एक रस्ते अपघात...एका क्रिकेटपटूचा मृत्यू...जो बचावला तो बनला जगातला सर्वोत्तम ऑल राउंडर

टॉम ड्यूडनी-गॅरी सोबर्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टॉम ड्यूडनी-गॅरी सोबर्स
    • Author, प्रदीप कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

क्रिकेटपटू ऋषभ पंतचा काही दिवसांपूर्वी मोठा अपघात झाला होता. गंभीर असलेला पंतची प्रकृती आता स्थिर असून त्याला काही धोका नाहीये. ही केवळ त्याच्या कुटुंबियांसाठीच नाही तर संपूर्ण भारतीय क्रिकेटसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे.

दिल्ली ते डेहराडून असा प्रवास करत असताना ऋषभची गाडी ताशी 150 किमी वेगात सुसाट होती. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पण नशीब बलवत्तर म्हणून त्याला वेळीच मदत मिळाली. आता त्याची प्रकृती ठीक आहे.

अशा अपघाताने एखादया क्रिकेटपटूच्या आयुष्यातील कोणत्या कोणत्या गोष्टी बदलू शकतात हे जाणून घ्यायचं असेल तर 63 वर्षांपूर्वी घडलेल्या एका अपघाताविषयी जाणून घ्यायला हवं.

क्रिकेटविश्वात घडलेला हा असा एक अपघात होता ज्यात एका ऑल राऊंडर क्रिकेटपटूचा मृत्यू झाला, तर गाडीचं स्टेअरिंग हातात असणारा दुसरा क्रिकेटपटू पुढे जगातील महान अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढं आला.

6 सप्टेंबर 1959 रोजी रेडक्लिफहून लंडनकडे येणाऱ्या रस्त्यावर स्टॅफोर्डशायरजवळ हा अपघात झाला. या कारमध्ये तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. यातल्या एकाचा मृत्यू झाला, दुसरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा कधी दिसलाच नाही, पण तिसऱ्याने जे विक्रम रचले त्याची पुनरावृत्ती शक्य नाही.

या कारमध्ये वेस्ट इंडिजचे तीन क्रिकेटपटू प्रवास करत होते.

खरं तर चौघेजण या कारमधून प्रवास करणार होते, मात्र चौथा खेळाडू ठरलेल्या वेळेत आलाच नाही. यातले 2 क्रिकेटपटू म्हणजे कोली स्मिथ, टॉम ड्यूडनी होते.

ही घटना घडण्यापूर्वी कोली स्मिथ वेस्ट इंडिजकडून 26 कसोटी सामने खेळला होता. या 26 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 1331 धावा केल्या होत्या आणि फिरकी गोलंदाज म्हणून 48 विकेट घेतल्या होत्या.

हे आकडे पाहिल्यावर कोली स्मिथ कोणत्या पठडीतला खेळाडू होता त्याची लगेच कल्पना येते. समोर ऑस्ट्रेलिया सारखा तगडा प्रतिस्पर्धी असताना देखील स्मिथने पदार्पणातच शतक झळकावलं होतं. त्याच्या कारकिर्दीतील दुसरं आणि तिसरं शतक त्याने इंग्लंडच्या खेळपट्टीवर झळकावलं होतं. त्याने आपल्या बॅटची कमाल दाखवत 161 आणि 168 धावा केल्या होत्या.

गॅरी सोबर्स आणि कोली स्मिथ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गॅरी सोबर्स आणि कोली स्मिथ
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कारकिर्दीतील चौथं शतक त्याने दिल्लीतील फिरोजशहा झळकावलं होतं. त्यामुळे स्मिथ म्हटलं की, वेस्ट इंडिज क्रिकेटचा एक दमदार खेळाडू डोळ्यासमोर यायचा.

सोबर्सने त्याच्या आत्मचरित्रात लिहिलंय की, "एक दमदार ऑफ-स्पिनर म्हणून स्मिथ पुढं येत होता. मी हे खूप गांभीर्याने म्हणतोय कारण त्याच्यात टॉप क्लास ऑल राऊंडर बनण्याची क्षमता होती, कदाचित जगातील बेस्ट ऑल राऊंडर बनण्याची क्षमता असं आपण म्हणू शकतो."

कारमध्ये टॉम ड्यूडनी हा दुसरा क्रिकेटर होता. उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या ड्यूडनीने आपल्या कारकिर्दीत वेस्ट इंडिजसाठी नऊ कसोटी सामन्यांत एकूण 21 बळी घेतले होते.

क्रिकेटपटू होता रॉय गिलख्रिस्ट. त्याने वेस्ट इंडिजसाठी 13 कसोटी सामन्यात एकूण 57 बळी घेतले होते. गिलख्रिस्ट वेळेवर पोहोचला नसल्याने कार अपघातातून बचावला.

साहजिकच तिसरा क्रिकेटपटू कोण म्हणून तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली असेल, तर तिसऱ्या क्रिकेटपटूचं नाव होतं गॅरी सोबर्स.

हाच तो गॅरी सोबर्स ज्याने क्रिकेटचं मैदान गाजवलं. अपघात होईपर्यंत क्रिकेटच्या मैदानात चमत्कार दाखवणारा ऑल राऊंडर खेळाडू. त्याने कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठ्या इनिंगमध्ये नाबाद 365 धावांची खेळी केली होती. 27 कसोटी सामन्यांमध्ये त्याने सहा शतकांच्या मदतीने दोन हजारहून अधिक धावा काढल्या होत्या.

लंडनला येत असताना झाला अपघात

कोली स्मिथने वेस्ट इंडिजकडून चार शतकं झळकावली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोली स्मिथने वेस्ट इंडिजकडून चार शतकं झळकावली होती.

गॅरी सोबर्सने त्याच्या आत्मचरित्रात या अपघाताविषयी सविस्तर लिहिलंय.

तो लिहितो की, "दुसऱ्या दिवशी लंडन मध्ये एक चॅरिटी मॅच होणार होती. त्यात सहभागी होण्यासाठी आम्हाला लंडनला जायचं होतं. आम्ही चौघेही मॅचसाठी जाणार होतो. त्या दिवशी जवळपास तासभर आम्ही रॉय गिलख्रिस्टची वाट पाहिली. त्यानंतर आम्ही तिघांनीही लंडनला जाण्याचा निर्णय घेतला.

आम्ही अजून थोडावेळ वाट पाहिली असती किंवा वेळेवर निघालो असतो तर काय सांगावं, नशीब काहीतरी वेगळं असतं. पण भूतकाळात आपण डोकावू शकत नाही ना."

गॅरी सोबर्सच्या आत्मकथेतील या अपघातासंबंधीची पानं वाचल्यावर कळतं की, या प्रवासामध्ये तिघेही जणं मित्रांसोबत मौजमजा करताना जसं आपण जातो तसाच प्रवास करत होते. एक तास उशीर झाल्यामुळे आपल्याला लंडनमधलं ट्राफिक लागणार नाही, यामुळे ते तिघंही खूश होते.

‘द अदर सोबर्स दॅट वेस्ट इंडीज लॉस्ट’

आळीपाळीने गाडी चालवण्याबाबत तिघांमध्ये ठरलंही होतं. नॉटिंगहॅम शायरच्या रेडक्लिफ भागापासून लंडनला पोहोचण्यासाठी चार तासांचा वेळ लागत असे. सर्वात आधी कार कोली स्मिथने चालवली आणि काही अंतर कापल्यानंतर टॉम कार चालवू लागला.

जेव्हा गॅरी सोबर्सची पाळी आली, तेव्हा टॉम बाजूच्याच सीटवर बसला होता आणि कोली मागच्या सीटवर झोपला होता.

गॅरी सोबर्सने याबाबत लिहिलंय की, “आम्ही स्टाफोर्डशायरमध्ये ए-34 नंबर स्टोनजवळ होतो. सकाळचे 4.45 वाजले होते. रस्त्यात पुढे वळण होतं. मला समोर दोन लाईट्स येताना दिसल्या आणि माझ्याकडे काहीही करण्यास वेळ नव्हता. माझ्या डोळ्यांपुढे अक्षरश: अंधार पसरला.”

“मला केवळ इतकंच आठवतंय की, धडक बसल्याचा आवाज झाला. नंतर मला लक्षात आलं की, जवळपास 10 टन गुरे वाहून नेणाऱ्या ट्रकला आमची कार धडकली होती. मी काही क्षण बेशुद्धावस्थेतच होतो.” “काही वेळानंतर जेव्हा मी शुद्धीत आलो, तेव्हा टॉम मोठ्याने किंचाळत त्याला वेदना होत असल्याचे सांगत होता. कोली जमिनीवर पडला होता. मी घाबरत घाबरतच विचारलं की, लिटल मॅन, हाऊ आर यू?” गॅरी सोबर्सनं लिहिलंय की, “कोलीने मला सांगितलं की, मी पूर्णपणे ठीक आहे. मग मी टॉमच्या जवळ गेलो आणि त्याची मदत करू लागलो. जोपर्यंत रुग्णवाहिका आली नाही, तोपर्यंत मी टॉमला दिलासा देऊ पाहत होतो. माझ्या मनगटाचं हाड तुटलं होतं, डोळ्यांजवळ खरचटलं होतं आणि डाव्या हातालाही जखम झाली होती.”

रुग्णालयात तिन्ही क्रिकेटर्सना वेगवेगळ्या खोलीत ठेवण्यात आलं होतं. सोबर्सला जाग आली, तेव्हा सर्वात आधी त्याने कोलीबाबतच विचारलं, टॉमबाबत नाही.

गॅरी सोबर्स

फोटो स्रोत, Getty Images

शक्यता अशी असू शकेल की, सोबर्स आणि कोली 1957 च्या इंग्लंड दौऱ्यापासूनच रूम पार्टनर होते.

सोबर्सने कोली स्मिथबाबत लिहिलंय की, “1957 साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना त्याच्या सल्ल्याचा मला फायदा झाला होता. मला चुकीच्या अंपायरिंगचा सामना करावा लागत होता आणि त्याच्या सल्ल्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत झाली. तो खूप धार्मिक व्यक्ती होता आणि त्याला चर्चमध्ये लेसन वाचणंही आवडायचं. आम्ही त्याला टीमचा मार्गदर्शकही म्हणायचो.” 

जेव्हा सोबर्सने कोलीबाबत विचारलं, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, कोली बेशुद्धावस्थेत आहे आणि त्याच्या पाठीचा कण्याला मार लागलाय. हे ऐकून सोबर्सला विश्वासच बसला नाही. तीन दिवसांपर्यंत डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. मात्र, डॉक्टर कोलीला ते वाचवू शकले नाहीत. 9 सप्टेंबरला कोली स्मित केवळ 26 व्या वर्षी हे जग सोडून गेला.

त्याच्या निधनानंतर वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष जे. एफ. डायरे यांनी म्हटलं होतं की, “कोली अशा प्रकारातला खेळाडू होता, जो खेळाला खेळ म्हणून खेळायचा. त्याचं उज्वल भविष्य होतं.” 

विस्डन क्रिकेट वृत्तपत्रानुसार, मेलबर्न क्रिकेट क्लबचे तत्कालीन असिस्टंट सेक्रेटरी एस. सी. ग्रिफिथ यांनी म्हटलं होतं की, “हे अत्यंत दु:खद आहे, कोलीच्या हृदयात भविष्यातील क्रिकेट होतं.” 

दुसरीकडे, सोबर्सला काळजीपूर्वक कार चालवली नसल्याच्या गुन्ह्याखाली 10 पाऊंडचा दंड ठोठावण्यात आला होता. या अपघाताना सोबर्सलाही मोठा धक्का बसला होता. सोबर्सला इंग्लंडविरोधातील सीरीजसाठी वेस्ट इंडीजला जायचं होतं. या सीरीजमध्ये कोली स्मिथचाही समावेश होता. मात्र, कोली स्मिथच्या मृत्यू झाला होता आणि सोबर्स मानसिकरित्या खेळण्याच्या अवस्थेत नव्हता. त्यामुळे तो वेस्ट इंडीजलाही परतू शकला नाही. 

कोली स्मिथच्या मृत्यूचा सोबर्सवर प्रचंड परिणाम झाला. सोबर्स दारूच्या आहारी गेला. सोबर्सने स्वत: लिहिलंय की, “जेव्हा आम्ही सोबत खेळत होतो, तेव्हा जास्त पित नव्हतो. त्याच्या मृत्यूनंतर मी माझं मद्यप्राशन वाढवलं. मी नशीबवान आहे की, याचा जास्त परिणाम माझ्या खेळावर झाला नाही. मात्र, रात्र रात्र जागून मी पित असे. मी रात्रभर जागा राहून पित बसत असे.” 

सोबर्सने लिहिलंय की, “माझ्या डोक्यात जे वादळ सुरू होतं, त्यामुळे तणाव वाढला होता आणि परिणामी माझं पिणं वाढलं होतं. स्कॉच असो वा ब्रँडी, मला कसलाच परिणाम होत नव्हता.”

सोबर्स जेव्हा या मानसिक अवस्थेतून जात होता, तेव्हा इंग्लंडमध्ये राहणारे वेस्ट इंडीजचे काही जुने खेळाडू त्याला रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होते. 

आपल्या वरिष्ठांच्या योगदानाबद्दल सोबर्सनं लिहिलंय की, “वेस्ट इंडीजचे माजी लेग स्पिनर आणि डॉ. सीबी बोर्टी क्लार्क यांनी मला यातून बाहेर काढण्याचं काम सुरू केलं आणि जैमकाचे आल्फ गोवर आणि स्टॅनली गुडरिच यांनी मिडलसेक्सच्या नेट्सवर माझा सराव घेतला.” 

काही काळानतंर सोबर्सला जाणीव झाली की, वेस्ट इंडीज क्रिकेटनं कोली स्मिथला गमावलं आहे आणि आपल्या मद्यप्राशनाच्या सवयीमुळे टीमचं आणखी नुकसान होतंय.

सोबर्सने आपल्या आत्मकथेत याबाबत लिहिलंय की, “मला हेही कळलं होतं की, आता मला गारफिल्ड सोबर्ससाठी खेळायचं नाहीय, तर माझ्या दोन लोकांची जबाबदारी पार पाडायची आहे, एक कोली स्मिथ आणि दुसरी माझी. या एका निर्णयानं माझं जीवन बदललं आणि माझ्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं टाकलं.” 

अपघाताच्या तीन महिन्यांनंतर सोबर्स वेस्ट इंडीजला पोहोचला आणि तिथं इंग्लंडविरोधात पहिला कसोटी सामना खेळवला जाणार होता. सोबर्सने या समान्याबाबत लिहिलंय की, “मला क्रीजवर उतरल्यावरच लक्षात आलं की, मला दोन लोकांसाठी खेळायचंय. तेवढं योगदान मला द्यायचंय. मी प्रत्येक धाव घेताना कोली स्मिथला आठवत होतो. जेव्हा फ्रेड ट्रुमनने माझा क्लीन बोल्ड केला, तोपर्यंत मी 226 धावा बनवल्या होत्या. काही आठवड्यांनंतर कोली स्मिथच्या होमग्राऊंडवर 147 धावांची खेळी केली. त्यानंतर तो कायम माझ्यासोबत राहिला.” 

सोबर्सच्या बोलण्यात विश्वास आणि वजन दिसतो, कारण त्यानंतर तो मोठ्या कालावधीसाठी क्रिकेट खेळला. त्याने सरासरी चांगली राखली. 93 कसोटी सामन्यांमध्ये 8 हजारहून अधिक धावा केल्या आणि अपघातानंतर कसोटी सामन्यात 200 हून अधिक विकेट घेतल्या. एकूण 235 विकेट्स सोबर्सच्या खात्यात आहेत. सोबर्सची गणती जगातील महान ऑलराऊंडर्सच्या यादीत होते. 

सोबर्स आता वयाच्या 87 व्या वर्षात आहेत. ते क्रिकेटशी संबंधित अनेक कार्यक्रमांमध्ये दिसतात. तर टॉम ड्यूडनी हे 89 व्या वर्षात आहेत. 

दुसरीकडे, जेव्हा कोली स्मिथचा मृतदेह जमैकाला पोहोचला, तेव्हा विस्डन आणि ईएसपीएन क्रिक इन्फोनुसार, त्याच्यावर अंत्यस्कारासाठी 60 हजार लोक जमा झाले होते. कोली स्मिथ याच्या क्षमतेवर लोकांचा किती विश्वास होता, हेच या संख्येतून दिसून येतं.

जमैकामधील पत्रकार कॅन चॅपलिन त्यांच्या ‘द हॅप्पी वॉरियर’ नामक पुस्तकात म्हणतात की, “जमैकाच्या पेन मेरी दफनभूमीत, जिथे कोली स्मिथला दफन केलं गेलं, तिथे, ‘कीन क्रिकेटर, अनसेल्फिश फ्रेंड, वर्थी हिरो, लॉयल डिस्पिल अँड हॅप्पी वॉरियर’ असं लिहिलंय.”

कोली स्मिथच्या आठवणीत त्यांच्या घराजवळील रस्त्याला कोली स्मिथ रोड असं नाव दिलंय. 

सोबर्स नेहमीच कोली स्मिथची आठवण काढतात. क्रिकेट जगतात आजही कोली स्मिथची आठवण काढत म्हटलं जातं की – ‘द अदर सोबर्स दॅट वेस्ट इंडीज लॉस्ट.’

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)