जगभरातील मुलींमध्ये 'सोलोगॅमी'चा ट्रेंड का वाढत आहे?

आम्ही प्रत्येकीनं स्वतःशीचं लग्न केलंय, अशी घोषणा 2011 मध्ये 10 स्पॅनिश मुलींनी एकत्र येऊन केली. त्यावेळी हे कृत्य म्हणजे पारंपरिक वैवाहिक जीवनाविरुद्ध बंडाची घोषणा होती.
मात्र, प्रत्यक्षात या संदर्भातली मोहीम जगात आधीच सुरू झाली होती आणि या मोहिमेचं नाव आहे 'सोलोगॅमी'.
पारंपरिक लग्न हे आता प्रत्येक मुलीच्या जीवनाचं महत्त्वाचं असं उद्दिष्ट राहिलेलं नाहीये. त्यापेक्षा 'सोलोगॅमी'वर विश्वास ठेवणाऱ्या मुली इतरांवर प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
पण स्वत:वर प्रेम व्यक्त करण्याचा हा मार्ग खूप विचित्र आहे की जुन्या कथेचा एक नवीन आश्चर्यकारक असा भाग आहे?
माय यांच्या लग्नाला 11 वर्षं झाली आहेत आणि त्या खूप आनंदी आहेत. त्यांनी स्वतःशीच लग्न केलं आहे. याचा अर्थ त्यांचा पार्टनर दुसरा कुणी नसून त्या स्वतःच आहे.
माय त्यांच्या लग्नानिमित्त आयोजित समारंभात म्हणाल्या, “या निमित्तानं मी संकल्प केलाय की मी माझा आतला आवाज ऐकेन आणि मला काय हवं आहे ते दररोज स्वतःला विचारेन. जेणेकरून मी ते पूर्ण करू शकेन.”
त्यांच्या या वाक्यानंतर समारंभात उपस्थित इतर महिलांनी टाळ्या वाजवल्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
सोलोगॅमी म्हणजे काय?
तुम्ही 'सोलोगॅमी' हा शब्द कधीच ऐकला नसेल असंही होऊ शकतं. हा शब्द स्पेनमधील भाषेचा अधिकृतपणे भागही नाहीये. असं असलं तरी याची सुरुवात इथूनच झाली.
पण जपान, अमेरिका, भारत, इटली आणि ब्रिटनसह जगातील अनेक देशांमध्ये स्वत:शीच लग्न करण्याची प्रथा रूढ होत आहे.
स्पेनमधील माय यांनी 2011 पासून 70 महिलांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास मदत केली आहे.
बहुतेक देशांमध्ये स्वत:शीच लग्न करण्याचा कायदा अस्तित्वात नाहीये. असं असतानाही मग इतक्या स्त्रिया सोलोगॅमीकडे का वळत आहेत?

माय सेरानो सांगतात, "मी तर सहज गमतीमध्ये हे केलं होतं. स्वत:वरील प्रेमावर सामान्य चर्चा सुरू करणं, हाच माझा एकमेव उद्देश होता."
"पण माझ्या लग्नाच्या दिवशी मला समजलं की मी काहीतरी महत्त्वाचं काम करत आहे. मला वाटलं की, मी स्वतःवर प्रेम करते, मीच माझी चांगली मित्र आहे आणि त्याच क्षणी मी शेकडो लोकांसमोर स्वतःला वचन दिलं की, मी स्वतःची काळजी घेईन आणि आधी स्वतःचाच विचार करेन."
नेविस ट्रबजोसा हे लैंगिक संबंधांचे तज्ज्ञ आहेत. ते म्हणतात की, लिंगभावाच्या दृष्टिकोनाच्या पलीकडे प्रत्येक माणसानं वैयक्तिकरित्या त्याच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा आदर करणं आवश्यक आहे.
ते सांगतात, “पुरुषांना स्वतःला महत्त्व द्यायला शिकवलं जातं, मग स्त्रियांसाठी त्यांचं स्वत:चं व्यक्तिमत्व अडथळा का ठरायला हवं?”
‘स्वतःवर प्रेम करणं आवश्यक नाही’
मानसशास्त्रज्ञ इसप्रांका बोश फेविल सांगतात की, "स्वतःवर प्रेम करणं शिकणं महत्त्वाचं आहे. कारण ते आपल्याला या जगात आपलं स्थान निश्चित करण्यात मदत करतं. यामुळे आपल्या प्रेमाला कोण पात्र आहे आणि कोण नाही हे ठरवण्यात मदत होते."
आपण कोणावर आणि कसे प्रेम करतो याचा ट्रेंड बदलत आहे. स्पेनमध्ये अजूनही बहुसंख्य जोडपी पारंपरिक लग्न-संबंधात बांधली गेली आहेत. पण आकडेवारीवर नजर टाकल्यास एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो.
तो म्हणजे आता पूर्वीपेक्षा कमी लग्नं होत आहेत आणि घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे.
पण दोनदा लग्न केलेल्या जिंकलसारख्या महिलांचं प्रकरण वेगळं आहे. पहिल्यांदा तिनं एका पुरुषाशी आणि दुसऱ्यांदा स्वत:शी लग्न केलं.
ती सांगते, "मी स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण त्यावेळी आमची सर्वांत धाकटी मुलगी जन्माला आली आणि मला अचानक जाणवलं की माझ्या आयुष्यात माझ्याकडे स्वत:साठी वेळच नाहीये."

फोटो स्रोत, Getty Images
'कधीकाळी बॅंकेत खाते उघडण्यासाठीही होती अडचण'
जिंकलचे पती सर्गिएव्ह म्हणाले की, "जेव्हा तिनं स्वत:शीच लग्न करण्याचा तिचा निर्णय मला सांगितला तेव्हा सुरुवातीला मला विचित्र वाटलं. पण जर ती स्वत:वर प्रेम करत नसेल आणि ती स्वत:वर समाधानी नसेल, तर त्याचा माझ्यावर, आमच्या मुलांवर आणि तिच्या आयुष्यात असलेल्या प्रत्येकावर परिणाम होईल."
नेविस ट्रबजोसा सांगतात की, एक काळ असा होता की एखाद्या महिलेला बँक खाते उघडण्यासाठी आणि कार चालवण्यासाठी चर्चमध्ये लग्न करावं लागे.
"गेल्या काही दशकांमध्ये बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. असं असलं तरी पारंपरिक कुटुंब हा समाजाचा सर्वांत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे आणि त्याला नैसर्गिक मानलं जातं." पण पारंपरिक लग्न हे बहुतेक करून महिलेसाठी एका तुरुगांसारखे असते, असं मानसशास्त्रज्ञ इसप्रांका बोश फेविल यांना वाटतं.
त्या सांगतात, "याचं पहिलं कारण म्हणजे लग्न करणं हा आपल्या जीवनाचा सर्वांत महत्वाचा उद्देश आहे, असं आपल्याला आयुष्यभर सांगितलं जातं. आकडेवारीवरून असं सिद्ध होतं की लग्नानंतर, घरातील कामं, मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची काळजी घेणं ही महिलांची जबाबदारी होऊन जाते."

स्पॅनिश सरकारच्या आकडेवारीनुसार, 2010 मध्ये महिलांनी पुरुषांपेक्षा घरकामात दोन तास अधिक घालवले आहेत.
सोलोगॅमीमुळे ही आकडेवारी बदलेल का?
नेविस ट्रबजोसा सांगतात की, सोलोगामी हा समस्येवरचा उपाय नाही, तर ते पितृसत्ताक समाजाचं प्रतीक आहे.
300 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 2018 मध्ये रॉयल स्पॅनिश अकादमीने त्यांच्या भाषेत समान अनुभव आणि प्राधान्यं असलेल्या महिलांसाठी एक शब्द समाविष्ट केला. सोरोरेटी, हा तो शब्द.
"आम्ही स्त्रिया एका जागी जमलो की जणू आरशासमोर उभे आहोत, असं वाटतं,” असं माय सांगतात.
"स्त्रिया या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत ही कल्पना पितृसत्ताक समाजानं निर्माण केली आहे. कारण महिलांनी एकत्र येऊ नये, अशी या समाजाची इच्छा आहे. पण प्रत्यक्षात अगदी उलट घडते. जेव्हा आपण एकत्र उभे राहतो तेव्हा आपण अधिक मजबूत होतो."
2017 मध्ये माय यांनी पोहणाऱ्या महिलांची संघटना स्थापन केली. या संस्थेच्या सुरूवातीस सदस्यांची संख्या 14 होती, आज ती 140 वर पोहचली आहे.
अशा उपाययोजनांमुळे महिलांना त्यांचे हक्क मिळण्यास मदत होते, असं महिला हक्कांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
माय सांगतात, "स्वतःवर प्रेम करण्याचं आवाहन आम्ही महिलांना करतो. आपण इतरांवर प्रेम करण्यापेक्षा स्वतःवर जास्त प्रेम केलं पाहिजे, असं त्यांना सांगतो."

फोटो स्रोत, Getty Images
पण लोक विचारतात की...
"तुम्ही स्वतःची काळजी घेत आहात याची तुम्हाला जाणीव करून देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत." जिंकल सांगते की, “काहीवेळा असं करणं कठीण असतं. कारण लोकांना ते समजत नाही आणि मग ते तुमच्यावर स्वार्थी असल्याचा आरोप करतात. "पण वस्तूस्थिती अशी आहे की स्वतःशी लग्न केल्यानंतर माझं पती आणि मुलांसोबतचं नातं सुधारलं आहे."
"मी जेव्हा आरशात पाहते तेव्हा मला चांगलं वाटतं. 11 वर्षांपूर्वी स्वतःला दिलेलं वचन मी पूर्ण केलं आहे आणि मी अजूनही त्यासाठी बांधील आहे. मला खात्री आहे की, हे मला कायम आनंद देईल," माय सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








