महेंद्रसिंग धोनी: 'प्रत्येकाला एके दिवशी निवृत्त व्हायचंय, पण…' धोनीच्या निवृत्तीनंतर खेळाडू भावनिक

धोनी

महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलंय.

टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने टीम इंडियाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलं. धोनीनं भारताला 2007 मध्ये वर्ल्ड टी-20 चे विजेतेपद, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळवून दिलं.

"आतापर्यंत तुम्ही दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद, आज संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांपासून मी निवृत्त होतोय," या शब्दात धोनीनं शनिवारी (15 ऑगस्ट) इन्स्टाग्रामवरून निवृत्तीची घोषणा केली.

2004 मध्ये धोनीनं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत त्यानं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 10 हजार 773 धावा काढल्या आहेत. 350 सामन्यांमधली ही अकराव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. धोनी 90 कसोटी सामने आणि 98 टी-20 सामने खेळला आहे.

धोनीनं कसोटी सामन्यात 4 हजार 876 धावा केल्या आणि 2014 मध्ये कसोटी सामन्यांमधून निवृत्ती घेण्यापूर्वी भारताला ICC क्रमवारीत अव्वल स्थानावर नेले.

2007 साली कर्णधारपदाची धुरा खांद्यावर घेतलेल्या धोनी 2017 मध्ये कर्णधारपदावरून पायउतार झाला. वर्षभरानंतर संघाच्या 200 व्या एकदिवसीय सामन्याचे नेतृत्त्व करण्यासाठी तो परतला.

धोनी

फोटो स्रोत, BCCI

धोनीनं 322 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलं. यामध्ये 200 एकदिवसीय, 60 कसोटी आणि 72 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. त्याच्या नेतृत्वात भारतानं 110 एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळालेला असून त्याच्यापुढे केवळ ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग असून त्यानं 165 सामन्यांमध्ये विजयी नेतृत्व केलंय.

धोनीने आपली निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारताचा फलंदाज सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघात खेळलेल्या रैनाने 226 एकदिवसीय सामन्यांमध्ये 35.31 च्या सरासरीने 5 हजार 615 धावा केल्या. तो 18 कसोटी आणि 78 टी-20 सामने खेळला आहे.

धोनीच्या निवृत्तीवर दिग्गजांच्या प्रतिक्रिया

चेन्नई सुपर किंग्जबरोबर तीनवेळा आयपीएल जिंकणाऱ्या धोनीला माजी सहकारी, प्रतिस्पर्धी आणि चाहत्यांनी निवृत्तीनिमित्त संदेश आणि शुभेच्छा दिल्या.

सचिन तेंडुलकर : भारतीय क्रिकेटला तुझं योगदान अमूल्य आहे. 2011 साली तुझ्यासोबत वर्ल्ड कप खेळणं ही माझ्य आयुष्यातला सर्वोत्तम क्षण होता. तुझ्या दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली : प्रत्येक खेळाडूची कारकीर्द एकेदिवशी संपते. पण तुम्ही अत्यंत जवळून पाहिलेली व्यक्ती असा निर्णय जाहीर करते, तेव्हा अधिक भावनिक वाटतं. तू देशासाठी आणि संघासाठी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील. आपल्यातला आदर आणि आपुलकी कायम राहील. धन्यवाद !

धोनी

इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन : 2011 चा वर्ल्ड कप हा तेंडुलकरचा निरोप समारंभ असला, तरी त्या वर्ल्डकपचा सूत्रधार धोनीच होता. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अविश्वसनीय आहे. तो आतापर्यंतचा सर्वात उत्तम 'व्हाईट बॉल' कर्णधार आणि फिनिशर आहे. यावर कुणाचंही दुमत असून शकत नाही.

इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर : तू माझ्यासाठी एक हिरो आहेस. अविश्वसनीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल अभिनंदन एमएस धोनी! तुझा प्रतिस्पर्धी म्हणून खेळणं हा माझा सन्मान आहे असं मी समजतो.

भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री : तुझ्यासोबत ड्रेसिंग रुमचा भाग असणं आणि तुझी चांगली कामगिरी पाहणं हा बहुमान आणि सन्मान आहे. भारताच्या एका महान क्रिकेटपटूला सलाम. एन्जॉय. गॉड ब्लेस एमएस धोनी.

भारतीय स्पिनर रविचंद्रन अश्विन : महान खेळाडू नेहमीप्रमाणे त्यांच्या खास शैलीत निवृत्त होतात. देशासाठी तुझे योगदान मोठे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय, 2011 वर्ल्ड कप आणि चेन्नई विजय माझ्या कायम स्मरणात राहतील.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या : एकच 'महेंद्रसिंग धोनी' आहे. माझ्या करिअरसाठी कायम प्रेरणा देणाऱ्या माझ्या मित्राचे आणि मोठ्या भावाचे आभार. निळ्या जर्सीत तुझ्यासोबत आता खेळता येणार नाही. पण मला खात्री आहे तू कायम माझ्यासोबत राहशील आणि मला मार्गदर्शन करशील.

धोनी

फोटो स्रोत, BCCI

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह : मैदानावर तू कायम मित्र आणि मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहेस. तुला केवळ पाहून मी खूप काही शिकलोय आणि तुझ्या कारकीर्दीत माझा सहभाग होता याचा मला आनंद आहे. तुझ्या उल्लेखनीय कारकीर्दीसाठी अभिनंदन माही भाई. खूप साऱ्या आठवणींसाठी धन्यवाद.

अनिल कुंबळे : महान आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल अभिनंदन. तुझ्यासोबत खेळणं हा अभिमान होता. कर्णधार म्हणून तुझे शांत वर्तन कायम स्मरणात राहील. तुला खूप खूप शुभेच्छा.

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद अफ्रिदी : एक महान भारतीय क्रिकेटर आणि कर्णधार.

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन : रिटायरमेंट क्लबमध्ये स्वागत, एमएस धोनी. जादूई कारकीर्द!

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)