली होती. माझ्या स्पर्शाने आजी अपवित्र होईल असं त्या बाईचं म्हणणं होतं.
तिच्या या बोलण्याचा मला राग आला आणि मी तिच्यावर खेकसले की, माझ्या स्पर्शाने उलटं तिला आनंदच होईल. बोलत बोलत मला रडू कोसळलं आणि खोलीतून बाहेर पडले. कारण अशा पितृसत्ताक पद्धतीशी लढण्याची ती वेळ नव्हती. माझ्या पालकांनी त्या केअरटेकर बाईंच्या विधानावर आक्षेप घेतला आणि मला खोलीत परत बोलवलं. पण त्या बाईंच्या बोलण्याचा माझ्यावर इतका परिणाम झाला की मी तिकडे जाऊच शकले नाही.

पण एवढंच नव्हतं. माझ्या आजीला जमिनीवर झोपवताना चादर फाटली आणि ती खाली पडली. यावर ती केअरटेकर माझ्याकडे आली आणि म्हणाली की, "तू आजीला स्पर्श केल्यामुळे तिला उचलणाऱ्या एकाचा तोल गेला आणि आजी खाली पडली."
मी जे काही ऐकत होते त्यावरच माझा विश्वासच बसत नव्हता. ती मला सांगत होती की, माझ्या नुसत्या स्पर्शाने माझ्या आजीला पुढच्या जन्मात शाप मिळू शकतो. माझ्याकडे यासाठी काही शब्दच उरले नव्हते. ती जे बोलते आहे ते चुकीचं आहे किंवा माझं आणि माझ्या आजीचं नातं कसं वेगळं आहे हे सांगण्याइतकं त्राण माझ्यात उरलंच नव्हतं.
माझ्या कुटुंबात मुला-मुलींना समान वागणूक दिली जाते. आम्हाला जे काही करायचं आहे त्यात माझ्या आई-वडिलांनी आम्हा दोघा भावंडांना नेहमीच पाठिंबा दिलाय. शिवाय माझ्या आजीनेही आम्हा दोघांमध्ये कधीही भेदभाव केला नाही.
माझ्या स्पर्शाने माझ्या आजीला शाप मिळेल असं एखाद्या अनोळखी व्यक्तीने मला म्हणणं आणि माझ्या आवडत्या व्यक्तीच्या जाण्याचं दुःख या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी त्रासदायक होत्या.
मी लहानपणापासूनच सशक्त महिलांना पाहत मोठी झाले. माझी आई, माझ्या आईची आई आणि माझ्या वडिलांची आई माझ्यासाठी प्रेरणास्थानी आहेत.
माझ्या आजीने अगदी लहान वयातच तिच्या नवऱ्याला गमावलं होतं.

लोकांनी तिला सांगूनही तिने दुसरं लग्न केलं नाही. ती तिच्या निर्णयावर ठाम होती. तिला शिकायचं होतं म्हणून तिने अभ्यास सुरूच ठेवला. लवकरच तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं, ती शाळेवर मुख्याध्यापिका म्हणून रुजू झाली.
तिला पोटची मुलं नव्हती, पण तिच्या बहिणीच्या मुलावर म्हणजे माझ्या वडिलांवर तिची माया होती. आम्ही तिला बडी दादी म्हणायचो. ती कधीच कोणत्या पुरुषावर अवलंबून नव्हती, ती स्वावलंबी स्त्री होती. ती स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगली. ज्या काळात महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती त्या काळात ती नोकरी करत होती.
तिच्या मृत्यूने माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. आपल्या समाजात अंतिम संस्कार करताना पुरुषांना महत्त्व दिलं जातं. पण स्वतः स्त्रीवादी असणाऱ्या माझ्या आजीला हे मान्य झालं असतं का? जर तिच्या मृत्यूआधी मी तिच्यासाठी होते तर तिच्या मृत्यूनंतर मी तिला स्पर्श करण्यात गैर असं काय होतं?
तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये असताना मी मुलगा आहे की मुलगी हे कोणी विचारलं नाही. तर तिच्या मृत्यूनंतर सगळी परिस्थिती अचानक कशी काय बदलली? मला आठवतंय की, तिच्या मृत्यूपूर्वी मी आणि माझ्या आई-वडिलांनी तिला गंगाजल प्यायला दिलं होतं. मी तिच्या खूप जवळ होते, त्यामुळे मी तिच्यासाठी काहीही करताना माझ्या आईवडिलांनी मला कधीच रोखलं नाही. पण ज्यावेळी आमच्या भोवती इतर लोक गोळा झाले तेव्हा परिस्थिती झपाट्याने बदलली.

मला एक जुनी गोष्ट आठवते की, जेव्हा माझ्या आईच्या आईचं निधन झालं होतं तेव्हा मी आणि माझी मावस भावंडं स्मशानभूमीत निघालो होतो. आजीच्या घराजवळ राहणाऱ्या एका महिलेने आम्हाला हटकलं आणि घरी जाऊन घर स्वच्छ करायला सांगितलं. पण माझी आई आणि माझी मामी आम्हाला आजीच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी घेऊन गेल्या. जर त्या दोघी नसत्या तर आम्हाला आजीचं शेवटचं दर्शन झालं नसतं.
आईवडिलांचे अंत्यसंस्कार करण्याचा हक्क केवळ मुलांनाच का असतो ? या माझ्या प्रश्नावर मला वेगवेगळी उत्तरं मिळाली. पण त्यातलं एकही उत्तर समाधानकारक नव्हतं. काही ठिकाणी तर महिलांना स्मशानभूमीतही प्रवेश दिला जात नाही.
अंतिमसंस्कार करण्यासाठी कोणीतरी असावं म्हणून लोक मुलीपेक्षा मुलाला प्राधान्य देतात का? आणि याने खरोखर मृतातम्याला शांती मिळते का? देवानेच निर्माण केलेल्या दोन लिंगांमध्ये खरोखर फरक आहे का?
जेव्हा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा तुम्ही फक्त त्यांची रिकामी खोली बघू शकता. तुम्हाला आता त्यांचा आवाज ऐकू येणार नाही, ना तुम्हाला त्यांचा प्रेमळ स्पर्श अनुभवता येईल. माझ्या आजीला मी शेवटचा स्पर्श केल्याने आणि तिच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्याने मला काही गोष्टींची कल्पना मिळाली.
माझी आजी जर त्याक्षणी शुद्धीत असती आणि मला जर कोणी आजीला स्पर्श करू दिला नसता तर मला खात्री आहे, माझ्या आजीने त्यावेळी सगळ्यांना खडसावलं असतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








