'दारु अजिबात पिऊ नका'; कारण सांगत रुग्णालयात दाखल विनोद कांबळी यांचा चाहत्यांना सल्ला

फोटो स्रोत, Getty Images and ANI
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी ठाण्यातील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना आपल्या चाहत्यांना दारु अजिबात पिऊ नका, असा सल्ला दिला आहे.
यावेळी त्यांनी 'वुई आर द चॅम्पियन' असं गाणंही गायलं. ख्रिसमसबाबत काय सांगाल, असं विचारलं असता ते म्हणाले, "एन्जॉय करा, मात्र, डोक्यावर ताबा ठेवा. दारु अजिबात पिऊ नका. कारण, आई-वडिलांना ते बिलकुल आवडणार नाही."
दोन दिवसांमध्येच मी तुमच्यासमोर ठणठणीत उभा असेन, असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, विनोद कांबळींची मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पुढे सरसावली आहे.
एकनाथ शिंदे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी विनोद कांबळींची भेट घेऊन त्यांना पक्षाकडून सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
तसेच, श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडूनही विनोद कांबळी यांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. ही रक्कम पुढील आठवड्यात सुपूर्द केली जाईल, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली.
एएनआयशी बोलताना विनोद कांबळी म्हणाले, "माझी तब्येत हळूहळू सुधारत आहे." चाहते वाट पाहत आहेत यावर ते म्हणाले, "मी क्रिकेट सोडलं नाहीये आणि सोडणारही नाही. कारण, मी इतक्या सेंच्यूरीज आणि डबल सेंच्यूरीज केल्या आहेत, ते मला सगळं आठवतं. आमच्या कुटुंबात आम्ही तिघे डावखुरे आहोत. मी सचिन तेंडुलकरचा आभारी आहे. कारण, त्याच्या सदिच्छा माझ्यासोबत नेहमीच राहिलेल्या आहेत."
डॉक्टरांनी काय म्हटलं?
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी, विनोद कांबळीला नेमका काय त्रास होतो आहे याची माहिती दिली.
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर ठाण्यातील आकृती या एका खासगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर विवेक द्विवेदी यांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत.
विनोद कांबळीच्या तब्येतीबद्दल डॉक्टर विवेक द्विवेदी यांनी सांगितलं, "शनिवारी (21 डिसेंबर) संध्याकाळीच आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं होतं. त्यांना घरीच स्नायू आखडण्याचा त्रास होत होता आणि घाबरल्यासारखं वाटत होतं. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा त्यांना खूप ताप होता. शिवाय त्यांना चालायला त्रास होत होता."
डॉक्टर विवेक द्विवेदी म्हणाले की, "हॉस्पिटलमध्ये त्यांची तपासणी केली असता, त्यांच्या लघवीमध्ये संसर्ग झाल्याचं आम्हाला आढळलं. तसंच शरीरात सोडियम आणि पोटॅशियमची कमतरता झाल्यामुळे त्यांचे स्नायू आखडले होते."
"त्यांचं ब्रेन स्कॅन केल्यावर लक्षात आलं की त्यांच्या मेंदूमध्ये पूर्वीच्या रक्ताच्या गाठी आहेत. कारण अलीकडेच त्यांना स्ट्रोक आला होता. रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं."


डॉक्टर विवेक द्विवेदी यांनी हे देखील सांगितलं की आता त्यांची तब्येत स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तसंच फिजिओथेरेपी देखील सुरू आहे. 2-3 दिवसात त्यांना हॉस्पिटलमधून घरी पाठवलं जाईल.
21 डिसेंबरला तब्येत बिघडल्यामुळे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
सचिन आणि विनोदचा व्हायरल व्हीडिओ
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची मैत्री प्रसिद्ध आहे. ते अत्यंत जवळचे मित्र आहेत. अलीकडेच काही दिवसांपूर्वी या दोघांचा एक व्हीडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल झाला होता.
या व्हिडिओमध्ये सचिन आणि विनोद एकमेकांना भेटून बोलताना दिसत होते. सचिन आणि विनोद कांबळीसारखे गुणवंत क्रिकेटपटू घडवणारे त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याच कार्यक्रमातला सचिन आणि विनोदच्या भेटीचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.

फोटो स्रोत, ANI
या इव्हेंटमध्ये विनोद कांबळीनं त्याचे गुरु रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली देत एक गाणं देखील गायलं होतं.
तसं पाहता सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघेही बालपणातील मित्र आहेत. ते साधारण एकाच वयोगटातील आहेत. मात्र या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी शारीरिकदृष्ट्या खूपच अशक्त झाल्याचं आणि त्याची तब्येत चांगली नसल्याचं दिसतं आहे.
सचिन आणि विनोद यांच्या भेटीच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक कॉमेंट्स करण्यात आल्या होत्या. या दोघांच्या प्रवासावर युजर्सनी कॉमेंट्स केल्या होत्या.
2000 मध्ये विनोद कांबळी शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता. विनोद कांबळीच्या खेळाची तुलना अनेकदा त्याचा लहानपणीचा मित्र असलेल्या सचिन तेंडुलकरशी केली जाते.
व्हीडिओसंदर्भात सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्या होत्या?
विनोद आणि सचिन यांच्या भेटीच्या या व्हीडिओवर त्यांच्या चाहत्यांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.
एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर रुचि कोक्चा या युजरनं लिहिलं होतं, "ज्याप्रकारे विनोद कांबळीनं सचिनला स्पर्श केला ती बाब खूपच दुखद आणि वेदनादायी होती."
मनू या आणखी एका युजरनं हा व्हीडिओ शेअर करत लिहिलं होतं, "आश्चर्यकारक! सचिन तेंडुलकरनं आपला जुना मित्र विनोद कांबळीला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र विनोदच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीनं त्यांना अडवलं."

फोटो स्रोत, Getty Images
आणखी एका युजरनं लिहिलं, "विनोद कांबळी होणं सोपी गोष्ट नाही! यशस्वी होणं, मग सर्वकाही गमावणं आणि मग ज्या गोष्टीवर तुमचा देखील अधिकार होता त्या गोष्टींकडे तळमळून पाहणं."
"सचिन तेंडुलकर होणं देखील सोपं नाही. यशस्वी होणं, त्यानंतर सुद्धा यशाच्या झगमगाटात वाहून न जाता परिश्रम करत राहणं. मार्ग देखील तुमचा, ध्येय देखील तुमचं."
आणखी एका युजरनं या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत लिहिलं, "हे खूप वेदनादायी आहे. सचिन तेंडुलकरनं मुंबईतील एका इव्हेंटमध्ये त्याचा मित्र आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची भेट घेतली. या दोघांची सुरुवात एकाच ठिकाणाहून झाली होती, मात्र त्यांचं आयुष्य किती वेगळं आहे."
या दोन्ही माजी क्रिकेटपटूंच्या एका जुन्या डावाची आठवण करत एस.व्ही. सुंदर या युजरनं लिहिलं, "1994 साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या एका कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोघांनी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय खेळी केली होती."
तर यादवेंद्र यादव या युजरनं लिहिलं, "विनोद कांबळी आता 52 वर्षांचा आहे. मात्र त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली दिसत नाही."
सोशल मीडियावर अनेक युजर्सनी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीच्या क्रिकेट करियरची तुलना देखील केली होती.
विनोद कांबळीच्या क्रिकेट कारकीर्दीची धडाकेबाज सुरूवात

हे आकडे इतर कोणाचे नाहीत, तर अतिशय प्रतिभावान आणि डावखुरा फलंदाज असलेल्या विनोद गणपत कांबळी याच्या क्रिकेट करियरचे आहेत.
हा डावखुरा फलंदाज 29 ऑक्टोबर 2000 ला त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता. ते शारजामधील स्टेडियम होतं आणि समोर श्रीलंकेचा संघ होता.
हा सामना भारतीय क्रिकेट रसिक बहुधा विसरणंच अधिक पसंत करतील. या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करत भारतीय क्रिकेट संघाचा धुव्वा उडवला होता.
श्रीलंकन गोलंदाजांसमोर भारतीय संघानं अक्षरश: गुडघे टेकले होते. सर्व भारतीय संघ फक्त 54 धावांमध्ये बाद झाला होता.
या सामन्यात विनोद कांबळीला फक्त तीन धावा काढता आल्या होत्या. इतरही फलंदाजांची अवस्था अशीच होती. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, युवराज सिंह सारखे फलंदाज देखील झटपट बाद झाले होते. भारतीय संघात फक्त रॉबिन सिंहनं दोन आकडी धावा केल्या होत्या.
सौरभ गांगुली या सामन्याच्या वेळेस भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता. या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
मात्र नऊ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या विनोद कांबळीसाठी हा शेवटचा सामना ठरला होता. विनोदसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे कायमचे बंद झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झालेली शानदार एंट्री आणि त्यानंतर काही वर्षातच प्रचंड अपयश येण्याचे अनेक किस्से, कहाण्यांचे उल्लेख क्रिकेट मासिकांमध्ये मोठ्या संख्येनं आहेत. मात्र विनोद कांबळीची कहाणी या सर्वांपेक्षा वेगळी आहे.
विनोद कांबळीच्या क्षमतेची, प्रतिभेची तुलना नेहमीच शालेय जीवनातील त्याचा मित्र असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली जाते.
या दोघांच्या मैत्रीची आणि त्यांच्या खेळाची चर्चा कितीतरी वेळा वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये छापली गेली आहे. त्यावर बरंच लिहिलं आणि बोललं गेलं आहे. खास करून त्यांच्या एका खेळीची सतत चर्चा होत असते.
ती म्हणजे हॅरिस शील्ड ट्रॉफी मधील या दोघांच्या विक्रमी भागीदारीची. तेव्हा सचिन 15 वर्षांचा होता तर विनोद 16 वर्षांचा होता. या सामन्यात दोघांनी 664 धावांची नाबाद भागीदारी केली होती... त्यात विनोदनं 349 धावा केल्या होत्या तर सचिननं 326 धावा केल्या होत्या.
फारच लवकर का संपली विनोदची कारकीर्द?
मात्र ही गोष्ट कदाचित फार थोड्या लोकांना माहित असेल की त्याच सामन्यात विनोदनं गोलंदाजीत देखील कमाल केली होती. त्यानं 37 धावा देत 6 गडी बाद केले होते. बहुधा हेच कारण होतं, ज्यामुळे या दोघांचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्यासह क्रिकेटचे अनेक जाणकार सचिन आणि इतर खेळाडूंपेक्षा विनोदला अधिक प्रतिभावान मानायचे.
पण मग असं काय झालं, ज्यामुळे विनोद कांबळीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला ग्रहण लागलं, ती इतक्या झटपट संपली.

फोटो स्रोत, ANI
विनोदच्या म्हणण्यानुसार त्याची कारकीर्द अकाली आणि इतक्या लवकर संपण्यासाठी त्याचा कर्णधार, संघातील त्याचे सहकारी, निवड समिती आणि क्रिकेट मंडळ जबाबदार होते.
विनोदनं हा देखील आरोप केला की राजकारण आणि पक्षपातीपणामुळेच त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द इतक्या लवकर संपुष्टात आली.
असं असू शकतं विनोदच्या आरोपांमध्ये काही तथ्य असेल. मात्र क्रिकेट विश्लेषकांनी या आरोपांपेक्षा या जबरदस्त फलंदाजाची वर्तणूक, खेळाबद्दलचा त्याचा दृष्टीकोन, परिस्थितीनुसार आपल्या खेळात बदल न करता येणं या गोष्टींमुळे विनोदच्या कारकीर्दीचा 'द एंड' झाल्याचं म्हटलं.
कसोटी क्रिकेटमधील करिअर
क्रिकेट समालोचक आणि लेखक हर्षा भोगले यांनी आयआयएम अहमदाबादच्या एका कार्यक्रमात सांगितलं होतं, "जेव्हा तुम्ही एका विशिष्ट टप्प्याच्या पुढे जाता तेव्हा तुमच्या प्रतिभेचं महत्त्व राहत नाही. तिथे इतर घटक महत्त्वाचे ठरतात. असं विनोदसह अनेक प्रतिभावान क्रिकेटपटूंच्या बाबतीत झालं आहे."
"या खेळाडूंच्या समोर जेव्हा आव्हानं निर्माण होतात, पुढचा मार्ग दिसत नाही, तेव्हा आता नेमकं काय करायचं हे त्यांना कळत नाही. कारण यशासाठी त्यांनी कधीही संघर्ष केला नव्हता. त्यांनी नेहमीच त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर यश मिळवलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
विनोद कांबळीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बदलांप्रमाणे स्वत:मध्ये बदल करता आले नाहीत. 1994 मध्ये कर्टनी वॉल्शसारख्या जलदगती गोलंदाजांविरुद्ध खेळणं त्याला कठीण होऊन बसलं.
हर्षा भोगले म्हणतात, "अशावेळी विनोदला हे माहितच नव्हतं की आता काय करायचं आहे. कारण आतापर्यंत त्याची प्रतिभाच त्याच्यासमोरच्या प्रत्येक अडचणीतून मार्ग काढत होती."
अत्यंत वेगानं खांद्यापर्यंत उसळी घेत येणाऱ्या या चेंडूंना कसं खेळायचं यावर विनोदला मार्ग सापडला नाही आणि कसोटी क्रिकेटचे दरवाजे त्याच्यासाठी बंद झाले.

फोटो स्रोत, Getty Images
'गरज होती तेव्हा सचिन मदतीला आला नाही'
1995 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर विनोदचं एकदिवसीय सामन्यासाठी संघातील स्थान देखील अनिश्चित राहिलं. तो कधी संघात असायचा कधी नसायचा. विनोदनं 9 वेळा कमबॅक केलं. मात्र सचिनप्रमाणे तो भारतीय संघात स्वत:चं कायमस्वरुपी स्थान निर्माण करू शकला नाही.
नंतर मग असाही काळ आला जेव्हा त्याचा बालपणीचा मित्र असलेल्या सचिनशी असलेलं नातं देखील दुरावत गेलं.

फोटो स्रोत, Getty Images
2009 मध्ये 'सच का सामना' या एका रिअॅलिटी शो मध्ये विनोद कांबळी म्हणाला होता की भारतीय क्रिकेट संघात त्याच्याबरोबर भेदभाव झाला होता. तो म्हणाला होता की जेव्हा तो प्रतिकूल परिस्थितीतून जात होता तेव्हा सचिननं त्याची मदत करायला हवी होती.
बातम्यांनुसार समोर आलेल्या माहितीनुसार, "या शो मधून विनोदला 10 लाख रुपये मिळाले होते. नंतर विनोद असं देखील म्हणाला की, जेव्हा मला त्याची (सचिन) सर्वाधिक गरज होती तेव्हा त्याने माझी मदत केली नाही. त्यामुळेच रिअॅलिटी शो मध्ये मी असं म्हणालो."
विनोद भारतीय संघात आपल्याशी भेदभाव केल्याचा आरोप करत म्हटलं होतं की जर त्याचं रेकॉर्ड पाहिलंत तर असं लक्षात येईल की त्याला भारतीय संघातून बाहेर का काढलं तेच कळत नाही.
सचिनची निवृत्ती, फेअरवेल भाषण आणि विनोद
यानंतर सचिन आणि विनोद मधील अंतर वाढतच गेलं. इतकंच काय 2013 मध्ये सचिन जेव्हा क्रिकेटमधून निवृत्त झाला तेव्हा आपल्या निवृत्तीच्या भाषणाच्या वेळेस सचिननं विनोदचा उल्लेख देखील केला नाही. त्यानंतर विनोदनं सचिनशी असलेली मैत्री तोडल्याचं सांगत सर्वांनाच धक्का दिला होता.
विनोद म्हणाला होता, "मला खूप दु:ख झालं आहे. मला आशा होती की कमीत कमी आपल्या निवृत्तीच्या भाषणात तरी सचिन माझं नाव घेईल. ज्या डावामुळे आम्हा दोघांचं करियर सुरू झालं आणि सगळ्या जगाला सचिन आणि विनोद बद्दल कळालं. त्या 664 धावांच्या विश्वविक्रमी भागीदारीबद्दल तरी तो बोलेल असं मला वाटलं होतं. त्यानं याबद्दल बोलणं अपेक्षित होतं, कारण त्या भागीदारीत माझा देखील वाटा होता."

फोटो स्रोत, Getty Images
विनोद पुढे म्हणाला होता, "आपल्या निवृत्ती पार्टीमध्ये सचिननं क्रिकेट संघातील सर्व मित्रांना आणि कुटुंबातील सर्वांना बोलावलं होतं, मात्र मला बोलावलं नाही, हे मला दु:ख होण्यामागचं दुसरं कारण आहे. या गोष्टीमुळे मी खूपच दुखावलो गेलो आणि मला खूप वाईट वाटलं."
"मी वयाच्या 10 व्या वर्षापासून कौटुंबिक पातळीवर आणि व्यावसायिक पातळीवर सचिनच्या आयुष्याचा भाग राहिलो आहे. आम्ही सोबतच चांगले आणि वाईट दिवस पाहिले आहेत. मी नेहमीच त्याच्यासाठी हजर असायचो. मात्र आता मी एवढंच म्हणू शकतो की तो मला विसरला."
विनोद बद्दल सचिन काय म्हणाला?
सचिनबद्दल बोलून विनोद अनेकदा चर्चेत आला. मात्र सचिननं या आरोपांना उत्तरही दिलं नाही आणि त्यावर कोणती प्रतिक्रिया देखील दिली नाही.
2014 मध्ये मात्र टेलीग्राफ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सचिन इतकं म्हणाला होता की त्याच्यात आणि विनोदमध्ये मोठा फरक होता. तो फरक होता जीवनशैलीचा.

फोटो स्रोत, Getty Images
सचिन म्हणाला होता, "मी प्रतिभेबद्दल बोलणार नाही. कारण ते ठरवणं हे माझं काम नाही. मात्र जर आमच्यातील फरकाबद्दल बोलायचं तर मी म्हणेन की त्याची जीवनशैली वेगळी होती. आम्ही दोघे वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती होतो."
"वेगवेगळ्या परिस्थितीला आम्ही दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीनं तोंड दिलं. माझ्या बाबतीत सांगायचं तर माझ्या कुटुंबाचं सदैव माझ्यावर लक्ष होतं. त्यामुळे माझे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. विनोदबद्दल मात्र मला सांगता येणार नाही."
सचिन आणि विनोद
पुण्यात मे 2016 मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भारताचे माजी कर्णधार कपिल देव देखील म्हणाले होते की विनोदचं करियर संपण्यासाठी त्याची जीवनशैली जबाबदार होती.
कपिलनं देखील सचिन आणि विनोद या दोघांची तुलना करत म्हटलं होतं की, "त्या दोघांनी एकत्रच आपल्या करियरची सुरूवात केली. दोघांची प्रतिभा सारखीच होती. विनोद कांबळी कदाचित अधिक प्रतिभावान होता. मात्र त्याची सपोर्ट सिस्टम, त्याच्या घरातील वातावरण, त्याचे मित्र कदाचित सचिनपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
"नंतर काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. सचिन देशासाठी 24 वर्षे क्रिकेट खेळला आणि विनोद गायब झाला. कारण आपल्या करियरच्या सुरुवातीलाच मिळालेलं यश विनोदला पचवता आलं नाही. तो अपेक्षा पूर्ण करू शकला नाही."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











