महेंद्रसिंग धोनी : क्रिकेट बॅटनंतर धोनीच्या हाती नांगर, पिकवतोय फळं आणि भाज्या

महेंद्र सिंह धोनी

फोटो स्रोत, Annad Dutta

    • Author, आनंद दत्त
    • Role, रांचीहून बीबीसी हिंदीसाठी

महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

Presentational grey line

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या काय करतोय?

या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात किंवा एका वाक्यात देणं अवघड आहे. शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटविश्वातून निवृत्ती घेतल्यानंतर आता वेगळ्याच क्षेत्रात काम सुरू केलं असून यातून त्याचाच नव्हे तर त्याच्या शेजाऱ्यांचाही फायदा होतो आहे.

अलीकडेच धोनीचं एक छायाचित्र व्हायरल झालं होतं. त्यात तो स्ट्रॉबेरी खाताना दिसत होता. त्याच्या स्वतःच्याच 43 एकर शेतामध्ये उगवलेलं ते फळ होतं.

या शेतात स्ट्रॉबेरीव्यतिरिक्त अननस, सीताफळ, पेरू, पपई, कांदा, टॉमॅटो, भोपळा आणि मटार यांचीही लागवड केली जाते. त्याचप्रमाणे टरबूज, कोबी अशा पिकांचीही लागवड इथे होते. शिवाय चारही बाजूंनी आंब्याची झाडंदेखील लावलेली आहेत.

धोनी स्वतः शेती करतो का?

क्रिकेटच्या जगात उत्तम फलंदाजीसाठी आणि खास शैलीत सामन्याचा निकाल लावण्यासाठी धोनी ओळखला जातो. पण क्रिकेटच्या क्षेत्रातील तज्ज्ञ धोनी शेती क्षेत्रात उतरला तेव्हा त्याने शेतीमधील तज्ज्ञांचं मत विचारात घेतलं.

रांची जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावरील सेंबो गावात धोनीचं शेतघर आहे. तिथल्या शेतीचा सर्व कारभार शेतकी महाविद्यालयातून पदवी घेतलेले रोशन कुमार पाहतात.

धोनी के खेत की स्ट्रॉबेरी

फोटो स्रोत, Annad Dutta

बीबीसीशी बोलतान रोशन कुमार यांनी सांगितलं, "टाळेबंदीच्या काळात मी पलामू येथील जपला इथे माझं घर बांधत होतं. तेव्हा मला एक फोन आला आणि धोनीने बोलावल्याचं मला सांगण्यात आलं. मी हातातलं काम सोडून तिकडे गेलो. तेव्हापासून या शेतीची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे."

नवीन तंत्र आणि गोड स्ट्रॉबेरी

रोशन म्हणतात, "पहिल्याच भेटीत धोनीभय्यांनी एवढंच सांगितलं की, रोशन जमिनीच्या प्रत्येक कोपऱ्यात झाड असायला हवं, पण प्रत्येक कोपऱ्याचं स्वतःचं खास वैशिष्ट्यही राहावं, एवढं बघ. त्यामुळे आधी आम्ही जमीन नांगरून घेतली. त्यात सहा महिने गेले. त्यानंतर स्ट्रॉबेरी, टरबूज यांचं पीक घेतलं. भय्यांनी स्ट्रॉबेरीची चव पहिल्यांदा घेतली तेव्हा ते म्हणाले की, त्यांनी बऱ्याच देशांमधल्या स्ट्रॉबेरी चाखल्या आहेत, पण इथली चव त्याहून भारी आहे."

रोशन सांगतात, "टॉमेटॉच्या झाडाचं मूळ वांग्याच्या झाडाचं आहे. याला ग्राफ्टेड तंत्र म्हणतात. वांग्याचं मूळ टॉमेटॉच्या तुलनेत जास्त मजबूत असतं. त्यामुळे हे झाड जास्त काळ टिकतं, शिवाय या मुळांमध्ये पोषक तत्त्वं अधिक प्रमाणात शोषली जातात, त्यामुळे टोमॅटोचं उत्पादनही जास्त होतं. सर्वसाधारणतः टॉमेटॉचं झाड एक ते दोन महिन्यांमध्ये मरून जातं, पण इथे आम्ही चार महिने टॉमेटॉचं उत्पादन घेतो."

महेंद्र सिंह धोनी

फोटो स्रोत, Annad Dutta

रोश यांच्या म्हणण्यानुसार, "इथे पूर्णतः सेंद्रिय शेती होते. पण शेतीची सुरुवात पूर्णपणे सेंद्रिय शेतीने करता येत नाही, हे लक्षात घ्यायला हवं. हळूहळू सेंद्रिय शेतीच्या दिशेने पावलं टाकावी लागतात. म्हणूनच इथे गायी पाळल्या जातात, कोंबड्या, मासे बदक पाळण्याचंही काम केलं जातं. याला एकीकृत शेती असंही म्हणतात. म्हणजे शेतीउत्पादन आणि पूरक उत्पादनं एकाच ठिकाणी घेतली जातात."

"साक्षीजी इथे आल्या तेव्हा त्यांनी काही सल्ला दिला होता. शेतीसोबतच इथे सौंदर्यही टिकवावं, अशी काळजी घ्यायची सूचना त्यांनी केली होती," असं रोशन सांगतात.

जवळपासच्या गायींवरील औषधोपचारांची व्यवस्था

या शेतघराचे व्यवस्थापक कुणाल गौतम सांगतात, "शेतावर जवळपास 70-80 मजूर रोज काम करतात. सगळे आसपासच्या गावांमधले आहेत. मजुरीसोबतच इथे त्यांना शेतीची विविध तंत्र शिकवली जातात, जेणेकरून ते स्वतःच्या जमिनीवरही अशाच प्रकारे शेती करू शकतील."

जवळच्या एका तरुणाकडे निर्देश करून गौतम म्हणाले, "हे भय्याके (धोनीचे) डॉक्टर साहेब." डॉक्टर विश्वजीत इथे गायीगुरांची देखभाल करतात.

"एके दिवशी धोनीभय्यांनी बोलावलं आणि म्हणाले, 'डॉक्टर, इथल्या गायी, कोंबड्या यांची देखभाल कराच, शिवाय जवळपासच्या गावातील गायींचीही काळजी तुम्हालाच घ्यायची आहे.' त्यासाठी इथे लिफ्टिंग मशिन आणण्यात आलं. शिवाय, लकवा झालेल्या गायी आणि इतर प्राण्यांचाही बचाव करणं यातून शक्य होतं," असं विश्वजीत सांगतात.

कुणाल गौतम बोलत होते तेव्हा त्यांच्या जवळ एका कंपनीचे प्रतिनिधी बसले होते. एका शेतकी कंपनीची ती माणसं होती. धोनीच्या शेतावर आपल्याच कंपनीचं सामान विकत घेतलं जावं, यासाठी ते प्रयत्न करत होते.

विश्वजीत पुढे म्हणाले, "इथे सध्या ७० गायी आहेत. शिवाय गीर आणि देशी प्रजातीच्या गायी येणार आहेत."

देशी प्रजातींबद्दल धोनीने त्यांना खास सूचना केली आहे. "या सगळ्यांसाठी एक आधुनिक गोठा तयार करण्यात आला आहे. तिथे 300 गायी राहू शकतात. दिवसभर जवळपास 350 ते 400 लीटर दूध मिळतं. सध्या रांचीच्या बाजारपेठेत हे दूध विकलं जातं."

महेंद्र सिंह धोनी

फोटो स्रोत, Annad Dutta

गायींव्यतिरिक्त तीन म्हशी आहेत. शिवाय, मध्य प्रदेशातील झाबुआमधून कडकनाथ कोंबड्या आणल्या जाणार आहे. बर्ड फ्लूसंबंधी वार्ता आल्यामुळे या उपक्रमाला उशीर झाला, पण लवकरच या कोंबड्याही इथे दाखल होतील. येत्या 15 दिवसांत 200 तीतर पक्षीही इथे आणले जाणार आहेत. इथल्या छोट्या तलावात मासे पाळण्यात आले आहेत.

धोनी आपल्याला गायी पाळण्यासाठी देणार आहेत, असं मजुरांनी सांगितलं

दिल्लीसह देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी अनेक क्रिकेटरांनी केलेली ट्विट सध्या चर्चेत आहेत. पण 'कॅप्टन कूल' यावर अजून काही बोललेला नाही.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी बहुतांश वेळ रांचीतील त्याच्या घरी घालवतो. या दरम्यान कधी तो शेतावर ट्रॅक्टर चालवतो, तर कधी स्ट्रॉबेरी खातानाची त्याची छायाचित्रंही प्रसिद्ध झाली आहेत.

धोनीच्या शेतावर काम करणाऱ्या जसिंता कुजूर जवळच्याच जराटोली गावात राहतात. कुजूर सांगतात की, त्या इथेच धोनीला भेटल्या आणि त्यांनी सोबत फोटोही काढून घेतला. याच वेळी धोनी त्यांना म्हणाले की, त्यांनाही गाय पाळण्यासाठी मिळणार आहे. इथे दर दिवशी 200 रुपयांची मजुरी मिळते, असं जसिंता म्हणतात.

गायें

फोटो स्रोत, Annad Dutta

जसिंता यांच्यासह काम करणारी उपासना संगा (20) म्हणाली की, धोनी आले की आपल्याला सांगावं असं तिच्या मैत्रिणी म्हणतात, इथे येऊन धोनीसोबत फोटो काढायची उपासनाच्या मैत्रिणींची इच्छा आहे.

धोनीला सेंद्रिय शेतीचा ब्रँड अँबेसेडर करण्याची सरकारची इच्छा

रांचीमधील भाजी बाजारपेठेला लोक डेली मार्केट म्हणून ओळखतात. इथलं दहा बाय दहा फुटांचं एक छोटंसं दुकान गेला काही काळ ग्राहकांच्या आणि माध्यमांच्या आकर्षणांचा केंद्रबिंदू झालं आहे. या दुकानावर धोनीच्या शेताचा बॅनर लावलेला आहे आणि सोबत धोनीचं छायाचित्रदेखील आहे.

दुकानाचे मालक अरशद आलम म्हणतात, "इथे दिसतेय ती स्ट्रॉबेरी महेंद्रसिंग धोनी यांच्या फार्म हाऊसवरून आलेली आहे. रोज तिथून स्ट्रॉबेरी येते. नाव तर तुम्हाला माहीतच असेल. धोनीच्या नावामुळेच लोक इथला माल विकत घ्यायला येतात, पण माल चांगला आहे, म्हणून लोक विकत घेऊन जातात."

तिथे जवळ उभे असलेले एक छोटे दुकानदार दीपक सांगतात की, हे धोनीच्या फार्महाऊसवरून आलंय असं ग्राहकांना सांगितल्यामुळे लोकांचा प्रतिसाद जास्त येतो, शिवाय इथली गुणवत्ता चांगली आहेच.

रांचीतील लालपूर चौकात सकाळी-सकाळी सुमन यादव यांची गाठ पडली. त्यांचं दुधाचं काउंटर आहे. इथल्या काउंटरच्या मागेही 'ईजा फार्म'चं छोटंसं पोस्टर लावलेलं आहे.

यादव सांगतात, "गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून धोनी यांच्या शेतावरचं दूध मी विकायला लागलो." साहीवाल, फ्रान्स इथल्या फ्रिजियन प्रजातीच्या गायींचं दूध ते विकतात.

यात पाणी, पावडर, सिंथेटिक, औषध असा कोणताच पदार्थ मिसळलेला नसतो. धोनीच्या शेतघरावरून इथे रोज दूध येतं आणि मग यादव ते घरोघरी पोचवतात. ते पुढे सांगतात की, प्रत्येक वेळी धोनीशी त्यांचं बोलणं गाय आणि दूध यासंदर्भातच झालेलं आहे.

अलीकडेच झारखंडचे कृषी मंत्री बादल पत्रलेख म्हणाले होते की, महेंद्रसिंग धोनीने झारखंडमध्ये सेंद्रिय शेतीचा ब्रँड अँबेसेडर व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. परंतु, याला धोनी होकारार्थी उत्तर देतात की नाही, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)