विनोद कांबळी : मच्छिवाल्यांच्या डब्यातून प्रवास करत भारतीय संघात स्थान ते परत 'हिटविकेट' होण्याची गोष्ट

विनोद कांबळी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विनोद कांबळी
    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठी

जगातील सर्वोत्कृष्ट फिरकिपटू शेन वॉर्ननं एकदा सचिन तेंडुलकर स्वप्नातही त्याच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करायचा, असं सांगितलं होतं. पण त्याच्या अनेक वर्षांपूर्वी सचिनच्याच जिवलग मित्रानं शेन वॉर्नला दिवसाच चंद्र-तारे दाखवले होते. तो क्रिकेटपटू म्हणजे भारताचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज विनोद कांबळी.

भेंडीबाजारच्या एका कुटुंबातून आलेला सर्वसामान्य मुलगा पुढं देशासाठी खेळला. वडिलांची देशासाठी खेळण्याची संधी थोडक्यात हुकली. मग त्यांनी मुलासाठी ते स्वप्न पाहिलं. त्यासाठी लोकलमध्ये मच्छिविक्रेत्यांच्या डब्यातून प्रवास आणि त्यामुळं कपड्यांतून येणारा वासही सहन करत हा तरुण परिश्रम करत राहिला.

पण आयुष्यातील यशापयशाचे चढ-उतार पार करण्यासाठी लागणारा आधार त्याच्याकडं नव्हता. त्यामुळं या हिऱ्याची चकाकी जगापर्यंत पोहोचूही शकली नाही. क्रिकेटशिवाय राजकारण, चित्रपट यातही हात आजमावला. पण तिथंही अपयशच समोर उभं होतं.

विनोद कांबळीचे काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेले व्हीडिओ आणि त्याची ढासळलेली प्रकृती यामुळं सध्या त्याच्याबाबत प्रचंड प्रमाणात चर्चा सुरू आहे.

तसंच, आज (18 जानेवारी) विनोद कांबळी यांच जन्मदिन आहे.

या निमित्तानं त्याच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सुरुवात करुया त्याच्या लहान पण धडाकेबाज क्रिकेट कारकिर्दीनं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

षटकार ठोकून रणजी पदार्पण

विनोद कांबळी डावखुरा फलंदाज होता, तसंच उजव्या हाताने गोलंदाजीही करायचा. सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजीसाठी त्याला ओळखलं जात होतं.

कांबळी आणि सचिन यांनी 664 धावांच्या भागिदारीनं खळबळ उडवून दिल्यानंतर दोघांसाठीही स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरही पदार्पणासाठी दारं खुली झाली. कांबळीची 1989-90 च्या रणजी हंगामात मुंबईच्या संघात निवड झाली. विशेष म्हणजे रणजी चषकात पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून त्यानं पदार्पण केलं.

पुढं 18 ऑक्टोबर 1991 रोजी पाकिस्तान विरोधात वन डे पदार्पण झालं. 1993 मध्ये इंग्लंडविरोधात कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. 1992 आणि 1996 अशा दोन वर्ल्डकपमध्ये खेळला. 1996 च्या विश्वचषकात सचिननंतर सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज होता.

1996 च्या विश्वचषकातील त्याची झिम्बाब्वे विरोधातील शतकी खेळी ही आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. शेन वॉर्नच्या एका ओव्हरमध्ये त्यानं ठोकलेल्या 22 धावांची चर्चा आजही होते.

ग्राफिक्स

1991 ते 2000 दरम्यान कांबळीला अनेकदा संघातून वगळण्यात आलं. तब्बल 9 वेळा त्यानं पुनरागमनही केलं. पण तरीही कारकिर्द फार मोठी ठरली नाही. त्यानं 104 वनडे सामन्यांत 2 शतकं आणि 14 अर्धशतकांसह 2477 धावा केल्या.

1993 मध्ये इंग्लंड विरोधात त्याचं कसोटी पदार्पण झालं. दुसऱ्याच कसोटीत द्विशतकी खेळी, त्यानंतर पुढच्याच सामन्यात झिम्बाब्वे विरोधातही द्विशतक आणि नंतर श्रीलंकेविरोधात शतक करत त्यांनं धडाक्यात सुरुवात केली.

पण तरी त्याची कसोटी कारकिर्द 17 सामन्यांपुरती मर्यादीत राहिली. त्यात त्यानं 4 शतकं आणि 2 अर्धशतकांसह 1084 धावा केल्या.

या लहानशा कारकिर्दीतही 14 कसोटींत वेगवान 1000 धावा, कसोटीत द्विशतक करणारा तिसरा सर्वात तरुण फलंदाज असे विक्रम त्यानं रचले. दक्षिण आफ्रिकेतील बोलंड क्लबकडूनही कांबळी खेळला होता.

मुंबईत जन्म, वडिलांकडून क्रिकेटचा वारसा

मुंबईत (तत्कालीन बॉम्बे) 18 जानेवारी 1972 रोजी गणपत कांबळी यांच्या घरी विनोदचा जन्म झाला. गणपत कांबळीही क्रिकेटपटू होते. त्यांच्याकडूनच विनोदला क्रिकेटचा वारसा मिळाला. विनोदची क्षमता पाहून वडिलांनी त्याच्यासाठी एक स्वप्न पाहिलं होतं. कांबळीनं एका मुलाखतीत याबाबत सांगितलं होतं.

"माझ्या वडिलांचं भारतीय संघात खेळायचं स्वप्न होतं. ते वेगवान गोलंदाज होते. त्यांना निवडीसाठी सीसीआय म्हणजे क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये बोलावलं होतं. रमाकांत देसाईही होते. त्यावेळी रमाकांत देसाईंची निवड झाली. माझ्या वडिलांची निवड झाली नाही.

"माझे वडील गावस्कर आणि त्या काळातील सर्व क्रिकेटपटूंबरोबर खेळले होते. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही, म्हणून त्यांनी माझ्यासाठी स्वप्न पाहिलं," असं कांबळी म्हणाला.

लगेजच्या डब्यातून लोकल प्रवास

वडिलांची प्रेरणा तर होतीच, पण भारतानं कपिलच्या नेतृत्वात 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकला त्यानंही कांबळी प्रेरित झाला होता. भारतानं हा वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी विनोद अंदाजे 10 वर्षांचा होता. घरी टीव्ही नसल्यानं बहिणीच्या घरी जाऊन संपूर्ण सामना त्यानं एकट्यानं पाहिला होता.

लहानपणी कांबळीचं कुटुंब भेंडीबाजारमध्ये राहायचं. नंतर ते कांजूरमार्गला शिफ्ट झाले. तिथून त्याच्या क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. क्रिकेटमुळं शारदाश्रम शाळेत प्रवेश मिळाला. त्यामुळं सकाळी 5 वाजता उठून मोठी किटबॅग आणि शाळेची बॅग घेऊन तो सहाची लोकल पकडून शाळेत जायचा.

आचरेकर सरांबरोबर सचिन आणि विनोद.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आचरेकर सरांबरोबर सचिन आणि विनोद.

लोकलची गर्दी पाहता विनोद लगेजच्या डब्यातून प्रवास करायचा. पण तिथं मच्छिवाले, भाजीवाले असायचे तो वास कपड्यांतून यायचा. पण त्याचा कधी विचार केला नाही. शाळा आणि सायंकाळी क्रिकेटचा क्लास असे परिश्रम विनोद करत राहिला.

एकदा रणजी सेमिफायनल खेळताना रात्री त्याला आई गेल्याचं समजलं. कांबळीनं आईला सामन्यानंतर भेटतो असं सांगितलं होतं. पण ती भेट झालीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन त्यानं सगळे विधी उरकले. त्यानंतर तो रडत असताना त्याचे वडील म्हणाले, 'तू खेळावं हेच आईचं स्वप्न होतं, त्यामुळं जा आणि खेळ'. त्यानंतर प्रत्येक चेंडू खेळताना त्याच्या डोळ्यात अश्रू होते.

आचरेकर सरांकडे सचिनशी पहिली भेट

विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर याची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यांची भेट क्रिकेटच्या निमित्तानेच झाली होती. शारदाश्रम शाळेच्या ट्रायलसाठी आचरेकर सरांनी मुलांना शिवाजी पार्क मैदानावर बोलावलं होतं. सलेक्शनमध्ये विनोद कांबळीला पहिला चेंडू खेळलेला पाहूनच आचरेकर सरांनी निवड केली होती.

"मला अजूनही आठवतं की, तिथं एक दहा वर्षांचा कुरळ्या केसाचा मुलगा होता. तो होता सचिन तेंडुलकर. सचिनला मास्टर ब्लास्टर नावही मीच दिलं. तो 10 आणि मी 11 वर्षांचे असताना आम्ही भेटलो आणि तेव्हापासूनची आमची मैत्री आहे," असंही कांबळीनं मुलाखतीत सांगितलं होतं.

664 नव्हे, 1000 धावा होते लक्ष्य

कांबळी आणि सचिननं केलेल्या एका विक्रमानं सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडं वेधलं गेलं होतं. तो म्हणजे हॅरिस शील्ड स्पर्धेतील 664 धावांच्या भागिदारीचा विक्रम. या भागिदारीत कांबळीनं नाबाद 349 तर सचिननं नाबाद 326 धावा केल्या होत्या.

याबाबत बोलताना कांबळी म्हणाला होता की, "आम्ही दोघांनी 300-300 धावा केल्या होत्या. आमचा विचार 1000 धावांच्या भागिदारीचा होता. पण डाव घोषित कराला लागला. या भागिदारीनंच आम्हाला जगभरात ओळख मिळवून दिली."

विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर

फोटो स्रोत, twitter

फेब्रुवारी 1988 मध्ये झालेल्या या सामन्यात विनोद कांबळीनं गोलंदाजीनंही कमाल केली होती. त्यानं प्रतिस्पर्धी संघाच्या 6 विकेट घेत त्यांना गारद केलं होतं.

असे जिवलग मित्र सचिन आणि कांबळी 1987 च्या विश्वचषकात बॉलबॉय होते. तर पुढच्याच 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये दोघांनी भारतीय संघात स्थान मिळवलं होतं.

कडक शिस्तीचे आचरेकर सर

रमाकांत आचरेकर सरांबद्दलचा त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रचंड आदर आणि भीतीही असायची. "आचरेकर सर कधी आम्हाला ऑल द बेस्ट आणि वेल प्लेड म्हणाले नाहीत. तुम्ही 200 रन करा किंवा 300, तरीही तुम्ही आऊट का झाले? असं ते विचारायचे," असं कांबळीनं सांगितलंय.

कांबळीनं वानखेडे मैदानावर द्विशतक केलं त्यावेळी आचरेकर सर मैदानात उपस्थित होते. त्यावेळी त्याला हे माहिती नव्हतं. पण काही वर्षांपूर्वी त्याला यूट्यूबवर व्हीडिओत सर दिसले होते. ती खेळी पाहूनही कौतुक झालं नाही, असं कांबळी सांगतो.

एक आठवणही कांबळीनं सांगितली. "मैदानात एकदा मॅच सुरू असताना मैदानावर पतंगाचा धागा त्रास देत असल्यानं मी तो पतंग घेऊन उडवू लागलो. आचरेकर सर हे सगळं डायरीत लिहून ठेवायचे. संध्याकाळी चर्चा करताना एक मुलगा ती डायरी वाचायचा. तेव्हा पतंगाबाबत वाचताच सरांनी एक जोरदार कानाखाली मारली. आजही ती थापड लक्षात आहे," असं तो म्हणाला होता.

सचिनबरोबरचा वाद

सचिन आणि कांबळी यांची मैत्री प्रसिद्ध होतीच. पण त्यांच्यातील वादही अनेक वर्ष चर्चेत होता. 2009 मध्ये एका टीव्ही शोमधील कांबळीच्या वक्तव्यानं याची सुरुवात झाली होती. 'सच का सामना'या शोमध्ये कांबळीला, "तू स्वतःचं करिअर उद्ध्वस्त केलं. पण स्वतःला उद्ध्वस्त करण्यापासून तुला सचिन तेंडुलकर वाचवू शकला असता का?", असा प्रश्न विचारला होता.

कांबळीनं त्याचं होकारार्थी उत्तर दिलं होतं. म्हणजे सचिननं ठरवलं असतं तर कांबळीला तो मदत करू शकला असता, पण त्यानं तसं केलं नाही, अशा चर्चा माध्यमांनी रंगवल्या.

2013 मध्ये सचिन तेंडुलकरनं निवृत्ती जाहीर केली, तेव्हाही कांबळीनं माध्यमांसमोर उघड नाराजी व्यक्त केली. सचिननं निरोपाच्या भाषणांत उल्लेख केला नाही, यामुळं कांबळी रागावला होता.

सचिनच्या अॅकेडमीत विनोद कांबळीला हेड कोच बनवलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सचिनच्या अॅकेडमीत विनोद कांबळीला हेड कोच बनवलं होतं.

एका वाहिनीशी बोलताना कांबळी म्हणाला होता की,"सचिननं सगळ्यांचे आभार मानले पण मला विसरला. मी त्याला 10 वर्षाचा होता तेव्हापासून ओळखतो. 664 धावांची भागिदारी हा आमच्या करिअरचा टर्निंग पॉइंट होता. ती भागिदारी झाली नसती तर कांबळी आणि सचिनलाही कोणी ओळखलं नसतं. त्या भागिदारीत माझाही मोठा वाटा होता. पण निरोपाच्या भाषणात त्यानं माझं नाव घेतलं नाही तर मला धक्का बसला."

यावेळी कांबळीनं सचिन आणि तो सात वर्षांपासून बोलले नसल्याचं सांगितलं होतं.

पण हा वाद नंतर संपुष्टात आला. सचिननं विनोद कांबळीला त्याच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये हेड कोच म्हणून संधीही दिली होती. तसंच विनोद कांबळीला हार्ट अटॅक आला त्यावेळी त्याला सचिननं आर्थिक मदतही केली होती. कांबळीनं स्वतःच एका मुलाखतीत याबाबत सांगितलं होतं.

1996 च्या वेदना आणि फिक्सिंगबाबत वक्तव्य

कांबळी म्हटलं की, 1996 च्या वर्ल्ड कपमधला त्याचा रडतानाचा व्हीडिओ डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.

13 मार्च 1996 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलकात्याच्या प्रसिद्ध ईडन गार्डन मैदानात सेमी फायनल सामना झाला. भारतीय फलंदाजी ढेपाळली. त्यामुळं चाहत्यांनी मैदानात बाटल्या फेकत, जाळपोळ करत गोंधळ घातला. अखेर सामना रद्द करून श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं.

सामना थांबला तेव्हा भारताला 156 चेंडूंमध्ये 132 धावा हव्या होत्या. 8 फलंदाज तंबूत परतले होते. कांबळी 10 धावांवर होता तर कुंबळे नुकताच मैदानात आला होता. पण सामना रद्द करून श्रीलंकेला विजयी घोषित करताच कांबळी मैदानातच ढसा-ढसा रडू लागला होता.

विनोद कांबळी

फोटो स्रोत, Getty Images

नंतर काही वर्षांनी कांबळीनं याबाबत एका वाहिनीवर बोलताना गंभीर आरोप केले होते. भारतानं टॉस जिंकूनही गोलंदाजी का घेतली? असा प्रश्न कांबळीनं उपस्थित केला होता.

"टॉसनंतर गोलंदाजीच्या निर्णयानं सगळ्यांनाच धक्का बसला कारण, फलंदाज पॅड बांधून रेडी होते. रात्री आणि मॅचपूर्वीही बॅटिंग घेणार हे ठरलेलं होतं. मग असं काय झालं?" असं कांबळी एका वाहिनीवर म्हणाला होता.

यानंतर या सामन्याविषयी प्रचंड चर्चा आणि फिक्सिंगचे संशयही व्यक्त करण्यात आले. तसंच हे बोलल्यानंच माझं करिअर संपवलं असे आरोप कांबळीनं केले होते.

वादांनी सोडली नाही पाठ

कांबळीसाठी वाद हे जणू नॉन स्ट्रायकर एंडवर असलेल्या पार्टनरसारखे सातत्यानं डोळ्यासमोर उभे असायचे.

त्यानं मद्यधुंद स्थितीत शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार त्याची पत्नी अँड्रियानं काही वर्षांपूर्वी (2022) केली होती. या प्रकरणी तिनं वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रागाच्या भरात विनोदनं कुकिंग पॅनचं हँडल फेकून मारलं, त्यामुळं डोक्याला इजा झाल्याचं अँड्रियानं म्हटलं होतं.

त्याचबरोबर 2022 मध्येच त्याला ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणातही अटक करण्यात आली होती.

कांबळीने 2009 आणि 2010 मध्ये डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या दादर शाखेकडून 50 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने त्याला नोटीस बजावली होती. त्यावेळीही बराच वाद झाला होता.

राजकारण, सिनेसृष्टीतही प्रयत्न

2009 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कांबळी अनेक प्रकारच्या भूमिकेत चाहत्यांसमोर आला. राजकारण, सिनेसृष्टी काही टीव्ही शो आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून तो चाहत्यांच्या भेटीला आला.

सुनील शेट्टी आणि विनोद कांबळी.

फोटो स्रोत, Getty Images

2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याने लोकभारती पक्षाकडून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. विक्रोळी मतदारसंघातून त्यानं निवडणूक लढवली. निवडणुकीत त्याचा पराभव झाला. कांबळीला अवघी 3800 मतं मिळाली.

दरम्यान, निवृत्ती जाहीर करण्याआधीच कांबळीनं मनोरंजन क्षेत्रातही नशीब आजमावलं. 2002 मध्ये अनर्थ नावाच्या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये एंट्री केली. 2009 मध्ये पल पल दिल के पास या चित्रपटातही तो झळकला. बेट्टानगेरे या दाक्षिणात्य चित्रपटातही त्यानं भूमिका केली. पण कॅमेऱ्यासमोर त्याला फटकेबाजी जमली नाही.

टीव्हीवरही त्यानं कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाइट्स बचाओ आणि मिस इंडिया अशा शोमध्ये काम केलं. तिथंही यश मिळालं नाही.

'यशही हाताळता यायला हवं'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कांबळीची कारकिर्द आणि त्याच्या एकूणच स्थितीबाबत बीबीसी मराठीनं ज्येष्ठ क्रीडा समीक्षक विनायक दळवी यांच्याकडून जाणून घेतलं. त्यांनी नुकतंच एका लेखात याबाबत सविस्तर विश्लेषण केलं आहे. कांबळीचे कुटुंबीय, डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ यांच्याशीही दळवी बोलले.

विनायक दळवींच्या मते,"यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर ते यश सांभाळणं सगळ्यांनाच जमत नाही. यशापाठोपाठ येणारे दुर्गुण कांबळीला चिकटले. तो दिवसा वेगळा आणि रात्री अगदी वेगळा असायचा. दिवसा अत्यंत विनम्र पण रात्री वेगळ्याच जगात, असं दुहेरी व्यक्तीमत्त्वं त्याचं शत्रू ठरलं."

तरुण वयात मिळणारी प्रसिद्धी, यश हे सांभाळण्यासाठी पाठिशी कुटुंबाचा भक्कम आधार हवा असतो. सचिनला अजित तेंडुलकरच्या रुपानं तो होता, तसा कांबळीला नव्हता. त्याच्यासाठी तशी सपोर्ट सिस्टिमच तयार झाली नाही, वडीलकीच्या नात्याने सांगणारं कुणी नव्हतं, असंही ते म्हणाले.

"कांबळीचं पहिलं लग्न मोडलं आणि नंतरही वैवाहिक जीवनाबाबत म्हणावं तसं स्थैर्य त्याला लाभलं नाही. त्यामुळं एक प्रकारची मानसिक स्थिरताच मिळाली नाही. व्यसनाधीनतेनं ही जागा भरून काढली आणि त्याचा पाय अधिक खोलात गेला."

विनोद कांबळी

फोटो स्रोत, Getty Images

क्रिकेटच्या दृष्टीनंही कांबळीचं काय चुकलं याचंही त्यांनी विश्लेषण केलं. ते म्हणाले की,"सचिन आणि कांबळी दोघांनाही त्यावेळी ताशी 130 किमी वेगाचे चेंडू खेळायची सवय होती. पण 140 च्या अधिक वेगाचे गोलंदाज आले तशा त्यांच्या अडचणी वाढल्या. सचिननं काही ठरावीक चेंडू खेळता येत नसतील तर त्यावर मार्ग शोधला. वेळप्रसंगी ते चेंडू तो सोडू लागला. कांबळीचा आक्रमक स्वभाव मात्र त्याला तेच चेंडू खेळायला लावायचा आणि त्यात तो अडकत गेला.

शिवाय त्या काळात मधल्या फळीसाठी द्रविड, गांगुली, लक्ष्मण, सेहवाग असे फलंदाज बेंचवर असायचे. त्यामुळं संघात स्थान टिकवणं त्याला कठिण होत गेलं. त्यापाठोपाठ फिटनेस गेला आणि कारकिर्दीला उतरती कळा लागली."

कांबळीला प्रचंड मानसिक आधाराची गरज होती. त्याच्या आभावानेच तो यशाला गवसणी घालू शकला नाही. आताही त्याची प्रकृती ढासळण्यामागं मानसिक आधाराची कमतरता हेच कारण जाणवत असल्याचं डॉक्टरांनी दळवींना सांगितलं.

एकूणच कारणं काहीही असली तरी सचिनएवढीच प्रतिभा असतानाही 22 यार्डाच्या खेळपट्टीवरची कांबळीची इनिंग फारच छोटी ठरली. किमान या आजारपणाच्या चक्रातून बाहेर पडून त्यानं आयुष्याची खेळी सदाबहार करावी हीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)