कल्याणची महिला पैलवान जी पुरुषांना चितपट करायची म्हणून लोक दगडफेक करायचे

फोटो स्रोत, FEROZ SHAIKH
- Author, नियाझ फारुखी
- Role, बीबीसी उर्दू
1950 च्या दशकात जेव्हा भारतात महिलांसाठी कुस्ती खेळणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट होती, तेव्हा हमीदाबानोनं पुरुष पैलवानांना आव्हान दिलं होतं.
या 32 वर्षीय महिला पैलवानानं पुरुषांना आव्हान देत म्हटलं की, “जो कोणी मला आखाड्यात पराभूत करेल, तो माझ्याशी लग्न करू शकेल.”
फेब्रुवारी 1954 नंतर तिने दोन पुरुष पैलवानांचा पराभव केला होता. त्यातला एक पटियालाचा तर दुसरा कोलकात्याचा होता.
मग त्याच वर्षी मे महिन्यात ती तिसर्या दंगलीसाठी (दंगल म्हणजे कुस्तीची स्पर्धा किंवा कुस्तीचं मैदान) बडोद्याला गेली होती. तिच्या भेटीनं शहरात खळबळ उडाली होती.
बडोद्याचे रहिवासी आणि पुरस्कार विजेते खो-खो खेळाडू त्यावेळी 80 वर्षीय सुधीर परब त्यावेळी शाळेत शिकत होते.
ते सांगतात की, “मला आठवतं की कुस्तीच्या या दंगलीसाठी लोक खूप उत्सुक होते. अशा कुस्तीविषयी कुणीच कधी ऐकलंही नव्हतं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
कुस्ती पाहण्यासाठी खास आसन व्यवस्था करण्यात आली होती.
त्यावेळी 'एपी' या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हा सामना फक्त 1 मिनिट 34 सेकंद चालला. हमीदाबानोने बाबा पहेलवान यांना चीतपट केलं होतं.
रेफ्रींनी बाबा पहेलवान हमीदासोबत लग्न करू शकत नाही, अशी घोषणा केली. या पराभवानंतर बाबा पहेलवान यांनी लगेच हा आपला शेवटचा सामना आहे, असं जाहीर करुन टाकलं.
पुढे हमीदाबानो या भारताच्या पहिली महिला व्यावसायिक पैलवान म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्याकाळी कुस्ती हा केवळ पुरुषांचा खेळ मानला जात असे.
'अलिगडची अॅमेझॉन'
हमीदाबानो सामान्य लोकांमध्ये एवढ्या लोकप्रिय झाल्या की त्यांचं वजन, उंची आणि आहारही बातम्यांचा विषय बनत होते.
त्यावेळच्या रिपोर्ट्सनुसार, त्यांचं वजन 107 किलो होते आणि उंची 5 फूट 3 इंच होती.
त्यांच्या दैनंदिन आहारात साडेपाच लीटर दूध, पावणेतीन किलो सूप, अडीच लिटर फळांचा रस, एक कोंबडी, एक किलो मटण, 450 ग्रॅम बटर, 6 अंडी, एक किलो बदाम, 2 मोठ्या रोट्या आणि 2 बिर्याणी प्लेट्सचा समावेश होता.
त्या दिवसातून नऊ तास झोपतात आणि सहा तास व्यायाम करतात, असेही या बातमीत म्हटले होते.
त्यांना 'अलिगडची अॅमेझॉन' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हमीदा यांचा जन्म मिर्झापूरमध्ये झाला होता आणि त्या सलाम नावाच्या वस्तादांच्या हाताखाली कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी अलीगढला गेल्या होत्या.

फोटो स्रोत, FEROZ SHAIKH
त्यांची स्तुती करताना एका स्तंभलेखकानं 1950 मध्ये लिहिलं होतं की, 'अलिगडच्या अॅमेझॉन'कडे फक्त एक नजर टाकणं तुमच्या मणक्याला कापरं भरण्यासाठी पुरेसे आहे.
अॅमेझॉन ही अमेरिकेतील प्रसिद्ध पैलवान होती आणि हमीदाबानो यांची तुलना तिच्याशी केली जात होती.
त्यांनी लिहिलं, "कोणतीही स्त्री तिच्याशी स्पर्धा करू शकत नाही. तर प्रतिस्पर्ध्यांच्या कमतरतेमुळे तिला विरुद्ध लिंगाच्या लोकांना आव्हान देण्यावाचून पर्याय नव्हता."
याशिवाय हमीदाबानो यांच्या नातेवाईकांशी झालेल्या संभाषणावरून समजतं की, समाजाच्या रूढीवादी विचारसरणीने त्यांना आपलं घर सोडून अलीगडमध्ये स्थायिक होण्यास भाग पाडलं होतं.
महिलेची पुरुषासोबत कुस्ती, टांगा आणि लॉरीवर पोस्टर
1950 च्या सुमारास त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. 1954 मध्ये त्यांना दावा केला की, त्यांनी आतापर्यंत सर्व 320 स्पर्धा (दंगली) जिंकल्या आहेत.
त्यांची कीर्ती त्या काळातील लेखांतून स्पष्टपणे दिसून येते. त्याच वेळी अनेक कथा लेखक त्यांच्या पात्रांमधील ताकद दाखवण्यासाठी पात्राची तुलना हमीदाबानोशी करत होते.
या गोष्टींमुळे बडोद्याच्या लोकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली होती.
सुधीर परब सांगतात की, भारतात पहिल्यांदाच एखादी महिला पुरुष पैलवानाशी कुस्ती करत होती, या अर्थानं ती दंगल वेगळी होती.
ते सांगतात, "1954 मध्ये लोक खूप पुराणमतवादी होते. अशी कुस्ती होऊ शकते यावर लोक विश्वास ठेवायला तयार नव्हते. चित्रपटांच्या प्रमोशनप्रमाणे टांगा आणि लॉरींवर बॅनर आणि पोस्टर लावून शहरात तिच्या आगमनाची घोषणा करण्यात आली होती.”
त्यावेळच्या वृत्तपत्रानुसार हमीदा यांनी बडोद्यात बाबा पहेलवान यांचा पराभव केल्याचं स्पष्ट आहे.

फोटो स्रोत, SCREENGRAB
परब सांगतात, "मला आठवतंय की ती सुरुवातीला लाहोरच्या प्रसिद्ध गामा पहेलवानशी संबंधित असलेल्या छोट्या गामा पहेलवानशी लढणार होती. त्यांना महाराजांचे संरक्षण होते."
पण छोट्या गामा पहेलवानानं शेवटच्या क्षणी हमीदाबानोसोबत कुस्ती खेळायला नकार दिला.
तो म्हणाला की, मी महिलेसोबत कुस्ती खेळणार नाही, परब सांगतात.
काही पैलवानांसाठी स्त्रीसोबत कुस्ती खेळणं ही लाजिरवाणी बाब होती.
त्याचवेळी एक महिला पुरुषांना सार्वजनिकपणे आव्हान देत त्यांचा पराभव करत असल्याचा राग अनेकांना होता.
'टाईम्स ऑफ इंडिया'मधील वृत्तानुसार, पुण्यातील रामचंद्र सालों नावाच्या पुरुष कुस्तीगीरासोबतची लढत शहरातील कुस्तीची नियंत्रक संस्था असलेल्या राष्ट्रीय तालीम संघाच्या विरोधामुळे रद्द करावी लागली.
कोल्हापुरात दुसऱ्या एका सामन्यात हमीदा यांनी शोभा सिंग पंजाबी नावाच्या पैलवानाला पराभूत केलं, तेव्हा कुस्तीच्या चाहत्यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर दगडफेक केली.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनाही पाचारण करावं लागलं आणि सर्वसामान्यांनी हा सामना खोटा असल्याचं म्हटलं. पण प्रकरण इथंच संपलं नाही.

फोटो स्रोत, SCREENSHORT
लेखक रणविजय सेन त्यांच्या 'नेशन अॅट प्ले: हिस्ट्री ऑफ स्पोर्ट इन इंडिया' या पुस्तकात लिहितात, "त्या उत्सवांमध्ये खेळ आणि मनोरंजन एवढं मिसळून जायचं की हमीदाबानोच्या सामन्यानंतर जो सामना होणार होता, त्यात एक पैलवान लंगडा आणि दुसरा आंधळा होता"
"पण तो सामना मनोरंजन म्हणून किंवा कदाचित तिला टोमणे म्हणून रद्द करण्यात आला. कारण अंध कुस्तीपटूने दातदुखीची तक्रार केली, ज्यामुळे त्याच्या प्रतिस्पर्ध्याला विजेता घोषित करण्यात आलं.”
सेन सांगतात, "अखेर हमीदा बानोला तिच्या सामन्यांवर बंदीच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे तक्रार करावी लागली. पण, देसाईंचं उत्तर होतं की, या सामन्यावर ती महिला असल्यामुळे नाही, तर आयोजकांच्या अनेक तक्रारींमुळे बंदी घालण्यात आली होती. ज्यांनी बानोविरुद्ध 'डमी' पैलवान मैदानात उतरवले होते."
‘कुणीही तिला पराभूत करू शकलं नाही’
हमीदा बानोविरुद्धच्या कुस्तीत डमी पैलवान किंवा कमकुवत प्रतिस्पर्ध्याचा वापर होत असल्याची बरीच चर्चा त्या काळी व्हायची.
हमीदा केवढ्या प्रसिद्ध होत्या, याविषयी बोलताना, महेश्वर दयाल त्यांच्या 1987 च्या पुस्तक 'आलम में इंतखाब - दिल्ली' मध्ये लिहितात की, तिने यूपी आणि पंजाबमध्ये अनेक कुस्तीचे सामने लढवले होते आणि तिला आणि तिची कुस्ती पाहण्यासाठी दूरदूरचे लोक यायचे.
ते लिहितात, "ती पुरुष पैलवानांसारखीच लढत असे. काही लोक असंही म्हणायचे की हमीदाबानो आणि पुरुष कुस्तीपटूमध्ये एक गुप्त करार असायचा आणि तो मुद्दाम हमीदा बानोकडून हरायचा."
त्याच वेळी, अनेक पुरुष लेखकांनी हमीदा यांच्या कारनाम्यांची खिल्ली उडवली किंवा त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

फोटो स्रोत, Screenshot
स्त्रीवादी लेखिका कुर्रतुल ऐन हैदर यांनी हमीदाबानो यांचा त्यांच्या 'दालनवाला' या कथेत उल्लेख करताना लिहिलंय की, 1954 मध्ये मुंबईत एक मोठी अखिल भारतीय दंगल आयोजित करण्यात आली होती. ज्यात हमीदानं अप्रतिम खेळ दाखवला होता.
त्या लिहितात, "फकीरा (तिचा नोकर)च्या मते, कुणीही तिचा पराभव करू शकला नाही. त्याच दंगलीमध्ये प्राध्यापक ताराबाईंनीही अत्यंत चुरशीने कुस्ती खेळली आणि त्या दोन महिला कुस्तीपटूंची छायाचित्रे जाहिरातीत छापण्यात आली. या छायाचित्रांमध्ये त्या बनियान आणि निकर परिधान करून आणि भरपूर पदके हातात घेऊन अभिमानाने कॅमेऱ्याकडे पाहत होत्या.”
त्यावेळच्या नोंदी दर्शवतात की, हमीदा बानो यांनी 1954 मध्ये मुंबईत रशियाच्या वीरा चेस्टेलिनचा एका मिनिटापेक्षा कमी वेळात पराभव केला आणि त्याच वर्षी त्यांनी युरोपियन पैलवानांसोबत कुस्ती करण्यासाठी युरोपला जाण्याचा हेतू जाहीर केला होता.
पण, या प्रसिद्ध दंगलीनंतर लगेच हमीदा कुस्तीच्या पटलावरून गायब झाल्या आणि त्यानंतर त्यांंचं नाव केवळ इतिहासाच्या रूपात नोंदवलं गेलं.
‘तिला थांबवण्यासाठी लाठ्यांनी मारहाण’
हमीदाबानो यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या जवळचे नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांचा शोध घेतला. ही मंडळी आता देशाच्या आणि जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात राहतात.
हमीदाबानो यांची युरोपला जाण्याची घोषणा त्यांच्या कुस्ती कारकिर्दीच्या पडझडीचे कारण ठरली, अशी माहिती त्यांच्याशी बोलल्यावर मिळाली.
हमीदा यांचा नातू फिरोज शेख आता सौदी अरेबियात राहतो. तो सांगतो, "एक परदेशी महिला तिच्याशी कुस्ती खेळण्यासाठी मुंबईत आली होती. ती आजीकडून हरली होती आणि प्रभावित होऊन आजीला ती युरोपला घेऊन जाणार होती. पण तिचे वस्ताद सलाम पैलवान यांना हे मंजूर नव्हतं."
तो सांगतो की, आजीला थांबवण्यासाठी सलाम पैलवानानं तिला लाठ्यांनी मारलं आणि तिचे हात तोडले.
तोपर्यंत दोघेही अलिगडहून मुंबई आणि कल्याणला येऊन राहायचे, तिथं त्यांचा दुधाचा व्यवसाय होता.
कल्याणमधील हमीदाबानो यांचे त्यावेळचे शेजारी राहिल खान त्यांच्यासोबत अशा हिंसक घटना घडल्याच्या माहितीला दुजोरा देतात. ते आता ऑस्ट्रेलियात राहतात.
ते सांगतात की, सलाम पैलवानानं तिचे पायही मोडले होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
ते सांगतात, "मला स्पष्टपणे आठवतं की ती उभीही राहू शकत नव्हती. तिचे पाय नंतर बरे झाले. पण ती वर्षानुवर्षे काठीशिवाय नीट चालू शकत नव्हती.
"दोघांमध्ये मारामारी सामान्य झाली होती. सलाम पैलवान अलिगडला परत गेला पण हमीदाबानो कल्याणमध्येच राहिल्या."
राहिल सांगतात, "सलाम पैलवान हमीदाबानोच्या नातवाच्या लग्नासाठी जेव्हा कल्याणला पुन्हा 1977 मध्ये आला तेव्हा दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही बाजूच्या लोकांनी लाठ्याही काढल्या होत्या. "
सलाम पैलवान हे प्रभावी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, ते राजकारणी आणि चित्रपट कलाकारांच्या जवळ होते आणि ते स्वतः नवाबासारखे जगत होते.
पण फिरोजचा दावा आहे, की सलामने हमीदा यांची पदकं आणि इतर सामान विकलं आणि जेव्हा त्याचे उत्पन्नाचे स्रोत संपले तेव्हा त्याला प्रचंड त्रास सहन करावा लागला.
हमीदा बानोचे कधी लग्न झाले होते का?
हमीदा कल्याणमध्ये राहत होत्या, ते संकुल बरंच मोठं होतं. तिथे गुरांचे गोठे आणि कशातरी बांधलेल्या खोल्या होत्या, ज्या त्यांनी भाड्याने दिल्या होत्या.
पण, बराच काळ भाडेवाढ न झाल्यामुळे त्यातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं.
राहिल सांगतात की, त्याचे आई-वडील शिक्षित होते, त्यामुळे हमीदा अनेकदा त्यांना भेटायला जायची.
राहिल यांची आई फिरोज आणि त्याच्या भावंडांना इंग्रजी शिकवायची.
"सलाम सोबतची भांडणं वाढत गेल्यावर, आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकदा ती माझ्या आईकडे ठेवायला देत असे," राहिल सांगतात.
पण शेवटच्या काळात तिला अनेक अडचणी आल्याचं ते सांगतात. ती कल्याणमधील घरासमोरील मोकळ्या मैदानात बुंदी विकायची.
मात्र, तिनं आपल्या मुलांना अलिगड किंवा मिर्झापूरला जाण्यास सक्त मनाई केली होती.
अलिगडमध्ये राहणारी सलाम पैलवान यांची मुलगी सहारानं सांगितलं की, सलाम मृत्यूशय्येवर असताना त्यांना भेटण्यासाठी हमीदा एकदा अलिगडला परत आली होती.
मिर्झापूरमधील हमीदाच्या नातेवाईकांनी याप्रकरणी बोलण्यास टाळाटाळ केली असली, तरी अलिगडमधील सलाम पैलवानच्या नातेवाईकांशी झालेल्या चर्चेदरम्यान एक महत्त्वाची माहिती मिळाली.
हमीदाबानो यांनी सलाम पैलवानशी लग्न केलं होतं आणि तेही स्वातंत्र्यापूर्वी.
पण हमीदाबानो यांच्याविषयी सलाम पैलवान यांची मुलगी सहारासोबत फोनवर बोलण झालं, तेव्हा ती हमीदा बानोला आई म्हणण्यास टाळाटाळ करत होती.
याविषयी विचारलं असता तिनं हमीदा ही सावत्र आई असल्याचं सांगितलं.
हमीदाबानो आणि सलाम पैलवान यांचं लग्न झालं होतं, असा त्यांचा दावा आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
सहाराने सांगितलं की, हमीदाबानोच्या आई-वडिलांच्या मते कुस्ती हा पुरुषांचा खेळ होता आणि तिनं कुस्ती खेळण्यास त्यांचा विरोध होता. त्याच दरम्यान, सलाम पैलवान तिच्या शहरात दौऱ्यावर गेले होते, ज्यामुळे हमीदाला बाहेर पडण्याची संधी मिळाली.
सहारा सांगतात, "माझे वडील मिर्झापूरला कुस्तीसाठी गेले होते. तिथे त्यांची हमीदाशी भेट झाली आणि ते तिला इथे अलिगडला घेऊन आले.
"तिला त्यांची मदत हवी होती. तिच्या कुस्तीसाठी माझे वडील मदत करायचे आणि ती त्यांच्यासोबतच राहायची."
हमीदाबानो आणि सलाम पैलवान यांच्यातलं नातं नेमकं काय होतं, याविषयी त्या दोघांनीच अधिक सांगितलं असतं. पण हमीदाबानोच्या अखेरच्या दिवसांत त्यांच्यासोबत असलेला त्यांचा नातू फिरोज याला मात्र सहारा आणि इतर नातेवाईकांचं म्हणणं पटत नाही.
तो सांगतो, "हमीदा सलाम पैलवानासोबत राहात होती, पण तिनं कधीच त्याच्याशी लग्न केलं नव्हतं."
फिरोज आजी हमीदाबानोसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल सांगतात, "खरं तर आजीने माझ्या वडिलांना दत्तक घेतलं होतं. पण माझ्यासाठी तीच माझी आजी आहे."
हमीदा बानो आणि सलाम पैलवान यांच्या कुटुंबीयांचे वेगवेगळे दावे आहेत. आज त्यांच्या वैयक्तिक नातेसंबंधांचे तपशील महत्त्वाचे नाहीत. ही वाघीण जिवंत असेपर्यंत तिला कुस्तीत हरवू शकेल असा एकही जण असा जन्मास आला नाही, हे मात्र नक्की.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








